तळ्यांनी नटलेले तवांग... 

डॉ. राधिका टिपरे 
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

पर्यटन

गेल्या काही दिवसांपासून अरुणाचल प्रदेश राज्यातील तवांग या जागेचा उल्लेख बातम्यांमध्ये वारंवार ऐकायला मिळत आहे... आपल्या शेजारी देशाची वाईट नजर तवांग या आपल्या सुंदर शहरावर पडलेली आहे... कारण तवांग हे अरुणाचलमधील भौगोलिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्यासुद्धा अतिशय महत्त्वाचे गाव आहे. 

पूर्वांचलातील सर्वांत पूर्वेकडील आणि जिथे सूर्याची किरणं सर्वांत आधी पोचतात तो प्रदेश म्हणजे अरुणाचल प्रदेश! पूर्वी नेफा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुणाचलचे हे नवीन नाव खऱ्या अर्थानं सार्थ आहे. पूर्वांचलातील इतर प्रदेशाप्रमाणं या भूमीवरही निसर्गानं उदंड निसर्गसौंदर्याची उधळण केली आहे. या निसर्गाला रौद्रतेची किनार असल्यामुळं हे निसर्गसौंदर्य अनुभवताना भोवंडून गेल्याची अनुभूती मिळते. तिबेट (चीन), म्यानमार आणि भूतान या तीन देशांबरोबर सीमारेषेनं जोडलेल्या अरुणाचल प्रदेशच्या दक्षिण दिशेला असम राज्याची सीमा आहे. 

अरुणाचलमध्ये भटकणं सोपं नाही. एकतर ‘इनरलाईन परमिट’ घेतल्याशिवाय आपल्याला अरुणाचलमध्ये जाता येत नाही. अरुणाचल प्रदेशाची भौगोलिक व्याप्ती प्रचंड आहे; पण त्या मानानं लोकवस्ती अतिशय तुरळक आहे. शिवाय निसर्गाच्या रौद्रभयानक रूपामुळं आणि खडतर प्रवासानुभवामुळं आपण आपल्या गंतव्य स्थानापर्यंत पोचेतो थकून जातो. हिमालयाच्या पूर्वोत्तर रांगांमध्ये वसलेलं अरुणाचल तिबेटला खेटून आहे. त्यामुळं या भागात प्रामुख्यानं बौद्ध धर्माचा प्रसार झालेला आहे आणि इथलं लोकजीवन, इथल्या चालीरीती, परंपरा आपल्यापेक्षा वेगळ्या आहेत. येथील जाती-जमातींवर तिबेटी जीवनशैलीचा प्रभाव अधिक आहे. 

हिमालयाच्या पर्वतरांगांच्या उतरंडी. प्रचंड खोल दऱ्या आणि त्यातून जीवघेण्या वेगानं वाहणाऱ्या नद्या.. त्यांना येऊन मिळणारे अगणित ओढे, नाले, निखळ निळं पाणी घेऊन वेगानं समतल भूमीकडं धावण्याची अखंड स्पर्धा करणाऱ्या या नद्या... त्यांच्या काठावर, हिरव्याकंच दऱ्याखोऱ्यांतून एकवटलेलं आदिवासींचं जनजीवन... इथल्या लहान खेड्यांतून वसलेलं विविध जाती-जमातींचं जनजीवन, त्यांच्या वेगळ्या चालीरीती आणि रूढी पाहणं हा एक अनोखा अनुभव आहेच; पण त्यासाठी आधी धडपड करीत या दुर्गम भागात पोचायची तयारी हवी. इथल्या गूढरम्य निसर्गाच्या रौद्रतेची ओळख करून घ्यायची तर एका ट्रीपमध्ये आपल्याला अरुणाचल प्रदेशची भटकंती पूरी करणं केवळ आणि केवळ अशक्यच आहे. या निसर्गाचं अवलोकन करताना आपण भान विसरून जातो. एक विलक्षण सुंदर पण रौद्र भयानक निसर्ग. कधीही न पाहिलेली वनसंपदा आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे बेभरवशाचं हवामान यामुळं तुमची भटकंती कधी आणि कुठं अडचणीत येईल याचा पत्ताच लागणार नाही. अरुणाचल प्रदेश पाहायचा तर तीनचार वेळा तरी या प्रदेशाचं दार ठोठवावं लागेल... 

