शिल्पकलेने समृद्ध बदामी-हम्पी

आशा होनवाड 
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

पर्यटन
 

उत्तमोत्तम लेण्या, स्थापत्य, शिल्पकलेची प्राचीन मंदिरे बघण्यासाठी बदामी-हम्पीचे पर्यटन अगदी आनंददायी ठरते. आयुष्यात एकदा तरी या ठिकाणांना आवर्जून भेट द्यायला हवी व येथील लेणी, प्राचीन मंदिरे डोळे भरून पाहायला हवीत. 

बदामी हे तालुक्‍याचे गाव उत्तर कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात आहे. बागलकोटपर्यंत रेल्वेने व तिथून बसने एक तासात बदामीला येता येते. चालुक्‍य राजाची ही राजधानी. सुंदर असे निसर्गसान्निध्य बदामीला लाभले आहे. बदामी ही पूर्वी एक व्यापारपेठ होती. बदामीची लेणी हे बदामीचे मुख्य आकर्षण. लाल डोंगरांच्या पोटात ही लेणी खोदून काढलेली आहेत. येथे चार लेण्यांचा समूह असून एक जैन लेणी आहे. हिंदू लेणी ही भारतातील सर्वांत प्राचीन लेणी समजली जातात. सुंदर कोरीव काम असलेल्या लेण्या आवर्जून जाऊन बघाव्यात अशाच आहेत. 

शैव लेणी : इ.स. ५५० च्या आसपास खोदली गेलेली ही लेणी सर्वांत प्राचीन समजली जाते. ४० पायऱ्या चढून आपण या लेणीपाशी येतो. दारातच उजवीकडे शिवाची १८ हात असलेली तांडवनृत्य करणारी भव्य प्रतिमा बघायला मिळते. भरतनाट्यम‌ नृत्य प्रकारातील अनेक मुद्रा या एकाच मूर्तीतून आपल्याला दिसतात. त्याच्या जवळच गणपती, नंदी, महिषासुरमर्दिनीची शिल्पे आहेत. 

वैष्णव लेणी : पहिल्या लेणीपासून अंदाजे ५०५५ पायऱ्या चढून आपण दुसऱ्या लेणीपाशी येतो. या लेणीत विष्णूची अनेक रूपे भव्य स्वरूपात कोरलेली आहेत. छतांवर समुद्रमंथन व कृष्णाच्या अनेक गोष्टींची शिल्पे कोरलेली आहेत. 

महाविष्णू लेणी : चालुक्‍य मंगलेश याने इ.स. ५७८ मध्ये ही लेणी खोदून काढली. दरवाजापाशीच अष्टभुज विष्णूची प्रतिमा आपले स्वागत करते. ही सर्वांत मोठी लेणी असून येथे विष्णू, शिव, इंद्र, वरुण, ब्रह्म, यम यांच्या सालंकृत प्रतिमा या दिसतात. येथील छतावर कुबेर, शीव, पार्वती, कार्तिकेय आणि गणेश यांची सुंदर शिल्पे आहेत. अत्यंत कलात्मक, देखण्या अशा या तीन लेण्या हिंदू देवदेवतांचे सुंदर दर्शन आपल्याला घडवितात. 

जैन लेणी : चालुक्‍य राजाने सातव्या शतकाच्या सुरुवातीला ही लेणी खोदून घेतली. गर्भगृहात महावीराची मोठी मूर्ती आहे. आतील भिंतीवर तीर्थकारांच्या विविध मूर्ती कोरल्या आहेत. पार्श्‍वनाथांच्या मूर्ती जास्त आकर्षक व उठावदार आहेत. दिगंबर पंथीयांची ही लेणी आहे. 

बदामी किल्ला : बदामी लेण्यांच्या समोरच्या डोंगरावर हा किल्ला बांधलेला आहे. किल्ला चढून जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पर्यटकांची फारशी वर्दळ येथे नसते. किल्ल्याची देखभाल चांगल्या प्रकारे केली आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी पुरातत्त्व खात्याचे वस्तुसंग्रहालय आहे. 

