शरदाच्या वाटेवरून शिशिरागमन!

डॉ. राधिका टिपरे
रविवार, 31 जानेवारी 2021

पर्यटन

संध्याकाळी सोसायटीच्या आवारात पाय मोकळे करण्यासाठी चकरा मारत होते. नुकतीच पावसाची सर येऊन गेली होती. परतीच्या वाटेवर असणारा पाऊस रोजच संध्याकाळी धांदल उडवत होता. त्यामुळे हवेत गारवा तर होताच. पण वाऱ्‍याच्या झुळकेबरोबर येणारा ओलसरपणा मोरपिसाच्या स्पर्शागत अलवार वाटत होता. या ओलसरपणात एक अनोखा दरवळही मिसळून गेलाय असे सारखे जाणवत होते, पण कुठला गंध आहे हे मात्र कळत नव्हते. गंधाचा मागोवा घेत मी चोहोबाजूने चक्कर मारली, पण हवेतील ओलेपणात मिसळलेला तो मनाला वेडावणारा मंदसा दरवळ कुठून येतोय हे काही कळले नाही. 

दुसऱ्‍या दिवशी अधिक तीव्रतेने नाकाशी रेंगाळणाऱ्‍या गंधाच्या दिशेने पावले वळली. तिकडे गेल्यानंतर लक्षात आले, जमिनीवर नाजूक फुलांचा सडा पडलेला आहे. फुलोरा पाहून नजर आपसूक वर गेली. उंच कंपाउंडच्या भिंतीपलीकडे सप्तपर्णीच्या फांद्यांवर अगणित चांदण्या फुलल्या होत्या. ओळखीचा वाटणारा तो मंद मंद दरवळ सप्तपर्णीच्या फुलोऱ्‍यातून निथळत आहे हे लक्षात आले आणि मन निःशंक झाले. सप्तपर्णी अंगोपांगी नखशिखांत फुलून आली होती. त्यामुळे चिंब ओलेपणातच भिजलेला सप्तपर्णीचा गंध अनुभवायला मिळाला. 

जशी सप्तपर्णी बहरून आली होती, तशीच थोड्याफार फरकाने रातराणीसुद्धा कळ्याफुलांनी बहरून आली. या गोष्टीची वर्दी तिच्या धुंद करणाऱ्‍या सुगंधानेच देऊन टाकली. रातराणीचा सुगंधही हवेत रेंगाळायला लागला तशी ऋतुबदलाची चाहूल लागली. हेमंत ऋतूमध्ये गारठा हवेमध्ये ओठंगून असतो असे मला नेहमी वाटते. त्यातच रातराणी फुलली असेल, तर तिचा चित्त वेडावणारा सुगंध हवेत वरच्या वर तरंगत राहतो जणू. तिन्हीसांजेला फुलून येणारी रातराणी याच दिवसात तिच्या स्वर्गीय सुगंधाने वेड लावते. खरे सांगायचे तर प्राजक्तही याच दिवसात फुलतो. दारी फुलून आलेल्या प्राजक्ताचा अंगणात पडलेला सडा आणि त्याच्या गंधाने बहरून आलेली पहाट ज्याला अनुभवायला मिळते त्याचे भाग्य थोरच म्हणायचे. या अशा गंधभिजल्या पहाटेस जाग यावी आणि अंगणात पडलेला नाजूक साजूक प्राजक्त फुलांचा सडा न्याहाळीत दिवसाची सुरुवात व्हावी असे आजही वाटत राहते. असो, प्राजक्ताच्या फुलांचे देखणे रूप देवघराच्या पावित्र्याचे दर्शन घडवते आणि कळत नकळत मन परमेश्‍वराचे नामस्मरण करायला लागते. पहाटेस फुलणारी प्राजक्त जशी सकाळच्या निरवतेला स्पर्श करीत तिच्या प्रसन्न सुगंधाने मनातील निरामय भावनांना जागे करते, तशीच काहीशी तिन्हीसांजेला फुलून येणारी रातराणी मनातील प्रेमभावनांना जागे करते. रात्र सुगंधित करते...! 

