ऑफबीट टर्की

अपर्णा सावंत 
शुक्रवार, 11 मे 2018

पर्यटन
 

युरोप पाहण्याचे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अनुभवण्याचे प्रत्येकाचं स्वप्न असतं. युरोप खंडाची महती अशी आहे, की हा प्रदेश एकदा पाहून मन तृप्त होत नाही. सुरवातीला रॅपिड रीडिंग केल्यासारखा पाहायचा व नंतर छोटा-छोटा भाग चवी-चवीने आस्वाद घेत अनुभवायचा ! 

यावेळी ऐतिहासिक व निसर्गसंपन्नतेचा अनोखा संगम असलेल्या तुर्कस्तान अर्थात टर्कीने आमचे लक्ष वेधले. आशिया व युरोप या दोन खंडाच्या मध्यावर वसलेल्या टर्कीची दहा दिवसांची टूर करायचं ठरवलं. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टर्कीला जायचं ठरलं.

जगातील पहिली मानवी वसाहत इ.स. पूर्व ६५०० मध्ये तुर्कस्थानमध्ये होती. नंतर तिथे रोमन व ग्रीकांची बरीच आक्रमणं झाली. शेवटी १९२३ मध्ये आतातुर्क केमाल पाशाकडून तुर्की गणराज्याची स्थापना झाली. फक्त सतरा वर्षांच्या सत्ताकाळात त्याने खूप चांगले बदल केले. निधर्मी राज्याची स्थापना करून एका वेगळ्याच उंचीवर तुर्कस्तानला नेऊन ठेवले.

तुर्कस्थानच्या दक्षिणेला भूमध्य समुद्र, पश्‍चिमेला एजियन समुद्र तर पूर्वेला काळा समुद्र आहे. पूर्व आणि पश्‍चिम संस्कृतीचा अनोखा संगम म्हणजे तुर्कस्तान. बॉस्फोरसच्या समुद्रधुनीवर वसलेले जगातील एक सुंदर शहर इस्तंबूल! आता इस्तंबूल राजधानीचे शहर नसलं तरी त्याची शान काही औरच आहे. तीन हजार वर्षे जुनं असलेलं इस्तंबूल जगभरातील पर्यटकांचे एक आवडतं शहर. सेफ्टीच्या दृष्टीने मध्यवर्ती असलेलं अंकारा आता राजधानीचे शहर आहे.

टर्किश एअरलाईनच्या विमानाने आम्ही मुंबईहून इस्तंबूलच्या आतातुर्क विमानतळावर उतरलो. नंतर लोकल विमानाने आम्ही कायसेरीला पोचलो. पुढे आमचा बसचा प्रवास सुरू झाला.

कॅप्पाडोकिया
काही लाख वर्षापूर्वीच्या ज्वालामुखी उद्रेकामुळे तयार झालेल्या चित्रविचित्र आकाराच्या खडकांचे आपल्याला इथे दर्शन होते. पुन्हा पुन्हा टेकड्यांना अजब अशा टोपीचा आकार मिळाला. काही मश्रुमच्या आकाराच्या तर काही धुरांड्याच्या आकाराच्या कॅप्पाडोकिया असा नैसर्गिकपणे तयार झाला. असे हे उघडेबोडके डोंगर जगात युनिक आहेत. धुरांड्याच्या आकाराचे डोंगर फेअरी चिमनीज म्हणून प्रसिद्ध आहेत. हे डोंगर अतिशय मृदू असल्यामुळे कोरायला सोपे. कोरलेली घरं आता कबुतरांसाठी वापरतात. त्याला ‘पिजन व्हॅली’ म्हणतात. पर्यटकांसाठी इथे सूर्योदयाच्या वेळी बलून राईड असते. बलूनमधून उंच उडाल्यावर खाली पाहताना आपण दुसऱ्याच ग्रहावर आहोत असं वाटतं, असं हे नैसर्गिक आश्‍चर्य पहायला पर्यटकांचा ओघ चालू असतो. 

