व्हॅली ऑफ कलर्स

डॉ. संजीव भंडारी, सोलापूर
सोमवार, 28 डिसेंबर 2020

पर्यटन

तीस वर्षांपूर्वी रोटरी इंटरनॅशनलच्या ग्रुप स्टडी एक्स्चेंज या कार्यक्रमाअंतर्गत ऑक्टोबर महिन्यामध्ये अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना या राज्यामध्ये पाच ते सहा आठवडे जाण्याचा योग आला होता. तेव्हा तेथील ब्लू रीज पार्कवे वरून बघितलेले अविस्मरणीय फॉल कलर्स बरीच वर्षे पुन्हा खुणावत होते. त्यामुळे यावेळी अमेरिका भेट आवर्जून खास ऑक्टोबर महिन्यातच प्लॅन केलेली होती. शरद ऋतूमध्ये पानगळ होण्याआधी झाडांची पाने हिरव्या, पिवळ्या, लाल आणि नारंगी रंगांच्या शेकडो छटांमध्ये रंग बदलतात. अमेरिका, कॅनडा व युरोप मधील इतर अनेक देशांमध्ये हा अवर्णनीय रंगोत्सव अर्थात फॉल कलर्स बघण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करतात. अर्थात पूर्ण भरात हा रंगोत्सव बघायचा असेल, तर त्यासाठी व्यवस्थित प्लॅनिंग करावे लागते. कारण कोणत्याही भागात विशिष्ट तीन-चार दिवसांत भेट दिली तरच त्याची खरी मजा अनुभवता येते. त्यासाठी इंटरनेटवरून ‘फॉल फॉलिएज पिक टाइम मॅप’ डाऊनलोड करून त्याप्रमाणेच नियोजन केल्यास सर्वोत्तम फॉल कलर्सचा अनुभव घेता येतो. 

दक्षिणेकडील फ्लोरिडा राज्यातील मायामीहून एक रेंटल एसयूव्ही घेऊन प्रथम ऑरलँडो या जगातील ‘थीम पार्क्स’च्या राजधानीमध्ये एक आठवड्याचा मुक्काम आम्ही केला. RCI या जगभर प्रसिद्ध हॉटेलच्या शृंखलेतील एका १८०० एकरावर पसरलेल्या ‘ऑरेंज लेक रिसॉर्ट’मध्ये आम्ही राहिलो. मुले बरोबर असल्यामुळे युनिव्हर्सल स्टुडिओ, वॉल्ट डिस्ने वर्ल्ड अशा वेगवेगळ्या थीम पार्क्सला दिवस-दिवस भेट  देण्यामध्ये आठवडा कसा संपला हे कळलेच नाही. इथून पुढे आमचा मुक्काम होता, नॉर्थ कॅरोलिना या राज्यातील ‘चिमणी रॉक पार्क’च्या पायथ्याशी लेक Lure च्या काठावरील एका Air BnB च्या जंगलामध्ये असलेल्या सुंदर घरामध्ये. सकाळी ऑरलँडोहून निघाल्यावर जवळपास एक हजार किलोमीटरचे अंतर सुंदर गुळगुळीत रस्त्यांवरून अवघ्या साडेनऊ दहा तासात पार करून आम्ही संध्याकाळच्या वेळी तेथे पोहोचलो. Air BnB मधून बुक केलेल्या घरांमध्ये शक्यतो किचन व इतर सर्व सोयी असल्यामुळे स्वतःचे जेवण तयार करून बराच खर्च वाचवता येतो. शिवाय घरमालकांनी अशी घरे खूपच सुंदररीत्या सजवून ठेवलेली असतात, ज्यामुळे तेथील वास्तव्य अतिशय आरामदायी असते. 

