झेकचा जागतिक वारसा

अपर्णा सावंत
शनिवार, 13 जानेवारी 2018

पर्यटन विशेष
झेक रिपब्लिकची राजधानी प्राग. तिथे प्रागला ‘प्राहा’ असं म्हणतात. झेकच्या पश्‍चिमेला जर्मनी, उत्तरेला पोलंड, पूर्वेला स्लोवाकिया व दक्षिणेला ऑस्ट्रिया येतात. इथे १९१८ ते १९४० पर्यंत लोकशाही नंतर १९४८ पासून साम्यवादी राजवट होती.

पूर्व युरोपातील चार देशांमधील प्रत्येक एक अशा चार शहरांना भेट देण्याचा योग नुकताच आला. मनात थोडी धाकधूक होती की ही शहरे पण मध्य युरोपातील शहरांसारखीच प्रेक्षणीय असतील का? पण मनातील शंकेला या शहरांनी पुरेपूर न्याय दिला व पूर्व युरोपातील शहरंसुद्धा तितकीच सुंदर आहेत याची खात्री पटवून दिली. स्लोवाकियामधील ब्राटीसलावा, हंगेरीमधील बुडापेस्ट ऑस्ट्रिया मधील व्हिएन्ना व झेक रिपब्लिकमधील प्राग. या प्रत्येक शहराने आपलं सौंदर्य वेगवेगळ्या पद्धतीने जपलेले आहे.

झेक रिपब्लिकची राजधानी प्राग. तिथे प्रागला ‘प्राहा’ असं म्हणतात. झेकच्या पश्‍चिमेला जर्मनी, उत्तरेला पोलंड, पूर्वेला स्लोवाकिया व दक्षिणेला ऑस्ट्रिया येतात. इथे १९१८ ते १९४० पर्यंत लोकशाही नंतर १९४८ पासून साम्यवादी राजवट होती. १९९३ मध्ये झेकोस्लावाकियाचे शांततेत विभाजन झाले. तेव्हा झेकरिपब्लीक व स्लोवाकिया हे दोन देश तयार झाले. झेक रिपब्लिक हा जगातील सहावा शांतता प्रिय देश. स्थानिक लोक प्रेमळ आणि मदत करणारी आहे असे अनुभवास आले. येथील चलन आहे क्रोनर. पण युरो चलन पण येथे  चालते. साधारण एक युरो म्हणजे पंचवीस क्रोनर. झेक रिपब्लिकमधील दोन ठिकाणं जास्त आवडली. एक चेस्कीक्रूमलाव व दुसरं बोन चर्च! 

चेस्कीक्रूमलाव
झेक रिपब्लिकच्या बोहेमीयन भागातील चेस्कीक्रूमलाव हे एक छोटं गाव आहे. तिथे त्यात नावाचं म्हणजे चेस्कीक्रूमलाव कॅसल आहे. हे युनेस्कोने जागतिक वारसा जाहीर केलेली ही जागा आहे. या कॅसलमध्ये फार मोठ्ठं म्हणजे ११ हेक्‍टर जागेमध्ये रोकीको गार्डन आहे. गॉथिक शैलीतलं सेंट विटस्‌ चर्च आहे. १६८० मध्ये थांबलेले एक बरोक थिएटर आहे. फार जुनं असल्यामुळे हे थिएटर वर्षातून फक्त ३ वेळा वापरतात. चेस्कीक्रूमलाव दरवर्षी वेगवेगळे सांस्कृतिक फेस्टीवल साजरे करते. जसे फोक डान्स, म्युझिक, हिस्टॉरिकल डान्स, इंटरनॅशनल म्युझिक फेस्टिवल जुलै ते ऑगस्टमध्ये असतो. यासाठी जगभरातील पर्यटकांची इथे रीघ लागलेली असते. या गावाचं वेगळेपण म्हणजे वालटावा नदी इथे घोड्याच्या नालेप्रमाणे वळलेली आहे. तिच्या दोन्ही बाजूला असलेली लाल उतरत्या छप्परांची अतिशय देखणी, स्वच्छ नीटनेटकी घरे ! नदीच्या वळणामुळे या गावाला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. वालटावा नदीने घेतलेल्या नैसर्गिक वळणाचे सौंदर्य व मॅनमेड देखणी घरं यांचा अतिशय सुंदर मिलाफ इथे पहायला मिळतो. जणू काही एखाद्या कसलेल्या चित्रकाराने स्वप्नात पाहून काढलेलं लॅंडस्केप! म्हणूनच जगातील लाखो सौंदर्यप्रेमी पर्यटक दरवर्षी या चेस्कीक्रूमलावला भेट देतात. १९९३ नंतर पर्यटकांसाठी नदीकिनारी व कॅसलजवळ सुमारे ८० रेस्टॉरंट उघडली आहेत.

