विलोभनीय आणि रम्य नायगारा

डॉ. कृष्णराव जा. पराते
मंगळवार, 27 एप्रिल 2021

पर्यटन

अमेरिकेसारखा भव्य देश व तेथील नायगारासारखा अफाट धबधबा पाहण्याची प्रत्येकाची इच्छा असते. दोन वर्षांच्या अंतराने मला दोनदा ही स्वप्ननगरी पाहण्याचा योग आला!

आयुष्य किती मजेदार असते नाही... आपण ज्याची अपेक्षा करतो, ते मिळतच नाही आणि ज्याची कधीच अपेक्षा केलेली नसते ते मात्र आपोआपच आपली झोळी भरून मिळते. कधीही न पाहिलेल्या ठिकाणांची आंतरिक ओढ लागणे ही मानवाची खासियत आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील मायामी शहरात मुक्कामाला असताना अमेरिकेतील पर्यटकांचे एक आवडते स्थान असलेला नायगारा धबधबा पाहण्याचे ठरले. त्याकरिता मी व माझी मुलगी डेट्रॉईटला (मिशीगन) जाण्यासाठी सकाळी सव्वानऊच्या फ्लाईटने निघालो व पावणेबाराला पोहोचलो. डेट्रॉईट विमानतळ दुमजली व खूपच मोठे आहे. येथे आमच्या जावयाचे मित्र आम्हाला घ्यायला आले. त्यांच्या घरी पोचायला एक तास लागला. दुसऱ्‍या दिवशी आम्ही सकाळी डेट्रॉईटवरून कारने निघालो. शहर मागे टाकले तसे नजर जाईल तिथपर्यंत केवळ ताडमाड वाढलेले हिरवेगार डवरलेले वृक्ष, हिरवळ आणि हिरवी झाडे असणारे डोंगर दिसू लागले. मिशीगन, ओहियो, पेनसिल्वेनिया पार करून न्यूयॉर्क राज्यात पोचवणारा हा थकवणारा ५४७ किमीचा प्रवास करून दुपारी दोन वाजता नायगाराला पोहोचलो. हे अंतर जवळ जवळ नागपूर ते पुणे इतके आहे.

नायगारा फॉल हा जगातील सर्वाधिक उंचीचा धबधबा मानला जातो. हा धबधबा जगातील महत्त्वपूर्ण नैसर्गिक आश्‍चर्यांमध्ये गणला जातो. नायगारा फॉल पाहण्याकरिता तिकीट काढून दोन तास रांगेत उभे राहावे लागले. प्रवेश घेण्यासाठी लिफ्टपर्यंत जाण्या-येण्याकरिता दोन डब्याच्या ट्रॉली बसची सोय आहे. लिफ्टने जवळ जवळ १५७ फूट खाली जावे लागते. तेथून खाली गेल्यावर पातळ रेनकोट व रबरी सपाता दिल्या जातात. अमेरिकेच्या बाजूचा नायगारा पाहण्यासाठी तयार केलेल्या लाकडी जिन्यावरून बरेच वर चढून जावे लागते आणि एका गुहेच्या वाटेने जावे लागते. आपल्या अंगावर पाण्याचे प्रचंड तुषार उडत असताना दिसणारे स्वर्गीय दृश्‍य विलोभनीय आहे. तेथून सभोवतालचे दृश्‍य पाहण्यासारखे आहे. 

