सह्याद्रीचा मॅटर्नहॉर्न!

अभिजित काटकर
सोमवार, 15 जून 2020

पर्यटन
रांगडा महाराष्ट्र, राकट महाराष्ट्र अशा उपमा आपण पुस्तकातून खूपदा वाचतो. मनातल्या मनात तशा कल्पनाही  केल्या आहेत. पण  ज्याच्या  कुशीत महाराष्ट्र विसावला आहे, त्या सह्याद्रीच्या डोंगररांगांचा 'याची देही याची डोळा' अनुभव घेताना मात्र आपल्यातल्या रांगडेपणाचा कस लागतो.

सह्याद्रीच्या रांगेतील 'राजगड' 'तोरणा' आणि 'रायगड' हे तीन किल्ले म्हणजे ट्रेकर्ससाठी पंढरीची वारीच!  ट्रेकिंगची भक्ती करणाऱ्या वारकऱ्यांना आपल्या पंढरीत जाण्यासाठी अनेक वेड्यावाकड्या 
वळणांचा  सामना करावा लागतो. याच रांगेत एक आभाळात घुसणारा उत्तुंग सुळका पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर आजही निर्भिडपणे उभा आहे. तो म्हणजे किल्ले 'लिंगाणा'!  इतिहासात लिंगाण्याचा वापर महाराजांनी कारागृह म्हणून केला. ७०°-८०° सरळ उभा असलेला सुमारे तीन हजार फूट उंचीचा सुळका हे त्याचे वैशिष्ट. लिंगाणा सर करणे तर सोडाच, परंतु त्याचे नुसते नेत्रसुख घेण्यासाठीदेखील बरीच मेहेनत करावी लागते. हा प्रवास आहे सह्याद्रीचा  'मॅटर्नहॉर्न' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  किल्ले लिंगाण्याचा.

मागच्यावेळी लिंगाण्याला पाहण्याचे  आमचे  स्वप्न भंगल होते. मानसिक तयारीचा आभाव आणि नियोजनाची कमतरता, यामुळे आम्हाला अर्ध्या वाटेवरूनच माघारी फिरावे  लागले. परंतु,  रायलिंग पठारावरून लिंगाणा पाहण्याची खुमखुमी काही केल्या पाठ सोडत नव्हती. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी मला लिंगाण्याचेच  रूप दिसत होते. सह्याद्रीतील ही  अतिविलक्षण जागा आम्हाला सारखी खुणावत होती. अखेरीस पुन्हा नियोजन केले  आणि मोहिमेचा दिवस उजाडला. दिनांक १४ फेब्रुवारी २०२०. 'व्हॅलेंटाईन डे' म्हणजेच प्रेमीयुगलांचा दिवस. मोहिमेसाठी मुद्दामच हा दिवस मी निवडला होता.

यावेळी मोहिमेत आम्ही तिघे सहभागी होतो. नेहमी सोबत असलेला सचिन सुतार आणि त्याचा मित्र संदीप. ठरवलेल्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास आम्ही सायन स्थानक गाठले आणि तीन सदस्यांसह दोन बाइक्स मुंबई-पुणे महामार्गावरून धावू लागल्या. ८.३० च्या सुमारास पनवेलजवळ न्याहारी आटपून खंडाळ्याचा घाट चढायला सुरुवात केली. खंडाळा घाट म्हणजेच 'बोर घाट'.   कोकणाला आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा सह्याद्री जिथे संपतो, ते ठिकाण म्हणजे खंडाळा. मुंबई-पुणे भागातील बरेचसे पर्यटक पावसाळ्यात या खंडाळा घाटाच्या भेटीसाठी आवर्जून येतात. शेकडो फुटांवरून धो-धो करत कोसळणारे धबधबे, आसपासच्या डोंगररांगांचे मनोवेधक दृष्य, आल्हाददायक आणि थंड वातावरण त्यामुळे खंडाळा हे  हील स्टेशन पर्यटकांना पूर्वीपासूनच आकर्षित करत आले आहे.