अरुणाचलमधील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या ‘तवांग’ इथं जाण्यासाठी आपल्याला इटानगरला जाण्याची आवश्यकता पडत नाही. अरुणाचल प्रदेशच्या अगदी पश्‍चिम कोपऱ्यात म्हणजेच भूतानला लागून तवांग आहे. तवांगसाठी अरुणाचलमध्ये प्रवेश करण्याचं सर्वांत योग्य ठिकाण म्हणजे असममधील ब्रह्मपुत्रच्या उत्तर तीरावर असलेलं तेजपूर हे शहर होय. तवांगला जाण्यासाठी आपल्याला तेजपूर इथूनच प्रवासाची सुरुवात करावी लागते. तेजपूर ते तवांग हा प्रवास अतिशय लांबचा, त्रासदायक आणि खडतर आहे. चौदा किंवा त्याहून अधिक वेळ या प्रवासासाठी लागतो. असं असलं तरी खऱ्या अर्थानं अरुणाचल प्रदेशच्या रौद्रभीषण निसर्गाची ओळख आपल्याला याच प्रवासात होते. पूर्व हिमालयाच्या अतिउंच रांगांतील दऱ्याखोऱ्या आणि त्यात सामावलेला रौद्र निसर्ग आपल्याला याच प्रवासात भेटतो. मी हेलिकॉप्टरनं जाण्याचा निर्णय घेतला. 

गुवाहाटी-तवांग हा हेली-प्रवासाचा अनुभव अतिशय सुरेख होता... फारतर तीस मिनिटांच्या या प्रवासात खालून झरझर बदलणारी निसर्गचित्रं पाहताना वेळ कधी संपला हे कळलंच नाही. विशेष म्हणजे तवांग जवळ येताना अगदी ठळकपणे दिसणारी तवांग  
मॉनेस्ट्री, छोटी छोटी घरं... आणि धुक्यात गुरफटलेल्या पर्वत रांगा... हिरव्यागार दऱ्यांतून एखाद्या रिबिनीगत दिसणारी नदी हे सर्वकाही अधाशासारखं डोळ्यात सामावून घेतलं. प्रवासाची अनुभूती अनुभवण्याच्या आतच हेलिकॉप्टर तवांगच्या छोट्याशा विमानतळावर उतरलंसुद्धा! 

‘तळ्यांचं तवांग’ या नावाचा एक लेख खूप वर्षांपूर्वी वृत्तपत्रात वाचला होता... तेव्हापासून तवांग पाहण्याचं स्वप्न मनात टवटवीत होतं... ते प्रत्यक्षात उतरताना मात्र खरोखर खूप त्रास झाला. मात्र जवळपास अकरा हजार फूट उंचावरील तवांग पाहिल्यानंतर प्रत्येकानं आयुष्यात एकदातरी तवांग पाहिलं पाहिजे असं आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण तवांग अगदी वेगळं आहे, सुंदर आहे. अरुणाचल प्रदेशच्या अगदी पश्‍चिम कोपऱ्यात असलेलं तवांग हे तिबेट आणि भूतानच्या सीमेला लागून आहे. त्यामुळं तवांगमधील लोकमानसावर संपूर्णपणे तिबेटियन संस्कृतीचा प्रभाव आहे. 

