सरीवर सरी आठवणीच्या

आरती वैद्य
सोमवार, 21 जून 2021

पर्यटन

मराठीतील महाकवी म्हणून मान्यता प्राप्त झालेल्या कवीवर्य मोरोपंतांनी सांगितले आहे, ‘‘केल्याने देशाटन...’’ त्याप्रमाणे प्रवास करताना आलेल्या संधी व आपत्तीमधून आपल्याला बेशक शिकायला मिळते. त्या आठवणींनाही बूस्टर डोसची आवश्यकता असतेच की; त्याचा हा रिकॅप.

सॅन फ्रान्सिस्को (SFO) ते मुंबापुरी परतीच्या प्रवासात रात्रीचे विमान होते. घरापासून इंटरनॅशनल एअरपोर्ट तीन तासांच्या अंतरावर असल्याने वेळेवर पोचण्यासाठी लगबग सुरू झाली. पारपत्र (पासपोर्ट) घरी विसरून चालत नाही व ते जिवापाड जपावे लागते, हे माहीत असल्याने ते असलेली पर्स निघायच्या अर्धा तास आधीपासून खांद्यावर लटकवलेली होती. उगाच ‘‘फालतूमे मुसीबत मोल लेना’’ सांगितलंय कुणी? पुढे विमानतळावर जाताना अर्धे अंतर कापल्यावर सहज टाईमपास म्हणून मी आमचे पासपोर्ट पहिल्या पानापासून वाचू लागले. पाहते तर काय, त्यावर जुनीच तारीख होती! तेव्हा माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. लागलीच लक्षात आले की नवीन पासपोर्ट बॅक लॉकरमध्ये मागे राहिले आणि फक्त जुने दोन बरोबर घेतले गेले. खरेतर चारही घ्यायला हवे होते. माझी अवस्था ४४० व्होल्टचा झटका लागल्यागत झाली. आगगाडीच्या प्रवासात धोक्याची साखळी ओढतात, तसे मी जोरात ओरडले. ‘‘भूषण गाडी थांबव.’’ हायवेवर गाडी अशी मधेच थांबवणं शक्य थोडेच होते? त्याने गाडी तशीच पुढे दामटली व निर्धारित जागेतच गाडी थांबली. सगळ्यांनाच कळून चुकले की आता पुढे विमानतळावर जाण्यात काहीच पॉइंट नाही. सर्वजण हवालदिल झालो. आमच्या सर्व नियोजनावर पाणी फिरले, त्याची पार वाट लागली हे सांगायला कोणा भविष्यकाराची गरज नव्हती. त्यानंतर संबंधित एअरलाइनला झाला प्रकार फोनवर सांगून नंतरच्या आठवड्यातील तिकिटे आरक्षण करायला कळवून माघारी फिरलो.

घरी आल्यावर प्रश्न पडला असे का झाले? असे झालेच कसे म्हणत सवाल जवाब मनात रूंजी घालू लागले तेव्हा लक्षात आले काय, तर फक्त पाच महिन्यांपूर्वी नूतनीकरण केलेले दोन पासपोर्ट हातात पडले होते. त्यापूर्वी तब्बल १० वर्षे केवळ दोनच पासपोर्ट हाताळायची सवय जडली होती. त्यामुळे मोक्याच्या वेळेला क्षणभर विसर पडला की आपले २ + २ पासपोर्ट आहेत. शेवटी माणूस ‘आदत से मजबूर’, याने की सवयीचा गुलाम. लॉकरमध्ये सर्वात वर असलेल्या दोन पासपोर्टमध्ये आम्हा दोघांचे फोटो असल्याची खात्री करून तेच व्हॅलिड आहेत अशी मुलाचीही समजूत झाली असणार. चार महिन्यांपूर्वी या दोन व्यतिरिक्त अजून दोन नवीन पासपोर्ट दिले होते, हे तोही विसरला. माझे ठीक आहे, मी ६०+ होते. परंतु हा पण विसरला की एकूण चार पासपोर्ट होते. कदाचित कारण असेल या पिढीला करावे लागणारे मल्टी टास्किंग, ‘वर्क फ्रॉम फोम’. त्यातच सर्व काही आले. मग या तारेवरच्या कसरतीतून येणारा ताणतणाव. घरून निघताना मिस्टरांनी विचारले होते, ‘‘पासपोर्ट घेतले नं?’ मी म्हणाले, ‘‘हो’’. त्यांनी कुठे विचारले होते की चार घेतले का? हिच्याकडून अशी भलती चूक होणार नाही असाच विश्वास असणार. त्यामुळे झाले काय, आपोआपच चुकांची श्रृंखलाच तयार झाली. 

