इतिहासाचे साक्षीदार - म्युनिक

दिलीप आमडेकर, डोंबिवली
सोमवार, 9 डिसेंबर 2019

पर्यटन
 

दुसऱ्‍या महायुद्धाच्या शेवटी दोस्त राष्ट्रांनी केलेल्या बॉम्बिंगमुळे म्युनिक शहराची व एकंदरीत जर्मनीची धुळधाण उडाली होती व बरीच शहरे बेचिराख झाली होती. या राखेतून पुन्हा उड्डाण करून आजचा जर्मनी, पुन्हा युरोपातील सर्वात धनवान आणि प्रगत राष्ट्र म्हणून उभा राहिला आहे. म्युनिकमध्ये फिरताना या आर्थिक समृद्धीची व प्रगतीची जाणीव कोपऱ्या कोपऱ्यात जाणवते. 

तरीही इतिहासप्रेमी पर्यटकांचे तांडे मात्र म्युनिकमध्ये हिटलर, नाझी व थर्ड राइचच्या संबंधातील इतिहास व वास्तूंचा शोध घेत असतात. याचे मुख्य कारण म्हणजे अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या करिअरची पहिली १३ वर्षे, नाझी पार्टीची स्थापना व जर्मनीची सत्ता १९३३ पर्यंत मिळेपर्यंतची नाझी पार्टीची वेगवान वाढ म्युनिकमध्ये झाली. 

आपल्याकडच्या शिवसेनेच्या इतिहासात लालबाग, परळ, दादरला आहे, तसेच महत्त्व नाझी पार्टीच्या इतिहासात म्युनिकला आहे. 

म्युनिकच्या Hauptbahnof (हाउपटबान होफ) नावाच्या सेंट्रल रेल्वे स्टेशनपासून हिटलर व थर्ड राइच ही वॉकिंग टूर रोज सकाळी निघते. म्युनिकची लोकसंख्या २५ लाख आहे. तरीही हे रेल्वे स्टेशन एवढे मोठे आहे, की त्याला ३२ प्लॅटफॉर्म्स आहेत. स्टेशनसमोरील एका स्पॉटला सगळ्यांनी जमायचे ठरले होते. आमच्या ग्रुपमध्ये अमेरिकन, रशियन, ब्रिटिश, चीनी, इटालियन, ऑस्ट्रेलियन असे जगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्‍या अनेक देशांचे प्रवासी होते. प्रत्येकजण हिटलर संदर्भातील इतिहासाचा अभ्यास करून आला होता. 

मुळात हाउपटबान होफ हे स्टेशनच दुसऱ्या‍ महायुद्धातील अनेक महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार आहे. पहिल्या महायुद्धातून परत आल्यावर हिटलरने स्वत: इथे स्टेशनवर काही काळ गार्ड ड्युटी (रखवालदार) केली होती. पुढे सप्टेंबर १९३८ मध्ये सत्तेत आल्यावर इटलीचा ‘मुसोलिनी’, जो एकेकाळी हिटलरचे दैवत होता, त्याचे याच स्टेशनवर भव्य व दिमाखदार स्वागत केले होते. १९४५ मध्ये दुसऱ्या‍ महायुद्धाच्या शेवटी अमेरिकन फौजा व जर्मन सैन्याची शेवटच्या प्रतिकाराची धुमसान लढाई येथे झाली होती. 

पुढे चालत चालत पहिल्यांदा आम्ही होफब्राउहाउस हा सुप्रसिद्ध बिअर हॉल पाहावयास गेलो. तीन मजली असलेला हॉल इ.स. १५६८ पासून म्हणजे ४५० वर्षांपासून सुरू असून बऱ्याच ऐतिहासिक घटनांसाठी प्रसिद्ध आहे. पहिल्या महायुद्धापूर्वी रशियन क्रांती होण्यापूर्वी काही काळ म्युनिकला वास्तव्यास असताना ‘लेनिन’ या हॉलमध्ये येत असे. जगप्रसिद्ध संगीतकार ‘मोझार्ट’ इथे जवळच राहायचा व त्याचे काही प्रसिद्ध ऑपेराज त्याने इथे सादर केले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बिअर हॉलच्या तिसऱ्या मजल्यावर हिटलर व त्याच्या साक्षीदारांनी नाझी पार्टीची स्थापना फेब्रुवारी १९२० मध्ये केली. त्या हॉलमधील हिटलरची भाषणे पुढे जर्मनीभर गाजली. त्याची आवेशपूर्ण भाषणे एक ते चार तास सहज चालत. भारावून गेलेले जर्मन तरुण-तरुणी, त्याचे क्षणार्धात निष्ठावंत अनुयायी होत. 

