संस्मरणीय बाली

अंजली फडके
सोमवार, 17 जून 2019

पर्यटन
 

प्राचीन परंपरा आणि हिंदू संस्कृतीचा वारसा मिळालेले, निळ्याशार सागरात पसरलेल्या इंडोनेशियातील बाली हे छोटेसे बेट. निसर्ग बालीवर मेहेरबान आहे. दाट झाडी, डोंगर, सुपीक जमीन, अनेक झरे अशी नैसर्गिक साधनसंपत्ती बालीला भरपूर लाभली आहे. माझी बालीचे सौंदर्य पाहाण्याची स्वप्नपूर्ती लवकरच झाली.

डेनपासार हे बालीचे राजधानी शहर आहे. वीणा वर्ल्डने इंडोनेशियातील पॅक्‍टो कंपनीतर्फे आम्हाला सर्व पर्यटनस्थळे दाखविण्याची व्यवस्था केलेली होती. आम्ही उतरलो होतो, त्या भागाचे नाव होते जिंबारान आणि हॉटेलचे नाव होते कर्मा जिंबारान. आमच्या गाइडचे नाव विस्नवा होते. आम्ही प्रथम कुंबसराई आर्ट मार्केटला भेट दिली. हे बाडुंग नदीकाठी आहे. उबुड समाजाने केलेल्या हॅण्डीक्राफ्टच्या वस्तू उदा. बांबूच्या पर्सेस, अत्तर, आकाशकंदील, पंखे, छोट्या बुट्ट्या वगैरे तिथे होते. न्याहारीनंतर बाजरा सॅंडी मॉन्युमेंट पाहायला गेलो. बालीच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी योगदान दिले, त्यांच्या स्मरणार्थ हे १९८७ मध्ये बांधले. त्यात ऐतिहासिक गोष्टी, बालीच्या राजांची माहिती आहे. डच लोकांनी त्यांच्यावर राज्य केले. स्वातंत्र्यलढ्यासाठी ज्या बालनीज लोकांनी प्रयत्न केले, त्यांची माहिती तिथे लिहिली आहे. हे मॉन्युमेंट बालीच्या गव्हर्नरच्या ऑफिससमोर आहे. याला बाजरा सॅंडी म्हणतात, कारण त्याचा आकार घंटेसारखा आहे. इंडोनेशियन भाषेत बाजराचा अर्थ घंटा. त्यानंतर बाली म्युझियममध्ये गेलो. हे चार भागात आहे. १. तबनन भागात नाट्यकलेला लागणारे मुखवटे व वाद्ये होती. २. करंगसेन भागात दगडी कोरीव शिल्पे व पेंटिंग, ३. बुलेलंग भागात कपडे, ४. तिमूर भागात उत्खननातील वस्तू व जुन्या तलवारी, म्यान, खंजीर. तबनन भागाला राजघराण्याचे योगदान होते. पूर्वी या इमारतीत राजघराण्याचे किमती ऐवज ठेवण्यात येत. पुढे गेलो तर नाण्यांपासून तयार केलेली छोटी बाहुली होती. तिचा मुखवटा पुठ्ठ्याचा होता. तिचा फ्रॉक नाण्यांपासून केला होता. डोक्‍याच्या मागे भरतनाट्यम करताना किरीट असते तसे होते. खूप सुरेख बाहुली होती. तशीच एक सफरचंदाची (खोटी) बाहुली होती. तीदेखील अप्रतिम होती. 

तेथे आत शिरताना आम्हाला बाली लिपीत लिहिलेला बोर्ड दिसला नव्हता, तो आता दिसला. बाली लिपी आर्टिस्टिक वाटली. इथली बोली भाषा बहासा आहे. विस्नवाबरोबर संवाद साधूनच आम्हाला बालनीज लोकांचे राहणीमान, रीतिरिवाज कळत होते. 

