पधारो म्हारे देस...

चारुता बाकरे-सावजी
सोमवार, 13 सप्टेंबर 2021

पर्यटन

लेखाचे शीर्षक वाचून आत्ता पावसाळ्यात कुठे हा राजस्थानचा विषय असे वाटू शकते. आपल्याकडे पावसाळा सुरू असताना आणि वाळवंटाबद्दल काय बोलायचे? पण या राज्यातसुद्धा नद्यांना पूर येतो बरं का! मुळात राजस्थान केवळ वाळवंट किंवा उंट, घुमर डान्स आणि राजपूत यांच्यासाठी प्रसिद्ध नाहीये. तर अनेक सुंदर गोष्टींनी परिपूर्ण आहे.

राजस्थान म्हणजे अविश्‍वसनीय असे राज्य... वैविध्यपूर्ण, रंगीबेरंगी आणि सुंदर! तब्बल ३३ जिल्हे असलेले हे राज्य आहे, जिथे प्रत्येक जिल्ह्यात काहीतरी बघण्यासारखे, अनुभवण्यासारखे आहे. याच कारणामुळे तिथे प्रत्येक जिल्ह्याचे महत्त्व आहे. मग ते वन्य/पक्षी अभयारण्य असो सुंदर महाल, प्रचंड मोठे किल्ले. मला खूप आवडली ती म्हणजे फ्युजन हॉटेल्स. जुन्या राजवाड्यांची हॉटेल्स केली आहेत. त्यामुळे तिथले आदरातिथ्यसुद्धा एकदम राजेशाही. त्यामुळे खरेच आपण महाराणी असल्याचा फील आला. तिथे इतिहास आणि पारंपरिक कला जपता जपतानाच तंत्रज्ञानाचाही मस्त वापर झालेला दिसला. अर्थातच परदेशी पर्यटक इकडे जास्त येतात त्यामुळे असेल. राजस्थानला वेदिक, सिंधू संस्कृतीपासून ब्रिटिशांपर्यंतचा हजारो वर्षांचा अत्यंत रंजक असा इतिहास आहे. तसेच त्यांचे खानपान, पारंपारिक कपडे... सगळेच भुरळ पाडणारे आहे. राजस्थान जैन समाजाचे एक तीर्थक्षेत्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. येथील जैन मंदिरे सुंदर कोरीव कामाचा उत्तम नमुना आहेत. असे हे सर्वांगाने समृद्ध असे राज्य आहे.

जयपूर - जोधपूर - बिकानेर - जैसलमेर करत उदयपूर आमचा शेवटचा टप्पा. सगळा प्रवास रस्‍त्यानेच केला. खूप स्वच्छ आणि एकही खड्डा नसलेले रस्ते आहेत. त्यामुळे एवढ्या लांबचा पल्ला सहज पार करता आला. मला सगळ्यात आवडलेले ठिकाण म्हणजे, राजस्थानच्या पश्चिमेला भारतीय सीमेजवळ असणारे वाळवंटातील गाव.. जैसलमेर!

जैसलमेर म्हणजे वाळवंट आणि उंट एवढेच नाही पाळीव मोरही आहेत. ते तर असेच इकडे-तिकडे फिरताना दिसतात. आपल्याकडे मोर दिसणे मोठी गोष्ट. पण जैसलमेरमध्ये कोंबड्या फिराव्यात असे मोर फिरत होते. हे आम्ही उंटावरून सफर करताना पाहिले. हा सगळा भाग दिवसभर गरम आणि रात्री तितकाच थंड होणारा प्रदेश. आम्ही तिथे दोन दिवस होतो. दिवसभर उंटावरून फिरले. फिरताना उंटाचा मालक असलेला गाइड त्याच्या भाषेत आमच्याशी बोलत होता. स्वतःचे कौतुक करत होता. हे अर्थातच नंतर कळले. 

‘धोरिया की रेत को सौं स्वभाव है, अपणो तो एक मिंट मा गरम दुसरी मिंट मा ठंडा...’

