हिरवागार आंबा

डॉ. मेधा देशपांडे, पुणे
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

पर्यटन
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये पर्यटन या सदरासाठी लेख पाठविण्याचे आवाहन वाचकांना करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेले लेख प्रसिद्ध करीत आहोत.

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे’ या तुकारामांच्या ओवीचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल, तर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आंबा घाटाला भेट द्यायलाच हवी. इथला निसर्ग मनाला भुरळ घातल्याशिवाय राहात नाही.

या स्थळाबद्दल शक्‍य तेवढी माहिती इंटरनेटवरून काढून आम्ही आंब्याला जायचे ठरवले. लक्ष्मीपूजन झाल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी आमच्या वाहनाने निघालो. पुढचे तीन दिवस निवांतपणे घालवायचे असल्याने मी व माझे कुटुंबीय अगदी खुशीत होतो. 

पुण्याहून निघाल्यावर पुणे-कोल्हापूर  महामार्गावर कराडनंतर ५ किमी पुढे उजवीकडे एक वळण आहे. तो मलकापूरला जाणारा रस्ता आहे. रस्त्यात कोकरूड नावाचे गाव आहे. या मार्गे आम्ही कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्याला लागलो.

सुंदर पर्वतरांगा, त्यावरील हिरवाई आणि जागोजागी असलेल्या पवनचक्‍क्‍या यांनी मनाला एका वेगळ्याच विश्‍वात आणून सोडले. प्रवासाचा आलेला थकवा निघून गेला. आंब्याला पोचल्यावर अनेक रिसॉट्‌स आहेत. आम्ही हॉर्नबिल रिसॉर्ट आधीच आरक्षित केले होते. इथे शक्‍यतोवर साधारण सहा जणांचा कंपू बनवून गेलेले बरे; कारण त्या पद्धतीने इथे सफारी ठरवल्या जातात.

आम्ही कंपू बनवलेला नसतानासुद्धा, नशिबाने साथ दिली होती व एक शेवटची राहिलेली खोली मिळाली. हॉटेलचे मालक सुनीत गुप्ते यांनी आमचे स्वागत केले. रिसॉर्टची बांधणी बाजूच्या निसर्गाला सुसंगत अशीच होती. त्यामुळे शहरी वातावरण सोडून वनराईत आल्याचा आनंद सुखद होता. दुपारी चार वाजता चहा घेऊन आम्ही रिसॉर्टच्या गाडीने बाहेर पडलो. आमचा ड्रायव्हरच आमचा वाटाड्या होत्या. गावातील छोट्या मार्गाने पुढे चढाईच्या वळणावर गाडी लागली आणि जंगल सुरू झाले. तशी थंड हवेने हुडहुडी भरायला लागली. १० किमी पुढे गेल्यावर मनोली धरण व तलाव लागला. रस्त्याला लागून असलेली थोडी उतरण उतरल्यावर सरळ धरणावर जाता येते. येथील धरण माती व दगडांनी बनलेले आहे. समोरील निळ्याशार पाण्यात बरेच जण डुंबत होते. इतक्‍या स्वच्छ पाण्यात कुणाला डुंबावंसं वाटणार नाही. तलावाच्या चारी बाजूचा देखावा अतिशय मनोरम्य होता. गर्द हिरवी, निळी, जांभळी वनराई व उंच चढत गेलेले पर्वत, मनाला शीतलता आणू लागले. काही धनगर आपल्या शेळ्यांना उंचावर फिरवत होते. अगदी सूर्यास्त होईपर्यंत तिथे बसलो. ते ठिकाण सोडवत नव्हते. पण आमच्या वाटाड्याने सांगितल्याप्रमाणे अंधार पडल्यावर जंगलात थांबणे धोक्‍याचे असल्याने आम्ही परत गाडीत येऊन बसलो व रिसॉर्टची वाट धरली.