ब्लू रीज पार्कवे हा जंगले व डोंगरांमधून सृष्टी सौंदर्य पाहण्यासाठी तयार केलेला एक अंदाजे साडेसातशे किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. आम्ही राहत असलेल्या घराजवळूनच हा रस्ता जात होता. व्हर्जिनिया राज्यातील Shennandoah नॅशनल पार्कपासून निघून ॲपॅलॅचियन पर्वतरांगांमधून दक्षिणेकडील नॉर्थ कॅरोलिना राज्यातील चेरोकी या गावापर्यंत रस्ता जातो. रस्त्यावर अनेक सुंदर ठिकाणे आहेत आणि ती बघण्यासाठी गाडी घेऊन निवांतपणे ड्राइव्ह करत जाण्याचा आनंद काही वेगळाच आहे. मी तर मागच्या वेळीच या भागाचे नाव ‘व्हॅली ऑफ कलर्स’ असे ठेवले होते. आपल्याकडे उत्तराखंडामध्ये जशी रंगीबेरंगी फुलांसाठी ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ प्रसिद्ध आहे, तसेच अवर्णनीय रंगांचे सौंदर्य या ठिकाणी पाहावयास मिळते. 

सकाळी घरीच केलेला नाश्‍ता खाऊन काहीशा पावसाळी पण सुंदर वातावरणात गाडी घेऊन आम्ही ब्लू रीज पार्कवेवरून पूर्वेला असलेल्या लिनव्हिल फॉलकडे निघालो. अर्थात मूळ उद्देश या सुंदर ड्राइव्हमध्ये फॉल कलर्स बघण्याचा होता. त्या भागामध्ये अजून पिक कलर्स येण्यास चार-पाच दिवसांचा अवधी असल्याने पूर्ण भरात असलेले पानांचे रंग बघावयास मिळाले नाहीत. पण तरीसुद्धा ज्या  काही हिरव्या पासून लाल-पिवळ्या-नारंगी रंगांच्या अनेकविध छटा वेगवेगळ्या झाडावर दिसत होत्या, त्या बघून मन हरखून गेले. रस्त्यावर अनेक ठिकाणी आजूबाजूच्या डोंगरदऱ्यातील निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी काही खास थांबे केलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी गाड्या पार्क करण्यासाठी भरपूर जागा ठेवलेली असते व प्रवाशांसाठी लागणाऱ्या  इतर अनेक सोयी सुविधादेखील तेथे केलेल्या असतात. बऱ्याच वर्षांपासून मनात असलेले ते दृश्य डोळ्यात व कॅमेऱ्यात साठवत आम्ही शेवटी लिनव्हिल फॉलला पोहोचलो. तेथे एका छोट्याशा ओढ्याच्या काठाकाठाने झाडांचे मनोहारी रंग बघत आम्ही धबधब्यापर्यंत गेलो. उतरत्या उन्हामध्ये झळाळणारे पानांचे विविध रंग बघून मन तृप्त झाले. पुढे Linn Cove Viaduct आणि ग्रँड फादर माऊंटनला भेट देऊन आम्ही संध्याकाळी उशिरा घरी परतलो.

पुढील दिवशी सकाळी गाडीतून आम्ही पश्चिमेकडील ग्रेट स्मोकी माऊंटनकडे निघालो. थोडावेळ हायवेवरून प्रवास करून पुन्हा आम्ही ब्लू रीज पार्कवे पकडला आणि त्यावरून टेनेसी राज्याच्या गॅटलीनबर्ग या गावाकडे निघालो. जेथून आम्ही निघालो त्या ठिकाणी पिक कलर्स नसल्यामुळे झाडांच्या फक्त टोकाला हळूहळू पिवळ्या लाल नारंगी रंगाच्या छटा दिसू लागल्या होत्या, पण हळूहळू जसजसे आम्ही उंचावर जाऊ लागलो तसतसे झाडांच्या पानांचे रंग अतिशय आकर्षक दिसू लागले. रस्ता वळणावळणाने दरीच्या काठाने  वर चढत होता; खाली दरीत आणि वर डोंगरांवरती आता सुंदर फॉल कलर्स दिसू लागले. गॅटलीनबर्गला जाण्याची घाई असल्यामुळे थांबायचे नाही असे जरी ठरवले, तरी सृष्टीचा तो अप्रतिम नजारा बघून मोह न आवरून दर पंधरा वीस मिनिटांनी आम्हाला गाडी थांबवून भरपूर फोटो काढल्याशिवाय राहवले नाही. मधेच एक रस्ता Clingman Dome या डोंगराच्या शिखराकडे जात होता. शिखरावरून आजूबाजूच्या दऱ्यांतील दृश्य अतिशय सुंदर दिसत होते. गॅटलीनबर्ग हे छोटेसे टुमदार गाव पर्यटकांचे खूप लाडके आहे. खरे तर तिथे दोन-तीन दिवस राहून आजूबाजूच्या ग्रेट स्मोकी माऊंटनच्या सौंदर्याचा मनसोक्त आस्वाद घेण्याची खूप इच्छा झाली. पण आम्ही चिमणी रॉक पार्क जवळ मुक्काम केला असल्यामुळे दोन-तीन तास गावात व आजूबाजूला फिरून पुन्हा रात्री उशिरा मुक्कामी परतलो.

