प्रतापगड परिक्रमा

डॉ. अमर अडके, दुर्ग अभ्यासक
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

पर्यटन

एक दिवस भल्या सकाळी पोलादपुराहून प्रकाशचा फोन आला, ‘सर, मुलांना घेऊन प्रतापगड परिक्रमा केली. तुम्ही केव्हा येताय? मधली वाटही साफ करून ठेवलीय.’

मनात खोल कुठंतरी दडून बसलेला विषय उसळी मारून वर आला. प्रतापगडच्या पायथ्याशी अफझल खानाचा निःपात केल्यानंतर अवघ्या जावळीच्या खोऱ्यात मावळ्यांनी एकच एलगार केला आणि आदिलशाही सैन्याचं पारिपत्य केलं. अवघ्या जावळी खोऱ्यात स्वराज्याचे हे शूर मावळे कुठं आणि कसे दबा धरून बसले असतील, ती मेटं, जंगलातल्या त्या जागा, अरण्यसंगराचा तो त्वेष या साऱ्यांविषयी विशेषतः त्या संग्रामाच्या भूगोलाविषयी विलक्षण कुतूहल गेली कित्येक वर्षं मनामध्ये होतं आणि या ओढीनं महाबळेश्वरपासून उमरठपर्यंत, तायघाटापासून मधुमकरंद गडापर्यंत अवघं जावळीचं खोरं अक्षरशः वेड्यासारखा भटकलो...

कधी वाई ओलांडून जोरच्या बाजूनं बहिरीच्या घुमटीकडून आर्थरसीट, कधी उलट्या बाजूनं चंद्रगड, कधी उमरठकडून दाभीळ टोकाच्या बाजूनं प्रतापगड, कधी कुडपण शेलारखिंड करून मूळ रामवरदायीनीच्या बाजूनं प्रतापगड, कधी किन्हेश्‍वराच्या मागील बाजूनं जुन्या रडतोंडी घाटाच्या खुणांवरून थेट जनीचा टेंभ, कधी वाईच्या अंगानं जुन्या पसरणी वाटेवरून तायघाट, मग क्षेत्र महाबळेश्‍वर, कधी अफझल खान ज्या वाटेनं वाईतून प्रतापगडाच्या पायथ्याशी आला, त्या वाटेचा मागोवा घेत तायघाट - गुरेघर क्षेत्र महाबळेश्‍वर - मेटतळे - रडतोंडी - पार - जनीचा टेंभ असा अनेक वाटांनी प्रतापगडी पोचलो. 

जावळीच्या खोऱ्यातून अशा वाटांनी प्रतापगडी पोचताना अफझल पारिपत्यानंतरच्या या परिसरातील युद्धाचा विचार सारखा मनात फिरायचा. ते दबा घरून बसलेले मावळे, त्यांच्या जागा, इशाऱ्यानंतर त्यांनी केलेले हल्ले या सगळ्या इतिहास आणि भूगोलाचा विचार पाठ सोडायचा नाही. 

मग टिपणं सुरू झाली. जागांचा भूगोल अभ्यासणं सुरू झालं आणि अरण्यात दडलेली एकेक युद्धभूमी, एकेक मेट, एकेक मोर्चा समोर येऊ लागला... आणि मग हळूहळू या जागा सांधणाऱ्या मोहिमा सुरू झाल्या. टप्प्याटप्प्यांनी प्रतापगडाच्या आसमंताची प्रदक्षिणा आकाराला येऊ लागली. पण मधेच इतर मोहिमा, काही अडचणी यात प्रदक्षिणा पूर्ण होत नव्हती... आणि आज मुलांची हाक आली, ‘सर, परिक्रमेला केव्हा येताय? अवघड जागी रान साफ करून आलोय.’ प्रतापगडाच्या पायथ्याच्या भूमिपुत्रांनी प्रतापगडाला गवसणी घातलीच होती. आता त्यांचा सांगावा होता, ‘सर, तुम्ही या. काही जागा, काही मेटं, काही चौक्या अजूनही परिक्रमेच्या आवाक्यात येत नाहीयेत. काही जागा जास्त अवघड वाटतायत.’ हा सांगावा म्हणजे एका स्वप्नपूर्तीचं बोलावणंच होतं आणि ठरलं, ‘प्रतापगड परिक्रमा’!

प्रतापगडाच्या पायथ्याच्या पोलादपूरचा प्रकाश कदम, प्रतापगड माचीवरचा संजय जाधव, ग्रामसृष्टीचे आप्पा उतेकर, अशी अनेक मंडळी या परिसरातले आमचे पालक. आमच्या सर्व मोहिमा या मंडळींच्या पाठबळावरच.

