वास्को द गामाच्या देशात

दिलीप आमडेकर
गुरुवार, 10 जानेवारी 2019

पर्यटन
पाचशे वर्षांपूर्वी भारतात पोचलेला पहिला खलाशी वास्को द गामा याच्या आठवणी लिस्बन या शहराने उत्तम रीतीने जतन केलेल्या आहेत. वास्को द गामाच्या आठवणी जपणाऱ्या या शहराचा फेरफटका...

भारतात बाबराने १५२६ मध्ये मुघल साम्राज्य स्थापन केले. त्याच्या आधी अठ्ठावीस वर्ष आणि शिवाजी महाराजांच्या जन्माच्या १३२ वर्ष आधी म्हणजे १४९८ मध्ये पोर्तुगीज भारतात आले याचे मला नेहमीच आश्‍चर्य वाटते. पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात पोर्तुगीज व स्पेन हे युरोपमधील सर्वांत पुढारलेले देश होते. त्यांच्या खलाशांमध्ये जग जिंकायची चढाओढ लागली होती. दोन्ही राष्ट्रे कट्टर धर्मनिष्ठ होती. नवीन राज्यप्राप्ती बरोबरच संपत्ती व धर्मप्रसार या ध्येयासाठी त्यांची चढाओढ शिगेला पोचली होता. कोणी कोणते देश घ्यायचे हा वाद पोपकडे गेला व १४७९ मध्ये पोपने जगाच्या नकाशाला गोल कलिंगडाची उपमा देऊन, हे कलिंगड मधोमध कापले व त्याचा एक भाग पोर्तुगीजांना दिला व एक भाग स्पॅनिश लोकांना दिला. (या वाटणीत त्या त्या देशांच्या स्थानिक लोकांना काय वाटते याचा विचारही केला नव्हता). या वाटणी केलेल्या भागात राज्याविस्तार करण्याचा निवाडा दिला. 

या वेळेस हिंदुस्थानातील मसाल्यांच्या पदार्थांना युरोपमध्ये फार मागणी होती. व चढ्या भावात माल विकला जाई. मसाल्याचे पदार्थ पिकविणाऱ्या गोवा ते केरळच्या किनारपट्टीवरुन हे मसाले व इतर पदार्थ सध्याच्या अफगाणिस्तान, इराण व पुढे तुर्कस्तानमार्गे युरोपमध्ये जात असत. हा व्यापार मुख्यत्वे अरबी व्यापारांच्या हातात होता. या मार्गावर असलेल्या ठिकठिकाणच्या दलालांमुळे युरोपियन व्यापाऱ्यांना हा माल फार महाग मिळे. याचे युरोपियन व्यापाऱ्यांना फार वैषम्य वाटे. यातून मार्ग काढण्यासाठी पोर्तुगालच्या राजाने वास्को दा गामास मदत करून समुद्रामार्गे भारत शोधण्यास प्रोत्साहित केले. एकंदर १७० खलाशांसमवेत ४ लहान शिडाच्या बोटीने अतिशय धाडसाने वास्को द गामाने कालीकतला पोचून पाश्‍चिमात्य राष्ट्रांच्या वसाहतीची सुरुवात केली. त्यानंतर जवळजवळ १०० वर्ष पोर्तुगिजांची या मार्गावर सत्ता होती. व व्यापारातून त्यांनी अमाप पैसा कमावला. अशा या धाडसी वास्को द गामाविषयी असलेल्या कुतूहलापोटी, व्यावसायिक कामासाठी जर्मनीला गेलो असताना, काम झाल्यावर पोर्तुगालमधील लिस्बनला जाण्याचे ठरवले.

