‘आंबोली’ला हवीय जंगलगस्त!

धीरज वाटेकर
सोमवार, 17 मे 2021

पर्यटन

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ‘आंबोली’ला पोहोचलो. सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेले आंबोली हे कोकणातील थंड हवेचे ठिकाण. जागतिक हवामान दिवसानंतर आलेला हा आठवडा उष्णतेची लाट घेऊन आलेला. या दोन-तीन दिवसांच्या भेटीत प्रचंड उकडत असतानाही आंबोलीच्या निसर्गाची विविध रूपे अनुभवता आली. त्यातल्याच एका भटकंतीत पट्टेरी वाघाने शिकार केलेला गवा पाहायला मिळाला होता. मागच्या लॉकडाउन काळातही दोडामार्ग-तळकट-खडपडे-कुंभवडे-चौकुळ-आंबोली मार्गावर हिंस्र जंगली प्राण्याने गव्याची शिकार केल्याचे आढळले होते. सह्याद्रीच्या जंगलात पट्टेरी वाघाचे अस्तित्व असल्याचे पुरावे गेल्या काही वर्षांपासून मिळत आहेत. यातला सगळ्यात ताजा पुरावा अगदी पंधरा दिवसांपूर्वीचा आहे.

अलीकडे तिलारी पाठोपाठ आंबोली ते दोडामार्ग पट्ट्याला संवर्धन राखीव क्षेत्र दर्जा मिळाला आहे. काही महिन्यांपूर्वी घेतलेला हा निर्णय या सगळ्याच परिसराच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल यात शंकाच नाही. मात्र पट्टेरी वाघाच्या अस्तित्वाच्या खुणांच्या पार्श्वभूमीवर या संवर्धन राखीव क्षेत्र दर्जा असलेल्या जंगलांना मिळालेले हे संरक्षण तातडीने प्रत्यक्ष जमिनीवर दिसायला हवे, असे या अंबोली भेटीत जाणवले. ‘आंबोली’ला आता तातडीची गरज आहे ती नियमित देखरेख आणि जंगलगस्तीची.

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनच्या काळात राज्यातल्या वेगवेगळ्या डोंगरपट्ट्यात शिकारीच्या घटना वाढल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर वनविभागाने शिकाऱ्यांना पकडण्यासाठी रात्रीची गस्त आणि देखरेख वाढविली होती. मुंबईच्या आसपास असलेल्या जंगलावर ड्रोनच्या साहाय्याने गस्त घालण्याचे नियोजन केले होते. ‘संरक्षित वन आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जंगल क्षेत्र याचे संवर्धन झाले पाहिजे. तेथे प्राण्यांचे मुक्त वास्तव्य राहिले पाहिजे. प्राण्यांची शिकार सहन केली जाणार नाही,’ अशी भूमिका वनखात्याकडून मांडली जात असतानाही वन्यजीवांच्या हत्या आणि तस्करीचे गुन्हे घडत असतात हे लक्षात घेतले तर जंगलगस्त किती महत्त्वाची आहे ते लक्षात यावे. 

जंगलगस्तीमधून अनेक बाबी लक्षात येत असतात. अवैध वृक्षतोड तर लक्षात येतेच पण त्याच बरोबर लाकूडचोरी, वन जमिनीवरील अतिक्रमणे, वणव्यांमुळे जंगल संपत्तीचे होणारे नुकसान अशा पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या बाबींविषयीही तातडीने उपाययोजना करणे जंगलगस्तीमुळे शक्य होते. आंबोलीत अशा नियमीत जंगलगस्तीचा उपयोग करणे आता आवश्यक ठरते आहे.

पाचएक वर्षांपूर्वी वनक्षेत्रात नियमित गस्त घालण्याबरोबरच अवैध वृक्षतोड, अवैध चराई आणि वन्य प्राण्यांची तस्करी रोखण्यासाठी एक उपाय म्हणून गिर्यारोहक आणि निसर्गप्रेमींची मदत घेण्याचे वन विभागाने ठरवले होते. जंगलात नियमितपणे भटकंती करणारी ही निसर्गप्रेमी मंडळी सतर्क असतात, स्थानिकांशीही त्यांचे सलोख्याचे संबंध असतात. त्यामुळे वनाधिकाऱ्यांना वन्यजीवांविषयीच्या किंवा वनांविषयी अगदी छोट्यामोठ्या घडामोडी समजायला मोठी मदत होत असते. असे प्रयत्न आंबोलीत अधिक सक्रिय करता येतील. 

कोकणातील डोंगररांगांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची एक बाजू व्यापलेली आहे. या वनक्षेत्रात आणि सह्याद्रीतील कोकणात उतरणाऱ्या मार्गांवर वन्यप्राण्यांच्या शिकारी होत असल्याच्या, चोरटी जंगलतोड होत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असतात. तस्करांपासून जंगल आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी वनक्षेत्रात निसर्गप्रेमी, अभ्यासक आणि गिर्यारोहकांचा वावर वाढल्यास चोरांवर नियंत्रण आणता येईल. मजूर आणि वनरक्षकांसोबत जंगलातील भटकंती दरम्यान खूप काही नव्याने शिकायला मिळेल. निसर्गाचे आकर्षण वाढेल. जंगलाचे व्यवस्थापन कळण्यासही मदत होईल. 