आता तुम्ही म्हणाल डॉक्युमेंट्स लॉकरमध्ये ठेवायची गरजच काय होती? तिकडे भुरट्या चोऱ्या होत नसल्या तरी जबरी घरफोडी, दरोडे इ. गुन्हे नेहमीचेच. भरीस भर म्हणून भारतीयांच्या घरी सोने, घबाड हाती लागते अशी तिकडील चोरांची मानसिकता! मुलाने त्याचापण कडवट अनुभव घेतला होताच. सीन कॉनरीच्या जेम्स बाँड चित्रपटातील अफलातून फंडा वापरून एका अवलिया चोराने पाळत ठेवून, बंद घरात घुसून आमच्या मुलाच्या कारची चावी शोधून घेऊन नंतर यथावकाश त्याची कोरी गाडीच गडप केली! तुम्हा म्हणाल ‘शोले’मधल्या बसंतीसारखे हे काय लांबण लावलेय? पण ते तर मी आधीच सांगितले की... आठवणींची सर म्हणून.

आठ दिवसांनंतर पुन्हा सर्व दस्तऐवज सजगपणे तावून सुलाखून विमानतळावर पोचलो. तिकीट मॉडिफाय केल्यामुळे तीनशे डॉलरचा फटका तर बसलाच. आमचे चेक-इन पूर्ण झाल्यावर मुलगा घरी परत गेला. बोर्डिंग पास मिळाल्यावर आम्हीपण जागेवर स्थानापन्न झालो. हवाई सुंदरीने बेल्ट बांधायला सांगितले. वाटले विमान लवकरच टेक-ऑफ करणार. शेवटचा कॉल करून मुलाला तशी कल्पना पण दिली. थांबा, यह तो सिर्फ ट्रेलर था। ब्रेकके बाद पिक्चर अभी बकी है। अब आगे झाऽऽऽलं, पुढच्याच क्षणी कॉकपिटमधून घोषणा झाली, की ए.सी. नीट काम करत नाहीये, फ्लाईट लेट आहे. क्या करें? बसलो गप्प. हात चोळत, मारून मुटकून बसवल्यागत. तासाभरानी दुसरी ॲनाऊन्समेंट झाली, ‘‘दुरुस्तीला अनिश्चित वेळ लागणार असल्याने, सर्व पॅसेंजर्सनी कॅबिन लगेज घेऊन खाली उतरावे!’’ एमिरेट्स‍चे ३५० प्रवासी घेऊन खचाखच भरलेल्या विमानातून एकामागून एक खाली येण्यात तब्बल एक तास गेला. संबंधित कर्मचाऱ्याला विमान सुटण्याची संभाव्य वेळ विचारली तर त्याने टोलवाटोलवी केलीच, कानावर हात ठेवले आणि ब्र काढला नाही. प्राप्त परिस्थितीला न डगमगता तोंड देण्यापलीकडे आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. कारण, आम्हाला सॅन फ्रान्सिस्कोचा ओ का ठो माहीत नव्हता. तिकडे ना (कुणाची) ओळख ना पाळख. तेवढ्यात, महाभारताच्या काळात होत असे तशी एक आकाशवाणी किंवा अशरीरवाणी कानावर पडली. काय तर ‘‘अल्पोहाराची व्यवस्था तयार आहे.’’ मधाचे पोळे फुटल्याप्रमाणे सर्व प्रवासी तिकडे झेपावले. झुंबडच उडाली. कहर म्हणजे ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणतात तसे शेवटची घोषणा झाली. ‘‘फ्लाईट रद्द झाली आहे, बेल्टवरून तुमचे चेक-इनचे लगेजपण ताब्यात घ्या.’’ हनुमानाच्या शेपटीप्रमाणे अडचणी वाढतच होत्या. मध्यरात्रीचे १२ वाजलेले. पुरते दमलेलो. पायाखालची भुई सरकणे म्हणजे काय, त्याची पुसटशी प्रचिती आली. ‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न म्हणतात ते उगीच नाही. कार्गोमधून सर्व सामान बेल्टवर वापस आले होतेच. खल्लास! आता तर परेशानी वाढून बेहोश व्हायचेच बाकी होते. ‘नानी याद आयी’ म्हणावे का? त्या अवजड बॅगा ट्रॉलीमध्ये लोड केल्या. रामभरोसे राहून त्रेधा तिरपीट उडण्याआधी मुलाला फोन लावून पाढा वाचला. तीन-चार तास वाहन चालवून नुकताच घरी पोचून कुलूपच उघडत होता. क्षणाचाही विलंब न लावता, त्याने सांगितले, ‘रिलॅक्स राहा, फ्रेमॉटमध्ये असणाऱ्या माझ्या मित्राला फोन लावतो. तो तुम्हाला घ्यायला येईल. त्याचा खास मित्र भूपेश देशमुख ‘मै हूँ ना’ म्हणत आम्हाला घेऊन गेल्याने दिलासा मिळाला.  दुसऱ्या दिवशीचे त्याच विमानाचे, त्याच वेळचे आमचे बुकिंग कन्फर्म झाल्याचे यथावकाश कळाले. त्यानंतर मात्र पुण्यनगरीपर्यंतचा पुढील प्रवास खरोखर सुपर डुपर स्मूथ झाला, वेगळे सांगणे न लागे.

पाच-सहा वर्षांपूर्वी ओढवलेल्या या प्रसंगानंतर ‘ताक फुंकून प्यावे’ म्हणतात, तसे महत्त्वाच्या गोष्टी पडताळून पाहून आम्ही प्रवासाचा श्रीगणेशा करतो.

हाय काय नाय काय!!

संबंधित बातम्या