डोडीताल पदभ्रमण

डॉ. कल्पना फळ
सोमवार, 13 मे 2019

पर्यटन
 

शांत, रमणीय पर्यटनस्थळे/ठिकाणे शोधून काढणे हल्ली कठीण होत चालले आहे. त्यामुळे असे ठिकाण असेल, तर तिथे पोचण्यासाठी जिकिरीचा प्रवास किंवा जीवतोड पायपीट करायलाही आनंदच वाटतो. गणपती महोत्सवात अशाच एका गणपती क्षेत्री जाण्याचा आनंद आम्ही लुटला. अतिशय सुंदर अशा क्षेत्राचे नाव आहे डोडीताल. उत्तराखंडातील एक ट्रेक - पुराणकथेनुसार गणेशजन्माचे ठिकाण.

उत्तराखंडातील हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये ११५० मी. उंचीवरील उत्तरकाशी हे प्रमुख मध्यवर्ती ठिकाण. उत्तरकाशी डेहेराडूनपासून १८० किमी अंतरावर आहे व उत्तरकाशी ते संगमचेट्टी अंतर सुमारे १७ किमी आहे. आगोडा (२२८६ मी.), भेबडा (२२५० मी.),  धारकोट, कचरी व मांझी ही गावे डोडीताल (३३०७ मी) या मार्गावर आहेत. येथून पुढे दरवा टॉप, सीमा कॅम्प मार्गे हनुमानचेट्टी येथे पोचता येते. हनुमानचेट्टी हा यमुनोत्रीला जातानाचा मुख्य थांबा आहे. संगमचेट्टीहून अक्षय गंगेचा मुख्य प्रवाहावर सीमा सुरक्षा दलाने (BSF) बांधलेला पूल ओलांडून डोडीतालचा ट्रेक सुरू होतो. यावर्षी आम्ही गणेशचतुर्थीच्या दिवशी सकाळी आठ वाजता संगमचेट्टीहून निघालो. भंकोली गावची पायवाट डाव्या बाजूला सोडून आगोडाच्या दिशेने वर जाणारी पायवाट धरली. साधारण एक कि.मी. अंतरापर्यंत वाट बरी होती. त्यापुढे पाऊस व भूस्खलनामुळे पायवाट साफ धुऊन गेली होती. पायवाट शोधण्यात जवळजवळ एक तास गेला, एक गावकरी मदतीला धावून आला. त्याने दाखविलेल्या वाटेचे रूपडेही तसेच होते. कधी वाटेत छोटे छोटे ओहोळ, कधी वाटच खचलेली, तर कधी निसरडी, दगडगोट्यांची वाट. सोबतीला पावसाने वाढलेल्या झुडुपांचे रान! निळ्या, जांभळ्या, पिवळ्या, गुलाबी व पांढऱ्या रानफुलांनी डोळे सुखावत होते. तर, कधी खाजखुयली आणि काटेरी झुडुपे अंगाला ओरबाडत होती. उन्हाचा त्रास जाणवत नव्हता, पण चढणीमुळे दमछाक होत होती. खाली उजवीकडे दरीत अक्षय गंगेच्या उपनदीचा प्रवाह साथीला होताच.

चार तासानंतर आगोड्याचा ओढा लागला. अवघ्या २० ते ३० घरांचे हे गाव, पण ८५ ते ९० टक्के लोक साक्षर आहेत. मुख्य व्यवसाय शेती व जोडीला व्यवसाय पर्यटकांची जेवणखाण व राहण्याची सोय करणे. शेतीशिवाय दुसरा कसलाही पर्याय नसल्यामुळे जवळ जवळ सर्वच तरुणांनी नेहरू पर्वतारोहण संस्थेतून (उत्तरकाशी) प्रशिक्षण घेऊन ते मार्गदर्शकाची तसेच HAP(high altitude porter) व LAP (low altitude porter) ची कामे स्वीकारतात. दुपारचा एक वाजला होता, पण आकाशात ढग जमा होऊ लागले होते. म्हणून त्या दिवशी आगोड्यात मुक्काम करण्याचे ठरवले आणि तो निर्णय योग्य ठरला. कारण तीन तास सपाटून पाऊस पडला. पाऊस थांबताच निरभ्र आकाश व हिरव्या पर्वत रांगांमुळे समोरचे निसर्गचित्र अवर्णनीय झाले. पावसापूर्वी डोंगर माथ्यावरून खाली उतरणारी पाण्याची रुपेरी धार आता मोठ्ठा प्रवाह बनून दरीत कोसळू लागली होती. डोंगर उतरणीवर राजगिऱ्यांचे लाल तुरे आणि मोहरीची पिवळी फुले अशी रंगसंगती निसर्गचित्राच्या सौंदर्यात भर टाकत होती आणि थोड्याच वेळात आकाशात उगवली ‘चवतीच्या चंद्राची कोर.’ गणेश चतुर्थीला ती पाहू नये असे म्हणतात. पण असे दृश्‍य पाहायला मिळणे म्हणजे अहो भाग्यम्‌!