कायमकल्ली अंडरग्राउंड सिटी 
हे एक मानवनिर्मित जागतिक आश्‍चर्य आहे. सततच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी त्यावेळी माणसांनी कायमकल्ली अंडरग्राऊंड सिटी निर्माण केली. शांततेच्या वेळी लोक जमिनीवर राहायचे. युद्ध सुरू होऊन दंगल, लुटालूट, जाळपोळ सुरू झाली, की लोक या भूमिगत घरांच्या आश्रयाला येत. चार-सहा पायऱ्या उतरून वाकून आम्ही एका छोट्या बोळात शिरलो. खाली उतरत गेलो. तापमानातील फरक लगेच जाणवला. एकदम थंड वातावरण. एका वेळी एकच व्यक्ती जाईल एवढीच वाट. माझ्या उंचीमुळे मला जास्तच वाकावं लागत होतं. खाली गेल्यानंतर आपल्या नेहमीच्या घराप्रमाणे खोल्या. जागोजागी हवेसाठी झरोके! वापरायची खोली, धान्य साठवायची कोठीची खोली अशा प्रत्येक कुटुंबाला वेगवेगळ्या खोल्या; पण स्वयंपाकघर मात्र एकत्र. खोल्यांमध्ये दिवे टांगण्याच्या खुंट्या, पाण्याची रांजणं दिसली. खाली जाण्यासाठी लालबाग व वरती येण्यासाठी निळे बाण दाखवलेले दिसले. कितीतरी आक्रमणं झाली पण या अंडरग्राऊंड सिटीमुळे माणसं बचावली. जिवंत राहिली! 

पामुकल्ले
पामुकल्ले म्हणजे कापसाचा किल्ला. नैसर्गिक शुभ्रधवल आश्‍चर्य म्हणजे पामुकल्ले. उत्तम दृष्टिसुख देणारं मला आवडलेलं हे ठिकाण आहे. डोंगरांच्या पोटात असलेल्या ज्वालामुखीमुळे वर येणारे गरम पाण्याचे झरे वर्षानुवर्षे वाहत आहेत. पाणी थंड व्हायला लागलं, की त्यात विरघळलेलं कॅल्शिअम घट्ट होऊन त्याचे कणकण जुळून पांढरेशुभ्र खडक तयार झाले आहेत. नावाप्रमाणे अगदी पांढरेशुभ्र! जगात कित्येक ठिकाणी असे गरम पाण्याचे झरे आहेत. पण असे कापसासारखे डोंगर फक्त आणि फक्त तुर्कस्थानमध्येच! जगातील एकमेव असं पामुकल्ले. पांढराशुभ्र कापूस न पिंजता त्याचे डोंगर करून ठेवल्यासारखा लांबून वाटतो. पण जवळून हात लावून पाहिल्यावर कळतं की किती कठीण आहे स्पर्श! १९८९ मध्ये पामुकल्ले जागतिक ठेवा म्हणून मान्य केलं गेलं. त्या खडकांजवळ जाण्याआधी सर्वांना शूज व सॉक्‍स काढून ठेवण्याचे सांगण्यात आले. त्या गुळगुळीत फरशीवरून वाहत्या कोमट पाण्यातून चालण्याची एक वेगळीच गंमत होती. काही ठिकाणी कॅल्शियममुळे फरशी धारदार झालेली होती. आम्ही तिघी जणी साखळी करून हळूहळू पुढे पुढे जात होतो. खालच्या बाजूला निळ्या रंगामुळे अतिशय विलोभनीय दिसणारा तलाव व मागच्या पाठीकडील बाजूकडे कापसाचे शुभ्र डोंगर! निसर्गाचा अद्‌भुत नजारा मनात साठवत होतो. खरंच तुर्कस्थानच्या भाग्याचा हेवा वाटला.

इस्तंबूल
इस्तंबूल जगातील एक सर्वांगसुंदर शहर! एक हजार वर्षे जुनं युरोप व आशियातील सर्वांत मोठ्ठे शहर! आशिया व युरोप या दोन खंडावर वसलेले पर्यटकांचे आवडतं शहर इस्तंबूल.

इटलीतील रोमप्रमाणेच इस्तंबूल सात टेकड्यांवर वसलेले शहर आहे. महापराक्रमी तुर्की सुलतान सुलेमान याने तिसऱ्या टेकडीवर बांधलेली समुद्राकाठची सर्वांत मोठ्ठी मशीद ‘सुलेमानिया’ ही आहे. इस्तंबूलच मुख्य आकर्षण आहे ‘तोपकापी पॅलेस’. सात लाख चौरस मीटर त्याचं क्षेत्रफळ आहे. फत्ते महंमदने पंधराव्या शतकात हा पॅलेस बांधला. ऑटोमन साम्राज्याची सूत्रं याच पॅलेसमधून हलली. इथे शाही पेहेरावांचे प्रदर्शन, सोने-चांदी, हिऱ्यांच्या अनेक शाही वस्तू पहायला मिळतात. एकाच मोत्यापासून बनवलेली सुलतानाची छोटी प्रतिमा पहायला मिळते. इथं पूर्वी संरक्षणाच्या तोफा असायच्या त्यावरून ‘तोपकापी’ नाव पडले. सर्वांत मौल्यवान, देखणा तोपकापी खंजीर पहायला मिळतो. त्याच्या मुठीवर तीन हिरवेगार पाचू व पुढच्या भागात हिरे माणकं जडवलेली. डोळ्यांचं पारणं फिटणं म्हणजे काय हे तो खंजीर पाहताना कळलं. तोपकापी नावाचा यावर चित्रपटही निघालेला आहे. ८६ कॅरटचा स्पूनमेकर डायमंड तिथे पहायला मिळाला. डोळे दिपवून टाकणारं शाही वैभव पहायला मिळालं. 

