रमणीय बस्तर

डॉ. दीपा नाईक, दिल्ली
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

पर्यटन
 

एकीकडे हिरवीगार जंगले, नद्या, प्रचंड धबधबे आणि वन्य व आदिवासी जीवनाचे वैविध्य, तर दुसरीकडे सतत येणाऱ्या येथील नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांच्या बातम्या, हे दोन्हीही असलेली भूमी म्हणजे छत्तीसगढ. पण, नुकत्याच केलेल्या बस्तरच्या सहलीत मनात ठसते, ते हिरवेगार जंगल व त्यातील प्रचंड धबधब्यांचे सौंदर्यच! 

भिलाईमध्ये अनेक वर्षे वास्तव्य असलेल्या आमच्या डॉ. अलका सरदेशपांडे या मैत्रिणीने जेव्हा छत्तीसगढमधील बस्तरच्या भेटीचा बेत आखला, तेव्हा अनेकांनी भुवया उंचावल्या व शंका काढल्या. पण, प्रत्यक्ष पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्याने पुढाकार घेऊन आमचा कार्यक्रम आखलाच आणि तो यशस्वी व्हावा, म्हणून स्वतः आमच्याबरोबर येऊन उत्साहात पारही पाडला. 

रायपूर या छत्तीसगढच्या राजधानीच्या विवेकानंद विमानतळावर उतरून मी तासाभराच्या सुखद प्रवासानंतर भिलाईला पोचले. तिथे नागपूर, पुण्याहून आमची इतर मित्रमंडळी आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी एका वातानुकूलित व्हॅनमधून आम्ही तेथून २९६ किमी अंतरावरील चित्रकूट धबधब्याला जायला निघालो. राजधानी रायपूरमधून आम्ही जाणार असल्याने तिथल्या पीडब्ल्यूडीच्या इंडियन कॉफी हाउसमध्ये नाश्‍ता करून आम्ही पुढे निघालो. 

छत्तीसगढ राज्य पूर्वी मध्यप्रदेशाचाच भाग होता. २००० मध्ये हे वेगळे राज्य झाल्यावर रायपूर ही त्याची राजधानी झाली. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या राज्यात चौदा वर्षे सलग रमण सिंग हे मुख्यमंत्री होते. पण, अलीकडे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे राज्य आले. रमण सिंग यांनी छत्तीसगढमध्ये अनेक नवे प्रकल्प उभे केले व राज्याच्या सौंदर्यात भरच घातली. नवे रायपूर (अटल नगर) हे नव्याने बांधलेल्या राजधानीचे शहर जुन्या शहरापासून १७ किमीवर बसविले. २०२३ पर्यंत ते पूर्णपणे कार्यान्वित होईल. या नव्या राजधानीत विधानसभा, प्रशासकीय कार्यालये, तसेच राहण्यासाठी गृहसंकुलांची उभारणी केली गेली. येथील रस्तेही प्रशस्त व दुतर्फा सुशोभित आहेत. 

या नव्या शहराच्या मधे ८०० एकरमध्ये नंदनवन नावाची मानवनिर्मित जंगल सफारी आहे. शाकाहारी प्राण्यांसाठी, तसेच वाघ, सिंह, अस्वल, मगरी यांकरिता निरनिराळे विभाग आहेत. त्यात हे प्राणी मोकळेपणाने विहार करतात. जाळीच्या सफारी व्हॅनमधून छोट्या वाटेने प्रवास करताना तुम्हाला यातील काही प्राणी नजरेस पडतातच. सभोवताली पाण्याचा तलाव आहे. आम्हाला तीन वाघ, (दोनपासून त्यांची संख्या आता सात झाली आहे) तीन सिंह (यांचीही संख्या तीनपासून नऊ झाली आहे), तसेच, अनेक हरणे, काळवीट, नीलगाय, सांबर दिसले. वन्यजीवन व जंगलांचे संरक्षण व संवर्धन हे त्याचे उद्दिष्ट आहे. खास वनस्पती व झाडांची लागवड व प्राण्यांच्या जेवणाची सोय करणे हे वनाधिकाऱ्याचे रोजचे काम होय. एका अस्वलाला दररोज सात किलो मध द्यावा लागतो. जंगलात चार अस्वले आहेत. 

यानंतर आम्ही नव्या रायपूरमध्येच आदिवासींची कला व जीवन दाखविणारे मुक्तांगण हे उद्यान पाहावयास गेलो. त्याच्या प्रवेशद्वारापासूनच आदिवासी कलेचे दर्शन होते. रंगीबेरंगी वेशात नृत्य करणाऱ्या आदिवासी तरुण-तरुणींचे गट, तर दुसरीकडे विविध आयुधे घेऊन तयार असलेली सेना यांचे शिळा व धातू शिल्प आहे. तसेच, ११ व्या शतकातील मंदिराची प्रतिकृती, उंचावर दर्शनकक्ष, रस्त्याच्या दुतर्फा आदिवासींच्या प्रतिकृती व घोटुल हे झोपडे (यात विवाहपूर्व मनपसंत वराबरोबर वधूने राहायचे व पटले तर नंतर लग्न करायचे) हे सर्व उद्यानात पाहावयास मिळते. २००६ मध्ये माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्याचे उद्‍घाटन झाले. 