घाटातून जाताना समोरच 'ड्यूक्स नोझ' म्हणजेच नागफणीचा डोंगर आमच्या नजरेस पडला आणि थोडा वेळ आम्ही बाईक्स  थांबवल्या. 'ड्यूक्स नोझ' म्हणजे खंडाळ्याच्या जवळच असलेले डोंगर शिखर! हे आपल्या विशिष्ट आकारामुळे (या डोंगरांचा आकार  नागाच्या फण्यासारखा असल्यामुळे  'नागफणीचा डोंगर' म्हणतात) आपले लक्ष वेधून घेतो. बरीचशी ट्रेकर मंडळी या डोंगरावर ट्रेकिंगसाठीदेखील जातात. 'ड्यूक्स नोझ' व्यतिरिक्त खंडाळा घाटात बरेचसे पाहण्यासारखे पॉइंट्सदेखील आहेत. उदा. राजमाची पॉइंट, व्हॅली पॉइंट  आणि असे  बरेच पॉइंट्स आहेत,  त्या पॉइंट्सना धावती भेट देत आमच्या बाइक्स पुढे जात होत्या. आठवड्याचा मधला दिवस असल्यामुळे ट्रॅफिक बऱ्यापैकी कमी होते. तळेगाव, देहू, बावधन ही  गावे आणि कात्रजचा बोगदा मागे टाकत खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ पोचलो. तिथून टोल नाका ओलांडल्यानंतर, नसरापूरच्या दिशेने निघालो. दुपारी  एकच्या  दरम्यान आम्ही नसरापूर फाट्याजवळ पोचलो. दणकून नाश्ता केल्यामुळे भूक तितकीशी लागली नव्हती.  त्यामुळे वेल्ह्यात जेवण करायचा असा निर्णय झाला. गाड्या हायवेवरून उजव्या हाताला वळवून आता वेल्ह्याच्या दिशेने भरधाव पळू लागल्या आणि अस्सल गावठी वारा अंगाला भिडू लागला.

अर्ध्या तासातच मार्गासनी गावातून पुढे जात असताना, दूरवर 'दुर्गराज राजगड'ने दर्शन दिले. हळूहळू पुढे जात असताना त्याच्याच मागे 'स्वराज्य तोरणा' खुणावू लागला. त्यांचेच रूप डोळ्यांत साठवत साधारण दोन वाजता आम्ही तोरण्याच्या पायथ्याला असणाऱ्या 'वेल्हे' या गावात पोचलो. आता आम्हाला पोटोबाची सोय करायची होती. बरीचशी हॉटेल्स धुंडाळल्यानंतर विसावा या हॉटेलसमोर गाड्या थांबवल्या. चमचमीत चिकन थाळी! तब्बल वीस-पंचवीस मिनिटांनंतर समोर आली...  आणि काही वेळातच थाळी फस्त करून तृप्त झालो. चमचमीत जेवण खाऊ घातल्याबद्दल हॉटेल मालकाचे आभार मानले आणि जेवणाचा मोबदला दिला, तेव्हा येताना आमच्याकडून चहा पिऊन जा, अशी ऑफरदेखील मिळाली.

सगळा कार्यक्रम आटपेपर्यंत दुपारचे तीन वाजले. आता वेल्ह्यातून आम्हाला २४ किलोमीटर दूर असणारे दुर्गम 'मोहरी' गाव गाठायचे होते. हॉटेलमधून बाहेर पडलो.  बाइकला किक मारल्या आणि बलाढ्य तोरण्याच्या पायथ्याचा वळणावळणाचा रस्ता पार करत 'चापेट' धरणाजवळ येऊन थांबलो. गाड्या रस्त्यावरच पार्क करून खाली धरणाजवळ गेलो. याच धरणाला 'गुंजवणे' धरणदेखील म्हणतात. या धरणातून आसपासच्या गावात पाणी पुरवठा केला जातो. चापेट धरणाच्या त्या निळ्याशार थंड पाण्यात हात-पाय धुतले आणि ताजेतवाने झालो. गुंजवणे धरणाचे सौंदर्य छायाचित्रांत  टिपले आणि नव्या ऊर्जेने पुन्हा ध्येयाकडे मार्गक्रमण करायला सुरुवात केली.

