अलास्काचा सांस्कृतिक ठेवा

प्रतिमा दुरुगकर 
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

पर्यटन

अमेरिकेच्या ताब्यात असणारे अलास्का म्हणजे स्वप्नभूमी आहे. अलास्का क्रूजने जाताना पॅसिफिक महासागरात दिसणारे हम्पबॅक व्हेल्स, अलास्कातील महाप्रचंड ग्लेशिअर्स, तेथील गोल्ड रशचा प्रदेश व त्याची सैर घडवून आणणारी व्हाइट पास रेल्वे, तेथील गावे, तेथील निसर्ग, पक्षी, स्थानिकांची खेडी व त्यांची संस्कृती ही या स्वप्न प्रदेशातील आकर्षणे आहेत. आम्ही अलास्का क्रूजमध्ये हे सर्व मनसोक्त अनुभवले. साल्मन फिश तर मत्स्यप्रेमींचे खास आकर्षण आहे. 

अलास्काच्या वायव्येला वेगवेगळ्या बेटांवर व समुद्राकाठी पुढील स्थानिक नेटिव्ह लोकांची वस्ती प्राचीन काळापासून आहे. व्हिलेज आयलंड आणि टोंगास आयलंडवरील क्लिंकिट (Tlingit) जमाती, प्रिन्स ऑफ वेल्स आयलंडवरील ओल्ड कसान येथील हैड (Haida) जमाती, शिवाय सिमशियान (Tsimshian) जमाती. या स्थानिकांना तेथे नेशन (Nation) असे संबोधतात. 

अठराव्या शतकाच्या शेवटी व एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला या नेशनच्या परंपरा, वाद्य, भाषा, पेहराव, कायदे म्हणजे एकूण संस्कृतीच, युरोपियन किंवा मिशनरी लोकांच्या वसाहतवादी वर्चस्वाखाली हळूहळू लोप पावू लागली. पण तरीही अजून काही परंपरा तग धरून आहेत. काही अगदी छोट्या वस्त्या आजही अलास्काच्या वायव्येला छोट्या बेटांवर तसेच समुद्राकाठी आहेत. या खेड्यांना भेटी दिल्यावर सर्वांत प्रथम नजरेत भरतात ते तेथील टोटेम पोल्स... 

अलास्कामध्ये विपुल प्रमाणात आढळणाऱ्या रेड सीडर ट्रीच्या (Red Cedar tree) बुंध्यावर कोरीव काम करून हे टोटेम पोल बनवितात. प्रथम दर्शनी यावर पुढील गोष्टी दिसतात - अस्वल, रेवन (अलास्कातील कावळ्यासारखा पण आकाराने खूप मोठा पक्षी), बेडूक, गरुड, व्हेल मासा, साल्मन मासा, स्त्री-पुरुष, बालक इत्यादी. 

पूर्वी घडलेल्या घटना, त्यातील पूर्वजांच्या आणि प्राण्यांच्या हकिकती या येथील लोकांच्या वंशाबद्दल आणि सांस्कृतिक मूल्यांबद्दल महत्त्वाची माहिती सांगतात. त्या हकिकती आपल्या वंशजांना सावधानतेचा इशाराही देतात. वायव्येला राहणारे हे स्थानिक लोक त्या कथा जाणतात. लहानपणी ऐकलेल्या कथा हे समाजाचे देणे असते. कुळाची कथा म्हणून या कथा कुळाचे चिन्ह बनते, कारण या कथा सांगताना प्राण्यांचे सिम्बॉल वापरतात. तेच कुळाचे चिन्ह बनते. पूर्वीच्या संशोधकांनी या चिन्हाला टोटेम हा शब्द वापरला. हा शब्द ‘लेक सुपीरियर’च्या लोकांकडून घेतला. 