महाकाय नायगारा हा त्याच नावाच्या नदीवरील तीन धबधब्यांचा समूह आहे. एक ‘अमेरिकन फॉल’, एक ‘हॉर्स शू फॉल’, तर एक ‘ब्रायडल व्हेल फॉल’. हा धबधबा अमेरिका व कॅनडा देशांच्या सीमेवर असून धबधबा दोन भागात विभागलेला आहेत. दोन धबधबे पूर्णतः अमेरिकेच्या हद्दीत आहेत. मुख्य धबधब्याचा बराच भाग कॅनडा देशाच्या हद्दीत मोडत असल्यामुळे त्याचे ‘कॅनेडियन फॉल’ असे नामकरण झालेले आहे. ‘अमेरिकन फॉल’च्या डाव्या बाजूने नायगारा नदीचे पाणी सुमारे एक हजार फूट लांबीच्या व १५७ फूट उंचीच्या कड्यावरून कोसळत असते. अफाट जलधारेचे दर्शन होते. तेथे कानावर पडतो तो जलधारेचा अनाहत नाद. भोवतालच्या डोंगरावर आपटून प्रतिध्वनीत होणारा हा नाद ज्या जलधारेमुळे निर्माण होतो, तिच्या समोर उभे राहून डोंगराच्या माथ्यावरून प्रचंड आवेगाने कोसळणाऱ्‍या त्या प्रवाहाला पाहिल्यावर निसर्गाच्या विराट अस्तित्वापुढे आपण किती नगण्य आहोत याची जाणीव होते. भोवतालच्या हिरव्यागर्द डोंगरातून पडणाऱ्‍या पांढऱ्‍या शुभ्र धारा मन मोहून टाकतात. धबधबा तुम्हाला वेगळाच जोम, उत्स्फूर्तता आणि आवेश देतो. 

या धबधब्याच्या काठी कितीही वेळ थांबले तरी समाधान होत नाही. नायगारा फॉलचा दिमाख काही औरच आहे. निसर्गाच्या या दर्शनाने विस्मित व्हायला होते. धबधब्याचा विस्तार फार मोठा आहे. धबधब्याची धार ज्या ठिकाणी पडते त्या प्रवाहात बोटिंग करण्याची सोय आहे. ‘मेड ऑफ द मिस्ट’ नावाच्या सुंदर क्रूझमधून होणारी सफर ही एक आश्‍चर्यकारक सफर आहे. या क्रूझ मधून आपण या तिन्ही धबधब्यांच्या पाण्याखालून सैरही करू शकतो. ही सुंदर नौका पाण्याच्या सहस्त्रावधी तुषारांखालून फेऱ्‍या घेऊ लागते तेव्हाचा आनंद काय वर्णावा! फॉलच्या अखंड कोसळणाऱ्‍या धारांमुळे उडणाऱ्या पाण्याच्या अगणित तुषारांमुळे भोवतालचे वातावरण कोंदून जाते.

 रात्री नऊ-दहाच्या सुमारास परत ऑब्झरवेशन पॉइंटवर जाऊन धबधब्यावर सोडण्यात येणाऱ्‍या रंगीत प्रकाशाचा शो पाहिला. अमेरिकेच्या बाजूच्या दोन धबधब्यांवर कॅनडा देशाच्या बाजूने निरनिराळ्या रंगांचे प्रकाश झोत सोडण्यात येतात व इंद्रधनुष्याचे रंग धबधब्यावर उतरतात; हे दृश्‍य फार मनोहारी असते. ते दृश्‍य प्रत्यक्षात बघून भान हरपते. हे बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक उपस्थित असतात. लोकांना ही रंगीत किमया किती विलोभनीय वाटते! रात्री हजारो तारकांप्रमाणे चमकणारी या धबधब्याची रोषणाई आकर्षक वाटते. डोळ्यांचे पारणे फेडणारा नजारा पाहायला मिळतो.

रात्री नायगारा ॲडव्हेंचर थिएटरमध्ये ४५ फूट उंचीच्या स्क्रीनवर नायगारा फॉलवर आधारित ३० मिनिटांचा ‘लेजंड्स ऑफ ॲडव्हेंचर’ नावाचा शो पाहिला. त्यात नायगाराचा इतिहास व संबंधित रोमांचकारी घटना चित्रित करण्यात आलेल्या आहेत. 

नायगारा ही खरे म्हणजे नदी नाही. दोन मोठ्या सरोवरांना सांधणारा एक दुवा आहे. हा दुवा आहे ३० मैल लांबीचा. ही नदी पश्‍चिमेस असणारे ‘ऐरी’ सरोवर आणि पूर्वेस असणारे ‘ऑटेरिओ’ सरोवर यांना जोडते. एक सरोवर दुसऱ्‍या सरोवरापेक्षा १६० फुटांनी कमी उंचीवर असल्यामुळे ‘ऐरी’ सरोवराचे पाणी मोठ्या कठड्यावरून उड्या घेत कमी उंचीवर असलेल्या ‘ऑटेरिओ’ सरोवरास मिळते. या धबधब्याचे रूपच इतके विलक्षण आहे, अनेक जण त्या दृश्‍याने वेडे होतात.