भूतनाथ मंदिर : बदामी लेण्यांच्या जवळ अगस्ती तीर्थाच्या काठावर मंदिरांचा समूह दृष्टीस पडतो. चालुक्‍याच्या कारकिर्दीत ही मंदिरे बांधली गेली. ही सर्व शीव मंदिरे आहेत. एकावर एक थर असलेले स्थापत्य या मंदिरांवर पाहायला मिळते. एक मल्लिकार्जुन मंदिर, तर दुसरे भूतनाथ मंदिर म्हणून ओळखले जाते. 

बनशंकरी : बदामीपासून पाच किमी अंतरावर बनशंकरी मंदिर आहे. बन म्हणजे वन आणि शंकरी म्हणजे पार्वती. वनात वसलेली पार्वती म्हणजे बनशंकरी. या देवीचे दुसरे नाव शाकंबरी असेही आहे. कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेक कुळांची ही कुलदेवता आहे. या देवीला निसर्गाची किंवा वनस्पतींची देवता असेही संबोधले जाते. मंदिरातील गाभाऱ्यात सिंहावर आरूढ अशी अष्टभुजा बनशंकरी देवीची अत्यंत सुंदर मूर्ती आहे. हातात अनेक आयुधे व अलंकारांनी ही मूर्ती सजलेली आहे. दर पौर्णिमेला देवीची रथयात्रा काढली जाते. पौष महिन्यात मोठी जत्रा असते. 

पट्टदकल : बदामीपासून २४ किमी अंतरावर मलप्रभा नदीच्या काठावर पट्टदकल आहे. चालुक्‍य राजवटीच्या उत्कर्ष काळात अनेक सुंदर मंदिरे बांधली गेली. या राजवटीत कलाकारांना मिळालेल्या मुक्त हस्तामुळे इथले मंदिरस्थापत्य बहरले. या प्रदेशाला मंदिर स्थापत्याची प्रयोगशाळा असे म्हटले जाते. स्थापत्यकलेच्या विविध शैलीतील ही मंदिरे बघून आपण अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो. राजकीय स्थैर्य, मुबलक नैसर्गिक साधनसंपत्ती, सर्वत्र शांतता व राजसत्तेकडून कलेला मिळालेला मोठा आश्रय या सर्व अनुकूल गोष्टींमुळे इथे अतिशय सुंदर व देखणा मंदिर कलाविष्कार उदयाला आला. एकूण नऊ मंदिरे या ठिकाणी आहेत. काडीसिद्धेश्‍वर, जंबुलिंग, गलगनाथ, चंद्रशेखर, संगमेश्‍वर, काशी विश्‍वेश्‍वर, मल्लिकार्जुन, विरूपाक्ष व पापनाथ अशी ही नऊ मंदिर आहेत. सहाव्या, सातव्या आणि आठव्या शतकात ही मंदिरे बांधली गेली, पण आजही ही बघायला तेवढीच सुंदर वाटतात. येथील स्थापत्य, शिल्पे यांचा इतिहास जाणून घ्यायला इथे खूप वेळा यावे लागेल व खूप वेळही द्यायला हवा. या मंदिर समूहापासून थोड्या अंतरावर एक जैन मंदिर आहे, तेही प्रेक्षणीयच. ही सर्व मंदिरे पट्टदकलच्या सौंदर्यात मोलाची भर टाकतात. 

एेहोळे : पट्टदकलपासून ३५ किमी अंतरावर एेहोळे वसलेले आहे. दक्षिण भारतातील मंदिरस्थापत्याची सुरुवात येथून झाली असे मानले जाते. सहाव्या ते आठव्या शतकातील ही मंदिरे. काही तर चालुक्‍य काळाच्या पूर्वीपासूनची आहेत. या संपूर्ण परिसरात जवळ जवळ २५ ते ३० मंदिरे आहेत. काही आकाराने लहान, तर काही मंदिरांची पडझड झालेली दिसते. हजार-दीड हजार वर्षे झाली, तरी आजही ही मंदिरे मोठ्या दिमाखात उभी आहेत. मंदिराचे दगडी बांधकाम, दगडातून कोरलेल्या मूर्ती व मूर्तींच्या चेहऱ्यावर दाखविलेले जिवंत हावभाव हे सगळेच अवर्णनीय व आश्‍चर्याच्याही पलीकडचे! पुरातत्त्व खात्याचे एेहोळे येथे एक सुंदर वस्तुसंग्रहालय आहे. इ.स. सहा ते १५ व्या शतकापर्यंत मिळालेल्या मूर्ती, पुतळे, विविध मंदिर अवशेष यांचे योग्य पद्धतीने जतन व संवर्धन या संग्रहालयात केले जाते. 

