त्रिपुरा व अद्‍भुत उनाकोटी

डॉ. विराग गोखले, मुंबई
सोमवार, 22 नोव्हेंबर 2021


पर्यटन

पाच वर्षांपूर्वी आमच्या एका मूळच्या त्रिपुरावासी नातेवाइकामुळे आम्हालाही त्रिपुरा बघायची इच्छा निर्माण झाली. या भेटीत उनाकोटी या अद्‍भुत ठिकाणालाही भेट दिली. काहीतरी वेगळे पाहिल्याचा, काहीतरी वेगळेच अनुभवल्याचा आनंद मिळाला.  

बांगलादेशच्या पूर्वेला असलेले हे छोटेखानी राज्य. ययातीचा पुत्र द्रुह्यू  याने या राज्याची स्थापना केली असे म्हणतात. पुढे त्यांच्याच वंशातील राजा त्रिपुर याच्या नावावरून या प्रदेशाला त्रिपुरा असे नाव  पडले. १५ ऑक्टोबर १९४९ रोजी हे राज्य भारतीय संघराज्यात सामील झाले. राजधानीचे शहर आहे अगरताळा. येथे असलेल्या ‘अगर’ नावाच्या सुगंधित तेल देणाऱ्या झाडांमुळे या शहराला हे नाव प्राप्त झाले. हेच अगरबत्ती या शब्दाचे मूळ.  

अगरताळा शहरातील उज्जयंता राजवाडा, जगन्नाथ व अन्य विस्तीर्ण मंदिरे व हेरिटेज पार्क, ही खास  प्रेक्षणीय ठिकाणे. या हेरिटेज पार्कमध्ये त्रिपुरा राज्याचा शेकडो वर्षांचा वारसा सांगणाऱ्या वास्तू, छोट्या छोट्या प्रतिकृतींच्या स्वरूपात दर्शविल्या आहेत. अगदी डोंगरदऱ्या, रेल्वे, हजारएक वर्षांपूर्वीची बास रिलीफ शिल्प, मंदिरे, राजवाडे सर्व काही येथे आहे. प्रतिकृती इतक्या हुबेहूब आहेत की प्रत्यक्ष वास्तूच पाहतो आहोत, असे वाटावे. हे पार्क बघताना हॉलंडमधील ‘मदुरोडॅम’ची आठवण  झाली.

महाराजा राधाकिशोर माणिक्य यांनी १९०१ साली बांधलेल्या उज्जयंता राजवाड्यामध्ये आज त्रिपुराचे शासकीय संग्रहालय आहे. शहराच्या मध्यभागी तलावाच्या किनाऱ्यावर वसलेला हा राजवाडा  अगरताळाची शान आहे. पांढऱ्याशुभ्र रंगाचा, तीन घुमट असलेला हा प्रचंड राजवाडा खरोखरीच प्रेक्षणीय आहे. सभोवतालची मुघल धर्तीची उद्याने, राजवाडा परिसराचे सौंदर्य आणखीन वाढवतात. सैन्यात असलेला एक मराठी जवान त्याच्या आईवडील, पत्नी व मुलाबरोबर त्याच वेळेला राजवाडा बघायला आला होता. आमचे मराठी संभाषण ऐकून त्यांना खूप आनंद झाला. कोल्हापूरकडचे जाधव आडनावाचे कुटुंब होते. त्यांनी लगेच आमच्याबरोबर गप्पा मारायला सुरुवात केली. अख्खा आठवडा या भागात फिरतोय, पण मराठी माणूस प्रथमच भेटला, असे त्यांनी सांगितले. एकत्र फोटो वगैरे काढून झाल्यावर आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. आजच्या अगरताळा शहरानजीक जुने अगरताळा आहे. येथे महाभारत काळापासून पुजल्या जाणाऱ्या राजघराण्याच्या चौदा देवता असलेले, मोठे नाही पण वेगळ्याच प्रकारचे, चतुर्दश देवता मंदिर आहे. येथे आषाढात एक आठवडा ‘खर्ची पूजा’ हा उत्सव साजरा होतो. अगरताळा शहराबाबतची सगळ्यात गमतीदार गोष्ट म्हणजे शहराला लागूनच असलेली बांगलादेशची सीमा. अगरताळा शहरातील सीमेलगतच्या रस्त्याने जाताना दोन फुटावर तारेचे कुंपण आहे. त्याच्या बाजूला बांगलादेशी शेतकरी शेतात काम करताना दिसत होते. बस! हाकेच्या नाही, तर एका टांगेच्या अंतरावर एक पूर्ण भिन्न राजकीय व्यवस्था कार्यरत होती!