परंपरेप्रमाणे टोटेमसाठी झाड निवडण्यापासून, तो उभा करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी विधी व समारंभ असतो. पण हे खांब धार्मिक विधीसाठी नसतात. अनुभवी प्रौढ व्यक्ती तरुणांना सर्व कौशल्ये शिकवितात. वेस्टर्न रेड सीडर ट्रीची (Western Red Cedar tree) निवड करतात व मग ते झाड तोडतात. या झाडाला वायव्येकडील हे स्थानिक 'Tree Of Life' म्हणतात. हे झाड त्यांच्या जीवनाचा आधार आहे. यापासून ते कपडे, भांडी, घरे, होड्या आणि टोटेम पोल बनवितात. कुळाचा मुखिया मग त्यांना खांबाचा विषय सांगतो. त्यावर काय कोरायचे तेही सांगतो. टोटेम पोलवर रिंगसुद्धा कोरतात. खांब उभा करणाऱ्याने जितके पाॅटलॅच (Potlatch) म्हणजे पार्ट्या दिल्या असतील, तेवढ्या रिंगा कोरतात. साल्मन माशांच्या अंड्यातील तैलीय पदार्थ व मिनरल्स यापासून रंग बनवितात. मुख्यतः रंग तीनच - निळा हिरवा, तपकिरी लाल आणि काळा. खांब कोरण्यासाठीची हत्यारे पूर्वी हाडांपासून बनवीत असत. खांब तयार झाल्यावर तो उभा करणे हा फार मोठा व प्रतिष्ठेचा समारंभ असे. त्याला पाॅटलॅच म्हणत. जे कुळ टोटेम उभे करते, ते पाॅटलॅच देई. इतर कुळांनाही बोलावत असत. खूप तयारी करत. पदार्थ, कपडे, भांडी, भेटवस्तू इत्यादी सर्व ठरवीत. पाॅटलॅच अनेक दिवस किंवा अनेक आठवडेही चाले. नृत्य, भाषणे, पारंपरिक वाद्य वाजविणे, जेवणावळी, भेटवस्तू देणे, जुन्या कथा सांगणे, मौखिक परंपरा पुढील पिढीला देणे इत्यादी सर्व या समारंभात होत असे. तुम्हाला तुमच्या कुळाची माहिती असलीच पाहिजे. तरच कळते तुमचे नातेवाईक कोण, त्यासाठी कुळाची चिन्हे असतात. 

खांब चिंन्हांमधून कोरला जातो. ते चिन्ह कुळाचे असते. ते मागे मागे जाऊन अनेक पिढ्यांना जोडते. सांगते - ‘तू मीच आहेस. मी तुझा पूर्वज आहे.’ पूर्वज तुमच्या कुटुंबाच्या मुळांना जोडणारे दुवे आहेत. हीच मुळे तुमच्या कुटुंबाचा आधार आहेत. तुम्ही कोण हे हीच मुळे सांगतात. परंपरा, परस्परसंबंध यातून या मुळांची रचना होते. पूर्वजांचे संचित हे कुळाच्या चिंन्हांमधून प्रस्थापित होते. त्याचे सादरीकरण होते. हा दस्तऐवज या टोटेम पोल्स व पाॅटलॅचमधून जपला जातो. हस्तांतरीत केला जातो. प्रत्येक चिन्ह त्या कुळाचे असते. कुळ मोठे होत जाते. शक्ती वाढते. कुळाचे खांब घराबाहेर समुद्राकाठी समुद्राकडे तोंड करून उभे केले जातात. तेव्हा लोकांना कळते - या घरात 'बेडूक कूळ' (Frog Clan) राहते. येथे माझे स्वागत होईल किंवा होणार नाही, हेही कळते. वायव्येकडील हे स्थानिक मातृसत्ताक आहेत. घरातील सर्व विधींमध्ये आईच्या भावाला वडिलांपेक्षा मान दिला जातो. 

वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी कोरलेल्या टोटेम पोलवरून त्याचे प्रकार होतात : 

१. हेरालडिक पोल (Heraldic Pole) : हा खांब कुळाच्या वंशाचे सादरीकरण असते. वायव्येकडील प्राणी-पक्षी कुळाचे प्रतिनिधित्व करतो. हा खांब घरासमोर उभा करतात. यावर आईच्या कुळाचे चिन्ह, माहिती असते. हैड जमातीत या खांबाचा खालील भाग म्हणजेच मुखियाच्या घराचा दरवाजा असे. म्हणजे झाडाचा बुंधा किती मोठा असेल याची कल्पना येते. 

२. मेमोरियल पोल (Memorial Pole) : स्मृती खांब. उच्च जमातीतील मोठी व्यक्ती गेल्यावर तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा खांब उभा करीत असत. यात त्या खांबाच्या मागे एक बॉक्स बनवीत व त्यात त्या व्यक्तीची राख ठेवीत असत. हा स्तंभ उभा करताना शोकसभेला विरोधी कुळातील लोक येत असत, तेच हा खांब उभा करीत. मृताप्रती आदर व्यक्त करीत. मग मृताचे नातेवाईक त्यांना भेटवस्तू देत. (किती उत्तम परंपरा.. विरोधही मरणाबरोबर संपतो. विखारी नाही.) याच वेळी मृताची जागा कुळातील दुसऱ्या लायक व्यक्तीला दिली जाई. त्यामुळे कूळ निराधार राहात नसे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला येथे आलेल्या मिशनरी लोकांनी स्थानिकांच्या अंत्यसंस्कार विधीला विरोध केला. त्यामुळे ख्रिश्चन पद्धतीने दफन चालू झाले. 

३. शेम अाॅर रिडिक्युल पोल (Shame or Ridicule Pole) ः लज्जास्पद खांब. एखाद्याने कर्ज बुडविले किंवा लज्जास्पद, कुळाला काळिमा लावणारे कृत्य केले, तर हा खांब त्याच्या घरासमोर उभा करीत असत. त्याने चुकीची दुरुस्ती केली तर हा खांब काढून टाकला जाई. 