बदामी, पट्टदकल व एेहोळेच्या रूपात एक मोठा सांस्कृतिक वारसा आपल्याला लाभला आहे. 

हम्पी : बदामीहून तीन तासांचा प्रवास बसने करून आपण हॉस्पेटला येतो व हॉस्पेटहून अर्ध्या तासात बसने हम्पीला येता येते. अजस्र, भल्या मोठ्या दगडाच्या टेकड्यांनी हम्पी आपले स्वागत करते. हम्पीचे हे दगड खनिजसंपत्तीने समृद्ध आहेत. तुंगभद्रा नदीच्या काठावर असलेले बेलारी जिल्ह्यातले हे गाव. इ.स. १४ व्या शतकात या ठिकाणी विजयनगरचे हिंदू साम्राज्य निर्माण झाले. हरिहर व बुक्क यांनी एक बलाढ्य हिंदू साम्राज्य येथे उभे केले. विजयनगर साम्राज्यात एकाहून एक सरस असे राजे होऊन गेले. त्या प्रत्येकाने आपल्या कारकिर्दीत हम्पीच्या वैभवात मोलाची भर घातली. परंतु, हम्पी म्हटले की फक्त कृष्णदेवरायाचेच नाव डोळ्यासमोर येते. कृष्णदेवराय हा अतिशय शूर, धाडसी व लोकप्रिय राजा होता. कला, साहित्य व संस्कृतीचे सुवर्णयुग असे त्याच्या कारकिर्दीला म्हटले जाते. हम्पीमधील भव्य मंदिरांचा परिसर व तेथील कलात्मकता पाहिली, की तेथील प्रत्येक वास्तूत हम्पीचा इतिहास दडलेला आढळतो. हम्पीच्या अनेक खुणांना वैभवशाली ओपन एअर म्युझियम म्हणतात. सध्या हे स्थान ग्रुप ऑफ मॉन्युमेंट्स युनेस्कोच्या यादीत आहे. त्यामुळे येथे अनेक परदेशी पर्यटक फिरताना दिसतात. 

हम्पीच्या जवळच पंपा सरोवर आहे. रामायणातील वाली व सुग्रीवांची राजधानी किष्किंधानगरी, हीपण याच परिसरातली. सीतेचा शोध घेत राम व लक्ष्मण या ठिकाणी आल्यावर पंपा सरोवराकाठी राम व हनुमंताची भेट झाली. सूर्याला लाल फळ समजून गिळायला निघालेल्या मारुतीचे जन्मस्थान - अंजनी पर्वत हादेखील याच परिसरातला. या सर्व घटनांमुळे हम्पीला एक पौराणिक इतिहासही आहे. 

विरूपाक्ष मंदिर : तुंगभद्रा नदीच्या दक्षिण तीरावर बांधलेले हे शंकराचे मंदिर. हम्पीत फिरताना या मंदिराची गोपुरे कुठूनही आपल्या दृष्टीस पडतात. या स्थानाची एक दंतकथा अशी आहे, की देवी पार्वती हिचा जन्म इथे झाला. तिचे नाव पंपा. तुंगभद्रा नदीचे पूर्वीचे नावदेखील पंपा. या देवीला शिवाशी लग्न करायचे होते, परंतु महादेव आपल्या तपश्‍चर्येत मग्न. त्यांना प्रसन्न करण्यासाठी देवी पंपा नदीच्या पलीकडील तीरावर तपश्‍चर्येला बसली. या या ठिकाणी आजही पंपा देवीचे एक छोटे मंदिर आहे. महादेवाला पार्वतीचे हे कठोर व्रत जेव्हा समजले, तेव्हा ते प्रसन्न झाले व याच ठिकाणी शिव पार्वतीचा विवाह संपन्न झाला. त्या ठिकाणी विरूपाक्ष म्हणजे शंकराचे मंदिर बांधले गेले, अशी येथील स्थानिक लोकांची श्रद्धा आहे. आजही या मंदिरात अनेक विवाह समारंभ केले जातात. 