'भट्टी' हे छोटे  गाव मागे टाकत आम्ही तोरणा किल्ल्याच्या पश्चिम टोकाजवळ पोचलो...  आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मागच्या वेळेस आम्ही याच ठिकाणी छायाचित्रे  काढली होती. इथूनच तोरणा किल्ल्याचे  'विशाळ' आणि 'घोडेजिनी' टोक नजरेस पडत होते. क्षणभर तिथे थांबून काही छायाचित्रे  काढली आणि पुढे  निघालो. 'पासली' हे गाव मागे टाकून आम्ही, बऱ्यापैकी चढण चढून  'केळद' खिंडीत पोचलो. आता आम्हाला इथून दहा किलोमीटरवर असणारे 'मोहरी' गाव गाठायचे होते. तिथून सुमारे दोन किलोमीटर पुढे गेल्यानंतर डांबरी रस्त्याची जागा दगड धोंड्याच्या रस्त्याने घेतली. आता  आमचा खरा प्रवास सुरू झाला.  मागच्या वेळेस याच ठिकाणाहून आम्ही मागे फिरलो होतो. परंतु,  यावेळी  आम्ही पुरत्या तयारीनिशी आलो होतो. मागे वळून पाहताना 'तोरणा' आणि 'राजगड' हे किल्ले क्षेत्रातील लेजंड्स जणू काही 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' असेच म्हणत उभे होते. निसरडी माती आणि खड्डे यांमुळे आम्ही १५-२० च्याच स्पीडने पुढे सरकत होतो. वाटेत काही आसपासची आदिवासी पाड्यातील मंडळीही आमच्या नजरेस पडत होती. त्यांना मार्ग विचारत आम्ही पुढे जात होतो. साधारण तास-दीड तास केळद खिंडीतून केलेल्या मशागतीनंतर, घाटमाथ्यावरून खाली कोकणात उतरणारी सह्याद्रीची डोंगररांग नजरेस पडू लागली आणि मोहरी गाव आता फार दूर नाही याची शाश्‍वती मिळाली. उत्साह त्यानेच दुणावला आणि पुढे निघालो. विदाउट  पासपोर्ट सिंगापूर गाव मागे टाकले  आणि अखेरीस पाचच्या सुमारास मोहरी गावात पोचलो. ऐन घाटमाथ्यावर वसलेले  हे छोटेसे  गाव, गाव म्हणण्यापेक्षा १०-१२ घरांची वस्तीच. मग  आम्ही गाड्या पार्क करायला सुरक्षित जागा शोधू लागलो. थोडे पुढे गेल्यानंतर एका मोकळ्या जागेत आम्ही गाड्या पार्क केल्या. आसपास कोणीच गावकरी दिसत नव्हते.  एक आजोबा काठी टेकत टेकत आमच्या दिशेने येताना दिसले. मी त्यांना रायलिंग पठारावर कसे  जायचे  हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी 'लिंगाण्याचे  पठार का?' असा प्रतिप्रश्न केला. मी 'हो' म्हणालो. पायवाटेकडे बोट दाखवून, सरळ या मळलेल्या वाटेने अर्धा तास पुढे चालत रहा, असे त्यांनी सांगितले. बहुतेक गावकरी रायलिंग पठाराला लिंगाण्याचे  पठार म्हणत असावेत, हे एव्हाना आमच्या लक्षात आले. पार्क केलेल्या गाड्या दाखवून गाड्यांवर लक्ष असूद्या असे  सांगून त्यांचे आभार मानले आणि पठाराच्या दिशेने आगेकूच केली. सुरुवातीची वाट चांगलीच मळलेली होती, मळलेल्या वाटेने पुढे जात असताना घनदाट जंगलाचा पॅच सुरू झाला.  १५-२० मिनिटे गर्द जंगलातून पायपीट केल्यानंतर झाडी विरळ झाली आणि दूरवर देशावरून कोकणात उतरणाऱ्या घाटवाटा आता आमच्या नजरेस पडू लागल्या. घाटवाटा म्हणजे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या दुवाच! कोकणच्या तुलनेत घाटमाथ्यावर प्रगतीला जास्त वाव मिळाला, त्यामुळे घाटमाथ्यावरचा  विकास लवकर होऊ लागला आणि  कोकणातून घाटमाथ्यावर येण्यासाठी त्याकाळी अनेक घाटवाटांची निर्मिती झाली. त्यांपैकी बऱ्याच घाटवाटा या भागात देखील आहेत. समोरच आम्हाला सिंगापूर नाळ, तवीची नाळ, फडताड नाळ आणि भीक नाळ या घाटवाटा नजरेस पडत होत्या. साथीदारांना त्यांची माहिती दिली. त्या घाटवाटांनाच न्याहाळत पुढे निघालो.  पुढे जात असताना काही वेळातच लिंगाण्याच्या आभाळात घुसणाऱ्या उत्तुंग माथ्याने आम्हाला पहिले दर्शन दिले,  तेव्हा माझ्या आनंदाला पारावर उरला नाही... मग धावतच पठारावर पोचलो.

