नोंदी

रोहित हरीप
गुरुवार, 19 जुलै 2018

रोल्स रॉईसची हवाई टॅक्‍सी
रोल्स रॉईस ही आलिशान चारचाकी बनविणारी शंभर वर्ष जुनी कंपनी. इंग्लंडमध्ये असलेली ही चारचाकी कंपनी जगातल्या सर्वांत महागड्या आणि आलिशान गाड्यांचे उत्पादन करते. वर्षाला फक्त साडेतीन ते चार हजार गाड्या विकणाऱ्या या कंपनीची आर्थिक उलाढाल मात्र अब्जावधीच्या घरात जाते.

रोल्स रॉईसची हवाई टॅक्‍सी
रोल्स रॉईस ही आलिशान चारचाकी बनविणारी शंभर वर्ष जुनी कंपनी. इंग्लंडमध्ये असलेली ही चारचाकी कंपनी जगातल्या सर्वांत महागड्या आणि आलिशान गाड्यांचे उत्पादन करते. वर्षाला फक्त साडेतीन ते चार हजार गाड्या विकणाऱ्या या कंपनीची आर्थिक उलाढाल मात्र अब्जावधीच्या घरात जाते.
या कंपनीची मालकी २००३ या वर्षापासून बीएमडब्लू या कंपनीकडे आली तेव्हापासून या कंपनीच्या तंत्रज्ञानात लक्षणीय सुधारणा झाली आहे. मोटार इंजिनाशिवाय ही चारचाकी कंपनी जेट विमानाची इंजिने, जहाजाची इंजिने, हेलिकॉप्टर इंजिने बनवणाऱ्या क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीने काही दिवसांपूर्वीच हवेत उडणारी टॅक्‍सी बनविणार आहोत अशी घोषणा केली. या दृष्टीने या कंपनीचे संशोधन सुरू आहे आणि पुढच्या दशकभराच्या काळात रोल्स रॉईसची पहिली हवाई टॅक्‍सी बाजारात उपलब्ध असेल अशी माहिती या कंपनीने जाहीर केली आहे.
जमिनीवरून हवेत सरळ रेषेत वर जाणारे वाहन बनवण्यासाठीचे खास इलेक्‍ट्रिक इंजिन यासाठी रोल्स रॉईसकडून विकसित करण्यात येत आहे. या हवाई टॅक्‍सीमध्ये चार ते पाच प्रवाशांना आरामात बसता येईल तसेच या टॅक्‍सीचा वेग ताशी अडीचशे मैल इतका असणार आहे. हॉलिवूडच्या सायन्स फिक्‍शन चित्रपटात अशा प्रकारच्या उडत्या तबकड्या आपण बघितल्या असतात. मात्र ही ‘कन्सेप्ट कार’ रोल्स रॉईस प्रत्यक्षात आणणार आहे. या प्रकारच्या हवाई टॅक्‍सी बनवण्यासाठी एअरबस, उबर यासारख्या इतर कंपन्या प्रयत्नशील आहेत. गुगलसारखी मातबर कंपनीसुद्धा त्यांना या कामी मदत करत आहे. मात्र त्यांचे काम अद्याप कागदावरच आहे.
रोल्स रॉईस कंपनीच्या हवाई कारचे हे डिझाईन फार्नबरो येथे भरविल्या जाणाऱ्या एअर शोमध्ये दाखवले जाणार आहे. हवाई टॅक्‍सीच्या या प्रोजेक्‍टसाठी रोल्स रॉईसकडून भागीदार शोधण्यासाठी चाचपणी सुरू आहे. रोल्स रॉईसच्या या हवाई टॅक्‍सीमुळे खासगी हवाई वाहतुकीचे एक नवे दालन लवकरच खुले होणार आहे.