‘म्हारे सांगे सांगे कद समझिया सगळा रिवाज, जब देखोला म्हारो प्रदेश, आप करोला मरुभूमी माथे नाज!’

रात्री तिकडच्या एका गावात लोकनृत्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. खूप सुंदर नृत्य.. पोशाखही सुंदर. डोक्यावर मातीची मडक्यांची रास ठेवून तोल सांभाळत नृत्य करत करत होते. अतिशय सुंदर हावभाव आणि अतिशय ‘ग्रेसफुल’ नृत्य. त्या तरुण मुली अतिशय सहजपणे हे सगळे करत होत्या. फारच कौतुक वाटले. त्यानंतर राजस्थानी संगीत आणि गाण्याचा आस्वाद घेतला. ही भाषा फार समजत नव्हती, तरीही ऐकायला फारच छान वाटत होते. त्यांची चाल, पारंपरिक वाद्य, त्याचे स्वर सुंदर जुळून आलेले. वाह! अगदी मैफीलमय वातावरण!

या सगळ्या भागात अजून एक गोष्ट भावली, ती म्हणजे इकडच्या लोकांचे रंगावरचे आणि आरशांवरचे प्रेम. कपड्यांपासून, कारागिरीपर्यंत उठून दिसत होते. काचकाम फारच नाजूक, रंगीत आणि सुंदर होते. राजस्थानी पगडी हादेखील त्यांच्या पेहरावातील एक महत्त्वाचा विषय. जल्लोर, भाट्टी, जोधपुरी शाही पाग, बंस्वारा, अलवार, सिरोही हे जोधपूर, अलवार, जैसलमेर अशा भागातले आहेत. पगडी बांधण्याच्या पद्धती, आकार यात फरक असतो. 

आणखी एक सुंदर गोष्ट म्हणजे कठपुतळी... ‘रंगीबेरंगी कपाडो से सजी हुई.. हांसती मुस्कुराती हमे कहानी सुनाए नाची जाती।’ बहुतेक सगळीकडे कठपुतळीचे खेळ बघायला मिळतात. गमतीदार असतात. या राज्यात लहान-मोठी एकूण पंचवीस अभयारण्ये आहेत. त्यामुळे पक्षी निरीक्षक, वन्यप्राणी निरीक्षक यांच्यासाठी पर्वणीच.

इथले काही लोक अतिउत्तम कलाकार, कारागीर आहेत, काही लोक सुंदर संगीत वाजवणारे आहेत, काही स्वादिष्ट भोजन तयार करणारे आहे. आम्ही या सगळ्याचाच मनसोक्त आस्वाद घेतला. 

इथली श्रीमंती दाखवणारी शहरे म्हणजे जयपूर, उदयपूर, जोधपूर. या भागात मोठमोठे राजवाडे आहेत. जयपूरपासून अकरा किमीवर असलेले आमेर गाव. इथला आमेर किंवा अंबेर किल्ला मनात भरला. खूप मोठ्या जागेत पसरलेला. संपूर्ण गाव मावेल एवढा मोठा याचा परिसर. असे अनेक अतिशय सुंदर किल्ले आणि महाल इथे आहेत. पण मला कुतूहल होते ते वाळवंटाचे. 

असे हे विविधतेने सजलेले भारताचे ‘राज’स्थान!! इथे फिरायचे असेल, एकरूप व्हायचे असेल तर कमीत कमी पंधरा दिवस पाहिजेत तुमच्याकडे. आणि हो, ट्रेनने जाण्यात फार मजा आहे. मुंबई सेंट्रलवरून माऊंट अबूमार्गे ट्रेन जाते. कोरोनाची महासाथ आटोक्यात आली की आवर्जून या राज्याला भेट द्यावी, असा माझा आग्रह राहील. विश्‍वास ठेवा, हे राज्य तुमचा अपेक्षाभंग करणार नाही!

संबंधित बातम्या