अन्नदानाची परंपरा 

अमोल सावंत
बुधवार, 28 मार्च 2018

कोल्हापूर-कोकण विशेष

अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ दान आहे. अन्नदान हे असे दान आहे, जेथे दाता-भोक्ता असे दोघेही प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होतात. इतर सर्व दानाचे फळ अप्रत्यक्ष असते. जोपर्यंत दान देणारा आणि दान घेणारा यांना तहान-भुकेच्या भावनेचा अनुभव येत आहे, तोपर्यंत अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही दान नाही. संसारात अन्नदानासारखे श्रेष्ठदान पूर्वीही नव्हते व पुढेही नसेल. अन्नदानाची पुण्यदायी परंपरा कोल्हापुरात महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे अव्याहत सुरू आहे. ट्रस्टची स्थापना २००८ मध्ये झाली. श्री अंबाबाईच्या दर्शनाला येणारे भाविक, पर्यटक, स्थानिक नागरिक या सर्वांना ट्रस्टतर्फे अन्न दिले जाते. भोजनप्रसादात भाजी, आमटी, खीर, भात, ताक असे पदार्थ दिले जातात. हे पदार्थ खाऊन भक्त अक्षरश: तृप्ततेचा अनुभव घेतात. सुरवातीला ट्रस्टतर्फे महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला अन्नदान सुरू झाले. कालांतराने ट्रस्टच्या कार्याची व्याप्ती वाढत गेली. आठवड्यातून तीन दिवस अन्नछत्र सुरू झाले.  

उत्तम दर्जा, स्वच्छता, टापटीप आदींमुळे अन्नछत्राचे नाव सर्वांमुखी झाले. २०१२ मध्ये ट्रस्टतर्फे रोज अन्नदानास सुरवात झाली. श्री तिरुपती बालाजी देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवासन यांच्या हस्ते रोजच्या अन्नछत्रास प्रारंभ करण्यात आला. गेली दहा वर्षे अन्नदानाचा हा सामाजिक यज्ञ अव्याहत सुरू आहे. रोज चार ते पाच हजार भाविक प्रसादाचा लाभ घेतात. विशेष म्हणजे, आयएसओ मानांकित २००८:९००१ असलेले महाराष्ट्रातील हे एकमेव अन्नछत्र ठरले आहे.

अन्नदानाबरोबरच इतर सामाजिक कार्यांतही ट्रस्ट अग्रेसर आहे. जेवणासाठी चांगली बैठक व्यवस्था, उत्तम सेवा, विनम्र कर्मचारी, भोजनाचा दर्जा या गोष्टींवर ट्रस्टने उल्लेखनीय प्रगती केली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भोजनात कांदा, लसणाचा वापर केला जात नाही. अन्नछत्रासाठी ७० कर्मचारी कार्यरत असून, कोल्हापूरच्या वैभवात भर टाकणारा हा उपक्रम ठरला आहे. 

ट्रस्टच्या सामाजिक कार्यात १०० ‘एचआयव्ही’ग्रस्त मुलांना दत्तक घेतले जाते. दिवाळीनिमित्त ५०० गरजू रुग्णांना पाच किलोप्रमाणे फराळाचे वाटप केले जाते. दातांचा दवाखाना सुरू केला असून, दोन हजार रुग्णांनी लाभ घेतला आहे. यात ६० टक्के सवलत दिली जाते. सीपीआर रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाइकांनाही रोज २०० डबे मोफत भोजन दिले जाते. सर्वसामान्य नागरिक, गरजू रुग्णांसाठी रक्त, लघवी तसेच सीटी स्कॅन, सोनोग्राफी, एमआरआय या तपासणीसाठी संस्थेकडून सवलत देण्यात येते.  

अन्नछत्राच्या माध्यमातून सामाजिक वसा जपण्याचे कामही केले जाते. सामाजिक एकतेच्या माध्यमातून दरवर्षी चार हजार महिलांसाठी कुंकुमार्चन सोहळाही आयोजित केला जातो. लवकरच भक्तांसाठी धर्मशाळेची निर्मिती करण्यात येणार आहे. यात १०० खोल्यांचा संकल्प केला असून, मेमध्ये २५ खोल्या निर्माण होतील. सर्वसामान्य भक्तांना केंद्रस्थानी ठेवून त्यांची सेवा करण्यास संस्था नेहमीच कटिबद्ध आहे.
- राजू मेवेकरी, अध्यक्ष, महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्ट, कोल्हापूर

फोटो फीचर

संबंधित बातम्या