येथील बेटाला ‘गोट आयलंड’ हे नाव आहे. याचा किस्सा मजेदार आहे. या बेटावर म्हणे पूर्वी पुष्कळ बोकड होते. १७७९ साली कडाक्याची थंडी पडल्यामुळे बहुतेक बोकड मरून गेले आणि एक दाढीवाला बोकड मात्र टिकून राहिला आणि लोकांनी या बेटाला तेव्हापासून ‘गोट आयलंड’ हे नाव दिले. 

नायगारा संबंधातले रंजक किस्से आणि आख्यायिकाही खूप आहेत. या धबधब्यावरून कोणी दोरावर चालत गेले. अनेकांनी धबधब्यात उड्या घेऊनही जिवंत राहण्याचा पराक्रम केला आहे. कोणी आत्मार्पण केले. १९०१मध्ये एडिसन या ६३ वर्षीय जहांबाज आजीने तर ड्रममध्ये बसून या धबधब्यात उडी घेतली होती आणि नंतर जिवंतही राहिली होती. या नायगाराला रेड इंडियन्सनी प्रत्यक्ष दैवतच मानले. या कृतीच्या बुडाशी कोणी भीषण दैवत असल्याची त्यांची एक समजूत होती. या धबधब्यात वास करणाऱ्‍या जलदेवतेला संतुष्ट करण्यासाठी वर्षातून एकदा गावातली एखादी सुंदर कुमारिका बळी देण्याची प्रथा होती. बळी जाणाऱ्‍या त्या कुमारिकेस फुलांनी श्रृंगार करून एका नावेतून पाण्याच्या प्रवाहात सोडून देण्यात येत असे. एकदा एका प्रमुखाची लाळावाला नावाची सुंदर मुलगी बोटीत बसून निघाली. त्या मुलीच्या शेवटच्या करुण कटाक्षाने बापाचे हृदय विरघळून गेले. बापाने लागलीच दुसऱ्‍या बोटीतून पोरीचा पाठलाग सुरू केला आणि शेवटी दोघेही कठड्यावरून खाली उतरून दिसेनासे झाले, अशी ही मनाला विषण्ण करणारी कथा आहे. अशा कितीतरी कथा या रंगेल व भीषण नायगाऱ्‍या भोवती केंद्रित झाल्या आहेत. आपल्याच धुंदीत रंगेलपणे कोणाची पर्वा न करता आपली वाटचाल करणारा हा रांगडा नायगारा आहे. 

येथील शासनाने उत्सुक व हौशी लोकांना नायगारा फॉलच्या साक्षीने विवाह करता यावा यासाठी नायगारा फॉल स्टेट पार्कमध्ये सोयसुद्धा केलेली आहे. नायगाऱ्‍याला सुमारे आठ कोटी लोक दरवर्षी भेट देतात, तसेच वर्षानुवर्षे जगातील सर्व प्रांतांतील विवाहीत जोडपी हनीमूनसाठी नायगाऱ्‍याला येत असतात, म्हणून नायगारा फॉल्सला ‘हनीमून कॅपिटल ऑफ वर्ल्ड’ असेही संबोधतात.

अमेरिका या समृद्ध देशातील हा निसर्गाचा खजिना आहे. नायगाराचे अत्यंत नेत्रसुखद व मनोहारी दृश्‍य, नायगारा नदीचे ते हिरवे निळे पाणी आणि धबधब्याचा कोसळणारा तो धीरगंभीर व संमोहित करणारा आवाज, इतक्या दिवसांनंतरही डोळ्यासमोरून जात नाही आणि कानात गुंजन करत आहे. स्मृतीतून कायमचा कोरला गेलेला नायगाराचा हा प्रवास विलक्षण अनुभव देणारा व अद्‍भुत होता.

संबंधित बातम्या