प्रतापगड युद्धाच्या इतिहासाच्या भूगोलाची एक प्रेरणा मोहीम ‘प्रतापगड परिक्रमा’ यांच्या भरवशावरच ठरवली. तयारी सुरू झाली. आदले दिवशी रात्री प्रतापगड पायथ्याशी मुक्काम आणि दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे मोहिमेला सुरुवात. ही मोहीम म्हणजे काही जागा माहिती, काही संदिग्धतेसाठी वाटाड्या आणि जाऊन परत येणे इतक्यापुरती मर्यादित नव्हती. खरंतर ही एक शोधमोहीमच होती. या मोहिमेतले आमचे गुरू आधी या वाटा धुंडाळून आलेली प्रतापगड पंचक्रोशीतील मंडळी होती. गेले आठ दिवस या परिसराचा भूगोल मनात थैमान घालत होता. नुसतं प्रतापगडाभोवती फिरायचं नव्हतं, साऱ्या माच्या, मावळ्यांची मेटं, एलगाराच्या जागा धुंडाळायच्या होत्या. एकेक जागांना आधी जाऊन आलो होतो. पण आता त्याची माळ गुंफायची होती. 

महाबळेश्‍वराच्या काही ठराविक ठिकाणांवरून आणि आंबेनळी घाटरस्त्याला लागल्यानंतर प्रतापगडाचं दर्शन होतं. पण त्याच्या स्थानाचा मात्र नीट अंदाज येत नाही. महाबळेश्‍वरावरून जावळीच्या खोऱ्यातून कोकणात उतरणारे जुने आणि आजचे अनेक मार्ग आहेत. त्यात काही थेट प्रतापगड पायथ्याशी संबंधित तर काही परिसरातील. महाबळेश्‍वराहून थेट पोलादपुरापर्यंत जाणारा आजचा गाडी रस्ता म्हणजे आंबेनळी घाट. क्षेत्र महाबळेश्‍वराच्या पिछाडीनं अरण्यात शिरून या आंबेनळी घाटाला एक-दोन ठिकाणी छेद देऊन मेट तळे-दुधोशी-जावळीच्या वरच्या अंगानं पारपर्यंत पोचणारा आणि मग कोकणात उतरणारा घाट म्हणजे पारघाट. हा अजूनही राबता असता तरी गाडीरस्ता नाही. परंतु, प्रतापगड युद्धाशी याचा भौगोलिक संबंध जवळचा. एक-दोन ठिकाणी आपलं शिवकालातलं बांधीव अस्तित्व दाखविणारा मूळ रामवरदायीनीच्या पुढ्यातून प्रतापगड पायथ्याशी येऊन खाली कोकणात जाणारा जुना रडतोंडीचा घाट असे तीनही घाट प्रतापगडाशी संबंधित आहेत. परिक्रमेच्या वेळेला यांचा भूगोल अत्यंत महत्त्वाचा. यापैकी पार तसा प्रतापगडाच्या उत्तरेचा. या घाटांच्या टप्प्यात बहुतांश मेटं.

प्रतापगडाच्या पायथ्याशी महाद्वाराच्या पायऱ्या जिथं संपतात तिथं एक नैसर्गिक गुहा आहे, चांगली पन्नास-साठ माणसं मावतील अशी. तिला ‘बखळ’ म्हणतात. या बखळीचा संबंध प्रतापगड युद्धाशी जोडला जातो. कोंडाजी फर्जंद इथं हत्यारबंद मावळ्यांसह दबा धरून बसणार आणि प्रसंगी खानाच्या हशमांवर तुटून पडणार हा एक प्रतापगड युद्धातला आणीबाणी नियोजनाचा भाग होता असं सांगितलं जातं. इथून प्रतापगड उजवीकडं ठेवून परिक्रमेला सुरुवात करायची हे नक्की. 

अशी इतिहास आणि भूगोलाची जुळवाजुळव करत मोहिमेला निघालो. दुपारी कोल्हापुराहून प्रस्थान ठेवलं. सूर्यास्ताच्या सुमारास महाबळेश्‍वराच्या माथ्यावर पोचलो. इथून डोंगररांगांच्या आड अस्तमानाला जाणारा सूर्य पाहणं हा एक अवर्णनीय निसर्गसोहळा असतो. त्या लाल प्रकाशात मधुमकरंदापासून दिसणारी सारी डोंगरशिखरं अतिशय विलोभनीय असतात. दाटत जाणाऱ्या काळोखाबरोबर प्रतापगडाच्या वाटेला लागलो. चांगला अंधार पडला तेव्हा प्रतापगडाच्या अर्ध्या चढणीवर मुक्कामाच्या जागी पोचलो. 