लिस्बनमध्ये मुक्काम
जुन्या लिस्बनमध्ये वास्को दा गामाच्या संबंधित वास्तुजवळच्या हॉटेलमध्येच मुक्काम ठोकला. हॉटेलसमोरच जेरॉनिमोस मोनेस्टरीची अवाढव्य सोळाव्या शतकात बांधलेली मोनेस्टरी होती. या ठिकाणाहून जेथून धर्मगुरू साहसी खलाशांना जगाच्या सफरीवर निघण्याची आधी धार्मिक आशीर्वाद देत. ही मोनेस्टरी बांधण्याचा खर्च वसूल करण्यासाठी किंग मॅन्युअलने आफ्रिका व आशियातून येणाऱ्या मालावर पाच टक्के कर लावला. ज्यावरून वर्षाला साधारण सत्तर किलो सोन्याच्या किमतीचा कर वसूल होत असे. नितांत सुंदर आर्किटेक्‍चर असलेल्या जेरॉनिमोस मोनेस्टरीच्या मागे १.५ किलोमीटरवर ‘रे स्टेलो हर्मिटेज’ हे चॅपल (प्रार्थनेसाठीची छोटी जागा) आहे जिथे वास्को द गामा व त्याच्या खलाशांनी मोहिमेवर जाण्याच्या आधीच्या रात्री ख्रिस्ताची प्रार्थना केला होती. तिथेच मुक्काम करून दुसऱ्या दिवशी मोहिमेला सुरुवात केली.

याच्या समोरच टागुस नदी आहे जी जवळच्या समुद्रास जाऊन मिळते. या ठिकाणी १५१९ मध्ये लिस्बनच्या संरक्षणासाठी बांधलेला चार मजली वॉच टॉवर आहे. सुरेख डौलदार, नदी किनाऱ्यावरचा टॉवर प्रेक्षणीय आहे.

जेरॉनिमोस मोनेस्टरीच्या शेजारीच असलेल्या चर्चमध्ये वास्को द गामाची कबर आहे. खरं म्हणजे वास्को द गामा त्याच्या तिसऱ्या भारताच्या सफरीच्यावेळी १५२४ मध्ये केरळमध्ये कोचीनला मरण पावला व तेथेच त्याची कबर बांधण्यात आली. पण पोर्तुगीजांना त्याच्याविषयी वाटत असलेल्या आदरापोटी त्याचे शव तेथून पुन्हा उकरून सोन्या व हिऱ्या मोत्यांनी सजवलेल्या शवपेटीतून लिस्बनला आणले व परत नवीन बांधलेल्या कबरीत ठेवण्यात आले. 

जेरॉनिमोस मोनेस्टरी व शेजारील चर्च ज्यात वास्को द गामाची कबर आहे, तेथे प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. मी गेलो तेव्हा जवळजवळ  ३०० (बहुधा सगळे) युरोपियन्सची तिकिटासाठी रांग होती. मी ऑनलाइन तिकीट आधीच काढल्याने लगेच प्रवेश मिळाला. 

दुसऱ्या दिवशी पुन्हा जेरॉनिमोस मोनेस्टरीच्या दुसऱ्या बाजूला असलेले मॅरिटाईम (सागरी) प्रदर्शन आहे ते पाहण्यास गेलो. वास्को द गामाच्या मोहिमेतील साओ गॅब्रिएल व इतर शिडाच्या बोटींची मॉडेल्स आहेत. तसंच पोर्तुगीजांच्या गेल्या अनेक शतकांपुर्वीच्या सागरी सामर्थ्याविषयीच्या बोटी, तोफा व इतर युद्ध साहित्य अशा जवळजवळ १७ हजार वस्तूंचे संग्रहालय आहे, जे पाहण्यास कमीत कमी तीन ते चार तास लागतात.

टागोस नदीवर संध्याकाळी असणाऱ्या ‘प्राका गा कमर्शिया’ या नितांत सुंदर स्थळाला भेट दिली. भारत आफ्रिकेतील वसाहतीमधून आणलेल्या व्यापारी बोटी इथे लागायच्या व तेथील मसाल्याचे पदार्थ व इतर वस्तूंचा व्यापार येथे चालायचा. मध्यभागी असलेला किंग जोसचा भव्य पुतळा जणू या धाडसी व्यापारांचे स्वागतच करत आहे असे वाटते. लिस्बनला आल्यावर गोवा मुक्ती संग्रामातील क्रांतिकारक मोहन रानडे येथील तुरुंगातील कोठडीत काही वर्ष खितपत होते याची आठवण आल्याशिवाय रहात नाही. 