तवांगचा शब्दशः अर्थ आहे, घोड्यानं निवडलेली जागा! ‘ता’ म्हणजे घोडा आणि वांग म्हणजे निवडलेले. तवांग इथं असलेली प्रसिद्ध बुद्धिस्ट मॉनेस्ट्री हीच या शहराची प्रमुख ओळख आहे. या बुद्धिस्ट गोम्पाच्या म्हणजेच मॉनेस्ट्रीच्या संबंधातील आख्यायिकेमुळंच तवांगला त्याचं नाव मिळालं आहे. ही प्रसिद्ध मॉनेस्ट्री १६८१ मध्ये बौद्ध धर्मगुरू मेरा लामा यांनी बांधली होती. तिबेटचे तत्कालीन धर्मगुरू, पाचवे दलाई लामा यांनी ‘मेरा लामा’ यांना हिमालयाच्या उंच पर्वतरांगांच्या शेंड्यावर वसलेल्या या लहानशा गावात बौद्ध गोम्पा बांधण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार त्यांनी हा मठ तथा गोम्पा बांधण्याचं ठरवलं. पण या मठाच्या बांधकामासाठी नेमक्या जागेची निवड कशी करावी, कुठच्या जागेवर हा बौद्ध गोम्पा उभारावा याबद्दल मेरा लामा यांना निर्णय घेता येत नव्हता. एके दिवशी नेहमीच्या प्रार्थनेनंतर ते बाहेर आले असता त्यांच्या लक्षात आलं, की त्यांचा घोडा जागेवर नाही, ते त्याला शोधण्यासाठी निघाले. बरीच पायपीट केल्यानंतर त्यांना त्यांचा घोडा एका उंच टेकडीच्या माथ्यावर कड्याच्या अगदी टोकाशी दिसला. त्यांच्या लक्षात आलं, की त्यांचा घोडा डोंगराच्या कड्यावर अशा ठिकाणी उभा आहे जिथून खालच्या बाजूला केवळ खोल खोल दरी आहे... त्याक्षणी त्यांच्या लक्षात आलं, की गोम्पा बांधण्यासाठी हीच ती योग्य जागा! मनानं कौल देताच मेरा लामा यांनी त्याच जागेवर गोम्पा बांधण्यास सुरुवात केली. आज ही चारशे वर्षं जुनी मॉनेस्ट्री पाहताना वाटतं, जणू ही मॉनेस्ट्री त्या डोंगरांच्या कड्यावर अधांतरी उभी आहे. बहुतांश वेळा ही मॉनेस्ट्री ढगांत हरवलेली आणि धुक्यात लपेटलेली असते. पृथ्वीवरील नंदनवनात असल्याप्रमाणं ही मॉनेस्ट्री अधांतरी तरंगते आहे, की काय असा भास होत राहतो. या गोम्पामध्ये अंदाजे सातशेहून अधिक बौद्ध भिख्खू वास्तव्य करतात. आकारमानाच्या दृष्टीनं विचार करता, तिबेट देशामधील ल्हासा येथील पोटाला पॅलेसच्या खालोखाल तवांग मॉनेस्ट्रीचा नंबर लागतो. या गोम्पाचं धार्मिक महत्त्वही पोटाला पॅलेसच्या खालोखाल आहे. 

सध्या भारतात वास्तव्यास असणारे तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा, १९५९ मध्ये परागंदा अवस्थेत ल्हासा येथील पोटाला पॅलेस या त्यांच्या निवासस्थानातून उभा हिमालय पर्वत ओलांडून भारतात येण्यासाठी पायी निघाले होते, तेव्हा तवांगमधील याच मॉनेस्ट्रीमध्ये काही काळासाठी थांबले होते. ही गोम्पा तिबेटी बौद्ध लोकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. ज्यावेळी मी तवांगला भेट दिली त्याच्या काही दिवस आधी अनेक वर्षांनंतर खुद्द दलाई लामा यांनी तवांग येथील बौद्ध मॉनेस्ट्रीला भेट दिली होती. 

