टांझानियातील ‘दार-ए-सलाम’

सुमेधा कुलकर्णी
सोमवार, 6 डिसेंबर 2021

पर्यटन

टांझानिया हा पूर्व आफ्रिकेतील देश. किलिमांजारोसारखा पर्वत, घनदाट जंगले, टांगानिका, व्हिक्टोरिया आणि मालावी लेक ही तीन मोठी सरोवरे अशा नैसर्गिक आणि भोगौलिकदृष्ट्या विविधतेने नटलेला हा देश आहे. मला टांझानियाला चारवेळा जायची संधी मिळाली. या चार भेटींमध्ये मी पाहिलेला टांझानिया... 

टांझानियात एकोणिसाव्या शतकात जर्मन राजवट आली आणि पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिशांचे शासन आले. १९६१मध्ये टांझानिया ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाला आणि १९६४मध्ये झांझिबार आणि टांझानिया यांचा संयुक्त प्रजासत्ताक टांझानिया झाला. टांझानियामध्ये स्वाहिली ही सर्वसामान्यपणे बोलली जाणारी भाषा असली, तरी बहुतेक जणांना इंग्रजी येते. टांझानियामध्ये इतर आफ्रिकन देशांपेक्षा अधिक राजकीय स्थैर्य दिसते. टांझानियाचे भारताशी खूप चांगले संबंध आहेत. 

दार-ए-सलाम हे टांझानियातील आणि पूर्व आफ्रिकेतील सर्वात मोठे शहर. याची लोकसंख्या ६० लाखांच्या वर आहे. दार-ए-सलाम येथे पूर्वी टांझानियाची राजधानी होती, पण नंतर १९९६मध्ये राजधानी डोडोमा या शहरात हलवली गेली, तरी आजही दार-ए-सलाम शहर कला, फॅशन, संगीत, मीडिया आणि आर्थिकदृष्ट्या टांझानियातील आघाडीचे केंद्र आहे. टांझानियाला भेट देणारे बहुतेक पर्यटक इथे येतातच. मंसाकी, ऑईस्टरबे, मसनानी या दार-ए-सलाममधील समुद्र किनाऱ्यावरील श्रीमंत वसाहती आहेत. श्रद्धा जाधव नावाची माझी केनियातील मैत्रीण लग्न झाल्यावर टांझानियाला शिफ्ट झाली होती. ती मसाकीमध्ये राहत असे. माझ्या टांझानियातील बहुतेक भेटींमध्ये मी तिच्या घरी जात असे. तिच्या घराच्या बाल्कनीतून दिसणाऱ्या समुद्राचा विलोभनीय देखाव्याचा फोटो मी आठवण म्हणून माझ्याकडे जपून ठेवला आहे. 

 श्रद्धा आणि मी रिकाम्या वेळेत दार-ए-सलाममध्ये भरपूर ठिकाणी हिंडत असू. दार-ए-सलाम शहराला  हिंदी महासागराची सुंदर किनारपट्टी लाभलेली आहे. समुद्रकिनाऱ्यावरील हॉटेल्स् भटकंती करणाऱ्या  प्रवाशांना विशेष आकर्षित करतात. समुद्राचे निळेशार पाणी आणि पांढऱ्या वाळूचे सुंदर स्वच्छ किनारे, आफ्रिकन सुमधुर संगीताची धून ऐकत हॉटेलच्या ओपन टेरेसमध्ये आपल्या मित्रजनांबरोबर आफ्रिकन पेय - पॅशन फ्रुट ज्यूस पिण्यातली मजा काही न्यारीच असते. 

 टांझानियातील स्थानिक बाजारातून आणि आर्ट गॅलरीतून टांझानियन कलाकुसर आणि संस्कृती दर्शवणारी चित्रे आणि कुरीओज विकायला ठेवलेले दिसतात. टिंगॅटिंगा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चित्रशैलीतील प्राण्यांची चित्रे आणि व्यंग्यचित्रे रेखाटलेली बघायला मिळतात. मासोनाईटवर रंगाच्या अनेक  थरांचा वापर करून ही चित्रे रंगवलेली असल्यामुळे चित्रांना छान चमक आलेली दिसते.
दार-ए-सलाममधील बहुतेक सर्व मोठ्या ओपन एअर हॉटेलमधून वीकएंड पार्टीचे

आयोजन केले जाते. अशा एखाद्या ठिकाणास भेट दिल्यास टांझानियातील तरुणाईचा जोश आणि स्थानिक संगीत ऐकायला मिळते. श्रद्धाबरोबर मला ‘ट्रिनिटी’ आणि ‘केम्पेसकी’ येथील वीकएंड पार्टीचा जल्लोष बघण्याची संधी  मिळाली होती. डीजे, काही गायक-कलाकार आणि स्थानिक तरुण मंडळी आणि बरेच टुरिस्ट त्या ठिकाणी दिसत होते. त्यामित्ताने ‘ताराब’ या संगीताची झलक बघायला मिळाली. या संगीताची सुरुवात झंझिबारमध्ये झाली आणि नंतर टांझानिया, केनियामध्ये त्याचा प्रसार झाला. हे संगीत थोडेफार अरबी संगीतासारखे असते.