आगोड्यातील विश्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी ऋषिपंचमीच्या सकाळी आठ वाजता आगोडा सोडले आणि साधारण तीन किमीच्या वळणावळणाच्या रस्त्याने भेबडा गावाच्या सीमेजवळ तासाभराने पोचलो. सकाळची वेळ व झुडुपांच्या रानातील वाट. इथेच जळवांनी आमच्या पायांवर आक्रमण करून बरेच रक्त शोषले होते व आम्हाला त्याचा थांगपत्ताही नव्हता. गावात प्रवेश करण्यापूर्वी एक मोठ्ठा ओढा ओलांडावा लागणार होता व त्याच्या जलप्रतापाचा आवाज मन अस्वस्थ करत होता. २०१३ च्या जलप्रलयात मोठ्यामोठ्या दगडधोंड्याबरोबर एक झाड या प्रवाहावर आडवे पडले होते व त्याला दोरी बांधून गावकरी त्याचा उपयोग पुलासारखा करीत होते. ते एक मोठे दिव्यच होते. आगोड्यात ओढा सांभाळून ओलांडा, वाटल्यास गावकऱ्यांची मदत घ्या, असे वारंवार बजावले होते. देवाचे नाव घेऊन त्या निसरड्या झाडाच्या ओंडक्‍यावर कसाबसा पाय ठेवला व पाठीवरच्या हॅव्हरसॅक सांभाळात एकमेकांना हात देत अर्धा प्रवाह ओलांडला आणि सरळ कंबरेइतक्‍या थंडगार पाण्यात उतरलो आणि दोघांनी मोठ्यामोठ्या दगडांवर पाय ठेवत उरलेला प्रवाह ओलांडला.

मांझी व वरच्या गावातील लोक थंडी पडू लागली, की (दीपावलीच्या पाडव्यानंतर) भेबडा व आगोड्यात येऊन राहतात आणि अक्षयतृतीयेला परत आपल्या मूळ गावी जातात. गढवाली भाषा प्रामुख्याने बोलणारे हे गावकरी मांझी ते आगोडा व आगोडा ते संगमचेट्टी हा प्रवास सहज करतात. पाठीवर मोठ्या टोपल्या किंवा लाकडाच्या मोळ्या घेऊन ये-जा करणारे गावकरी क्वचित भेटले, की हसून नमस्ते म्हणत. ‘कहाँ डोडीताल, गाइड नहीं, दोनोही हो?’ असे म्हणत आमचे मनोधैर्य वाढवीत. भेबडा गाव सोडल्यानंतरची वाट चढाईची होती आणि ऊनही वाढले होते. त्यामुळे दमछाक होत होती. सूचिपर्णी वृक्षांच्या जंगलातून जाणारी वाट अतिशय रमणीय होती पण त्या वृक्षांची उंची व खोडांची रुंदी धडकी भरेल अशी होती. याशिवाय महागोनी, भोजपत्र, चिनार, अक्रोड आणि हिमालयीन जांभूळ अशीही झाडे वाटेत होती. भेबडा ते धारकोट हे तीन कि.मी. अंतर कापायला सुमारे दोन तास लागले कारण चढ खूप होता. धारकोट हा संगमचेट्टी व डोडीताल यांच्या मध्यावरचा थांबा. हे दर्शविणारी वन खात्याची पाटी इथे आहे. व्ह्यू पॉइंट वरून मागील निसर्ग चित्र कॅमेऱ्यात टिपले आणि कचरी (२ किमी) या गावासाठी आगेकूच केली.