तवांगमध्ये मुख्यत्वेकरून मोंपा या जमातीचे लोक राहतात. हे लोक भूतान आणि तिबेटमधूनच भारताच्या या भागात स्थलांतरित झालेले आहेत. गोरेपान, अगदी गोलमटोल चेहऱ्याचे मोंपा मंगोलवंशीय असून तसे साधेसुधे असतात. बहुतेक शेती आणि पशुपालन या व्यवसायात रमतात. तवांग मॉनेस्ट्रीद्वारे प्रचलित असणाऱ्या ‘गेलुम्पा महायान’ या बौद्ध पंथाचा स्वीकार करून त्याप्रमाणं जीवनाचं आचरण करतात. बौद्ध धर्माचा स्वीकार करण्यापूर्वी तिबेटियन लोकांप्रमाणंच तेसुद्धा ‘बॉन पो’ या प्राचीन धर्माचं पालन करीत होते. तवांगमध्ये फिरताना जागोजागी फक्त बौद्ध धर्माच्या खुणा पाहायला मिळतात. इथं-तिथं भगव्या वस्त्रात लपेटलेले तरुण बौद्ध भिख्खू शांतपणे वावरताना दिसतात. सर्वत्र त्यांचे प्रार्थना ध्वज (प्रेयर फ्लॅग्ज) हवेमध्ये फडफडत असतात. 

तवांग येथील ‘तवांग वॉर मेमोरिअल खूप छान आहे. मी तेथूनच सुरुवात केली... रस्ता चांगला होता. बहुतेक सर्व ठिकाणी आर्मीची वर्दळ होती. वाटेत एका ठिकाणी मला छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा पाहून कमालीचं आश्चर्य वाटलं. चौकशी केल्यानंतर कळलं, की त्या ठिकाणी मराठा रेजिमेंटचं प्रमुख ठाणं असल्यामुळं शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. हे वॉर मेमोरिअल नव्यानं बांधलेलं आहे. १९६२ च्या चीन-भारत युद्धात शहीद झालेल्यांच्या स्मृतीसाठी उभारलेलं हे मेमोरिअल शुभ्र संगमरवरात बांधलेलं असून आकार एखाद्या स्तुपासारखा आहे. याठिकाणी बहुतेक सर्व शहीद जवानांचे नाव, हुद्दा, पत्ता लिहिलेलं आहे. 

त्यानंतर मी तवांग मॉनेस्ट्री पाहायला गेले. पण दुपारचे फक्त अडीच-तीन वाजत आले होते. तरीही अचानक आकाशात ढग दाटून आले. संपूर्ण आसमंत काळवंडून गेला... दिवस मावळल्यागत अवस्था झाली होती. मॉनेस्ट्री तर अर्धीअधिक ढगात आणि धुक्यात लपून गेली होती. थंडी कमालीची वाढली होती. उंचावर असलेल्या या बौद्ध मठाच्या छतावरून मागील खोल दरी पाहण्याची माझी इच्छा होती. पण सर्वत्र धुकेच धुके असल्यामुळं काहीच दिसलं नाही. या मॉनेस्ट्रीमध्ये भगवान बुद्धाचा आठ मीटर उंच, सोन्याचा मुलामा दिलेला पुतळा आहे. तसे इतरही अनेक लहानमोठ्या आकाराचे पुतळे आहेत. आतापर्यंत खूप मॉनेस्ट्री पाहिल्या आहेत.  एकूणच या सर्व बौद्ध मठांचं अंतरंग साधारण सारखंच असतं. तेथील वातावरण एकूणच गूढ-गंभीर असतं. तिथं राहणारे बौद्ध भिख्खू आपली दिनचर्या अगदी काटेकोरपणे पाळताना दिसतात. 

तवांगमध्ये अतिशय सुंदर धबधबा आहे, पण अंधारून आल्यामुळं ड्रायव्हरनं मला तिकडं नेलंच नाही. उरुगेलिंग मॉनेस्ट्रीकडंही जाता आलं नाही. ही मॉनेस्ट्री आकारानं लहान असून या ठिकाणी सहाव्या दलाई लामांचा जन्म झाला होता असं मानलं जातं. त्यांच्या हाता-पायांचे ठसे या ठिकाणी जपून ठेवलेले असल्यामुळं हा गोम्पा बौद्ध धर्मीयांसाठी तीर्थक्षेत्राप्रमाणं अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण आहे. अंधारून आल्यामुळं तसंही आमचं तवांगचं साइट सीईंग त्यामानानं लवकर आटोपलं. ड्रायव्हरनं मला हॉटेलवर सोडलं. दुसऱ्या दिवशी माधुरी-तलाव पाहायला जायचं होतं. 

