वात्सल्यपूर्ण संगोपन

वर्षा मराठे
गुरुवार, 22 मार्च 2018

परिसर

लहान मुलांना सांभाळणे ही सुद्धा एक कला आहे. त्यांचा चंचलपणा, सवयी, खाण्यापिण्याच्या सवयी यामध्ये बरीच विविधता असते. त्यामुळे त्यांना एकत्र सांभाळणे ही त्या बाईंची जबाबदारी असते. वस्त्यांमध्ये राहणारे आईवडील कामाला गेल्यावर घरातील लहान मुलांच्या संगोपनाचा आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतो. या लहान मुलांकडे नेहमीच दुर्लक्ष होत असते. 

गरिबीमुळे मुलांच्या बालपणावर परिणाम होतो तसेच शिक्षणापासून वंचितही ते राहतात. जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना हा प्रश्न नेहमीच भेडसावत असतो.या घटकांना आधार देण्यासाठी 'अन्नपूर्णा परिवार' या स्वयंसेवी संस्थेतर्फे 'वात्सल्यपूर्ण स्वयंरोजगार सेवा को ऑपरेटिव्ह सोसायटी'ची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेमार्फत पुणे आणि मुंबई येथील वस्त्यांमधील पाळणाघराची योजना गेल्या अनेक वर्षांपासून राबवली जात आहे. आजमितीला पुणे, मुंबईतील वेगवेगळ्या वस्त्यात एकूण २० पाळणाघरे सुरू आहेत. या पाळणाघरांमुळे वस्तीतील दोन महिलांना वस्तीतच रोजगार मिळाला आहे. या महिलांना वात्सल्यपूर्ण संस्थेकडून मुलांच्या शारीरिक, भाषिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक विकासाचे प्रशिक्षण दिले जाते. या दोन महिला आपल्याच वस्तीतील इतर महिलांची मुले सांभाळतात त्यामुळे त्या मुलांच्या आया कामाला जाऊ शकतात. यामुळे वस्तीतील प्रत्येक महिलेचा आर्थिक, सामाजिक स्तर उंचावण्यास मदत होत आहे. वस्तीतील महिलेसोबत तिच्या संपूर्ण कुटुंबाचा विकास करून 'कुटुंब सक्षम बनविणे' हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. 

या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या महिलांचे अनुभव अतिशय सुखद आहेत. अप्पर इंदिरानगर येथे राहणाऱ्या मीना ताई यांनी ४ वर्षांपूर्वी भाड्याच्या खोलीत पाळणाघर सुरू केले होते. त्यानंतर अन्नपूर्णा संस्थेकडून आर्थिक मदत घेऊन त्या मदतीत स्वतःच्या नव्या घरी त्यांनी पाळणाघर सुरू केले. आज त्यांना या योजनेमुळे दरमहा दहा हजारापेक्षा जास्त उत्पन्न मिळत आहे. असाच अनुभव गोसावी वस्ती कोथरूड येथे पाळणाघर चालवणाऱ्या निर्मला ताई यांचा आहे. गेल्या ८ वर्षांपासून त्या पाळणाघराचे काम पाहत आहेत. अन्नपूर्णा परिवारातर्फे मिळालेल्या मदतीतून त्यांनी त्यांच्याच वस्तीत पाळणाघरासाठी सुसज्ज वास्तू उभारली. निर्मला ताईंच्या कामाची वाखाणणी अनेक पालकांनी केली आहे. मुलेही त्यांच्याकडे आनंदाने राहतात तसेच दिवसेंदिवस त्यांच्याकडे येणाऱ्या मुलांची संख्या वाढत आहे. 

या पाळणाघरांमुळे वस्तीतील १ ते ६ वयातील मुले पाळणाघरात साधारणतः १० ते ११ तास असतात. या दहा -अकरा तासात मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. मुलांवर चांगले संस्कार व्हावे यासाठी विशेष काळजी घेतली जाते. तसेच मुला मुलींच्या सुरक्षितते सोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी देखील घेतली जाते. येरवडा येथे असलेल्या पाळणाघरात संस्थेतर्फे पालकसभेत फी वाढीसाठी प्रस्ताव ठेवण्यात येतो. पालकांच्या समस्या आणि बाजू लक्षात घेऊन पालकांकडूनच यावर निर्णय घेण्यात येतो. गेल्यावर्षी या सभेत पालकांनी एकमताने शुल्कात ८० रुपयांच्या वाढीला मान्यता दिली. यावेळी काही पालकांनी दिलेली प्रतिक्रिया पाळणाघराच्या आणि या महिलांच्या कामाची पावती होती .एक पालक म्हणाले, की तुम्ही आमच्या मुलांना एवढ्या काळजीने १०-११ तास सांभाळता, बाहेर याकामासाठी हजारो रुपये घेतले जातात, अशा वेळी ही शुल्कवाढ करायला काहीच हरकत नाही किंबहुना यातून आमच्याच मुलांना सुविधा पुरवली जाणार असल्याने त्याचा विनियोगही चांगलाच होईल याची आम्हाला खात्री आहे. या शुल्कातून पाळणाघरात असलेल्या मुलांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाते. यासाठी संस्थेने मुलांची 'आरोग्य निधी योजना' सुरू केलेली आहे.सद्यःस्थितीत पाळणाघरे महिलांनी स्वत:च्या राहत्या घरात सुरू आहेत. ज्यावेळी वस्तीत पाळणाघरे नव्हती त्यावेळी मुलांवर अत्याचार होणे, वाईट संस्कार होणे, चुकीच्या सवयी लागणे तसेच घरातील मोठ्या भावंडांचे विशेषत: घरातील मुलींचे शिक्षण अर्ध्यातून सुटत होते. याचा परिणाम त्यांच्या भविष्यावरही होत होता. आता मात्र या पाळणाघरांमधील मुलांची शारीरिक, भाषिक, भावनिक, बौद्धिक कौशल्ये वाढवली जातात त्यामुळे मुलांचा सामाजिक विकास होण्यासही मदत होत आहे. तसेच पूर्व-प्राथमिक शिक्षणची तयारी करून घेतली जाते आणि एक चांगला नागरिक घडवण्याचे काम ही पाळणाघरे 

करत आहेत. पुढील नवी पिढी शिक्षित व सुसंकृत करण्याचे काम 'अन्नपूर्णाची वात्सल्यपूर्ण योजना' करीत आहे. अन्नपूर्णा परिवाराच्या या अभिनव उपक्रमामुळे केवळ या मुलांची सुरक्षाच नव्हे तर वस्तीतील महिलांचे आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि सक्षमीकरणही होत आहे. म्हणूनच अन्नपूर्णा परिवार या संस्थेची ‘वात्सल्यपूर्ण योजना’ हजारो लोकांच्या आशेचा किरण आहे.

संबंधित बातम्या