प्रतापगडाच्या अर्ध्या चढणीच्या माचीवर आमचे डोंगरभाऊ प्रकाश कदम यांचा निवारा आहे आणि जवळच संजय जाधवांचं अन्नगृह आहे. ही दोन्ही आमची हक्काची ठिकाणं. लाल मातीच्या अंगणात प्रथेप्रमाणं रात्री गप्पांचा फड जमला. गप्पांच्या मैफिलीत डोंगरांसारखीच एक बातमी आमच्यापर्यंत येऊन पोचली. उद्याच्या आमच्या परिक्रमेत सह्याद्रीतल्या नवनवीन वाटा शोधून काढणारे ज्येष्ठ गिर्यारोहक, आमचे किमान तीन दशकांचे मित्र अरुण सावंत सामील होणार होते. अशा मनस्वी डोंगरभटक्यांबरोबर मोहिमा करणं याचा आनंद शब्दातीत असतो. बरोबर हरहुन्नरी गिर्यारोहक सुरेश मालुसरेही असणार होता. तशी अरुण सरांबरोबर या मोहिमेविषयी चर्चा झालीही होती, येतोही म्हणाले होते आणि आमच्याही आधी एक दिवस पोचलेही होते. दुर्गभटक्यांच्या पिढ्यानपिढ्यांनी वंदन करावं अशी ही नावं आहेत. 

नाही म्हटलं तरी उद्याच्या मोहिमेचा तणाव होताच. प्रतापगडाच्या पायथ्याच्या त्या मातीत गार वाऱ्यात झोप केव्हा लागली कळालंच नाही. पहाटवाऱ्यानं जाग आली. सगळ्यांची आवरण्याची लगबग संपली. सॅक पाठीवर ताणल्या, ध्येयमंत्र उच्चारला आणि अजूनही अंधार असतानाच प्रतापगडाच्या महाद्वाराकडं निघालो. तिथं पोचेपर्यंत पूर्व उजळू लागली होती. महाबळेश्‍वराची डोंगरशिखरं आणि त्यांना जोडणाऱ्या डोंगररांगा एका पाठोपाठ एक क्षितिजावर येत होत्या. पण सूर्यबिंब अवतरण्यापूर्वीच परिक्रमेला सुरुवात करायची होती. अरुण सावंत सहकाऱ्यांसह आमची वाट पाहतच होते. खूप दिवसांनी सरांची प्रत्यक्ष भेट होत होती. साठी उलटलेल्या या आमच्या तरुण सहकाऱ्याला पाहताच कडकडून आलिंगन दिलं. डोंगरमित्रांची मैत्री डोंगरासारखीच असते.

महाद्वाराच्या पायऱ्या संपतात तिथं खाली सगळे एकत्र जमलो. नव्या पिढीला आणि नव्या लोकांना सावंतसरांचा परिचय करून दिला. प्रतापगड, प्रतापगड संग्राम या साऱ्यांचा संक्षिप्त इतिहास कथन केला. इतिहासाच्या एका वेगळ्या शोध दालनात प्रवेशाच्या कल्पनेनं सारे सहकारी थरारून उठले आणि शिवराय वंदनेनं परिक्रमेला सुरुवात झाली. 