‘ऋतुनाम् ऋतू वसंत...!’ असे म्हणून आपण नेहमीच रंग उधळणाऱ्‍या वसंताचे गुणगान करीत असतो. वसंताचे वर्णन करताना ‘वसंत’ म्हणजे मीच असे खुद्द श्रीकृष्णानेच सांगितलेले आहे! पण त्यामुळेच की काय नितळ चांदण्याची पखरण करणारा शरद ऋतू आणि त्याच्या पाठोपाठ गोड गुलाबी थंडी घेऊन येणारा हेमंत थोडा दुर्लक्षिला जातो असे उगाचच वाटत राहते. खरे तर कोजागिरी पौर्णिमेचे मुलायम चांदणे घेऊन येणाऱ्‍या शरद ऋतूच्या काळात गंधमाधुर्य वेड लावणारे असते. पाठोपाठ येणाऱ्‍या त्रिपुरी पौर्णिमेच्या चांदण्यांचे तर क्या कहने... टिपूर चांदणे... पिठूर चांदणे... लख्ख प्रकाश देणारे चांदणे... उपमा तरी कशा आणि कुठल्या शब्दात द्यावी हेच कळत नाही! शरदाच्या सुखद ऋतूमध्ये सुगंध पेरीत येणारा सोनचाफा, प्राजक्त, रातराणी, दिन का राजा यांच्या जोडीला सप्तपर्णीची वर्णीही लागून गेली. खरे सांगायचे तर हल्ली जिकडे तिकडे फुलून आलेला, पिवळ्या धम्मक फुलांनी डवरलेला टॅबुबिया नजरेला भूल घालीत असतो. लक्ष वेधून घेत असतो. काय सुरेख दिसतो त्याचा पिवळाधम्मक रंग! त्याच्या पिवळ्या धमक लांबोड्या फुलातील मध चोखण्यासाठी शिंजीर पक्षी नुसते रुंजी घालत असतात. या टॅबुबियाच्या जोडीला लालबुंद तुऱ्‍यांनी फुललेला अफ्रिकन ट्युलीपसुद्धा काय सुरेख दिसतो आजकाल. कांचनसुद्धा बहरून आलाय जिथे तिथे... रक्त कांचन, शुभ्र कांचन आणि गुलाबी कांचन. अनेक ठिकाणी कांचनवृक्ष बहरलेले पाहायला मिळताहेत. खरेतर कांचन वृक्षाचे फूल अप्रतिम देखणे असते. लाखात एक! प्रत्येक पाकळी वेगळी असते. कमनीय नक्षीदार वेलांट्यांनी नटलेली असते. रंग आणि रूप या दोन्हीमधून फुलाचे सौंदर्य फुलून येते. त्यातही रक्त कांचनाची फुले तर अधिकच सुंदर दिसतात. त्याच्या रक्तवर्णी कळीचे कमनीय रूप नजर वेधून घेतेच.  

रंगही किती आकर्षक... गडद गुलाबी जांभळा! टपोऱ्या फुलांनी डवरलेला रक्त कांचन वृक्ष इतका आकर्षक दिसतो, की येणाऱ्‍या जाणाऱ्‍या सर्वांचे लक्ष वेधून घेतो. त्यामुळे शारदीय चांदण्याची अपूर्वाई घेऊन येणारा शरद ऋतू जितका सुगंधित तितकाच रंगबेरंगी आहे हे ध्यानात आले आणि माझे मलाच हसू आले. वसंताचे वारेमाप कौतुक करणाऱ्‍यांनी जरा इकडेही लक्ष द्यायला हवे हेच खरे! 

भरपूर खावे-प्यावे, मेहनत करावी आणि निरोगी मनाने सुखी राहावे असा हा संपन्न ऋतू... दसरा दिवाळी या आनंदमयी सणांच्या आगमनामुळे या ऋतूची गोडी वाढलेली असते. यावर्षी अधिक मास आल्यामुळे दसरा उशिरा आला. आश्विन संपून कार्तिकाच्या वाटेवर सणांची मांदियाळी सोबतीला असतेच. दिवाळीसारख्या सणामुळे कार्तिक महिन्याचे महत्त्व आपल्या हिंदू संवत्सरामध्ये सर्वात अधिकच असते. मात्र कार्तिक संपून मार्गशीर्षाकडे वाटचाल करताना हेमंत ऋतूच्या आगमनाची चाहूल लागते. शरद संपून हेमंताचे आगमन होते ते गोड गुलाबी थंडीच्या संगतीने. खरेच, गंधित वारा आणि शुष्क वाटणाऱ्‍या तिन्हीसांजा म्हणजे हेमंताची हवीहवीशी ओळख. त्यांच्या पावलावर पाऊल टाकीत गोड गुलाबी थंडी संगतीला घेऊन येणारा हेमंत सर्वांनाच हवाहवासा वाटणारा ऋतू! छान गोड धोड खावे... रजया दुलया काढून लपेटून झोपेच्या अधीन व्हावे... मनाबरोबर शरीराचेही लाड करून घ्यावेत, असा हा प्रेमात पाडणारा ऋतू. हेमंतातील थंडी मनाला प्रसन्न करणारी असते. आल्हाददायी असते. आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारी असते. निसर्गातील अलवारपण अद्याप टिकून असते. मार्गशीर्ष संपून पौष येतो. त्याच्या सोबतीला पानगळ आणि शुष्क कोरडेपणाही येतो. अंग कोरडे पडायला लागते. ऋतुमानातील बदल शिशिराच्या आगमनाची नांदी द्यायला लागतात. शिशिर आपल्या अस्तित्वाच्या खाणाखुणा सर्वत्र उमटवू लागतो. एका परीने पौषामधील वातावरण स्नेहशील, सुखद आणि सुगंधी असते. पण बोचरे वारे, सुकणारी पाने, निसर्ग कुणासाठी थांबत नसल्याची ग्वाही मात्र देत असतो.