डोडीतालच्या वाटेवरचे हे जंगल अतिशय समृद्ध आहे. वेगवेगळ्या औषधी वनस्पती, झुडुपे यांची रेलचेल तर इथे आहेच, पण नेपाळचे राष्ट्रीय फूल असणारे वृक्षही इथे आहेत. या जंगलात कस्तुरी मृग, बिबटे, अस्वले (काळी आणि भुरी), भरल आणि वेगवेगळी माकडे आहेत. आम्हाला वाटेवर साळींदरचे काटे सापडत होते. रंगबिरंगी फुलपाखरे आणि चकोर, सातभाई, थ्रश, तितर असे पक्षी दिसले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मोरासारखे रंग असणारी हिमालयन मोंनाल पण दिसली. वाटेत थांबलो असता पायात चावण्याची संवेदना झाली. पाहतो तर दोघांचे पाय जळवांनी रक्तबंबाळ केले होते. धारकोट ते कचरीचा ओढा हे तीन कि.मी. अंतर दीड तासात कापले. त्या नंतर डोंगराच्या माथ्यावरील मांझी या गावात पोचायला आणखी दीड तास लागला. भेबडापासून आम्ही मांझीपर्यंत आठ किमी अंतर सहा तासात कापले होते, पण ७०० मी. उंचीचा टप्पा गाठला होता.

पशुपालन करणारे गुज्जर आपली जनावरे चरायला बुग्याल (गवताळ) भागात उन्हाळ्यात घेऊन जातात. थंडी सुरू झाली, की आपली जनावरे खाली आणतात. गुज्जर लोक अति उंचीवर मुक्काम असताना दूध आणि दुधाचे दही आणि तूप करून खातात. दुर्गम ठिकाणी मिळेल ते अन्न. त्यामुळे पाळीव कुत्र्यांनासुद्धा दूधच दिले जाते. मांझीत वासुदेव नामक गावकऱ्याने आपुलकीने चहा पाजला आणि ‘आठ वर्षांपूर्वी तीस लोकांचे डोडीतालला शिबिर घेऊन आला होतात आणि तेव्हा भेबडाला मीच जेवण केले होते,’ अशी आठवणदेखील करून दिली. ढगाळ वातावरण व त्यात पावसाची किंवा बर्फ पडण्याची शक्‍यता होती. वासुदेवाने आमचे थकलेले चेहरे पाहून मनोधैर्य वाढविण्यासाठी माझ्याकडे पाहात माहिती दिली. ‘अब जादा चढावं नही है, सिधा रास्ता है.’ तरी डोडीताल अजून पाच कि.मी. अंतरावर होते. परतीचा प्रवास ठरल्याप्रमाणे होण्यासाठी आम्ही दुपारी तीन वाजता डोडीतालकडे कूच केले. खालच्या सर्व वाटांपेक्षा ही वाट खूपच चांगली होती. डोंगरांना वळसे देत छोटे मोठे ओढे ओलांडत पाच वाजता ३३०० मी. उंचीवरील भैरवनाथ देवळात पोचलो. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने नयनरम्य अशा डोडीतालला (३३०७ मी.) पोचलो. 

समोर तिन्ही बाजूंनी हिरवेगार हिमालयाचे डोंगर. आमच्या पायाखालून आलेली जंगलातली वाट थेट त्या गोड्या पाण्याच्या तळ्याकडे येऊन थांबली होती. असे म्हणतात, दरवा टॉपच्या खाली खांडवा आणि अक्षयगंगा यांचा संगम होतो आणि त्याचा सोंडेसारखा प्रवाह तळ्यात उतरतो म्हणून हे स्थळ डुंडीप्रयाग आणि मूळचे गणपतीचे जन्मस्थान. सकाळपासून सुमारे १५ किमी अंतर आणि १३०० मी. उंची गाठली म्हणून माझे मलाच खरे वाटत नव्हते.

संध्याकाळचे ५.३० वाजले होते. आकाशात ढग भरून आले होते. अंधारून पाऊस/बर्फवृष्टीची दाट शक्‍यता असल्यामुळे प्रथम डोडीतालच्या चौकीदाराकडे गेलो. मनविरसिंग चोकीदाराला आम्हाला पाहताच आश्‍चर्याचा धक्काच बसला. त्याने प्रश्‍नोत्तराचा भडिमार आमच्यावर केला. ‘आप दोनोही आये, इतनी देरसे? कोई गाइड नही? कोई बात नही, फिरभी सही टाइमपे पोहोंच गये।’