प्रतापगडाच्या मुख्य दरवाजाच्या खालच्या अंगाला पायऱ्या जिथं सुरू होतात, तिथं डाव्या बाजूला डोंगराच्या पोटात एक मोठी बखळ आहे; पन्नास तरी माणसं मावू शकतील अशी. इथून खानाच्या भेटीची जागा म्हणजे ‘जनीचा टेंभ’ स्पष्ट दिसतो आणि तिथं त्वरेनं पोचताही येतं. आणीबाणीच्या प्रसंगी त्वरेनं हालचाल करून खानाच्या हशमांवर तुटून पडण्यासाठी किंवा गरज भासलीच तर शिवरायांना संरक्षण देण्यासाठी हिरोजी फर्जंद चाळीस-पन्नास मावळ्यांसह या बखळीत दबा धरून बसले होते. ही बखळ उजव्या हाताला ठेवून पायवाटेनं जंगलात शिरलो. तसा अगदी पायथ्याचा असला तरी हा गच्च जंगलाचा भाग. उतरत्या पाऊलवाटेनं थोडं अंतर जुन्या पारघाटाकडं गेलं, की उजव्या हाताला झाडीत एक बांधीत कदाचित टेहळणीसाठीची जागा आणि तिथून कोकणाच्या बाजूला दरीत उतरणाऱ्या काही पायऱ्या लागतात. प्रतापगडापासून काही अंतरावर असणाऱ्या या पायऱ्या आणि जागेविषयी बरीच वर्षं माझ्या मनात कुतूहल आहे. त्या मार्गानं काही अंतर उतरण्याचाही मी प्रयत्न केला पण हाती काही लागलं नाही. पायऱ्या संपल्यानंतर काही अंतर उतरताही येतं, पण पुढं काय? अरुण सावंतांसह याही वेळेला या पायऱ्यांवरून उतरून गेलो. पण पुन्हा तेच कुतूहल मनात घेऊन रामवरदायीनीच्या वाटेला लागलो. जंगल दरीचा हा उतार संपला की दाट आणि उंच गवताचं पठार लागतं. डावीकडं महाबळेश्‍वराचं खोरं आणि उजवीकडं कोकण आणि डोगंरदांडावरची वाट प्रतापगड पाठीशी घेऊन आपण मूळ रामवरदायीनीशी पोचतो. या रामवरदायीनीच्या पुढ्यातला डोंगर फोडून तयार केलेला वळणावळणाचा रडतोंडीचा घाट हे ऐतिहासिक स्थापत्य थेट शिवकालात घेऊन जातं. ही मूळ रामवरदायीनी आणि रडतोंडीचा घाट हा अमूल्य ऐतिहासिक ठेवा फारच थोड्यांना माहिती आहे. प्रतागडाचा पर्यटक क्वचितच इकडं वळतो. प्रतापगडाचा भोवताल अशा अनेक ऐतिहासिक खुणा जपतोय... परिक्रमेच्या मार्गातला हा महत्त्वाचा थांबा. इथून आता थेट प्रतापगडाची पिछाडी.

मूळ पारघाट शिवकालीन रडतोंडीचा घाट हे तसं जावळीच्या खोऱ्यातलं दुर्लक्षित ऐतिहासिक स्थापत्य. पण याच बरोबर प्रतापगडाच्या पिछाडीची आजही काही प्रमाणामध्ये राबती असणारी किन्हेश्‍वराची वाट हीसुद्धा तशी दुर्लक्षितच आहे. किन्हेश्‍वर ते रानकडेसर ही प्रतापगडाच्या पश्‍चिमेची दुर्गम वाट हा प्रतापगड युद्धाचा महत्त्वाचा भूगोल आहे. किन्हेश्‍वराच्या वरच्या अंगाला मोरोपंत पिंगळे पायदळासह सज्ज होते. तर रानकडेसर पठाराच्या मेटावर नेताजी पालकरांचं घोडदळ तयारीत होतं. किन्हेश्‍वर ते प्रतापगड तसंच रानकडेसराच्या बाजूनं प्रतापगडावर अनेकदा येणं-जाणं झालं होतं. मोठ्या रोमांचकारी वाटा आहेत. आता या वाटेच्या अंगानंच आज किन्हेश्‍वर पाठीवर येऊन रानकडेसराच्या पठारावर पोचायचं होतं. अर्थात पूर्वेच्या हाताला प्रतापगड ठेऊनच. डाव्या बाजूला दरी, उजव्या रानकडेसरच्या अलीकडं डोंगर, अशा डोंगरदरीतल्या वाटेनं रानकडेसरच्या अलीकडं पोचलो. या परिक्रमेतला उत्साह अधिक असण्याचं कारण म्हणजे अरुण सावंत आमच्या बरोबर होते. उंच पठारावर खालचा परिसर न्याहाळून दोन हात पाठीमागं टोचणाऱ्या दगडांवर ठेऊन पाय सरळ करून क्षणभर विसावणं यातली मजा उत्तुंग पठाराच्या माथ्यावर पोचल्यावरच कळते. आजूबाजूला सगळेच टेकले आणि अचानक अरुण म्हणाला, ‘डॉक्टर थंडगार पाणी पाहिजे का?’ आणि एक बाटली उंचावली. ‘हा आमचा फ्रीज!’ खराब झालेले सॉक्स स्वच्छ धुऊन एकमेकांना शिवून एक जाडसर आवरण तयार करायचं आणि त्यात बाटली सरकवायची आणि सगळे सॉक्स पाण्यानं भिजवायचे. झाला आमचा फ्रिज! भटकंतीच्या दरम्यान आमच्या गरजा अशाच लहानसहान गोष्टींनी आम्ही पूर्ण करतो.

