इतिहासाचा साक्षीदार

आनंद जगताप 
बुधवार, 28 मार्च 2018

कोल्हापूर-कोकण विशेष

कोल्हापुरात आले, की महालक्ष्मी दर्शनानंतर पर्यटकांची पावले वळतात ती पन्हाळगडाकडे. सलग तीन महिने छत्रपती शिवरायांनी वास्तव्य केलेला, इतिहासाचा साक्षीदार आणि निसर्गाची मुक्‍त उधळण असणारा पन्हाळगड आता नव्या रूपात पर्यटकांना साद घालतोय. थंड हवेच्या लाटा अंगावर झेलत, निसर्गात रममाण होत, शिवरायांच्या आठवणी जागवत या किल्ल्याला भेट हा पर्यटकांसाठी एक रोमांचकारी अनुभव ठरतो. समुद्रसपाटीपासून ३१२७ फूट उंच असलेला, जांभी दगडावर उभारलेला हा किल्ला शिलाहारवंशीय भोज राजाच्या कारकिर्दीतला. पन्नगालय, पराशराश्रम, पद्‌मालय, पर्णालदुर्ग, ब्रह्मशैल, शहानबीदुर्ग अशा अनेक नावांनी परिचित असलेला... शिवरायांनी १६५९ मध्ये हा गड आपल्या ताब्यात घेतला आणि त्याचे नाव ठेवले पन्हाळगड. गडावर केवळ पायवाटेच्या रूपात असणारे जांभी दगडाचे रस्ते कालानुरूप ऐसपैस पसरले. जांभी खडीऐवजी काळी खडी आली, मुरमाची जागा सिमेंटने आणि त्यानंतर डांबराने घेतली. आता तर पेव्हिंग ब्लॉक आले आहेत. पन्हाळगड दिवसेंदिवस आधुनिकतेला सामोरा जात आहे.   

पन्हाळगडी सदर ई महल, अंबरखाना, तीनदरवाजा, धान्याची कोठारे, धर्मकोठी या इतिहास जागविणाऱ्या इमारती आजही ताठ मानेने उभ्या आहेत. गडाभोवतालची तटबंदी बऱ्यापैकी सुस्थितीत आहे, या तटबंदीवरून आजही गडाखालच्या जंगलातील विविध वनस्पती, पक्षी, प्राणी यांचे दर्शन होते. जंगलातील रानमेव्याची चव देणारी काही मंडळी येथे आहेत. गडावर जशी पर्यटकांच्या जिभेचे चोचले पुरवणारी हॉटेल्स आहेत, तशीच अलीकडच्या काळात येथील ‘झुणका-भाकरी‘ प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. चुलीवरील गरमागरम भाकरी, झणझणीत झुणका, खरडा, दही, कांदा असा रांगडी मराठमोळा... खाना पिझ्झा आणि चायनीजच्या जमान्यात पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. तांबड्या-पांढऱ्या रश्श्‍याचा पुरवठा करणारी मंडळी तर घरटी आहेत.

पावनगड ते पन्हाळगड या रोप-वेची प्राथमिक प्रक्रिया पार पडली असून वनखाते आणि पुरातत्त्व विभागाच्या मंजुरीनंतर हा रोप-वे कार्यरत होत आहे. पर्यटन महामंडळाने येथे भव्य अशी इंटरप्रिटिशन इमारत उभारली असून, ती नगर परिषदेच्या ताब्यात दिली आहे. नगरपरिषदेमार्फत येथे आता मनोरंजनाचे विविध कार्यक्रम होत आहेत. ऐतिहासिक अंबरखान्यात ‘लाइट अँड साउंड शो’ची नजीकच्या काळात पूर्तता होत असून शेजारच्या मसाई पठाराच्या पायथ्याशी जिऊर ग्रामपंचायत, वनखाते आणि संयुक्‍त वन व्यवस्थापन समितीमार्फत भव्य ‘व्हर्टिकल ॲडव्हेंचर पार्क’चे पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाच्या मार्गावर आले आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीने एक कोटी रुपयांचा निधी व्यवस्थापन समितीकडे सुपूर्त केला आहे. या प्रकल्पास ‘ लेटस मिस ए हार्ट बीट‘ ही टॅगलाईन देण्यात आली असून, या प्रकल्पातील रोप-वे झिपलाईन, क्‍लायंबिंग वॉल, रॉक क्‍लायंबिंग अँड रॅपलिंग, हाय रोप कोडस, झॉरबिंगबॉल, पॅरासिलिंग, पॅराशूट अशा साहसी प्रकारांनी देशविदेशांतील पर्यटक आकर्षित होणार आहेत. पर्यटकांना राहण्यासाठी तंबू, भोजनगृह, स्वच्छतागृह तसेच मॉर्निंग वॉकसाठी ट्रॅक उभारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसगर्सौंदर्याचा आणि नैसर्गिक स्वच्छ वातावरणाचा लाभ पर्यटकांना मिळणार असल्याने पन्हाळगडाला पर्यटनाच्या नकाशावर वेगळे स्थान मिळणार, हे निश्‍चित.

संबंधित बातम्या