इतिहासप्रेमींना जगाच्या इतिहासातील प्रमुख घटनांच्या साक्षी असलेल्या वास्तूतून वावरताना एक वेगळाच रोमांचकारी अनुभव येतो. या हॉलमधील बिअर हॉल अजूनही सुरू असून जगभरातील रसिक, मुद्दाम येथे बियरपान व जेवणासाठी येतात. 

याच्या पुढे जवळच बर्गरब्राडकेलर ही दुसरी ऐतिहासिक महत्त्वाची वास्तू होती. जिथे हिटलरच्या पहिल्या अयशस्वी क्रांतीचे, ज्याला बिअर हॉल पुतल्स’ म्हणतात, त्याचे रामायण घडले. १९२३ मध्ये नाझी पार्टीचा जोर वाढल्यानंतर काहीशा उतावळेपणे हिटलरने क्रांतीची घोषणा करून सत्ता ताब्यात घ्यावयाचा प्रयत्न केला. म्युनिकचे पोलिस व लष्करी प्रमुख उपस्थित असलेल्या या इमारतीतील सभेत दोन हजार नाझी स्टॉर्म ट्रुपर्स व गुंडांनी सभेला वेढा घातला. हेस, अर्नेस्ट रॉम, लुडेनडॉर्फ यांच्यासह हिटलर स्वत: हातात पिस्तूल घेऊन सभागृहात शिरला, त्याने पोलिस प्रमुखांना क्रांती झाल्याचे घोषित केले. 

दुसऱ्या दिवशी आम्हाला गाइडने, सत्ता काबीज करायला हिटलर, हर्मन गोअरिंग, हिमलर व इतर साथीदार निघाले ती गल्ली दाखवली. गल्लीच्या एका टोकाला पोलिस व दुसऱ्या टोकाला नाझी, त्यांच्यात जोरदार हाणामारी व गोळीबार होऊन १६ नाझी व ४ पोलिस मरण पावले. हिटलरला तुरुंगवासाची शिक्षा होऊन कारागृहातच त्याने त्याचे जगप्रसिद्ध ‘माईन काम्फ’ हे पुस्तक लिहिले. याच इमारतीत नोव्हेंबर २९ मध्ये हिटलरच्या सभेत बॉम्बस्फोट घडवून त्याला मारण्याचा प्रयत्न झाला. पण स्फोट होण्यापूर्वीच भाषण संपवून निघून गेल्याने तो वाचला. (मूळ हॉल अमेरिकन बॉम्बिंगमध्ये उद्‍ध्वस्त होऊन आता तिथे नवीन इमारती आहे) 

हिटलर व नाझींच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार असलेल्या वास्तू व स्थळे बघून टूरमधील इतिहासप्रेमी चांगलेच भारावले. गाइडवर प्रश्‍नांचा भडिमार होत होता. गाइडपण भरभरून माहिती देत होता. या जागेच्या परिसरातच नाझी पार्टीची ऑफिसेस ‘रोलींगस्वास’ इथे होती. याच ठिकाणी हिटलरची प्रेयसी इव्हा ब्राऊन व त्याची प्रथम भेट झाली. ती जवळच्याच एका फोटोग्राफरच्या दुकानात नोकरी करत होती. हिटलरचे वय त्यावेळी ४० होते, तर इव्हा सतरा वर्षांची होती. त्यांच्या भेटी हिटलरच्या आवडत्या ऑस्टेरिया इटालियाना या रेस्टॉरंटमध्ये होत. हे रेस्टॉरंट अजूनही सुरू आहे.

जवळच्या फ्युररबाड या इमारतीकडे वळलो. नाझी पार्टीच्या इमारतीमध्ये १९३८ मध्ये ब्रिटिश पंतप्रधान चेंबरलेन, फ्रेंच पंतप्रधान, इटलीचा मुसोलिनी व हिटलर यांच्यात ऐतिहासिक ‘म्युनिक करार’ झाला. पुढे युद्ध काळात फ्रान्स व इतर युरोपियन राष्ट्रांतून पळवलेली अनेक मौल्यवान चित्रे व वस्तू या इमारतीत ठेवल्या होत्या. 