दुपारच्या प्रवासानंतर सूर्य अस्ताला जाण्याच्या सुमारास आम्ही चित्रकूट धबधब्यानजीक पोचलो. दूरवरून पाणी कोसळण्याच्या आवाजाची गाज धबधबा जवळ आल्याची वर्दी देत होती. ते उंचावरून पडणारे तीन मोठे, दोन छोटे पिवळ्या मातकट रंगाचे प्रपात, खालून वर उडणाऱ्या तुषारांची भिंत व त्यावर पडणारे सूर्यकिरण प्रत्यक्षात पाहून तोंडातून ‘आहाहा..’ असे उद्‍गार आपोआपच बाहेर पडले. चंद्रावती नदी वाहत येऊन ९७ फुटांवरून दरीत कोसळते. घोड्याच्या नालाच्या आकाराच्या अर्धवर्तुळाकार असलेल्या या धबधब्याला ‘मिनी नायगारा’ असेही म्हणतात. हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात रुंद धबधबा आहे. 

धबधब्याजवळच छत्तीसगढ पर्यटन खात्याच्या लाकडी वातानुकूलित टुमदार कॉटेजेसमध्ये आमचा मुक्काम होता. रात्रभर धबधब्याचे संगीत कानात घुमत होते. सकाळी सकाळी कॉटेजेसच्या पाठीमागच्या डेकवरून धबधब्याचा रंग पांढरट पिवळा, तर शुभ्र तुषारांचे धुके उंचापर्यंत दिसत होते... आणि सूर्य उगवताना तर त्या पाण्यावर चढलेला सोन्याचा मुलामा डोळ्यांचे पारणे फेडत होता. 

दुसऱ्या दिवशी आम्ही ६५ किमी अंतरावरील तीरथगढ हा धबधबा पाहावयास गेलो. कांगेर राष्ट्रीय उद्यानाचाच हा भाग आहे. २००२ मध्ये यास राखीव वनक्षेत्र घोषित करण्यात आले. धबधब्याच्या जवळच्या रेस्टॉरन्टमध्ये शिरण्याअगोदरच्या रस्त्यावर रंगीबेरंगी कपडे घातलेल्या आदिवासी महिला रस्त्यावर दांडा पाडून पैसे घेत होत्या. त्यांची अधिकृत समिती असून जिल्हाधिकाऱ्याच्या संमतीने त्या पैसे आकारतात, असे समजले. छत्तीसगढमध्ये अजूनही बऱ्याच आदिवासींच्या जमाती वसाहती करून आहेत. त्यांच्या कलेला (रॉट आयर्न, बांबू आदींच्या वस्तू) वाव देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

तीरथगढ हा कांगेर नदीवरचा धबधबा २९९ फुटांवरून तीन टप्प्यात कोसळतो. वरून त्याचा वेग व सौंदर्य इतके जाणवत नसले, तरी पायऱ्या पायऱ्यांनी उतरून त्याच्या तळाशी गेल्यावर उंचावरून पडणारे दुधाळ शुभ्र पाणी अंगावर घेत तुषारांनी ओलेचिंब होत, त्यावरच्या लाकडी पुलावरून त्याचे सौंदर्य न्याहाळण्याचा थरार अनुभवायलाच हवा. 

त्यानंतर, आम्ही दांतेवाडीचे प्रसिद्ध मंदिर पाहावयास गेलो. रस्ता दांतेवाडीतूनच जात होता. हा नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला. शिवाय विधानसभेची फेरनिवडणूक दोन दिवसांवर आलेली. त्यामुळे केंद्रीय राखीव दलाच्या जवानांची स्कूटरवरून चाललेली गस्त दिसत होती. पण, वातावरणात तसा ताण जाणवत नव्हता. नक्षलवाद्यांच्या कारवायांच्या बातम्या मीडिया ठळकपणे दाखवीत असते. पण, छत्तीसगढच्या विपुल निसर्गाबाबत बाहेरच्या लोकांना माहीत नसते, असे मत आमच्याबरोबर असलेल्या अधिकाऱ्याने व्यक्त केले. नक्षलवाद्यांचा उपद्रव नाकारता येत नसला, तरी ते पर्यटकांच्या वाट्याला जात नाहीत. सरकारी अधिकारी व राखीव दले हेच त्यांचे लक्ष्य असते. पण, दांतेवाडीहून जगदलपूरला परतताना आमच्या वाहनाने नक्षल भाग टाळून दूरचा मार्ग निवडला होता.

दांतेवाडीच्या देवीचे चौदाव्या शतकात बांधलेले मंदिर आदिवासींचे कुलदैवत असलेले जागृत देवस्थान आहे. गाभाऱ्यात स्वयंभू दांतेश्‍वरी देवीचे स्थान असून ५२ शक्तिपीठांपैकी हे एक आहे. गाभाऱ्यात भारतीय वेषातच जावे लागते. जीन्स, पॅंट, पायजमा घालून जाता येत नाही. आमचा त्या दिवशीचा मुक्काम जगदलपूरमधील हॉटेलमध्ये होता. 

तिसऱ्या दिवशी आम्ही परतीच्या वाटेवर धमतुरीजवळील गंगरेल धरण पाहावयास गेलो. महानदीवरील या धरणाचे पाणी भिलाई, रायपूर व बस्तरला पुरविले जाते. हे धरण १८३० मीटर्स रुंद आहे. त्याच्या विस्तीर्ण जलायशाशेजारी राहण्यासाठी सुंदर कॉटेजेस व देखणे रेस्टॉरन्टही आहे. बोटिंग, पॅरासेलिंग आदी जलक्रीडांचा अनुभव घेता येतो. त्याला छत्तीसगढचे ‘गोवा’ म्हणतात. 

आमचा बस्तर दौरा संपत होता. पण, पाहिले त्यापेक्षा अनेक जंगले, धबधबे, मंदिरे व रामायण महाभारतातील पाऊलखुणा सांगणारी अनेक ठिकाणे येथे आहेत. आमच्याकडे असलेल्या कमी वेळात त्यांचा समावेश करता आला नाही. छत्तीसगढचे निसर्गसौंदर्य मात्र पुन्हा एकदा भेट द्यावयास खुणावत राहील, हेही खरे! 

संबंधित बातम्या