संध्याकाळचा वेळ तिथे आलेल्या मंडळींसोबत भाजलेली कणसे, रताळी, बटाटे, चिकन, ढब्बू मिरची यांना सळईला लावून खाण्यात मजेत गेला. हे खाद्यपदार्थ या परिसरातले विशेष बरं का! या भागातल्या रस्त्यावरही ठिकठिकाणी हे पदार्थ असेच भाजून मिळतात. यांची लज्जतच न्यारी! यानिमित्ताने तिथे वेगवेगळ्या गावाहून आलेल्या मंडळींची ओळखही झाली.

तिथेच ताडपत्री व तात्पुरते छत टाकून तयार केलेल्या भोजनकक्षात एकत्र जेवताना मज्जा आली. दोन घास जास्त जेवलो. गरम ज्वारीच्या भाकऱ्या, पिठलं, दोडक्‍याची भाजी, पापड लोणचे, दोन प्रकारचे भात, वांग्याचे भरीत असे पदार्थ ताटात आयते आल्यावर सुख काय असतं, ते गृहिणीच कळू जाणे.

आजूबाजूच्या चिडीचूप झालेल्या वनात आता रातकिडे चांगलेच किर्रर्रऽ करू लागले होते. आम्ही जेवण संपवून खोलीवर परत आलो व थकलेला देह पलंगावर टाकला. अशी गाढ झोप लागली म्हणून सांगू. सकाळचा प्रोग्रॅम आधीच आमचे रिसॉटचे मालक व गाइड यांनी ठरवला होता. सकाळी सहाला उठल्यावर, आलं टाकलेला वाफाळता चहा घेतला आणि आमचे दोन कंपू दोन वेगळ्या टेम्पो ट्रॅक्‍समध्ये वर चढलो. 

अांबा घाटातल्या डोंगररांगांमधले सगळ्यात उंच शिखर ‘सडा पॉइंट’ सर करण्यासाठी आम्ही पायथ्याशी आलो. सगळेच शेतकरी राहत असलेली वस्ती. कुठे तांदळाची मळणी सुरू होती तर कुठे कांदे वाळत घातलेले. कोंबडा आरवतो, कुणी उठून दात साफ करत बसलंय.

आमची चढाई सुरू झाली. सुरुवातीची वाट गवताच्या कुरणातून होती. गवत तुडवत आम्ही वर निघालो. नंतरची वाट करवंदांच्या जाळीतून. ही नागमोडी वाट, चालून-चालून तयार झालेली. मध्येच थोडे पाणी साठलेले. हळूहळू वर आलो आणि सगळीकडेच काळा कातळ! लॅटेराईट नावाच्या दगडावरून या शिखराला सडा असे नाव पडले आहे. हा काळा कातळ किती युगं इथे राहून इतिहासाचा साक्षी आहे. याचा काहीच अंदाज लागेना. शिखराच्या सपाट पठारावर त्या पॉइंटला कुंपण घातले होते. त्या कुंपणाला लागून आम्ही सगळे उभे राहिलो. खाली नागमोडी वळणं घेत जाणारा रत्नागिरीकडे जाणारा रस्ता, एखाद्या अजस्र अजगरासारखा दिसत होता. चहूबाजूची पर्वतांची शिखरं खुणावत होती. सोबतीला सोसाट्याचा वारा. या अनुभवाचे वर्णन शब्दात करणे अशक्‍य!

दूरवर वाढलेली वनराई दाट होती. तिथे गवा असण्याची शक्‍यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे इच्छा असूनही प्रसन्नता हृदयात भरून आम्ही खाली उतरलो. नंतरचा दिवससुद्धा आखलेला. कारण आंब्यात आहेतच भरपूर ठिकाणं बघण्याची. आधी नाश्‍त्यामध्ये आंबोळी आणि नारळाच्या चटणीचा फडशा पाडला. नंतर आंबा घाट ज्या चांदोली अभयारण्याच्या अखत्यारीत येतो त्या काही ठराविक जागा बघायला निघालो.

पुन्हा उघड्या (टप नसलेल्या) टेम्पो ट्रॅक्‍समध्ये आपल्या जागी स्थानापन्न झालो. आजचा आमचा वाटाड्या अतिशय उत्साही होता. जागोजागी थांबवत त्याने आम्हाला वृक्ष आणि झुडुपांबद्दल वैद्यकीय माहिती द्यायला सुरूवात केली. त्याच्या जाणकारीबद्दल मला फार कौतुक वाटले.