बोन चर्च
झेक रिपब्लिकमधील कटनाहोरा जवळील सेडलेक जिथे हे जगप्रसिद्ध बोनचर्च आहे. जगातील एकमेव असं हे वेगळ्या प्रकारे सजवलेलं चर्च आहे. चर्चची आतील सजावट ४०,००० हून जास्त मानवी हाडांची केलेली आहे. जवळ जवळ चाळीस ते सत्तर हजार मानवी सांगाड्यांच्या हाडांची व कवट्यांची सजावट या चर्चमध्ये पहायला मिळते.

१२७८ मध्ये मॉनेस्ट्रीच्या मुख्य हेन्रीला बोहामीयाचा राजा ओटकर-II याने जेरुसलेमला पाठवले. त्याने येताना आपल्याबरोबर जेरुसलेमची पवित्र माती आणली. ती माती त्याने या सिमेंट्रीमध्ये पसरली. हेन्रीच्या या कृतीमुळे ही सिमेट्री पवित्र झाली. ही बातमी सगळीकडे हळूहळू पसरली. मग सेंट्रल युरोपमध्ये सर्वांना असं वाटू लागलं की आपण मेल्यानंतर आपल्याला याच जागी पुरण्यात यावं. चौदाव्या शतकात प्लेगच्या साथीत मेलेल्या हजारो लोकांना याच पवित्र जागी पुरण्यात आलं. मग ही सिमेट्री वाढवण्यात आली. मधल्या भागात नवीन गॉथिक शैलीचं चर्च बांधले व खालचा भाग सिमेट्रीसाठी ठेवला. नवीन मृतांना जागा करण्यासाठी तिथे अधिक खणण्यात आलं तेव्हा खूप मानवी हाडं व कवट्या मिळाल्या. त्या सगळ्या नीट रचून ठेवण्याचं काम १८७० मध्ये रींट नावाच्या सुताराला देण्यात आलं. त्याने ती हाडं ढीग करून ठेवली नाहीत. त्याने आपली कल्पनाशक्ती पणाला लावली. अवयवांप्रमाणे त्याने हाडं वेगळी केली. झुंबरं, माळा, तोरणं बनवली. आतून त्याने संपूर्ण चर्च सजवण्यासाठी त्यांचा उपयोग केला. झुंबर बनवताना त्याने मानवी हाडांच्या प्रकारातील एक तरी हाड वापरले आहे. चर्चच्या दरवाजाजवळ लावलेल्या एका हाडामध्ये रींटची सहीसुद्धा आहे. त्यावेळी रींटला वाटलं नसेल की पुढील येणाऱ्या काळात हे चर्च झेक रिपब्लिकमधील एक महत्त्वाचं लोकप्रिय प्रवासी आकर्षण असलेलं ठिकाण होईल म्हणून जगातील सर्व भागातून पर्यटक हे आगळंवेगळं चर्च पहायला येतात. जागतिक वारसा म्हणून हे जपलेले आहे. हींटच्या कल्पनाशक्तीला सलाम! 

फोटो फीचर

संबंधित बातम्या