४. हाऊस पोस्ट्स अाॅर पिलर्स (House Posts or Pillers) ः हे खांब कुटुंबाचा इतिहास गोल खांबावर कोरून बनवीत. हाच खांब घर बांधताना मध्यभागी उभा करीत. त्यावर कुळाचे चिन्ह व महत्त्वाच्या घटना कोरीत. क्लिंकिट जमातीत हे होते. 

५. स्टोरी पोल्स (Story Poles) ः कुळाच्या वंशाच्या कथांचे सादरीकरण या खांबावर केले जाई. उदा. हैड जमातीत एक शूर योद्धा होता. त्याचे नाव स्टोन रिब (Stone Rib). समुद्रावर वादळ आले असताना तो कोणाचेही न ऐकता समुद्रावर गेला व बुडाला.  किलर व्हेल्सनी त्याला तळाशी नेले. (प्राण्यांचे जग आपल्यासारखेच असते. त्या जगात ते माणसेच असतात आपल्याला ते प्राणी वाटतात अशी श्रद्धा.) किलर व्हेल्सनी स्टोन रिबला हिवाळ्यासाठी अन्न कसे साठवायचे ते शिकविले. त्याला पुन्हा आपल्या लोकांकडे जायची इच्छा झाली. पण किलर व्हेल्सनी त्याला नकार दिला. स्टोन रिबने स्वतःला पानात गुंडाळून 'सी लायन'सारखे बनविले व तो किलर व्हेल्सना चुकवून वर आला. 

६. सन अँड रेवन टोटेम पोल (Sun n Raven Totem Pole) ः अतिशय लोकप्रिय कथा. हे खांब सर्वत्र दिसतात. रेवन(Raven) हा पक्षी सर्वच जमातीत लोकप्रिय आहे. तो आदर्श नायक आहे. मुखियाने चंद्र, सूर्य व तारे एका पेटीत बंदिस्त करून ठेवले होते. रेवनने त्यांच्या नातवाचे रूप घेतले. हट्ट करून रडून आजोबांकडून पेटी मिळविली. पेटी मिळताच रूप बदलले. पेटी उघडली. सूर्य, चंद्र, तारे मोकळे केले. या टोटेम पोलवर, वर माथ्यावर रेवेन व नंतर सूर्य-चंद्र, मुखिया, पेटी, नातू इत्यादी सर्व कोरतात. 

७. फाॅग वूमन : साल्मन मासे अंडी घालण्यासाठी उलट्या दिशेने समुद्रातून नदीत स्थलांतर करतात. रेवन एका स्त्रीशी लग्न करतो. ती स्त्री बास्केट नदी मुखाजवळ पाण्यात बुडवून साल्मन पकडण्यात पटाईत असते. ती असे साल्मन पकडून रेवनला देत असे. हेच जगातील पहिले साल्मन. जेव्हा रेवन तिला वाईट वागवितो तेव्हा ती त्याला सोडून निघून जाते. स्वतःबरोबर सर्व साल्मन घेऊन जाते. रेवन तिला पकडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या पंजातून ती धुक्याप्रमाणे निसटते. 

एक लोकप्रिय लोकगीत 
या कथा कोणी लिहिल्या 
नाही! कोणीच नाही 
त्या अनेक जगन मधून आल्या 
ते जग आणि ते लोक नाश पावले 
जे पूर्वी माणसे होती 
ती पक्षी झाली 
मासे झाले 
केसाळ प्राणी झाले 
हरीण झाले 
फळे बनले 
जमिनीखाली कंद बनले
हेच ते ज्यांच्याकडून कथा आल्या 
इथेच फक्त नाही 
तर प्रत्येक अशा ठिकाणी 
जेथे वेगवेगळे लोक राहतात 
वेगवेगळ्या भाषा बोलणारे 
वेगवेगळे अन्न खाणारे
इथेसुद्धा असेच खूप लोक आहेत . 

                                     - अनामिक 

तर असे हे टोटेम पोल, अलास्काच्या वायव्येकडील स्थानिकांचा सांस्कृतिक ठेवा, त्यांची मौखिक परंपरा जिवंत ठेवणारे, संपत्ती व प्रतिष्ठा दर्शविणारे, मृतांप्रती आदर व्यक्त करणारे. तथाकथित बुद्धिवादी, आधुनिक लोकांनी यांना मागासलेले, अविकसित ठरविले. पण मागासलेले कोण? हे लोक जे निसर्गाला आपले पूर्वज मानून त्यांचा सांभाळ करतात, विरोधकांचाही आदर करतात, स्त्रीला सन्मान देतात, की आपण जे पृथ्वीला ओरबडीत आहोत, जंगले नष्ट करीत आहोत, समुद्र, नद्या प्रदूषित करीत आहोत. अत्याधुनिक शस्त्रास्त्रे बनवून सतत युद्धाच्या तयारीत राहात आहोत.   

संबंधित बातम्या