आता पुढचा टप्पा प्रतापगडाच्या उत्तर आणि पूर्व बाजूचा. राखी टोक नावाच्या एका शिखराच्या बाजूचा. थोडा घसाऱ्यावरच्या अंगाचा. या बाजूला प्रतापगड युद्धावेळी थोडं जास्तच सैन्यबळ होतं. किमान चार चौक्या, अण्णाजी, पासलकर, बांदल, जेधे अशी सैन्याची विभागणी वरच्या अंगाला आणि थेट पायथ्याला आंबेनळी, कुंभरोशीच्या रानात दडलेले मावळे.

नेटानं रानकडेसरच्या पठारावरून राखी टोकाकडं मेटांच्या शोधात मन भिरभिरत होतं. बांदल, जेधे, पासलकर, कुळे मावळ्यांसह दबा धरून बसले असतील? हा परिक्रमेचा प्रवास पाहता पाहता यशवंत बुरुजाकडून प्रतापगडाच्या दिशेनं सरकू लागला. उजव्या हाताला प्रतापगडाची अभेद्य तटबंदी डोक्यावर दिसू लागली. खानाच्या भेटीची जागा म्हणजे जनीचा टेंभही स्पष्ट दिसू लागला. प्रतापगडाच्या थोडं अधिक जवळ सरकलो. परंतु आता थेट प्रतापगडाच्या महाद्वाराशी परिक्रमा पूर्ण न करता जनीच्या टेंभाच्या खालच्या अंगाला घनदाट झाडीत शिरायचं होतं. कारण याच रानात शिळीमकर आपल्या मावळ्यांसह दबा धरून बसले होते. टप्पा तसा दूरचा होता. पण त्याशिवाय परिक्रमेला पूर्तता नव्हती. नदीकाठच्या उतारानं रानात शिरलो. तीव्र उतारानं जनीच्या टेंभाची पिछाडी गाठली आणि पारच्या बाजूनं येणाऱ्या जुन्या वाटेनं जनीच्या टेंभाची पिछाडी चढून प्रतापगड पायथ्याशी पोचलो तेव्हा दुपार टळायला आली होती. जेवण्याखाण्याचं भानही नव्हतं. परिक्रमेच्या परिपूर्तीचं एक समाधान खोल कुठंतरी आतमध्ये जाणवत होतं. सगळ्यांच्या मुखातून एकच आरोळी आली, ‘बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय!’

परिक्रमेच्या निमित्तानं अनेक वेळा अनेक वर्षं महाबळेश्‍वर, प्रतापगड आणि जावळीचं खोरं सगळ्या बाजूंनी, सगळ्या दिशांनी फिरलो, तिथल्या दऱ्याखोऱ्या पालथ्या घातल्या. प्रतापगड युद्धाच्या मेटं, माच्या शोधत घनदाट अरण्यात त्यातून डोकावणाऱ्या निष्पर्ण पठारांवर, कधी धडपडत उंच सुळक्यांवर चढलो. त्या शूर इमानी मावळ्यांच्या दबा धरून बसलेल्या जागा शोधण्याचा प्रयत्न केला. मग साकारत गेली प्रतापगड पंचक्रोशीतल्या आधुनिक मावळ्यांच्या साथीनं ‘प्रतापगड परिक्रमा’. झाडंझुडुपं साफ करत ही मुलं प्रतापगड सर्व बाजूंनी फिरून आली. पहिल्या परिक्रमेचा मान त्यांचाच... मग या मुलांनी आम्हाला आवतण धाडलं, ‘सर या!’ मग त्यांचं बोट धरून प्रतापगडाच्या प्रदक्षिणेला पाऊल पडलं. एका प्रेरणादायी इतिहासाच्या भूगोलाच्या अंतरंगात शिरलो. जसं आकलन होईल तशी परिक्रमा पूर्ण केली. या मुलांच्या पावलाबरोबर फिरलो. या परिक्रमेत अजूनही सारं सापडलंय असं नाही. काही पहारे, मेटं, माच्या अजूनही रानात दडलेल्या आहेत. त्या सर्वांनी मिळून शोधूया. जाज्वल्य पराक्रमाची ही युद्धभूमी परिक्रमेच्या रूपानं जागती ठेऊया. या घनदाट अरण्यात दडलेला मावळ्यांचा पराक्रम त्याच अरण्यात शिरून जागवूया. त्याच अरण्यात त्यांना कृतज्ञ वंदन करूया. जावळीचं युद्ध, त्यातल्या दबा धरून बसलेल्या जागा, तेथून मावळ्यांनी केलेला एलगार याची एक प्रेरणादायी गुंफण करूया आणि जावळीच्या पराक्रमाची ही माळ महाराष्ट्रासमोर ठेऊया!

संबंधित बातम्या