डॅलस ः बिग थिंग्ज हॅपन हिअर 

धनश्री केतकर
गुरुवार, 7 जून 2018

पर्यटन    
 

डॅलसला जाण्यापूर्वी हे एक बऱ्यापैकी उजाड, वैराण शहर असेल अशी माझी (गैर)समजूत होती. पण प्रत्यक्षात हे एक मोठाल्या रस्त्यांच जाळं असलेलं स्वच्छ, सुंदर शहर आहे. नैसर्गिक नसली तरी रस्त्यांच्या कडेने सर्वत्र हिरवळ आणि झाडं आहेत, एकमजली घरं आणि त्याभोवती छोट्या बागा आहेत. डाउनटाऊन भागात गगन चुंबी इमारतीही आहेत.

या शहरात थोडेथोडके नाहीत तर, एकवीस हजार एकरांवर पसरलेले चारशे सहा पार्कस आहेत. नव्याण्णव किमी लांब सायकलिंग व जॉगिंग करण्याचे रस्ते आहेत. ट्रिनिटी नदीकाठी साडेचारशे ते साडेपाचशे फूट उंचीवर वसलेले हे शहर आहे. इथून चार मुख्य हायवे जातात.

पूर्वी कापूस, कॅटल म्हणजे गाईगुरे आणि तेल यावर डॅलस अवलंबून होते. आता मात्र जगातील पाच हजार सातशे नामांकित कंपन्या इथे आहेत. (उदाहरणार्थ  AT&T, Texas Instruments .) फुटबॉलप्रेमींच्या या गावी सहा नामांकित फुटबॉल क्‍लब आहेत. येथील बार्बेक्‍यू, मेक्‍सिकन व टेक्‍समेक्‍स फूड प्रसिद्ध आहे. इथली हवा उकाड्यात आपल्या मुंबईसारखी, मात्र थंडीत खूप थंडी असते. पाऊस फार जास्त पडत नसला तरी वर्षभरात केव्हाही पडू शकतो, जून ते ऑगस्ट मध्ये त्यातल्यात्यात जास्त पडतो. इथले टोर्नाडो आणि हेलस्टॉर्म (वावटळ, वादळ व गारांचा पाऊस) मात्र कधीकधी अतिरौद्र रूप धारण करतात. चेंडूएवढाल्या गारा पडून घरं, गाड्या यांच खूप नुकसान होतं.

तिथे असताना जवळजवळ महिना दीड महिना आम्ही रोज नवी नवी ठिकाणे शोधून भटकायला जात होतो. शेवटी तर तिथे राहणारे लोकही आम्हाला म्हणाले की इथे एवढी ठिकाणं आहेत आम्हालाही माहीत नव्हतं.

सीडर रिज पार्क, आर्बर हिल्स, लेल्ला नेचर प्रीझर्व, केटी वूड पार्क अशी अनेक जंगल टाइप पार्क्‍स आहेत. या जंगलांतून चालण्यासाठी सुबक रस्ते केलेले आहेत. बरीचशी झाडही एकाच प्रकारची, सारख्या उंचीची वाटतात. पण सतत इमारतींच्या जंगलात वावरण्यापेक्षा ही थोडी कृत्रिम जंगलही छान वाटतात.

‘व्हाइट रॉक लेक’ हा तिथला एक विस्तीर्ण आणि नितांत सुंदर तलाव. याच्या भोवती चालण्यासाठी, सायकल चालवण्यासाठी खास रस्ता आहे, हिरवीगार लॉन्स आहेत, राजप्रासादासारखी घरं आहेत, एक घर तर अगदी व्हाइट हाउस सारखे आहे.

याच तलावाकाठी इथले सुप्रसिद्ध बोटॅनिकल गार्डन म्हणजेच अर्बो रेटम आहे. हे गार्डन सहासष्ट एकरांवर पसरलेले आहे. इथे इतकी अगणित रंगांची, आकारांची फुलं होती की किती बघू आणि किती फोटो काढू असं आम्हाला झालं होतं.  

डॅलसमध्ये फिरण्यासाठी सिटीपास काढल्यास त्यात त्यांनी दिलेल्या सहापैकी चार ठिकाणे आपल्याला बघता येतात. आम्ही अर्बोरेटम, झू, रियुनियन टॉवर व पिरो म्युझियम ही ठिकाणं निवडली होती.

डॅलस झू हे एकशेसहा एकरवर असल्याने चालून पायाचे तुकडे पडायची वेळ येते. इथे चारशे प्राण्यांच्या जाती आहेत.एकूण प्राणी तर दोन हजार आहेत. हे झू अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सुरू झाले. 