दुपारी उलूवाटू मंदिरास गेलो. वाटेत जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूस लांबच लांब पोपटी रंगाची तरारलेली भातशेती पाहून जणू हिरव्या पाचूचे गालिचे पसरले असल्यासारखा भास होत होता. पाचूचे बेट असे का म्हणतात, हे या वेळेस लक्षात आले. ते पाहून डोळे दिपून जातात. मनात अल्हाद संचारतो. अधूनमधून आंब्याची, नारळाची झाडेपण दिसत होती. त्यांच्या भाषेत उलू म्हणजे edge आणि वाटू म्हणजे Cliff.  उलूवाटू मंदिर हे कड्याच्या टोकावर आहे. दोन बाजूला दोन कडे आहेत व ते वरून जोडलेले आहेत. कड्यांवर समुद्राच्या लाटा आदळत होत्या. इथल्या एका कड्याच्या टोकावर हे हिंदू मंदिर आहे. हे मंदिर साधारणपणे १०३२ ते १०३६ या काळात बांधले गेले आहे. EHPO KUTURAN हा एक धर्मगुरू होता. Dalem Waturenggong या राजाच्या काळात हा धर्मगुरू ‘भगवान’ म्हणून प्रसिद्ध होता. या मंदिरात Danghyang Niratha याला मोक्ष मिळाला. दरवर्षी इथे उत्सव असतो. या देवळात फक्त ठराविक पोशाख घालून त्यांच्या ब्राह्मणासोबतच जाता येते. इतरांना प्रवेश नसतो. बालनीज देवभोळी माणसे आहेत. त्यांची आत्म्यावर अगाध श्रद्धा. देवळात मूर्ती नसते. बालनीज संस्कृतीत पंचतत्वाला देव मानतात. बालनीज लोकांचा गीतेतील खालील श्‍लोकावर विश्‍वास आहे.

‘कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भार्मा ते सग्ङाऽस्त्व कर्मणि।।’

थोडे पुढे गेल्यावर अर्धगोलाकार स्टेज होते व तेथे केचक नृत्य दाखविले. या नृत्यात रामायणाची कथा मूक अभिनयाने प्रकट केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रथम बारोंग नृत्यनाटिका पाहायला गेलो. प्रेक्षागृहाचे प्रवेशद्वार दगडाचे होते. रामायण व महाभारताचा बालनीज लोकांवर प्रभाव आहे. या नाट्यानंतर आम्ही चांदीचे दागिने तयार करण्याच्या कारखान्यात गेलो. तिथे फारसा वेळ दवडला नाही. तेथून पुढे लाकडात कोरीव शिल्प कसे करतात ते पाहिले. आत म्युझियमसारखे करून तेथे सर्व मांडले होते. सॉफ्टवुडपासून तयार केलेली वॉल-हॅंगिंग होती. गणपतीच्या छोट्या-मोठ्या मूर्ती, ओंकारातील गणपती, सोंडेतून गणपती, कृष्णाची मूर्ती वगैरे वगैरे. मोठे कोच, त्यावर कोरीव काम, टेबल-खुर्च्यांवर कोरीव काम होते. त्यानंतर पेंटिंग पाहायला गेलो. कॅनव्हासवर मेणाने आधी चित्र काढून घेतात, मग त्यांना हवे ते रंग भरतात. नग्न स्त्रियांची चित्रे, निसर्गचित्रे, बालनीज लोकांची घरे व राहणीमान दाखवणारी अशी बरीच चित्रे होती. अप्रतिम! मी तर स्पीचलेस झाले होते. किमतीही अफाट होत्या. 

तेथून गोहगजाहला गेलो. हे उबुड भागात आहे. ही उत्खननात सापडलेली गुहा आहे. त्यामुळेच पन्नास-एक पायऱ्या उतरून खाली जावे लागते. हे नवव्या शतकातील मंदिर आहे. प्रवेशद्वार दगडी होते. तेथे आपल्याकडे जय-विजयच्या मूर्ती असतात, तशा दोन प्राण्यांच्या मूर्ती प्रत्येक देवळाच्या दरवाजावर असतात. हिंदू आणि बुद्ध लोकांना पूजा करण्यासाठी तिथे जागा होती. पुढे गेल्यावर दोन कुंड होती. कुंडाच्या मूर्तीच्या हातातील कुंभातून पाणी वाहत होते. पुढे गेल्यावर जय-विजयच्या मूर्ती, गणेशाची मूर्ती होती. गुहेत वाकून प्रवेश करावा लागला. आत अंधार होता. तसेच आत गेलो. एक मिणमिणता दिवा होता. एका बाजूला कार्तिकस्वामींची मूर्ती व दुसऱ्या बाजूला ब्रह्मा, विष्णू, महेशची मूर्ती होती. बाहेर आलो, आणखी खाली आलो तर पाण्याचा खळखळणारा आवाज ऐकू येत होता. सर्व ठिकाणी हिरवे हिरवे आणि हिरवेच! 