‘वाकेरी’ या झुडपाची खूप झाडे जंगलात होती. त्याची मुळं प्रोटिन पावडर करण्यासाठी वापरतात अशी माहिती मिळाली. हिरडा, बेहडा ज्यांचा त्रिफळा चूर्णात उपयोग होतो. यांचेही खूप वृक्ष जंगलात होते. ‘रक्तरोहिडा’ या वनस्पतीचा उपयोग हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी होतो. हे झाडही येथे आढळते. कारवी या झाडाला येणाऱ्या जांभळ्या फुलांचा मध सर्दी व खोकला यावर वापरण्यात येतो. चिंचार्डीची फळे पित्तावर वापरतात. दातपडी नावाच्या वृक्षाची भरमसाठ वाढ असून पूर्वी याचा उपयोग किडलेला दात पाडून टाकण्यासाठी होत असे. पण वापर जरा जपूनच केलेला बरा! नाहीतर बाजूचे चांगले दातही पडायचे. आंबेहळद व गवळाकाचरी यांचीही रोपे या जंगलात वाटाड्याने आम्हाला दाखवली.

नंतर मात्र न थांबता आम्ही वाघझरा या स्थानाजवळ आलो. इथे खाली उतरले, की छोटे तळे आहे. हे तळे मानवनिर्मित आहे. रात्री इथे वन्य पशू पाणी प्यायला येतात. इथे थोडा वेळ थंड पाण्यात पाय टाकून बसलो. या छोट्याशा भेटीनंतर लगेच पुढे निघालो.

पुढे सगळ्यांना औत्सुक्‍य असलेल्या जंगल ट्रेकसाठी थांबलो. समोर वृक्षांमधून एक पायवाट होती. सगळ्यात पुढे आमचा वाटाड्या होता. तिथे प्रवेशाजवळच तयार झालेल्या मुंग्यांच्या वारुळाजवळ त्याने आम्हाला थांबवले. मुंग्यांनी बांधलेले हे उंच वारूळ एक निसर्गाची करामत होती. यांची एक राणी मुंगी असते. बाकीच्या सगळ्या मुंग्या कामगार. त्या तोंडात सुपीक माती घेऊन येतात आणि गोलाकार पद्धतीने वारूळ बांधायला सुरवात करतात. या वारुळाला बरेच उंचवटे होते. सगळ्यात मोठा उंचवटा साधारण ३ फूट होता. ही वारुळाची तोंडं वारुळाच्या उंचवट्याची दिशा पूर्व - पश्‍चिम असते. कारण मुंग्या दिवसा काम करतात. वारुळाच्या मातीचा उपयोग मड थेरपीसाठी होतो. मुंग्यांनी वारूळ रिकामे केल्यावर त्याला तोडून वापरायला हरकत नाही. परंतु काही उपद्रवी लोकं त्यात मुंग्या वास करत असतानासुद्धा तोडतात.

पुढची वाट आम्ही झुडूप बाजूला करीत पुढे जात होतो. पायात गुडघ्यापर्यंत बूट असतील तर फारच छान! नाहीतर जळू चिकटली तरी समजायचे नाही. काही छोटे ओढे पार करत, उंच चढताना एकमेकांना हात देत आम्ही जंगल पार केले. काही वृक्ष तर इतके उंच, की आकाशाला गवसणी घालतील की काय असे वाटावे. त्यावर चढलेले वेल व त्यांचे बुंधे इतके जाड की त्यावरून त्यांचे वय सांगता यावे.

बाहेर रस्त्यावर आलो. कपडे व बूट झटकले. एका १४ वर्षाच्या मुलाच्या पायातून रक्त वाहत होते. त्याच्या पायाला जळू चिकटली होती. आमच्या वाटाड्याने त्याला ती काढण्यास मदत केली. चालून दमछाक झाली होती. विसावा घेतला, पाणी प्यायलो आणि पुढे निघालो.