प्रयोगशाळेतले ‘नॉनव्हेज’
विज्ञानाच्या मदतीने माणसाने केलेली प्रगती अफाट आहे. निसर्गाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीला माणसाने विज्ञानाच्या मदतीने पर्याय शोधून काढला. कृत्रिम अवयव असो, प्राण्यांचे केलेले क्‍लोनिंग, जेनेटिक बियाणे यांच्या माध्यमातून विज्ञानाने मानवी जीवन नेहमीच सुसह्य केले आहे. कृषी क्षेत्रातल्या हरित क्रांतीमुळे अन्नधान्याचे उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढले. मात्र भविष्यातल्या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्ष्यात घेता अन्नाच्या इतर स्रोतांचा शोध घ्यावा लागणार आहे हे नक्की. 
माणसाच्या या वाढत्या गरजा लक्ष्यात घेऊन प्रयोगशाळेत कृत्रिम मांस तयार करण्याचे प्रयत्न ‘मोसा मीट’ (Mosa Meat) या नेदरलॅंड देशातील कंपनीकडून पाच वर्षापूर्वी पहिल्यांदा करण्यात आले होते. हा प्रयोग यशस्वीसुद्धा झाला होता. मात्र तेव्हा आर्थिक पाठबळ नसल्याने हा प्रयोग थांबवण्यात आला होता. आता या कंपनीला तब्बल नव्वद लाख डॉलरचा आर्थिक निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे २०२१ पर्यंत ही कंपनी कृत्रिम पद्धतीने बनवलेले मांसाहारी हॅम्बर्ग बाजारात 
आणणार आहे अशी महत्त्वाकांक्षी घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. हा निधी ‘एम व्हेंचर्स’ आणि ‘बेल फूड’ या दोन कंपन्यांनी
उपलब्ध करून दिला आहे. जर्मनीस्थित एम व्हेंचर्स हे वाहन-उद्योग क्षेत्रातले एक मोठे नाव आहे, तर बेल फूड ही मांस प्रक्रिया क्षेत्रातील स्विर्झलॅंडमधील मोठी कंपनी आहे. या कंपनांच्या मदतीमुळे कृत्रिम मांसाहाराचा हा प्रयत्न प्रत्यक्षात येणार आहे. याआधी गुगल कंपनीचे सह-संस्थापक सर्जे ब्रीन यांनीदेखील ‘मोसा मीट’ कंपनीला दहा लाख डॉलरची मदत केली होती. 
जगातल्या पर्यावरणवाद्यांनी जगातली वाढती लोकसंख्या आणि त्यांच्या अन्नाची वाढती गरज याबाबत चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः चीन आणि आफ्रिकन देशांमध्ये मोठ्या प्रमाणात मांसाहार केला जातो. शाकाहारपेक्षा पोर्क, बीफ आणि चिकन यामार्फत प्रथिनांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जातो. हा मांसाचा पुरवठा करण्यासाठी प्राण्यांची भविष्यात कमतरता भासू शकते. तसेच या प्राण्यांना जो हिरवा चारा खाद्य म्हणून दिला जातो त्यामुळे ग्रीन हाउस गॅसेसच्या प्रमाणात वाढ होते. परिणामी तापमान वाढ होते. 
निसर्गाची हानी टाळण्यासाठी आणि अन्नाची कमतरता भरून काढण्यासाठी कृत्रिम मांसाहाराचा पर्याय उपयुक्त ठरू शकतो. पाळीव पशूंच्या पेशींपासून हे कृत्रिम मांस प्रयोगशाळेत तयार केले जाते. याची चव आणि रंगरूप हे खऱ्या मांसासारखेच असते. तसेच पोषणमूल्यांच्या बाबतीतही हे नैसर्गिक मांसापेक्षा सरस ठरले आहे. 

सौदर्याची बदलती व्याख्या...

सौंदर्याच्या ज्या काही रूढ व्याख्या आहेत, त्यात आजही गोऱ्या रंगाला महत्त्व दिले जाते. टीव्हीवर सौंदर्य प्रसाधनाच्या उत्पादनांच्या माध्यमातून कायम  ‘रंग कसा उजळेल ?‘ आपण गोरे कसे होऊ ? हेच प्रेक्षकांच्या मनावर ठसवले जाते. यावरून कळत नकळत सावळ्या रंगाला कायम दुय्यमच ठरवले जाते. मनात नकळत पेरल्या जाणाऱ्या वर्णभेदाच्या या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये दि अन रॉजर या पंचवीस वर्षीय कृष्णवर्णीय युवतीने ‘ग्रेट ब्रिटन मिस युनिव्हर्स’ हा किताब पटकावून नवा इतिहास रचला 
आहे. या स्पर्धेत ब्रिटनच्या विविध राज्यांतून आलेले चाळीस स्पर्धक सहभागी झाले होते. या सर्वांवर मात करत दि ॲन रॉजरने हा किताब पटकावला.
दि अन रॉजर ही मूळची कॅरेबियन बेटावरील ब्रिटिश वसाहतीतील रहिवासी असून, तिने बर्किंगहम विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. दि अन रॉजरने राष्ट्रकुल स्पर्धेत ॲथलेटिक्‍समध्ये ग्रेट ब्रिटनचे प्रतिनिधित्व केलेले आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तिला खेळ सोडावा लागला आणि ती मॉडेलिंगकडे वळली. आता मात्र मिस युनिव्हर्स ग्रेट ब्रिटन हा किताब पटकावीत तिने आपला निर्णय योग्य असल्याचे जगाला दाखवून दिले आहे. हा पुरस्कार पटकावल्यानंतर तिने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, ‘‘हा पुरस्कार मिळाल्यामुळे मला स्वतःचा खूप अभिमान वाटतो आहे. तसेच यामुळे सौंदर्याची व्याख्या बदलत आहेत असा संदेश सर्व जगात जाईल अशी खात्री आहे.’’ ब्रिटनमध्ये 
१९५२ पासून ही स्पर्धा आयोजित केली जाते. मात्र आजपर्यंत एकाही कृष्णवर्णीय युवतीने
या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला नव्हता. ही स्पर्धा जिंकून दि अन रॉजर आता मिस युनिव्हर्स या जागतिक स्पर्धेत ब्रिटनचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही स्पर्धा फिलिपिन्स येथे होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप या सौंदर्य स्पर्धेचे एकेकाळी आयोजक होते. 
दरवर्षीच्या वसंत ऋतूत ब्रिटनमध्ये ‘ग्रेट ब्रिटन मिस युनिव्हर्स’ ही स्पर्धा आयोजित केली जाते. अठरा ते अठ्ठावीस या वयोगटातील तरुणी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. फॅशन आणि मॉडेलिंग क्षेत्रातील नामवंत व्यक्ती या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम बघतात.
फ्रान्सच्या फुटबॉल संघातील कृष्णवर्णीय खेळाडूंचे वाढते प्रमाण असो किंवा दि अन रॉजरने पटकाविलेला हा मिस ब्रिटन युनिव्हर्सचा किताब असो; युरोपातील कृष्णावार्णियांबद्दलच्या जाणिवा बदलत आहेत हे चित्र नक्कीच आशादायक आहे. 

संबंधित बातम्या