शेवटच्या दिवशी संध्याकाळी नॉर्थ कॅरोलिना राज्याची राजधानी राले (Raleigh) येथून न्यूयॉर्कसाठी फ्लाईट पकडायची असल्यामुळे सकाळच्या वेळी आम्ही जवळच असलेल्या सुंदरशा लेक Lure आणि चिमणी रॉक पार्कला भेट देण्यास गेलो. तळ्याकाठी अनेक सुंदर सुंदर घरे होती आणि चारी बाजूला उंचच उंच डोंगर होते. त्या घरात राहणाऱ्या माणसांचा खरोखर मनापासून हेवा वाटला. तळ्याकाठच्या बहुतांश सर्व घरांपाशी लाकडी डॉक्स आणि तेथून तळ्यामध्ये फिरण्यासाठी छोट्या छोट्या बोटी बांधलेल्या होत्या.  शिवाय कयाकिंगचीसुद्धा सोय होती, पण वेळेअभावी आम्ही थांबू शकलो नाही. पर्यटन स्थळांची सुंदर निगराणी करणे व सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे चिमणी रॉक पार्क! उजवीकडच्या डोंगरावर निम्म्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता केलेला होता. तेथून पुढे डोंगराच्या माथ्यावर जाण्यासाठी चिमणी रॉक या खडकामधून एक २६ मजली लिफ्ट केली होती.

वर पोहोचल्यावर काचेच्या मोठ्या खिडक्या असलेले एक रेस्टॉरंट कड्याच्या टोकावर बांधलेले होते. तेथे बसून खालील दरीमधील लेक Lure तळ्याचे व आजूबाजूच्या उंचच-उंच डोंगरांचे सुंदर दृश्य बघताना थोडी भीतीही वाटत होती. जवळच उंचावरील एका मोठ्या खडकावर अमेरिकेचा झेंडा फडकत होता व बाजूने रेलिंग लावून खालील दृश्य बघण्यासाठी सोय केलेली होती. अजून एक आठवड्याने या भागात आजूबाजूच्या सर्व झाडांनी रंग बदलल्यावर ते पिक कलर्स वरून किती सुंदर दिसत असतील याची आम्ही फक्त कल्पनाच करू शकलो आणि जमल्यास पुन्हा कधीतरी ते दृश्य बघायला यायचे असे मनाशी ठरवले! जवळच असलेल्या ‘हिकरी नट’ नावाच्या धबधब्याच्या वरील टोकावर आणि खाली जाण्यासाठी हायकिंग ट्रेल्स होते. आम्ही चिमणी रॉकच्या खडकावर बसून राहिलो आणि मुले मात्र उत्साहाने ते ट्रेल्स करून लिफ्टने न येता पायऱ्या उचलून खाली आले. 

हा सुंदर परिसर सोडून जाताना मनाला एक प्रकारची रुखरुख लागली होती. पण जवळपास तीनशे किलोमीटरचा पल्ला पार पाडून, मधे शार्लोट या गावात एका स्नेह्यांची गाठ घेऊन, शेवटी न्यूयॉर्कसाठी संध्याकाळची फ्लाईट असल्यामुळे राले ( Raleigh )च्या दिशेने गाडी दामटली. अमेरिकेमध्ये सेल्फ ड्राइव्ह कारची एवढी सुंदर सोय आहे, की मायामीहून जवळजवळ दहा दिवसांपूर्वी घेतलेली गाडी आम्ही रालेच्या विमानतळावर पाच मिनिटांत परत करून वेळेआधीच फ्लाईटसाठी पोहोचू शकलो.

बऱ्याच वर्षांपासून मनात असलेल्या फॉल कलर्सच्या रंगोत्सवाचा हा पहिला भाग होता..! 

संबंधित बातम्या