आता पोटात कावळे ओरडायला लागले होते. आमच्या रिसॉर्टकडून आम्हाला वनभोजन होते. जंगलातील झाडांच्या मधला हिस्सा झाडून स्वच्छ केला होता. चटया टाकल्या होत्या. चविष्ट भोजनाचा आस्वाद घेऊन आम्ही पोटातील कावळ्यांना आधी शांत केले.

थोडा वेळ पहुडलो. हळूहळू ट्रेकिंगचा शीण गेला तेवढ्यात आमच्यातील एकाने बाजूच्या जंगलात लपलेला गवा बघितला. ९०० किलोचे ते अजस्र धूड बघून आम्ही सावध झालो. तो गवा आला तसा निघूनही गेला. 

आंबा घाटातल्या आमच्या भरगच्च कार्यक्रमात शेवटचा टप्पा पावनखिंड बघण्याचा होता. साधारण १५ किमी दूर असलेल्या खिंडीपर्यंत आम्ही पोचलो. बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाने पावन झालेल्या खिंडीची माहिती आमच्या वाटाड्याने भरभरून सांगायला सुरवात केली. आपल्या इतिहासात अजरामर झालेल्या खिंडीला भेट देताना ऊर अभिमानाने भरून आला. बाजीप्रभू यांचे स्मारक उभारून त्यांना अमर करण्यात आले आहे. स्मारकाच्या बाजूला खाली दरीकडे जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या आहेत. या पायऱ्या उतरून आम्ही खिंडीकडे निघालो. खिंड म्हणजे दोन डोंगरामधील चिंचोळी व अरूंद जागा. या खिंडीमध्ये एक खळाळणारा झरा आहे. आणखी काही अरुंद पायऱ्या ुतरल्यवर या झऱ्याच्या पाण्यात अंघोळ करण्याचा आनंद घेता येतो.

या आठवणी स्मरणात ठेवून आम्ही परत निघालो. आता टेम्पो ट्रॅक्‍समध्ये सगळी मंडळी शांत बसली होती. कधी एकदा परत रिसॉर्ट जाऊन विसावा घेतो, असे झाले होते. अंधार दाटून आला होता. खोलीवर जाऊन थकलेला जीव आम्ही झोपेच्या अधीन केला.

तिसऱ्या दिवशी सकाळी आमचा कंपू आंबेश्‍वर देवराई बघायला निघाला. आंब्याच्या निसर्ग माहिती केंद्रातही या विषयी माहिती मिळते. आमच्यासोबत आमचे रिसॉर्टचे मालक गाइड म्हणून आले. त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली. येथील देवराई ८०० ते ८५० वर्षे जुनी आहे. देवराई म्हणजे माणसाने टिकवून ठेवलेली छोटी - छोटी वने. गावातील आदिवासींनी देवराईसाठी आपली जमीन देऊ केली आहे. या वनात देवदेवतांचा वास असतो, असा समज असल्यामुळे येथील झाडे व पाने कोणीही तोडत नाही. येथील वनात सगळ्या प्रकारची झाडे आहेत. वनातील वेलीच्या बुंध्यांचा आकार बघून साधारणपणे या देवराईचे वय ठरविण्यात आले आहे. आंबा, वड, पिंपळ, अशोक, औदुंबर, अंजीर असे अनेक वृक्ष या जंगलात आहेत. महाराष्ट्रात एकूण २८२० देवराई आहेत. या देवराई बऱ्याच प्रमाणात नष्ट झाल्या आहेत. या उरलेल्या देवराई म्हणजे वनाचे छोटे छोटे तुकडेच. पूर्वी देवराईच्या देवळातील पुजारी आजारी लोकांना वनातील औषधी पुरवीत असत व त्यांना तिथे ठेवत असत. अशा प्रकारे आजारी व्यक्तीला बाकीच्या समाजापासून दूर ठेवण्यात मदत होई.

असा हा आंबा घाटाचा नितांत सुंदर परिसर कायम लक्षात राहील असाच आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या