घोंगावणारा सुसाट वारा आणि समोर उभा असणारा सह्याद्रीचा काळाकभिन्न कातळ, अंगावर रोमांच आणणारे  वातावरण. लिंगाण्याच्या त्या मूर्तिमंत देखण्या रूपाला पाहून किंचितसा भारावलो आणि स्तब्ध झालो. समोरच्या दृष्याने डोळ्यांत पाणी आले. कित्येक दिवस खुणावत असलेल्या सह्याद्रीच्या विलक्षण जागेवर आज मी उभा होतो. ते सुख शब्दांत व्यक्त करणे  कठीण होते. युरोपियन आल्प्स पर्वत रांगेतील 'मॅटर्नहॉर्न' या शिखराशी तुलना करणारा हा 'लिंगाणा' सह्याद्रीच्या कुशीतील बेलाग सुळका अर्थात सह्याद्रीचा 'मॅटर्नहॉर्न' आम्ही 'याची देही याची डोळा' पाहिला  आणि लिंगाण्याचे  वर्णन करताना काही ओळी  मला सुचल्या...

सह्याद्रीच्या विशाल ललाटावर उभा पहाड रेखीला होता..
स्वराज्य राजधानीवर 
अहोरात्र करडी नजर 
ठेवण्यासाठी त्याला नेमला होता!
कित्येक गिर्यारोहकांना आव्हान देत,
ताशीव कड्यांनी रौद्ररूपी तो 
सजला होता!
रायगडाला कवेत घेणारा आयुष्यातला
अविस्मरणीय सूर्यास्त 
मी इथून पाहिला होता!
कित्येक तते उलटूनही राकट, 
कणखर आणि अभेद्य
असा तो लिंगाणा होता!
तो लिंगाणा होता!️

लिंगाणा सर करण्यासाठी इथूनच डाव्या बाजूने, बोराट्याच्या नाळेद्वारे एक घाटवाट खाली उतरते. याच मार्गाने हा लिंगाण्याचा सुळका सर करावा लागतो. महाराष्ट्रामधल्या सर्वात अवघड ट्रेक्समध्ये याचा समावेश होतो. माझेही लिंगाणा सर करण्याचे  स्वप्न आहे. पश्चिमेला दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड दर्शन देत होता.  नीट निरखून पाहिले,  तर जगदीश्वर मंदिर आणि नगारखाना आपली ओळख देत होते. महाराजांच्या समाधीला इथूनच वाकून मुजरा केला. आज दिवसभरात स्वराज्याचे खंदे शिलेदार 'राजगड', 'तोरणा', 'लिंगाणा' आणि सरतेशेवटी 'रायगडाचे' दर्शन झाले आणि भरून पावलो.

सूर्यनारायण मावळताना आसमंतात आपले रंग उधळत होते. जणू काही आमच्या मोहीम पूर्तीची ती सलामीच होती. बराच वेळ ते एकंदरीत दृष्य डोळ्यांत साठवले  आणि अखेरीस मावळत्या सूर्यनारायणाने रायगडाला कवेत घेतले. रायलिंग पठारावरून पाय निघत नव्हता, पण परतीची वाट आम्हाला खुणावत होती. तिथले सारे  सौंदर्य आणि विलक्षण ऊर्जा घेऊन पावले मागे वळवली.  परतीचा प्रवास सुरू  झाला, पण मन मात्र रायलिंग पठारावरच अडकून बसले  होते. आयुष्यभर विसरू शकणार नाही, असा अनुभव गाठीशी घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो... आणि असा काहीसा हटके 'व्हॅलेंटाईन डे' आम्ही साजरा केला... क्योंकीं, शहरोंवाला प्यार हमें कहा जचता हैं, ये दिल तो पहाडों मै हीं बसता हैं! 

संबंधित बातम्या