इथे जिराफ, हत्ती या प्राण्यांसाठी खोलगट जागा केली आहे, त्यामुळे अगदी जवळून हे प्राणी आपल्याला बघता येतात. आम्ही तिथे असतानाच एक जिराफाचे पिल्लू जन्माला आले असे सारखे माईकवरून सांगत होते. इथे दर थोड्या वेळाने वेगवेगळ्या प्राण्यांचे वीस मिनिटांचे कार्यक्रम असतात. त्यात त्या प्राण्याची माहिती व शक्‍य असेल तेव्हा त्यांच्या काही करामती दाखवतात. 

पिरो म्युझियम हे सायन्स व नॅचरल हिस्टरी म्युझियम एका सहा मजली इमारतीत आहे. इथे निरनिराळी अकरा दालने आहेत. पंच्याऐंशी फूट अलामोसॉरसचा सांगाडा , पस्तीस फूट मालवीसॉरसचा सांगाडा , भूकंपाची ,टोर्नाडोची अनुभूती देणारी खोली, आपल्या मनाच्या एकाग्रतेवर उडणारा बॉल अशा अनेक गोष्टी आपल्याला खिळवून ठेवतात. 

पण सगळ्यात खास आहे तिथला जेम्स आणि मिनरल्स किंवा रत्न व स्फटिकांचा भाग. रंगांच्या एकूणएक छटांचे दगड, स्फटिक तिथे आहेत आणि सुंदर प्रकाश योजना करून त्यांच्या सौंदर्यात भरच टाकली आहे. प्रत्येक ठिकाणी ते कुठले दगड आहेत हेही लिहिलेले आहे, त्यात भारताचे नावही अनेक वेळा दिसले. जगातील अनेक मोठ्या शहरांमध्ये एक मोठा मध्यवर्ती टॉवर असतो तसाच डॅलस इथेही पाचशे एकसष्ट फूट उंचीचा रियुनियन टॉवर आहे. दिवसा फारसा आकर्षक न दिसणारा टॉवर रात्रीच्या वेळी बाहेरून लावलेल्या दोनशे एकोणसाठ दिव्यांमुळे रत्नजडित बॉलसारखा दिसतो. त्या दिव्यांचे रंग विशेष प्रसंगी बदलतात. तिथे वर फिरते उपाहारगृह आहे, जिओ डेक नावाचे निरीक्षण दालन आहे. तिथे लावलेल्या दुर्बिणीतून लांबवरचे दृश्‍य बघता येते.

येथे जवळच एक सात मजली इमारत आहे, ‘टेक्‍सास स्कूल बुक डिपॉझिटरी’ची, जिच्या सहाव्या मजल्यावरून १९६३ मध्ये ओस्वाल्ड याने लोकप्रिय अमेरिकन अध्यक्ष जॉन केनेडी यांच्यावर गोळी झाडून हत्या केली. येथील ‘सिक्‍स्थ फ्लोअर म्युझियम’ मध्ये या घटनेशी संबंधित सर्व कागदपत्रे, फोटो, माहिती वगैरे आहे. इथे टेक्‍सास अपटाऊन आणि डाऊनटाऊन जोडणाऱ्या रस्त्याच्या वरून ‘क्‍लाईड वॉरन पार्क’ नावाचे एक मस्तपैकी उद्यान आहे.

जगात अनेक ठिकाणी असलेले ‘रिप्लेज बिलीव्ह इट ऑर नॉट’ हे पण डॅलस मध्ये आहे. बाहेरून मशिदीसारखा आकार, पांढरा शुभ्र रंग व त्याला लाल जांभळ्या रंगांची सजावट अशी ही इमारत बघितल्यावरच कुतूहल निर्माण करते. डॅलस जवळच्या ‘फोर्ट वर्थ’ येथील बोटॅनिकल गार्डनही अतिशय सुंदर आहे (आणि मुख्य म्हणजे फुकट आहे! नाहीतर जिकडे तिकडे एन्ट्रन्स फी भरता भरता पाकीट रिकामे होते.) फोर्ट वर्थ मधलीच वॉटर गार्डन हे एक अनोखे ठिकाण आहे. वरून जवळजवळ शंभर फूट खाली जाणाऱ्या वेगवेगळ्या उंची,लांबी,रुंदीच्या पायऱ्या; त्यावरून सोडलेले पाणी आणि दिवे यामुळे मस्त दिसते. 