आंबोली-दोडामार्ग कॉन्झर्वेशन रिझर्व्ह या ५६९२ हेक्टरवर पसरलेल्या जंगलक्षेत्रात पट्टेरी नर वाघाचे अस्तित्व स्पष्ट झाले आहे. कॉन्झर्वेशन रिझर्व्ह कायद्यांतर्गत लोकांच्या सहभागातून, त्यांचे अधिकार कायम राखून वन्यक्षेत्राचे संवर्धन करणे अभिप्रेत आहे. अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान संवर्धनाचे कडक नियम पाहता संवर्धन राखीव क्षेत्रामध्ये स्थानिकांना सोबत घेणे सोयीचे होते. पूर्वी पश्चिम घाट अभ्यासासाठी नियुक्त केलेल्या डॉ. माधव गाडगीळ समितीनेही हे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र निश्चित करण्याची शिफारस केलेली होती. आंबोली ते दोडामार्ग पट्टा ‘व्याघ्र मार्ग’ म्हणून संरक्षित व्हावा यासाठी ‘वनशक्ती’ संस्थेने न्यायालयात प्रयत्न केले होते. 

पंधराच दिवसांपूर्वी सह्याद्रीच्या पट्ट्यात वनविभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये शिकार केलेल्या गाईसह एक वाघ दिसला होता. त्या आधी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व्याघ्र प्रकल्पाच्या एका भागात पट्टेरी वाघाने मारलेल्या गव्याचे कुजलेले शरीर आढळून आले होते. वाघाच्या पावलांच्या ठशांवरून हा पूर्ण वाढीचा नर वाघ असल्याची शक्यता त्यावेळी वन विभागाने वर्तवली होती. त्यापूर्वीही म्हणजे नोव्हेंबर २०१९मध्ये, त्याआधी फेब्रुवारी २०१८मध्ये पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याचे किंवा वाघाच्या वावराच्या खुणा आढळत असल्याचे स्थानिक रहिवासी सांगतात.

आंबोली-दोडामार्ग हे जंगलक्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. गोव्यातील म्हादई आणि कर्नाटकातील भीमगड अभयारण्य क्षेत्र या जंगल क्षेत्राला जोडलेले असल्याने वन्यजीवांच्या आणि वाघांच्या भ्रमणमार्ग आणि प्रजननाकरिता हा सलग पट्टा उपयुक्त आहे. भविष्यातल्या या पट्ट्यात होणाऱ्या वन्यजीवांच्या हालचाली लक्षात घेतल्यास या सगळ्या परिसरात सततची देखरेख आणि गस्त आवश्यक आहे हे वास्तव अधोरेखित होते. हा संपूर्ण पट्टा नर वाघाच्या भ्रमंतीचा परिसर असल्याचे वाघांवर संशोधन करणारे वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी यांनी यापूर्वीच शासनाच्या निदर्शनास आणले आहे. त्यांनी २०१४-१५ साली वनविभागाच्या मदतीने लावलेल्या ‘कॅमेरा ट्रॅप’मध्ये तीन वाघांची नोंद झाली होती. तसेच सह्याद्री निसर्ग मित्र आणि बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीने राबविलेल्या ‘ई-मॅमल’ प्रकल्पांतर्गतही कॅमेरा ट्रॅपमध्ये पट्टेरी वाघाचे छायाचित्र मिळाले होते. 

सह्याद्रीत संरक्षित नसलेल्या वनक्षेत्रात गेली अनेक दशके वृक्षतोड सुरू आहे. यामुळे जैवविविधतेतील काही घटकांचे संपूर्ण अधिवास नष्ट होत आहेत. तरीही आंबोली ‘शिस्टुरा हिरण्यकेशी’ मासा, टॅरॅन्टुलाची (कोळी) ‘थ्रिगमोपीयस इग्निसिस’ प्रजाती आदी प्रदेशनिष्ठ जैवविविधता जोपासून आहे. २०१३च्या दिवाळीत आंबोली भ्रमंती करताना आम्हाला मोठ्या केसाळ कोळ्याची हॅप्लॉक्लास्ट्स (Haploclastus) प्रजाती पाहायला मिळालेली होती. 

तळकोकणातल्या सह्याद्रीच्या रांगात मागील काही वर्षांपासून जाणवणारे पट्टेरी वाघाचे अस्तित्व जंगलप्रेमींना सुखावणारे आहे. जंगलाचा श्वास असलेल्या वाघाची निर्मिती आपल्याला शक्य नाही; म्हणून त्याच्या अधिवासांचे संवर्धन आणि संरक्षण आवश्यक आहे. यासाठी आंबोली जंगलात नियमित कडक ‘देखरेख आणि गस्त’ हवी आहे. आंबोलीत अलीकडे जंगल गस्त वाढविल्याचे अधिकारी सांगतात मात्र सह्याद्रीतले आजवर आपल्याला दिसलेले धोके पाहता आंबोली सारख्या जंगलांना मिळालेले संरक्षण तातडीने जमिनीवर दिसायला हवे आहे.

संबंधित बातम्या