त्या संध्याकाळी, म्हणजे खरंतर साडेचार वाजता, कडाक्याच्या थंडीत तवांगच्या बाजारातून थोडी फिरले. काही बाही खरेदी करून हॉटेलवर परतले. दुसऱ्या दिवशी सकाळी ड्रायव्हर वेळेत आला आणि आम्ही ‘संगेत्झर लेक’ पाहण्यासाठी बाहेर पडलो. साधारण ४५ किलोमीटर अंतरावर जायचं होतं. तवांगमध्ये असलेल्या अनेक तळ्यांपैकी हा सर्वांत सुंदर आणि सर्वांत शेवटचा तलाव होता. भूतानच्या सीमारेषेजवळ असलेला! 

तवांग सोडल्यानंतर वळणावळणाच्या रस्त्यानं चढण सुरू झाली. वाटेत सर्वत्र आर्मीची ठाणी होती. पाण्याची बाटली घ्यायची विसरले होते, म्हणून एका कँपमध्ये थांबलो. तेथील जवानांना मी एकट्यानंच प्रवास करत असल्याचं पाहून आश्चर्य वाटलं. त्यांनी बाटलीत गरम पाणी भरून दिलं. रस्ता फारसा चांगल्या अवस्थेत नव्हता. तसाही तो वर्दळीचा रस्ता नव्हताच. एक-दोन वाहनं सोडली तर त्या रस्त्यावर वाहनं अशी फारशी नव्हतीच. याचं कारण तो भाग तिबेट भारत सीमारेषेच्या अत्यंत जवळ होता. हळूहळू वृक्षराजी अत्यंत विरळ होत गेली. त्यानंतर सभोवताली भुरकट, राखाडी रंगाचे उघडे बोडखे पर्वत दिसू लागले. घरं नाहीत. वस्ती नाही. फक्त रौद्र, राकट वाटणारे पर्वत. मात्र या निसर्गचित्रात सुंदर नीलमण्याप्रमाणं चमकणारे अनेक तलाव दिसले. एक-दोन तलावांचे फोटो घेतले. पण एका ठिकाणी मी खाली उतरून तळ्याचा फोटो घेत होते तेव्हा अचानक कुठूनसा स्टेनगन घेतलेला जवान माझ्याजवळ आला... तो अचानक कुठून आला ते मला कळलेच नाही. त्यानं त्या ठिकाणी फोटो घेता येणार नाही असं बजावून सांगितलं. त्यामुळं मी पटकन पुन्हा गाडीत बसले. 

त्या डोंगराळ भागात कुठंही साधं खोपटंही नजरेला दिसत नव्हतं. पण एखाद - दुसरा जवान अधेमधे उभा दिसायचा. मग लक्षात आलं, की त्या भागात जमिनीखाली आर्मीचे बंकर्स आहेत. अरुणाचल प्रदेशची त्या भागातील चीनबरोबरची सीमा हा गेल्या काही वर्षांपासून वादाचा आणि संवेदनशील विषय असल्यामुळं या भागात भारतीय लष्कर डोळ्यात तेल घालून राखण करतं. संगेत्झर लेकसाठी आपण ज्या रस्त्यानं प्रवास करतो तिथून चायना बॉर्डर फार दूर नाही. या वाटेवर साधारण सात ते आठ छोटे छोटे आकाशाच्या निळ्या रंगात रंगलेले तलाव पाहायला मिळाले. असे बहुतेक अकरा तलाव आहेत. पण त्यातले दोन तलाव आडवाटेला आहेत. तिथं पायी चालत जावं लागतं. सर्वांत शेवटी संगेत्झर तलाव आहे. हा अतिशय रमणीय तलाव आजकाल ‘माधुरी-लेक’ म्हणून ओळखला जातो. कारण ‘कोयला’ या हिंदी चित्रपटाच्या एका गाण्याचं चित्रीकरण या ठिकाणी झालं होतं. 