तेथून Puratirtha Empul at Tampaksiring येथे गेलो. मुखातून खूप मोठा पाण्याचा स्रोत पडत होता. तिथे प्रत्येकाला त्यांच्याकडील लुंगीसारखे वस्त्र कंबरेला बांधायला दिले. त्याला सारोंग असे म्हणतात. या कुंडात प्रत्येक पाणी पडणाऱ्या ठिकाणाशी जाऊन अंगावर पाणी घेऊन अंघोळ करायची. कुंडाच्या सुरुवातीला ड्रॅगन होता. दुसऱ्या कुंडात प्राणी होता. ज्या लोकांना या कुंडात स्नान करायचे आहे त्यांनी इथे करावे. त्यामुळे सर्व पापे नाहीशी होतात, अशी त्यांची भावना आहे. त्याच परिसरात मोठ्या जागेवर कंपाउंड घालून जागा बंदिस्त केली होती. त्या कंपाउंडला लागून इंडोनेशियाच्या गव्हर्नरचे निवासस्थान होते. 

विस्नवाशी गप्पा मारताना कळले, की बालीत औद्योगिक कारखानाच नाही. त्यामुळेच हे बेट प्रदूषण विरहित आहे. मात्र, इथे पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागते. हॉटेलमध्ये तुम्हाला बिअर किंवा कोकाकोला मिळतो. बिअरला बालनीज लोक बीर्र असे म्हणतात. वानगी दाखल काही शब्द- रामायण-रामायणा, महाभारत-महाभारता, सहदेव-सहदेवा, महादेव-महादेवा. काही इंडोनेशियन शब्द रातु-क्वीन, कौसान-फ्रेंड, दाक्तेर-डॉक्‍टर, स्वस्थिअस्तु-गुड मॉर्निंग इत्यादी. थॅंक्‍यू म्हणायचे असेल, तर सुकसमा म्हणतात. आम्ही अगुंड येथील ज्वालामुखी पाहिला. अगुंड आणि माऊंट बातूर हे दोन्ही किंतामणी या भागातच आहेत. येथून आम्ही कॉफी प्लांटेशन पाहायला गेलो. प्रथम कोकोची फळे असलेले झाड पाहिले, नंतर कॉफीची झाडे. त्यालापण फळे आलेली होती. बालीतील लुवाक कॉफी प्रसिद्ध आहे. लुवाक हा मांजर वर्गातील प्राणी. लुवाकच्या विष्टेतून ज्या बिया मिळत त्या भाजून, पूड करून कॉफी करत. अशी कॉफी करण्यास खूप कष्ट पडत असत. त्याला एक प्रकारची खास अशी चव होती. आता काळ बदलला आहे. कॉफीच्या बियांवर प्रोसेस करायला मशिनरी आलेली आहे.

तिसऱ्या दिवशी प्रथम आयुन मंदिरात गेलो. हे अगुंग पुटू यांनी १६३४ मध्ये राजा मनगुईच्या कारकिर्दीत बांधले. मंदिर एका पठारावर असून भोवताली मोठे तळे आहे. हे इंडोनेशियातील व बालीतील पवित्र ठिकाण म्हणून ओळखले जाते. प्रजेच्या सुखसमृद्धीसाठी राजा इथे पूजा करतो. सध्या राजाच्या पूर्वजांनाच या मंदिरात जाण्याची मुभा आहे. हे तीन भागात विभागले आहे. पहिला व दुसरा भाग सर्वांना खुला आहे. पहिल्या भागावर सर्वत्र हिरवेगार कुरण पसरले आहे. तेथेच प्रवेशद्वावर जय-विजयच्या मूर्ती आहेत. पहिल्या भागाला ‘निस्ता मंडला’, तर दुसऱ्या भागाला ‘मध्या मंडला’ आणि तिसऱ्या भागाला ‘उत्तम मंडला’ असे म्हणतात. तिसऱ्या भागाच्या कंपाउंडच्या बाहेरील बाजूने चक्कर मारता येते. आतील भागातील झोपडीवजा घरांना पवित्र नावे दिलेली आहेत. आत असलेल्या पॅगोडाला ‘मेरू’ असे संबोधतात. बालनीज संस्कृतीप्रमाणे इथे कुठलीही मूर्ती नाही. पण आसन बांधलेले असते. या जागेच्या भोवती एक छोटे तळे आहे. 