शिशिर ऋतू हा उत्तरायणात येणारा ऋतू असला तरी या ऋतूमध्ये सूर्य अद्यापही दक्षिण गोलार्धातच असल्यामुळे भारतीय उपखंडात हेमंत ऋतूप्रमाणेच किंबहुना थोडी अधिक थंडी शिशिर ऋतूमध्ये असते. दक्षिणायन कालखंडात सूर्याचे पृथ्वीवर येणारे किरण सरळ न येता तिरपे येत असल्याने दिनमान क्रमाक्रमाने लहान होत जाते. त्यामुळे या दिवसांत रात्र मोठी असते. सूर्यकिरणांची तीव्रताही कमी असते. त्यामुळेच या काळास सौम्यकाल असेही म्हटले जाते. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे, शिशिरऋतूतील वाढलेल्या थंडीमुळे पौष महिन्यात धुंधुरमास पाळण्याची पद्धत आहे. धुंधुरमास म्हणजे सकाळी लवकर उठून, स्नानादी आटोपून सकाळच्या कोवळ्या उन्हात बसून आहार घेणे होय. आहारात मुगाची खिचडी, गुळाची पोळी, वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, लोणी असे पदार्थ असतात. या ऋतूमध्ये गहू, तांदुळापेक्षा बाजरी अधिक प्रमाणात खाल्ली जाते. बाजरी उष्ण असल्यामुळे या ऋतूत आहारात तिचा समावेश करणे योग्यच असते. बाजरीच्या भाकरीबरोबर स्निग्धतेसाठी ताजे लोणीही उपयुक्त! याच हेतूने बाजरीच्या भाकरीत तीळही मिसळतात.

सूर्याच्या उत्तरायणास सुरुवात व्हायच्या वेळी, म्हणजेच सूर्य मकरवृत्ताकडून पुन्हा उत्तर दिशेने सरकण्यास सुरुवात व्हायच्या वेळी संक्रांत साजरी केली जाते. थंडीच्या या मोसमात म्हणूनच तीळगूळ खायची पद्धत आपल्याकडे रूढ आहे. स्निग्धतेसाठी अगदी संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तीळगुळाचा हा रतीब चालू ठेवला जातो. वर्षा ऋतूच्या माघारी, शरद ऋतूतील एका ओल्या सांजेपासून सुरू झालेले निसर्गाचे आख्यान अगदी शिशिरापर्यंत पोहोचले म्हणायचे की! ऋतू बदलांचा मागोवा घेता घेता शिशिरागमनचे वेध लागले. 

होय... काळ कुणासाठी थांबत नसतो. मार्गशीर्षाच्या पाठोपाठ पौष कधी दारी येऊन उभा राहतो कळतसुद्धा नाही. पौष म्हणजे शिशिरातील माध्यान्हीचा काळ! आपल्याकडील हिवाळा हेमंत आणि शिशिर या दोन ऋतूंमध्ये विभागला जातो. हेमंत स्निग्ध, शीत तर शिशिर मात्र बोचऱ्‍या थंडगार वाऱ्‍यांसह कधीमधी कडाक्याची थंडीही घेऊन येतो. डाहळ्यांवरील सुकलेली पाने वाऱ्‍यामुळे झाडांची संगत सोडून धरणीवर येतात. पानगळीमुळे जिकडे तिकडे सुकलेल्या पाचोळ्याचा ढीग दिसू लागतो. उभ्या वृक्षांना निष्पर्ण, ओकेबोके करणाऱ्‍या शिशिरामुळे मग मनही उदास होऊन जाते. अवघ्या भवताली औदासिन्य भरून येते. मात्र, पानगळीच्या पाठोपाठ नवचैतन्याची पालवी फुटणार असते, हे अवघ्या चराचराला ठाऊक असते. ऋतुचक्राचे हेच तर गमक असते...!

संबंधित बातम्या