मानविरसिंगकडून सर्व सोपस्कार पार पाडून खोलीत जाऊन ताजेतवाने झालो आणि गणपती बाप्पाला प्रथम भेटायला गेलो. जयनारायण खंडुरी हा इथला पुजारी, देवाची अविरत पूजा करतो. उन्हाळा संपेपर्यंत इथेच राहतो. या वर्षी दोन-तीन महिन्यांत येणारे आम्ही पहिलेच पर्यटक. आम्हाला पाहून त्याला खूप आनंद झाला. त्याने आमच्याकडून साग्रसंगीत पूजा-आरती करविली. गावचा गणपती चुकल्याचे दुःख त्यामुळे कमी झाले. आम्ही मनविरसिंगकडून सर्व पाहुणचार घेतला. त्याच्या स्वयंपाकखोलीत चुलीकडे बसून नाश्‍ता, जेवण करणे व साथीला त्याच्या सुरस गप्पा आणि आपुलकी व आग्रह. या मानविरसिंगबद्दल थोडे सांगायला हवेच. हा नेपाळी गुरखा वयाच्या ११ वर्षांपासून उत्तरकाशीत लहानसहान कामे करत हिमालयाशी घट्ट नाते जोडून आहे. डोडीताल आणि दरवा टॉपसहीत हा चार चौक्‍यांचा एकटाच रखवालदार. कधीकधी सगळ्या त्या परिसरात हा निधड्या छातीचा माणूस एकटाच असतो. केवळ निसर्गाशी बांधिलकी त्याच्या बोलण्यातून प्रत्ययाला येत होती. म्हणूनच रुपये तीन हजार दरमहा पगार, तोही गेली कित्येक वर्षे न मिळता तो सगळ्यांची सरबराई करत असतो. मग तो वनपाल, वनरक्षक असूदे नाही तर पर्यटक. प्रसंगी मंदिराच्या पुजाऱ्याला, मेंढपाळांनाही मदत करत असतो. डिसेंबर नंतर मनविरसिंगही भेबड्याला खाली उतरतो. पण हौशी पर्यटक डोडीतालचे बर्फाचे रूप पहायला आले, की त्याला परत वर यायला लागते. शिधासामुग्रीबरोबरच प्रथोमचाराची औषधे, फेविक्विक, सोलर दिवे अशा अत्यावश्‍यक वस्तूंची मदत इतक्‍या उंचीवर देणे म्हणजे कौतुकाचाच भाग. याशिवाय सध्या रेडिओच्या मदतीने इतके सामान्यज्ञान वाढविले आहे, की नोटबंदी असूदे किंवा अटलबिहारी वाजपेयी यांच्या मृत्यूची बातमी. सर्व विषयावर अशा दुर्गम ठिकाणी राहूनही अद्ययावत ज्ञान. मोबाईलची रेंज नसल्यामुळे इथे राहणारे व येणारे सुखीच म्हटले पाहिजेत. 

संधिप्रकाशात डोडीतालला पाहून मन भरले. सकाळी पुजाऱ्याच्या घंटानादाने लवकरच जाग आली. सकाळी सूर्योदयानंतर डोडीतालच्या परिक्रमेला सुरुवात केली. रात्री सांबर, चितळ, भरल आणि अस्वले यांचा वावर तळ्याकडे असावा, असे पायांच्या ठशांवरून वाटत होते. तळ्याच्या तिन्ही बाजूला हिरवेगार डोंगर सूर्योदयाच्या किरणांनी न्हाऊन गेले होते व त्यांचे प्रतिबिंब तळ्यात पडले होते. तळ्यातले पारदर्शक पाणी त्यामुळे हिरवेगार वाटत होते. तळ्यातले गोल्डन ट्राऊट (गढवाली भाषेत डोडी) मासे पाण्यात विहार करताना दिसत होते. पाणपक्षी सूर्याच्या किरणांनी न्हाऊन निघाले होते. हे अलौकिक, अप्रतिम असे डोडीतालचे रूपडे डोळ्यात, मनात नव्हे हृदयात ठसून राहिले होते. सगळे योग जुळून आले, हवामानाने साथ दिली आणि मुख्य म्हणजे श्री गणेशाने बोलावले म्हणूनच हे शक्‍य झाले. 

परिक्रमा संपवून उन्हाचे चटके लागेपर्यंत सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत तळ्याचे सौंदर्य उपभोगत राहिलो. आपल्या पृथ्वी मातेला जिवंत ग्रह का म्हणतात याची प्रचिती शहरात क्वचितच येते, पण उंच पर्वतराजीत ही अनुभूती नेहमीच येत असते. अशा या अद्‌भुत तळ्याकाठी काहीतरी दैवी शक्ती असावी, त्यामुळे मनाला शांतता आणि तृप्ती लाभत होती. संध्याकाळी सुमारे तीन तास जोरदार पाऊस व बर्फवृष्टी होत होती. 