हम्पीतले हे भव्य दिव्य मंदिर इ.स. आठव्या-नवव्या शतकात बांधल्याचे सांगितले जाते. मुळात हे मंदिर खूप छोटे होते. कालांतराने विजयनगर साम्राज्यात त्याची भरभराट होत गेली. नऊ मजल्याच्या उत्तुंग गोपुरातून आपण मंदिरात प्रवेश करतो. देवळासमोर रथ, मंडप, सभागृह आहेत. अत्यंत सुबक मूर्तिकला त्या गोपुरांवर आहे. येथे पंपादेवी, नवग्रह, भुवनेश्‍वरी अशी छोटी छोटी मंदिरे आहेत. 

हेमकुट समुदय : विरूपाक्ष मंदिराच्या शेजारी या मंदिरांचा समुदय आहे. येथे टेकडीसारखे चढून जावे लागते. या संपूर्ण टेकडीला दगडी तटबंदी आहे. इ.स. नऊ ते १४ व्या शतकात उभारलेले हे मंदिरस्थापत्य आहे. शीव-पार्वतीच्या विवाहाच्या वेळी स्वर्गातून देवांनी इथे सोन्याची फुले उधळल्याने हे ठिकाण झाले हेमकुट. येथून सूर्योदय व सूर्यास्त अतिशय छान दिसतो. 

हम्पी बझार : विरूपाक्ष मंदिराजवळच हा हम्पी बाजार आहे. विजयनगरच्या साम्राज्यात येथे मोठमोठ्या व्यापाऱ्यांच्या राहण्याच्या जागा, कचेऱ्या होत्या. बहुतेक वास्तू दोन ते तीन मजली आहेत. आता काही वास्तूंमध्ये खाली स्थानिक राहतात. काहींची दुकाने, हॉटेल्स आहेत व वरची जागा पर्यटकांना राहण्यासाठी देतात. परदेशी पर्यटकांची वर्दळ या हम्पी बाजारात मोठ्या प्रमाणात दिसते. 

कृष्णमंदिर : ओडिशाच्या सैन्याचा पराभव केल्यानंतर कृष्णदेवरायाने या विजयाचे प्रतीक म्हणून हम्पीमध्ये हे कृष्णमंदिर इ.स. १५१३ मध्ये बांधले. मुख्य रस्त्याला लागूनच हे मंदिर आहे. येथील गोपुरांवर युद्धाचे प्रसंग शिल्पीत केलेले आहेत. 

हजारीराम मंदिर : हम्पीतले रामाचे हे एक भव्य मंदिर. मंदिराच्या बाहेर रामायणातले अनेक प्रसंग कोरलेले आहेत. १५ व्या शतकातले हे मंदिर आहे. संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घातली, की संपूर्ण रामायणाचेही दर्शन होते. रामनामाचा जप या मंदिरात सतत सुरू असतो, म्हणून हे हजारीराम मंदिर म्हणून ओळखले जाते. 

विजय विठ्ठल मंदिर : सर्व देखण्या गोष्टींनी सजलेले हे विठ्ठल मंदिर म्हणजे नुसत्या हम्पीचेच नाही, तर अख्ख्या भारताचे भूषण आहे. अनेक छोट्या छोट्या मंदिरांनी सजलेला हा परिसर अगदी डोळे भरून पाहावा असाच आहे. राजा कृष्णदेवरायाने आपल्या दिग्विजयानंतर १५१३ मध्ये हे मंदिर बांधले. अतिशय कलात्मक शिल्प असलेल्या या भव्य मंदिरात एकही देवाची मूर्ती नाही. शिल्पातल्या एकाच मूर्तीत १६ वेगवेगळी रूपे दिसतात. येथे संगीत वाजवणारे खांबही आहेत. त्यातून कधी संगीताचे सप्तस्वर, तर कधी ढोलके, तबला, मृदंग, वीणाचे स्वर ऐकू येतात. विठ्ठल मंदिरासमोर जगविख्यात एक दगडी रथ आहे, तो बघून ओरिसातील कोणार्कमधल्या सूर्य मंदिराची आठवण येते. आत्ताच्या पाच रुपयांच्या नोटेवर या मंदिराची प्रतिमा आपल्याला दिसते. 

