पृथ्वीपेक्षा तिप्पट मोठा ग्रह

रोशन मोरे
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

नोंदी    
 

पृथ्वीपासून तब्बल ५३ प्रकाश वर्षे अंतरावर असणाऱ्या नव्या ग्रहाचा शोध लागला आहे. नासाच्या ट्रान्झिटिंग एक्‍झोप्लॅनेट सर्व्हे  (टीईएसएस) सॅटेलाइटने हा ग्रह शोधला आहे. या ग्रहाला एचडी २१७४९बी असे नाव देण्यात आले आहे. हा ग्रह आकाराला लहान असल्याचे संशोधकांचे मत असले तरी हा ग्रह पृथ्वीपेक्षा तिप्पट मोठा आहे. 

‘सूर्यासारख्या चमकदार ताऱ्याभोवती भ्रमण करणारा हा सर्वाधिक थंड लघुग्रह आहे, जो आपल्याला नुकताच माहीत झाला आहे,’ अशी माहिती या ग्रहाचा शोध लावणाऱ्या संशोधक टिमचे नेतृत्व करणाऱ्या डायना ड्रेगॉमिर यांनी दिली. डायना या एमआयटीच्या कावली इन्स्टिट्यूट फॉर ॲस्ट्रोफिजिक्‍स अँड स्पेस रिसर्चमधील संशोधक आहेत.

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ सध्या ट्रान्झिटिंग एक्‍झोप्लॅनेट सर्व्हे (टीईएसएस) मिशनच्या माध्यमातून आपल्या सूर्यमालेबाहेरील नव्या ग्रहांचा शोध घेत आहे. टीईएसएस मिशनच्या माध्यमातून सुमारे दोन लाख ताऱ्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या मोहिमेतून सुमारे दोन हजार ग्रह आणि संभावित ताऱ्यांचा शोध घेण्यात येईल, असा विश्‍वास संशोधक व्यक्‍त करत आहेत. या संशोधकांच्या मते यातील किमान ३०० ग्रह हे पृथ्वीइतके अथवा मोठ्या आकाराचे म्हणजे ‘सुपर अर्थ’ असतील. या ग्रहांचे टेलिस्कोपच्या मदतीने निरीक्षण करून जीवनाची शक्‍यता आणि अन्य वैशिष्ट्ये पडताळून पाहण्यात येणार आहेत.


फेसबुकवरील २५ कोटी खाती बनावट
लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट असणाऱ्या फेसबुक संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. फेसबुकवर असणाऱ्या एकूण खात्यांपैकी ११ टक्के खाती बनवाट आहेत. फेसबुकने आपल्या एका अहवालात स्पष्ट केले आहे, की फेसबुक असणाऱ्या खात्यांपैकी अंदाजे २५ कोटी खाती बनावट आहेत. २०१५ च्या तुलनेत बनावट खात्यांचे प्रमाण पाच टक्‍क्‍यांनी वाढल्याचेही फेसबुकने आपल्या अहवालात म्हटले आहे. आपल्या व्यावसायिक व राजकीय फायद्यासाठी अशी खाती तयार केली जात आहेत. राजकीय पक्षांकडून देखील मोठ्या प्रमाणात बनावट खाती तयार केली जात असल्याचे फेसबुककडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बनावट खात्यांवर बंधन कसे आणायचे याचा विचार फेसबुक टिमकडून केला जात आहे. त्यातच राजकीय पक्षांकडून आपली ओळख लपवून निवडणुकांमध्ये प्रचार केला जात आहे. हे रोखण्यासाठी फेसबुकवरील राजकीय जाहिराती कशा असतील याच्या रचनेत फेसबुकने बदल केले आहेत. या बदलानुसार फेसबुक युजर्स आता राजकीय जाहिराती ’पब्लिश्‍ड बाय’ किंवा ‘पेड फॉर बाय’ अशा डिस्क्‍लेमरसह पाहू शकतील. म्हणजेच ती जाहिरात कोणी दिली आहे, त्याबाबतचा स्पष्ट उल्लेख जाहिरातीखाली असणार आहे.  याव्यतिरिक्त फेसबुक एका जाहिरात लायब्ररीवरही काम करत आहे. त्यात युजर्स राजकारणाशी संबंधित या जाहिरातींबद्दल अधिक तपशीलवार माहिती जाणून घेऊ शकतील. जाहिरातीचा खर्च, जाहिरात किती लोकांनी पाहिली हे या लायब्ररीतून लोकांना कळेल. तसेच राजकीय जाहिराती बनवणाऱ्या व्यक्तींचे लोकेशनदेखील पाहता येणार आहे. ज्या फेसबुक पेजव्दारे जाहिरात केली जाते ते फेसबुक पेज नेमके कुठले आहे, ते यामुळे समजणार आहे. भारतात हे नवे नियम मार्च महिन्यापासून लागू होणार आहेत.