आता आमची वॉकिंग टूर संपत आली. हिटलरचे निवासस्थान, स्टॉर्म ट्रुपर्सचे ऑफिस वगैरे अनेक इमारती या परिसरात आहेत. बऱ्याच वास्तू युद्धाच्या शेवटी बॉम्बिंगमध्ये नष्ट झाल्या. 

आता दुपारचे ऊनही वाढले होते व जठराग्नी तप्त झाल्याची जाणीवही होत होती. म्युनिकमध्ये रस्त्याच्या कडेला पेयपानासाठी व जेवणासाठी अनेक रेस्टॉरंट्‌स आहेत. रस्त्यावरची गंमत बघत फुटपाथवर टाकलेल्या टेबल खुर्चीवर थंड बिअरचा स्वाद घेत सावकाश जेवण घेणे, हा म्युनिकमधला भोजनानंद म्हणता येईल. टिपिकल जर्मन जेवणात पोर्क, बीफ, टर्कीपासून केलेले सॉसेजेस, बर्गर्स, बटाट्याचे विविध सॅलड्स व एग नूडल्स, ब्रेडचा समावेश असतो. 

दुपारी लोकल ट्रेनने म्युनिक गावापासून थोडासा दूर असलेला ‘डॅच्यू कॉन्संट्रेशन कॅम्प’ पाहण्यास गेलो. हिटलर ३० जानेवारी १९३३ रोजी जर्मनीचा चॅन्सलर झाला. लगेचच मार्च महिन्यात त्याच्या जवळच्या हिमलर या साथीदाराने नाझींचा पहिला कॉन्संट्रेशन कॅम्प (यातना घर) सुरू केला. युद्ध संपेपर्यंत म्हणजे एप्रिल १९४५ पर्यंत हा कॅम्प सुरू होता. मुख्यतः ज्यू, कम्युनिस्ट, हिटलरचे विरोधक असलेले कॅथलिक धर्मगुरू, जिप्सी यांना इथे डांबून ठेवत. सुरुवातीला यातना घराचे स्वरूप असलेल्या या कॅम्प्सचे रूपांतर नंतर कत्तलखान्यांमध्ये झाले. नंतर नाझींनी जर्मनी व पोलंड व इतर अनेक ठिकाणी कॅम्प्स काढले. ऑसविचच्या कॅम्पमध्ये विषारी गॅसद्वारे ११ लाख निराधार ज्यूंना मारले. हा कॅम्प मी पूर्वीच पाहिला होता. डॅच्यूला साधारण ३१ हजार कैदी मारले. सदर कत्तलखाने पाहताना प्रवाशांच्या डोळ्यात अश्रुधारा वाहतात. 

काही लोकांना हिटलरची शिस्त, दुसऱ्या महायुद्धात जर्मन सैन्याने मिळवलेले आश्‍चर्यजनक विजय यामुळे त्याच्याविषयी आकर्षण वाटते. पण माणुसकीला काळिमा फासणारे व लाखो निरपराधांना विनाकारण क्रूरपणे मृत्युसदनी पाठवणारे हे कॅम्प्स पाहिल्यावर हिटलरविषयी घृणाच वाटते. 

म्युनिक ही बव्हेरिया या राज्याची राजधानी आहे. बव्हेरियन लोक त्यांच्या शिस्तबद्धतेविषयी प्रसिद्ध आहेत. त्याचा प्रत्यय सार्वजनिक ठिकाणी येतो. 

प्रसिद्ध ऑडी, बीएमडब्ल्यू या ऑटोमोबाईल कंपन्या, आदिदास, प्युमा या स्पोर्ट्स ब्रँड्सच्या फॅक्टऱ्या म्युनिकच्या आसमंतात आहेत. आधुनिक जर्मनीचा मागोवा घ्यावयाचा असल्यास बीएमडब्ल्यूच्या फॅक्टरीची टूर (तिकीट १२ युरो) करता येते. तेथील रोबोटद्वारे चाललेले उत्पादन बघून थक्क व्हायला होते. 

म्युनिक फिरायला तेथील पब्लिक ट्रान्स्पोर्टचा डेली पास, एअरपोर्ट ते सिटी व इतरत्र जाण्यासाठी बस, ट्रॅम व लोकल ट्रेनच्या प्रवासासाठी स्वस्त व सोयीचा पडतो.

संबंधित बातम्या