पाताळेश्‍वर मंदिरात खाली पायऱ्या उतरून जावे लागते. जमिनीच्या पातळीखाली खोदून बांधलेले हे देऊळ आहे. पूर्वी या मंदिराच्या गाभाऱ्याखाली पाणी असायचे. पण आता पाणी नाही व मूर्तीही नाहीत. बडवलिंग मंदिर हे हम्पीमधले सर्वांत मोठे असलेले एकाश्‍म शिवलिंग. एका गरीब शेतकरणीने नवस पूर्ण झाला म्हणून एका कालव्याजवळ हे शिवलिंग स्थापन केले. या शिवलिंगाची पाठ कायम पाण्यात असते. बडवलिंगाच्या जवळच लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे. या चतुर्भुज मूर्तीचे हात भग्न झालेले आहेत. कडवेकाळू गणेश व शशिवेकाळू गणेश हे दोन्ही गणपती आठ व १५ फूट उंचीचे आहेत. एकसंध दगडातून या गणेशमूर्ती घडविल्या आहेत. 

राणीवसा : राजघराण्यातील राण्यांच्या खासगी महालाला राणीवसा म्हटले जाते. राजघराण्यातील स्त्रियांसाठी राखीव असलेला हा परिसर अत्यंत देखणा व प्रशस्त आहे. येथील गेरू रंगाची इमारत, ज्याला कमल महाल म्हणतात; या इमारतीचा पाया हिंदू मंदिराप्रमाणे, तर वरच्या कमानी इस्लामिक पद्धतीच्या आहेत. हा महाल बांधताना येथे वायुवीजनाची अशी व्यवस्था केली आहे, की ऐन उन्हाळ्यातही येथे आल्यावर थंड वाटते. चारी बाजूला उद्यान आहे. 

गजशाळा : महोत्सवाच्या वेळी जे खास हत्ती मिरवणुकीसाठी आणले जात, त्या हत्तींसाठी बांधलेली देखणी व भारदस्त अशी गजशाळा राणीवशाजवळच आहे. यालाच हत्तींचा तबेलाही म्हटले जाते. ११ तबेले असलेली ही गजशाळा अतिशय प्रेक्षणीय आहे. 

राण्यांचे शाही स्नानगृह हे हिंदू-इस्लामिक शैलीने सुंदर तयार केले आहे. संपूर्ण काळ्या दगडातून बांधलेली अष्टगोल विहीर हीपण खूपच प्रेक्षणीय आहे. 

अनेगुंदी : अनेगुंदी ही विजयनगर साम्राज्याची पहिली राजधानी. रामायणात ज्या किष्किंधा नगरीचा उल्लेख आला आहे, ते गाव म्हणजे अनेगुंदी. एका बाजूला वाहत असलेली तुंगभद्रा व तिन्ही बाजूला पर्वताने वेढलेले छोटेसे गाव म्हणजे अनेगुंदी. इथला महाल, रंगनाथ स्वामी, चिंतामणी स्वामी ही मंदिरे प्रेक्षणीय. पंपासरोवर शबरी आश्रम, हनुमानाचे जन्मस्थान अंजनी पर्वत, ही सर्व अनेगुंदी परिसराजवळची प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. अनेक ऐतिहासिक घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत. 

दरवर्षी येथे हम्पी फेस्टिव्हल खूप मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. संपूर्ण हम्पी, आजूबाजूच्या दगडी टेकड्या, रस्ते, सर्व दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघते. दशावतारांच्या अनेक प्रतिमांची मिरवणूक ढोल ताशांच्या तालावर वाजत गाजत निघते. विविध कलागुणांचे अनेक कार्यक्रम सादर केले जातात. घरोघरी पाहुणे मंडळींची रेलचेल असते. आसपासच्या गावाहून अनेक लोक येऊन उत्साहाने आनंदाने या फेस्टिव्हलमध्ये सामील होतात. होस्पेट येथून विनामूल्य बससेवा लोकांना उपलब्ध करून दिली जाते. यावेळी हे फेस्टिव्हल दोन-तीन मार्चला होते. आम्ही त्यावेळी हम्पीला असल्याने आम्हालाही ते फेस्टिव्हल पाहता आले. 

हम्पीचा निरोप घेताना खरेच मन खूप भरून येत होते. तिथले मोठमोठे दगड जणू काही आमचा इतिहास जाणून घ्यायला पुन्हा पुन्हा परत या, असे म्हणून खुणवीत होते.  

संबंधित बातम्या