लिस्बनचा काही भाग जसा मॉडर्न आहे, तसेच जुने लिस्बन ही आहे. तिथे मुंबईत पूर्वी असलेल्या ट्राम सारख्या ट्रॅम्स आहेत व काळबादेवीसारख्या गल्ल्याही आहेत. 

युरोपियन म्हणजे सगळे सज्जन व कायद्याचे काटेकोर पालन करणारे असे समजू नये. इथे खिसेकापू व भुरट्या शर्विलकांची उपस्थिती जाणवते.जेरॉनिमोस मोनेस्टरीपासून अर्ध्या तासांवर एका टेकडीवर ‘साओ जॉर्ज कॅसल’ नावाचा मुस्लिम बांधणीचा प्रेक्षणीय पुरातन किल्ला आहे. पोर्तुगालमध्ये इ.स ७११ ते  १२४९ पर्यंत म्हणजे ५०० वर्षांच्या वर मुसलमान राज्यकर्त्यांचे राज्य होते. इ.स. ११४७ मध्ये अल्फान्सो हेनरिकने हा किल्ला मुसलमानांकडून जिंकून घेतला. नंतर ख्रिश्‍चनांचे राज्य चालू होऊन पोर्तुगीज व स्पेनमध्ये अनेक मशिदीचे रूपांतर चर्च किंवा कॅथेड्रलमध्ये करण्यात आले. 

आपल्याकडे मिळणारा रत्नागिरी हापूस आंबा हा पोर्तुगीज सेनानी अल्फान्सो दा अल्बुकर्क याने तेथून आणून गोवा, कोकणात लागवड सुरू केली. तसेच मूळचे ब्राझील, साउथ अमेरिकेतील बटाटा, पेरू व पपई ही फळेसुद्धा पोर्तुगीजांनी येथे आणली. लिस्बन गावात सजवलेल्या रिक्षाही फिरतात. त्याला इथे टुकटुक म्हणतात. तसेच मुंबईत पूर्वी असलेल्या घोड्यांच्या बग्गी सारख्या बग्गी प्रवासी जवळच्या अंतरावर जाण्यास वापरतात. 

जेवणासाठी मत्स्यप्रेमींना येथे इच्छाभोजन मिळेल. पोर्तुगाल दरवर्षी युरोपमध्ये लाखो टन विविध मासे निर्यात करतो. त्यामुळे मांसाहारींची येथे चंगळ आहे. तसेच युरोपियनांमध्ये शाकाहारी किंवा व्हेगन जेवणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विविध शाकाहारी पदार्थ सहज मिळतात. आतातर युरोपमधील प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये भारतीय हॉटेल्सही सहज दिसतात. 

आपल्याकडे पुण्याच्या चितळे बंधूंच्या दुकानात बाकरवडी घेण्यास जशी रांग असते, तशीच रांग जेरॉनिमोस मोनेस्टरीच्या समोर असलेल्या ‘पेस्ट्रीज दा बेलोम’ या बेकरीत, तेथील प्रसिद्ध पेस्ट्रीज घेण्यासाठी असते. मद्य प्रेमींना पोर्तुगालची प्रसिद्ध निंजा लिकर मोहित करते.

कसे फिराल 
एअरपोर्टवर किंवा गावात कुठेही २४ तास चालणारे लिस्बन कार्ड १९ युरोला मिळते. सर्व बसेस, ट्रॅम्स, ट्रेन, लोकलने अमर्याद प्रवास करता येतो व २६ म्युाझियम्सना या कार्डमुळे प्रवेश मिळतो, तसेच म्युझियममध्ये प्रवेश करताना तेथील रांगेत उभे राहावे लागत नाही. 

कुठे राहाल
प्रत्येकाच्या बजेटप्रमाणे भरपूर हॉटेल्स उपलब्ध आहेत. शक्‍यतो आपणास ज्या वास्तू पहावयाच्या आहेत, त्या परिसरातील हॉटेल निवडल्याने वेळ व पैसा वाचतो. 

केव्हा जावे
साधारण मे महिना ते ऑगस्टपर्यंतचा सीझन येथे फिरण्यासाठी उत्तम समजला जातो. 

संबंधित बातम्या