अय्यासोफिया
ख्रिस्तांच्या साम्राज्यातील सर्वांत मोठ्ठे चर्च अशी ज्याची ख्याती होती ते अय्यासोफिया तोपकापीपासून जवळच आहे. फत्ते महंमदचा विजय झाल्यानंतर या चर्चची मशीद झाली. पुढे जवळ जवळ ५०० वर्षे ही मशीद वापरात होती. १९३५ मध्ये आतातुर्क केमाल पाशाने टर्की निधर्मी राष्ट्र केल्यानंतर या मशिदीचं म्युझियम करण्यात आलं.

ब्लू मॉस्क 
अय्यासोफियाच्या तोडीस तोड अशी मशीद बांधायचं ऑटोमन साम्राज्याच्या सुलतान एहमतच्या मनात आलं. त्यासाठी त्याने अय्यासोफियाच्या समोरील जागा निवडली. हाताने कलाकुसर केलेल्या वीस हजारांहून जास्त निळ्या टाईल्सने ती सजवली. हिला सहा मिनार आहेत. सात मिनार फक्त मक्केतील मुख्य मशिदीला आहेत. निळ्या रंगामुळे आत गेल्यावर खूप शांत वाटलं.

ग्रॅन्ड बझार 
जवळ जवळ चार हजार दुकानांचा मिळून तयार झालेला ग्रॅन्ड बझार! एक भुलभुलय्या! चुकामूक होण्याची शक्‍यता असल्यामुळे गाईडने आम्हाला कुठल्या गेटने बाहेर पडायचं ते बजावून सांगितलं होतं. सेफ्टी म्हणून आम्ही सर्व जण एकत्रच फिरत होतो. क्रॉकरी, गालीचे, टर्किश लाईट्‌स, अन्टीक ज्वेलरी टर्किश डिलाईट, बकलावा, टर्किश टी सर्व तिथे मिळत होते. तिथे भाषेचा फारच प्रश्‍न पडतो. तोडकेमोडके इंग्रजी दुकानदारांना कळल्यामुळे थोडी खरेदी झाली. टीप कागदासारखा ओलावा शोषून घेणारे जगप्रसिद्ध टर्किश टॉवेल घेतले. आपल्या भारतीय हलव्यासारखा गोड टर्किश डिलाईटची चव घेतली. आपल्याकडे जसे शेंगदाणे-फुटाणे हातगाडीवर विकतात तसे तिथे हातगाडीवर पिस्ते विकणारे दिसले. टूरचा शेवटचा दिवस असल्यामुळे टर्किश लिरा संपत आल्या होत्या म्हणून पिस्ते खरेदीचा मोह आवरावा लागला. त्यावेळी एक टर्किश लिरा म्हणजे पंचवीस भारतीय रुपये होते. 

बास्फोरस क्रूज
ही सफर म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव! बॉस्फोरच्या दोन्ही बाजूला वसलेले इस्तंबूल शहर आणि सगळ्या प्रेक्षणीय इमारती. उजव्या बाजूला आशिया तर डावीकडे युरोप खंड. गाइड सांगत होता की पूर्वी इस्तंबूल बिझेन्तिन सम्राटाच्या नावाने कॉन्सॅन्टिनोपल म्हणून ओळखले जात होते. पुढे फत्ते महंमदने इस्तंबूल असं नामांतर केलं. टर्किश टी चा आस्वाद घेत घेत बॉस्फोरसचं सौंदर्य मनात साठवत होतो. युरोपियन बाजू जास्तच देखणी वाटली. दहा दिवसांची टूर संपवून मुंबईला परत येण्यासाठी आतातुर्क विमानतळावर जमलो. खूप काही पाहिलं. सुखद आठवणींचा खजिना मिळाला. पण मन भरलं नाही. पुढच्या वेळी पुन्हा टर्कीला भेटायचं ठरवून निरोप घेतला.

फोटो फीचर

संबंधित बातम्या