उदयपूर ही त्रिपुरा राज्याची सोळाव्या शतकातील राजधानी. अगरताळा शहरापासून हे शहर पंचेचाळीस किलोमीटर दूर आहे. मंदिरांचे शहर म्हणून उदयपूरची ख्याती होती. येथे आम्ही त्रिपुरा सुंदरीचे मंदिर बघायला गेलो होतो. मंदिर कासवाच्या आकाराच्या एका डोंगरावर वसलेले आहे. या डोंगराला कूर्मपीठ म्हणतात. ओरिसा, आसाम व बंगाल या जवळजवळच्या राज्यातील मंदिरांचे स्थापत्य मात्र खूप भिन्न आहे. त्रिपुरा सुंदरी मंदिराचे रूप बंगाली पद्धतीचे आहे. छताचा आकार जणू गवतांच्या पेंढ्या शाकारून केल्यासारखा आहे. मंदिराजवळच कल्याणसागर नावाचा एक तलाव आहे. तलावात अनेक प्रकारचे मासे व कासवे आहेत. तलाव परिसरात माशांसाठी खाद्य विकणारे फेरीवाले होते. पाण्यात खाद्य टाकताच गोळा होणाऱ्या नाना रंगी माशांची लगबग गमतीदार वाटते.  अगरताळापासून पन्नासएक किलोमीटरवरील रुद्रसागर तलावात बांधलेला निरमहाल तसा आधुनिक, म्हणजे १९३०चा आहे. महाराज वीर विक्रम किशोर माणिक्य यांनी हा तयार केला. उत्तर पूर्वेच्या राज्यांमध्ये हा एकच जलमहाल आहे. रवींद्रनाथ टागोरांनी हे नाव महाराजांना सुचवले असे म्हणतात. बरीच पडझड झालेल्या महालाची पर्यटन खात्याने हल्लीच  पुनर्बांधणी केली आहे. अल्प शुल्क देऊन होडीने महालापर्यंत जाता येते. मुघल व हिंदू स्थापत्याचे मिश्रण असलेला हा महाल तरुण जोडप्यांना  भरपूर फोटोग्राफीच्या संधी देतो. येथे ध्वनी प्रकाश कार्यक्रमसुद्धा सुरू होणार होता व आम्ही गेलो तेव्हा त्या दृष्टीने तयारी सुरू होती.

या राज्यात दगड फारसे नाहीत, म्हणून बांधकामासाठी खडीऐवजी विटांचे तुकडे वापरतात. आम्हाला ठिकठिकाणी विटांच्या वेगवेगवेगळ्या आकारांच्या तुकड्यांच्या राशी आढळल्या. देवळांबाहेर व पूजा स्थानांबाहेर, पांढऱ्या धाग्याचे जाळ्यासारखे झेंडे आम्हाला दिसले. त्याचे महत्त्व काय हे जाणून घ्यायच्या आमच्या प्रयत्नांना यश आले नाही. ग्रामीण भागात भाषेची थोडी अडचण जाणवली. थोडेबहुत इंग्रजी जाणणाऱ्या एका गृहस्थाने आम्हाला ते ‘प्रेअर फ्लॅग’ आहेत अशी माहिती दिली.      

अगरताळ्याच्या ईशान्येला, १७८ किमी दूर एक अद्‍भुत ठिकाण आहे - उनाकोटी. आम्ही टॅक्सीने  पाच तासांत तेथे पोचलो. ज्या शहराजवळ रघुनंदन डोंगरातील उनाकोटीचे अद्‍भुत शिल्प-जग वसले आहे, त्याचे नाव कैलाशहर, म्हणजे कैलास अधिक हर. तेथेच रात्री मुक्काम करून सकाळी आम्ही नवव्या शतकात शिल्पकारांनी निर्माण केलेले हे आश्चर्यकारक स्थान बघायला गेलो. येथील डोंगर व दऱ्यांमध्ये शिल्पकारांनी असंख्य देवदेवतांची शिल्प कोरली आहेत. ही अजस्र ‘बास रिलीफ’ अथवा उठाव पद्धतीची शिल्प, भारतातील सगळ्यात मोठी आहेत. शिव, विष्णू, गणेश, अन्य अनेक देवता,  नंदी, कासव सगळे काही येथे अवतरले आहेत. सभोवताली सुंदर वनश्री आहे. शिल्पकला आदिवासी धाटणीची आहे. खरी गंमत स्थळाच्या नावात आहे. ‘उनाकोटी’ म्हणजे ‘कोटी उणे एक’. अशी कथा सांगितली जाते, की भगवान शंकरांसह एकूण एक कोटी देवदेवता या प्रदेशावरून, काशीच्या दिशेला प्रवास करत होते. येथे पोचले तेव्हा सर्व देव फार थकले होते. त्यांनी शंकराला विनंती केली की ती रात्र तेथेच मुक्काम करावा व सकाळी पुढे मार्गक्रमण करावे. एकूण परिस्थिती पाहून शंकराने होकार दिला. पण कोंबडा आरवताच निघायची अट घातली. सकाळ झाली, अपार थकलेले देव उठेचनात. शिवशंकर क्रोधित झाले. ‘तुम्ही सगळे कायमचे येथेच दगडासारखे पडून राहा!’ असे बोलून शंकर एकटेच पुढे काशीला रवाना झाले. एक कोटी उणे एक शिवशंकर म्हणजे उनाकोटी देव आज तेथेच पडून आहेत. त्यातले २०-३० देव आम्ही पाहिले, पण मग आम्हीही थकून गेलो आणि डोंगर चढून अन्य देवांचे दर्शन करायचा संकल्प सोडून अगरताळा येथे परतण्यासाठी टॅक्सीत बसलो.

काहीतरी वेगळे पाहिल्याच्या, काहीतरी वेगळेच अनुभवल्याचा खुशीत सचिन 

देव बर्मन व राहुल देव बर्मन यांच्या मूळ राज्यातून मुंबईला परतलो.

संबंधित बातम्या