 दार-ए-सलाममधील मला सर्वात जास्त आवडलेले ठिकाण म्हणजे ‘यॉट क्लब’. हा सदस्यांचा खासगी क्लब असून मसनानी खाडीच्या किनाऱ्यावर बांधलेला आहे. फक्त मेम्बर्सबरोबरच आपल्याला या क्लबमध्ये प्रवेश मिळतो. नौकाविहार, रेसिंग, फिशिंग, स्कूबा डायव्हिंग आणि कायाकिंग यासारखे  वॉटर-स्पोर्ट्सचे इथे आयोजन केले जाते. या क्लबमधील रेस्टॉरंट्सच्या मेनूत खाण्यापिण्याची रेलचेल  दिसते. बहुतेक शुक्रवारी रात्री या क्लबमध्ये बार्बेक्यू आणि संगीत पार्टीचे आयोजन केलेले असते. लहान मुलांना खेळण्यासाठी बऱ्याच प्रकारचे खेळ असतात आणि समुद्रकिनाऱ्यालगत स्वीमिंग पूलही  आहे. त्यामुळे  कुटुंबीयांसमवेत बहुतेक सभासद शनिवार-रविवार इकडे येणे पसंत करतात.

दार-ए-सलामच्या राष्ट्रीय संग्रहालयामध्ये ओल्डुवाई येथील मानवी उत्क्रांतीचे पुरावे पाहायला मिळतात. स्टोन आणि कांस्ययुगात इथिओपिया, सुदान आणि आजूबाजूच्या भागातील कुशी, नायलॉट्स, दत्तुग आणि बांटू जमातीच्या लोकांची टांझानियात स्थलांतरे झाली असल्याचे काही दाखले संग्रहालयामध्ये दिसतात. याशिवाय दार-ए-सलाममधील ओपन एअर व्हिलेज म्युझियममध्ये स्थानिक आणि इतर टांझानियन आदिवासींची पारंपरिक घरे प्रदर्शित केली आहेत.

टांझानियामध्ये सध्या भारतीय वंशाचे  पन्नास हजारांहून अधिक लोक आहेत. त्यापैकी बरेच व्यापारी आहेत आणि त्यांचा टांझानियन अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण सहभाग आहे. दार-ए-सलामच्या भटकंतीत  मला स्वामीनारायण, हनुमान, शिव आदी मंदिरे पाहावयास मिळाली. तिकडे मराठा मंडळही आहे. या मंडळात दरवर्षी गणपती उत्सव साजरा केला जातो.  टांझानियातील आरुषा हे शहर मेरू या ज्वालामुखीय पर्वताच्या तळाशी आहे. या शहराच्या  आजूबाजूला टांझानियातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे - माऊंट किलिमांजारो, सारंगगेटी आणि गोरंगोरो  (वाईल्डलाईफ सफारी) असल्यामुळे बहुतेक पर्यटक येथे मुक्काम करतात.  

किलिमांजारो या आफ्रिकेतील सर्वोच्च शिखराची (५,८९५ मी) चढाई गिर्यारोहक येथूनच सुरू करतात.  किलिमांजारो चढण्यासाठी गिर्यारोहणाची विशेष कौशल्ये, दोरखंड किंवा तत्सम उपकरणे लागत नाहीत. हे पर्वतारोहण नसून हायकिंग किंवा ‘वॉक-अप’ शिखर आहे. तुम्हाला जर उंच जागेवरील ऑक्सिजन कमतरतेमुळे होणारे आजार नसतील तर तुम्ही हा पर्वत चढू शकता. आम्ही किलिमांजारो चढलो नसलो, तरी आम्हाला आमच्या सफारीमध्ये किलिमांजारोच्या सपाट बर्फाच्छादित शिखराचे दर्शन झाले होते. 

दरवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात केनियातील मसाई मारा या अभयारण्यातून वाईल्ड बीस्ट, झेब्रा, हरणे, जिराफ आणि नाईल मगरी असे एक-दीड दशलक्ष वन्यप्राणी टांझानियातील सारंगगेटी आणि गोरोंगोरो या अभयारण्यात स्थलांतरित होतात आणि परत ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मसाई मारामध्ये परत जातात. नदीतून होणारे वाईल्ड बीस्टचे स्थलांतर पाहताना अंगावर शहारा उभा राहतो. 

केनियानंतर टांझानिया हा मला आवडलेला आफ्रिकेतला दुसरा देश आहे. अजून माझी टांझानियातील  बरीच ठिकाणे पाहायची राहून गेली आहेत. बघू, परत कधी तिकडे जायचा योग येतो ते!

संबंधित बातम्या