दुसऱ्या ठिकाणी आलो. तेथे एक हिंस्र प्राण्याचा पुतळा होता. त्याचे अंग वेगवेगळ्या धान्यांनी मढवलेले होते. चेहरा, मान, डोके यासाठी मका, तूर, तांदूळ व इतर काही धान्ये वापरली होती. पोटाचा भाग भाताच्या लोंब्या कापल्यानंतर जे मऊ गवत असते त्याचा होता. येथे बेराँग उत्सव होतो. हा उत्सव दर २१० दिवसांनी येतो. त्यानंतर पुरा उलू दानू हे ऐतिहासिक शिवमंदिर पहायला गेलो. तेथेच बेराटन नावाचे सरोवर आहे. त्याचा उपयोग वॉटर इरिगेशनसाठी केला जातो. त्या आवारातील एक पॅगोडा शिव-पार्वतीसाठी अर्पण केलेला आहे. दगडात विविध प्राणी कोरलेली शिल्पे होती. तेथे भित्तिचित्राद्वारे इंडोनेशियन ग्रामीण जीवन रेखाटले होते. एका स्तूपावर चारी बाजूंनी बुद्धाच्या मूर्ती कोरलेल्या होत्या. बारटन सरोवरात एक चक्कर मारून आलो. बाराचे ऊन होते. पण पाण्याच्या गारव्यामुळे जरा बरे वाटले. वाटेत गप्पा मारताना विस्नवा सांगत होता, इथे मृत्यूचासुद्धा सोहळा करतात, जसा एखादा उत्सव करतो तसा. त्या प्रेताची वाजतगाजत मिरवणूक काढतात व मचणासकट शेवटी अग्नी देतात. 

चौथ्या दिवशी आम्ही रिव्हर राफ्टिंगला गेलो. राफ्टिंग करण्यासाठी २०० पायऱ्या उतरून खाली आणि परतताना १५० पायऱ्या चढून यावे लागते. हा थरार आयुग नदीवर होता. आमच्या बरोबर दुसरा गाइड होता. त्याच्यासोबत पायऱ्या उतरू लागलो. वळणावळणाचा रस्ता होता. दमछाक होत होती. अखेर शेवटच्या टप्प्यावर आलो. आता लाइफ जॅकेट व डोक्‍यावर हेल्मेट घालण्यास दिले. उरलेल्या तिघांनाही वल्ही दिली. नावाड्याच्या हातात तर होतीच होती. आम्ही बसलेली छोटी होडी रबराची होती. रामाच्या नावाचा जल्लोष करीत नाव पुढे निघाली. खळाळते पाणी होते. मोठमोठ्या दगडांना आमची बोट आदळायची, वळण घेऊन खोल पाण्यात जायची. त्यामुळे आमच्या अंगावर गार पाणी उडायचे. दरीच्या दोन्ही बाजूस डोंगर असून त्यावर उंच झाडे होती. दरीच्या दोन्ही बाजूस हिरवळ होती. निसर्गाचे वैविध्यपूर्ण रूप पाहून माझे दोन्ही नेत्र दिपून गेले. मान उंच उंच करून सृष्टिसौंदर्य न्याहाळावे लागत होते. किती पाहू, किती नको असे झाले होते. आम्ही पूर्णपणे भिजावे म्हणून नावाड्याने डोंगरावरून पडणाऱ्या पाण्याच्या झऱ्याखाली आमची बोट नेली. आता पूर्णपणे भिजलो. इथल्या दगडी भिंतीवर रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी कोरल्या आहेत. कधी कधी दरी चिंचोळी व्हायची, तेव्हा वाटायचे आता हा नावाडी आपली बोट कशी नेणार, पण कौशल्याने त्यातून तो बाहेर नेई. हे राफ्टिंग जवळजवळ तासाभराचे होते. शेवटी धक्‍क्‍यावर आलो. आता १२५ पायऱ्या चढून वर जायचे होते. दमल्यामुळे आमचा वेग कमी झाला होता. पण मनाचा हिय्या करून वर आलो. तेथे अंघोळ करून कपडे बदलण्याची सोय होती. आता प्रथमच भूक लागल्याची जाणीव झाली. लंचची सोय होती. भरपेट जेवलो. अशी ही मस्तीभरी मुशाफिरी अविस्मरणीय आहे. 