‘स्टॉक यार्डस‘ हे  फोर्टवर्थ मधले एक आगळे आकर्षण आहे. या ठिकाणी जुन्या काळात टेक्‍सासमध्ये जशा तऱ्हेची घरे, दुकाने असायची तशी सजवून ठेवली आहेत. इथून दुपारी चार वाजता एक आगळी वेगळी परेड असते. तीस चाळीस धष्टपुष्ट गाई ज्यांची शिंग तीन, चार फूट लांब असतात, कोणाची सरळ तर कोणाची वळणदार आणि त्यांच्या बरोबर काऊबॉयचा वेश घेतलेले लोकं बघायला मस्त मजा येते. मात्र अशा ठिकाणी पार्किंगला जागा मिळवताना पुरेवाट होते.

डॅलसपासून जवळच ‘एनिस’ नावाचं छोटस गाव आहे. आपल्या ‘कास’च्या पठारासारखं ते वसंत ऋतूत तिथे फुलणाऱ्या निळ्या नाजुकशा फुलांसाठी प्रसिद्ध आहे. मध्ये लहानसे तळे, कारंजी, चहूबाजूंनी हिरवीगार कुरणे आणि त्यात अधेमध्ये फुललेली निळी आणि पिवळी फुलं. इतकं मोहक दृश्‍य होतं, की तिथून हलावसंच वाटत नव्हतं.

एक दिवस आम्ही उत्साहाने तिथलं ‘आर्ट म्युझियम’ बघायला गेलो. पण अगदी खरं सांगायचं तर थोडा अपेक्षाभंगच झाला. अतिशय भव्य आणि सुंदर इमारत, वातानुकूलित मोठमोठाली दालनं, सुयोग्य लायटिंग हे सगळं असलं, तरी आपल्या देशातली म्युझियम पाहिलेली असल्याने तिथल्या बऱ्याचशा वस्तू अगदीच साध्या वाटल्या. काही चित्रं आणि शिल्प खूप छान होती, पण आपल्याइतकी कलाकुसर व कोरीव काम कुठेच दिसले नाही.

माझा मुलगा गौरवचे उच्च शिक्षण डॅलसमधेच झाले असल्याने त्याची युनिव्हर्सिटी पाहायचीच होती. Texas Instruments या जगप्रसिद्ध कंपनीने युनिव्हर्सिटी ऑफ टेक्‍सास ॲट डॅलस या विद्यापीठाचा पाया घातला. पाचशे एकरवर हे विद्यापीठ पसरले आहे. त्यामुळे आतमध्ये इकडे तिकडे फिरण्यासाठी त्यांच्या बसेस असतात. इथून नोबेल पारितोषिक विजेते व अवकाशवीरही शिकले आहेत. आपल्या देशातील नवीन जिंदाल हे उद्योगपती या कॉलेजचे विद्यार्थी असल्याने त्यांनी देणगी दिलेल्या मॅनेजमेंट कॉलेजला त्यांचे नाव दिले आहे. कॉलेजात सगळीकडे फिरताना अगदी रात्री अकरा वाजतासुद्धा दिव्यांचा लखलखाट आणि एसीचा गारवा जाणवत होता.अमेरिकेत फिरताना हे द्दृश्‍य सगळीकडेच दिसतं. ते बघून केवढी वीज फुकट जाते आहे हे मनात आल्या शिवाय रहात नाही. 

‘एव्हरीथिंग इज बिग इन टेक्‍सास’ याचा प्रत्यय जागोजागी येतो. वॉलमार्ट, होमडेपो, अल्डी, बेड अँड बाथ, आयडिया अशी सामानाने खचाखच भरलेली अति भव्य दुकानं पहाताना आपणही थक्क होतो. तिथे वॉलमार्ट चोवीस तास चालू असल्याने एकदा तर आम्ही रात्री बारा वाजता गेलो होतो. मला वाटायचं तिथे या मुलांना भारतीय पदार्थांची फारशी व्हरायटी मिळत नसेल दुकानात. पण तिथली ‘पटेल ब्रदर्स’ ची दुकानं पाहून मी अवाक झाले. नुसते पोळी आणि पराठा यांचे तीस तरी प्रकार मिळतात. मात्र पुरणपोळी, गूळपोळी, मोदक असे खास आपले पदार्थ अजून तरी दिसले नाहीत ! 

डॅलसमध्ये व बाहेर केलेले प्रवास, भेटलेले अनेक नवे व काही जुने लोक, गप्पांच्या मैफली, त्याच्या सोसायटीच्या लॉनवर केलेला बार्बेक्‍यू , मित्रमंडळींबरोबर मध्यरात्री व्हाइट रॉक लेकवर खेळलेली अंताक्षरी या आणि अशा अनेक गोष्टी मनात घोळवत आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.

फोटो फीचर

संबंधित बातम्या