परतीचा प्रवास तिसऱ्या दिवशी सकाळी पावणे सात वाजता सुरू केला. एकीकडे हे सुख संपले याची रुखरुख वाटत होती. तर, दुसरीकडे संगमचेट्टी गाठण्याचे वेध लागले होते. मांझीला पोचायला सव्वानऊ वाजले. मागे एक दृष्टिक्षेप टाकला असता निरभ्र आकाशाच्या पार्श्वभूमीवर बर्फाच्छादित शिखरे मनमोहक दिसत होती.  

प्रकाश नामक गुज्जराने आग्रहाने चहा पाजला. मांझी ते धारकोट पूर्ण उतार असल्यामुळे भेबडाला पोचायला दुपारचा दीड वाजला. आदल्या दिवसाच्या पावसाने भेबडाच्या ओहोळाचे स्वरूप अक्राळविक्राळ झाले होते, पण गावकऱ्यांनी खालच्या बाजूला दगडधोंडे  टाकून ओहोळ ओलांडणे सोपे केले होते. आगोड्याच्या वाटेवर पुन्हा आमचे पाय जळवांनी फोडून काढले. वाटेत झाडांना अक्रोड लगडलेले दिसत होते. पण लक्ष्य संगमचेट्टी असल्यामुळे दुपारी अडीच वाजता आगोडा गाठले. त्यानंतर दोन तासांच्या पायपिटीनंतर आम्ही पुन्हा त्या साफ वाहून गेलेल्या वाटेजवळ पोचलो. वाटेच्या भुलभुलैय्याने पुन्हा एकदा आम्हाला हैराण केले. पण एका आगोडावासीयाने आम्हाला वरून पाहिले आणि भूस्खलन झालेल्या ढिगाऱ्यावरून वर यायला सांगितले. कारण वाट वरून होती. या सगळ्या प्रकारामुळे संगमचेट्टीला पोचायला संध्याकाळचे साडेपाच वाजले. इथे आम्ही फसलो कारण चार वाजल्यानंतर उत्तरकाशीला जाण्यासाठी कोणतेही वाहन मिळत नाही. पण रात्र कशी आणि कुठे काढणार या विचारात असताना काही गावकरी विचारपूस करू लागले. आमच्या भ्रमणध्वनीला रेंज नव्हती. आमच्या अडचणींचे गांभीर्य जाणून त्यांनी उत्तरकाशीतील ड्रायव्हरशी संपर्क साधून दिला. तीन दिवसांपूर्वी आम्हाला संगमचेट्टीत सोडून गेलेला ड्रायव्हर आम्हाला घेऊन जाण्यासाठी राजी झाला. पण तरी त्याला यायला कमीतकमी एक तास लागणार होता. आमची सोय होते पाहून गावकरी निघून गेले. तेथे थंडीत कुडकुडत बसण्यापेक्षा हळूहळू उत्तरकाशीच्या दिशेने चालू लागलो. डावीकडे अक्षयगंगा आणि उजवीकडे डोंगरातून वळणावळणाने जाणारा रस्ता आणि चंद्रप्रकाशाची साक्ष. सुमारे एक तासानंतर अंधारातच गाडीचे दिवे लकाकले अन्‌ ड्रायव्हररूपी देव भेटला आणि आम्ही उत्तरकाशीला सुखरूप पोचलो. नेहमीप्रमाणे वाटेत विघटन न होणारा कचरा (NON BIODEGRADABLE) गोळा करायचे काम डोडीतालपासून उतरताना सुरू केले होते. डोडीताल ते धारकोट या दरम्यान गोळा केलेला कचरा वनखात्याने धारकोटला बांधलेल्या बांधीव खड्डयात जमा केला. तसेच धारकोट ते संगमचेट्टी या दरम्यान गोळा केलेला कचरा उत्तरकाशीत आणला.   

निसर्गाच्या अद्‌भुत रूपात देव भेटला. वाटेत देवासारखी माणसे भेटली, त्यामुळे गणेश जन्मभूमीची यात्रा सफल आणि संपूर्ण झाली. भरून पावलेल्या या डोडीताल/डुंडीप्रयाग पदभ्रमणाचे हे स्मरणरंजन! गणपतीपुढे रांगा लावून पाय शिणवण्यापेक्षा अनुकूलता पाहून या बाप्पाला जरूर भेट द्या. पर्यावरण आणि निसर्गप्रेमींना तर ही वारी परमानंदच देऊन जाईल. 

संबंधित बातम्या