आदल्या दिवशी दमल्यामुळे दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता निघालो. आज आम्ही क्रूझची छोटी मुशाफिरी करणार होतो. वेलकम ड्रिंक देऊन आमचे स्वागत करण्यात आले. प्रत्येकाच्या गळ्यात चाफ्याचा हार घालण्यात आला. ही क्रूझ तीन मजली होती. साधारण ४०-५० लोक या क्रूझवर होते. पर्यटक वेगवेगळ्या देशातून आलेले होते. काही मधुचंद्रासाठी आले होते. क्रूझ संथगतीने पुढे जात होती. संध्याकाळ दाटू लागली, ढगांशी मस्ती करणाऱ्या वाऱ्याचा खोडकरपणा वाढला. ढगांमुळे सूर्यास्त काही पाहायला मिळाला नाही. आता हळूहळू गडद अंधार होऊ लागला, तर दुसरीकडून आकाशगंगा अवतरू लागली आणि अचानक आकाशात तारका दिसू लागल्या. चकाकणारा शुक्र दिसू लागला. सहाजिकच ‘शुक्र तारा मंद वारा’ या गाण्याचे सूर ओठातून बाहेर पडू लागले. गार वारा झोंबत होता, पण तरीही मनाला आल्हाददायक वाटणारा होता. डिनरचा आस्वाद घेत असतानाच एकीकडे बोंगो आणि गिटार यांच्या तालावर इंडोनेशियन कलाकार गाणे म्हणू लागले. त्यानंतर क्रूझवरील लोकांनी नृत्याचे विविध प्रकार केले. खूप मजा येत होती. शेवटी क्रूझ धक्‍क्‍यावर लागली व सर्वजण पायउतार झाले. सहावा दिवस वॉटर स्पोर्ट्‌सचा होता. बीचवर पोचल्यानंतर मी जो स्कुबा डायव्हिंगचा पोशाख पाहिला, तो निराशाजनक होता. म्हणून स्कुबा डायव्हिंग टाळून वॉक अंडर वॉटर करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी दिलेला स्वीमिंग कॉस्च्युम घालून बोटीतून लांब समुद्रात गेलो. तेथे आम्हाला पाण्याखाली उतरण्यास सांगण्यात आले व डोक्‍यावर हेल्मेट घालण्यास दिले. त्यातूनच आम्हाला ऑक्‍सिजन पुरवठा होत होता. पाण्याखाली त्यांनी चालण्यासाठी रस्ता केला होता व आधारासाठी रेलिंग बार लावले होते. त्याला धरूनच आम्ही समुद्रातील खजिना न्याहाळत होतो. तसेच इकडून तिकडे स्वैराचाने पळणारे मासे पाहात होतो. हा साधारण पाच मिनिटांचाच अवधी होता. 

वॉटर स्पोर्ट्‌स करून इकडेतिकडे हिंडलो. बीचवर एका रेस्टॉरंटच्या मागच्या भागात टेबल खुर्च्या टाकून डिनरची सोय करत होते. आमचा बालीचा हा शेवटचा दिवस होता, त्यामुळे इथल्या माशांवर ताव मारायचा असे ठरवून आत शिरलो. भोवती बारीक पांढरी शुभ्र वाळू आणि सागराची भरती असल्यामुळे येणाऱ्या लाटांच्या संगतीत डिनर केले व रिसॉर्टवर परतलो. दुसऱ्या दिवशी आम्ही जकार्ताला जाणार होतो, बालीला टाटा करणार होतो.

संबंधित बातम्या