अंतराळवीर अवकाशात करणार मुक्काम
‘गगनयान’या इस्रोच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेची तयारी जोरदार सुरू आहे. इस्रोच्या बंगळुरूस्थित मुख्यालयात मानव अंतराळ उड्डाण (HSFC : Human Space Flight Centre)  उभारण्यात आले आहे. या केंद्रातून मोहिमेचे नियोजन, अभियांत्रिकी प्रणालीचा विकास, मोहिमेच्या चमूची निवड व प्रशिक्षण अशी सर्व कामे पहिली जाणार आहेत. या मोहिमेनुसार तीन भारतीय अंतराळवीर सात दिवस अंतराळात मुक्काम करणार आहेत. या मोहिमेसाठी केंद्र सरकारने दहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मानवाला अंतराळात पाठवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेसाठी भारताने रशिया आणि फ्रान्सबरोबर करार केला आहे.

दहा चाचण्या होणार
२०२२ पर्यंत ‘गगनयान’ अंतराळात पाठवणार असल्याचे इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी सांगितले आहे. त्याआधी २०२० आणि २०२१ मध्ये दोन मानवरहित यान अवकाशात पाठवण्यात येणार आहे. ही गगनयान मोहीम यशस्वी होण्यासाठी अंतराळात जाणाऱ्या व्यक्तीच्या कमीत कमी दहा चाचण्या घेण्यात येणार आहेत. याशिवाय इस्रोने ५० हून अधिक अवकाश मोहिम हाती घेतल्या आहेत. यासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद वाढवली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच इस्रोने ‘क्रू एस्केप सिस्टिम’ म्हणजे कॅप्सूलची यशस्वी चाचणी केली होती. या चाचणीनुसार अंतराळवीर आता त्यांच्यासोबत इतर लोकांना देखील अंतराळात घेऊन जाऊ शकणार आहेत.


पृथ्वीखाली सर्वांत मोठी प्रयोगशाळा 
विश्वाची निर्मिती कशी झाली, विश्व कशाने बनले आहे, कृष्णविवरे अस्तित्वात कशी आली आदींबाबत शास्त्रज्ञांनी केलेल्या भाकितासंबंधी व त्यांच्या उत्तरांसाठी मोठी प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.  ही नवी प्रयोगशाळा जमिनीखाली शंभर किलोमीटर परिघाच्या बोगद्यात असणार आहे. तिथे पॉझिट्रॉन नावाचा मूलकण (इलेक्‍ट्रॉनचा प्रतिकण) व इलेक्‍ट्रॉनचे झोत परस्परविरोधी दिशेने आणि प्रकाशवेगाने पाठवून त्यांच्या धडक घडवण्यात येणार आहेत. अशी माहिती युरोपियन सेंटर फॉन न्युक्‍लिअर रिसर्च (सर्न) या संस्थेने आपल्या अहवालात दिली आहे. अत्याधुनिक उपकरणांच्या साह्याने या टकरींचा अभ्यास केल्यास नव्या मूलकणांचे अस्तित्व सिद्ध होऊ शकेल, असे शास्त्रज्ञांना वाटते. अशीच प्रयोगशाळा आधी फ्रान्स आणि स्वित्झर्लंड या देशांच्या दरम्यान जमिनीखाली २७ किमी परिघाच्या एका बोगद्यात उभारण्यात आली होती. या प्रयोगशाळेसाठी पाच अब्ज डॉलर खर्च आला होता. त्याचा वार्षिक देखभाल खर्च एक अब्ज डॉलर होता. लार्ज हॅड्रॉन कोलायडर (एलएचसी) हे नाव असलेल्या या प्रयोगशाळेत धनभारित मूलकणांचे (प्रोटॉन) झोत जवळजवळ प्रकाशवेगाने, परंतु विरुद्ध दिशेने सोडले जातात. ते असंख्य वेळा धडकतात. या टकरीतून मिळणाऱ्या किंवा बाहेर पडणाऱ्या उर्जेच्या मात्रेस अज्ञात मूलकणांच्या अस्तित्वाचे पुरावे समजले जाते. एलएचसी २०१३ पासून कार्यरत असून, ही प्रयोगशाळा अद्ययावत करण्यासाठी दोन वर्षे बंद राहणार आहे. काही शास्त्रज्ञांनुसार आणखी काही मूलकण शोधण्यासाठी ही प्रयोगशाळा उपयोगी पडत नसल्याने सध्याच्या एलएचसीपेक्षा मोठी व त्याहूनही सक्षम प्रयोगशाळा उभारावी अशी मागणी काही शास्त्रज्ञांनी केली आहे. त्यानुसार आता नवीन प्रयोगशाळा उभी राहणार आहे. या नव्या प्रयोगशाळेतून विश्‍व कसे निर्माण झाले? हे कोडे उलगडण्यास मदत होईल.

संबंधित बातम्या