या परिसरात भूकंपामुळं झालेल्या उत्पातामध्ये १९५० मध्ये हा तलाव तयार झालेला आहे. डोंगर उतारावरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात मोठमोठाले बोल्डर आडवे पडल्यामुळं पाणी अडवलं गेलं. शिवाय भूगर्भातील हालचालींमुळं खोलगट भागही तयार झाला होता. त्यामुळं त्याजागी एक अतिशय सुंदर तलाव तयार झालेला आहे. संपूर्ण तलाव स्फटिकासारख्या निर्मळ पाण्यानं भरलेला आहे. आजूबाजूच्या उंच पर्वत शिखरांचं प्रतिबिंब तलावाच्या पाण्यामध्ये पडल्याचं स्पष्टपणे पाहता येतं. त्यामुळं हा तलाव फार सुंदर दिसतो. अगदी चित्रवत्! पण संपूर्ण तलावात वठलेल्या पाईन वृक्षांची खोडं ताठ उभी आहेत. ती पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं, की निसर्गात होणाऱ्या उत्पातातून कधी मधी निसर्गरम्य गोष्टींची निर्मिती होते हे खरं असलं, तरी विध्वंसाच्या खाणाखुणा मागं राहतातच! 

चोहोबाजूंनी उंच पर्वतांनी वेढलेला हा तलाव उंच पर्वतशिखरावरील बर्फ वितळून पहाडावरून खळाळत खाली येणाऱ्या पाण्यामुळं बनलेला आहे. मोठमोठ्या दगडधोंड्यांतून वाट काढीत हे पाणी पुढं खाली दरीत झेपावत राहतं. या ठिकाणी एक पूल आहे. त्यावरून पुढं गेल्यानंतर आपण टकत्सँग मॉनेस्ट्रीकडं पोचतो. ही तवांगमधील भूतानच्या सीमारेषेजवळ असणारी लहानशी मॉनेस्ट्री आहे. ही मॉनेस्ट्रीसुद्धा खोल दरीच्या उंच कड्यावर बांधलेली आहे. या मॉनेस्ट्रीला ‘टायगर्स नेस्ट’ असंही म्हणतात. 

‘माधुरी लेक’नंतर हॉटेलमध्ये परतले. प्रायव्हेट गाडीनं तेजपूरला जायचं ठरलं होतं. त्यामुळं लगेचच निघालेसुद्धा! पण तो निर्णय थोडा चुकीचा होता हे नंतर उमजलं... वळणावळणाचे रस्ते त्यातच रस्ता अत्यंत खराब होता. रस्ता रुंदीकरणाचं काम चालू होतं. भयानक खोल खोल दऱ्या... काळेकभिन्न रुक्ष वाटणारे पर्वत आणि जागोजागी दिसणारे बौद्ध गोम्पा, स्तूप, जिथं तिथं वाऱ्यावर फडफडणारे प्रेयर फ्लॅग्ज या गोष्टी तेथील बौद्ध जीवनपद्धतीची आणि बौद्ध धर्माच्या प्रसाराची जाणीव करून देत होते. 

वाटेत ‘जसवंत गढ’ म्हणून एक मेमोरिअल आहे. त्या ठिकाणी थांबलो. हे मेमोरिअल म्हणजे ‘जसवंत सिंग’ नावाच्या एका शहीदाचं घर आहे. आर्मीनं त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यासाठी बांधलेलं. १९६२ च्या चीन-भारत युद्धात केवळ १८ वर्षांच्या या बहादूर शिपायानं एकट्यानं सेला ही खिंड लढवली होती. शहीद जसवंत सिंग यांना मरणोत्तर महावीर चक्र देण्यात आलं. पण अगदी तरुण वयात शहीद झालेल्या या जवानाचा आत्मा त्या जागी घोटाळत असल्याचे नंतर घडलेल्या अनेक प्रसंगांमुळे आणि घटनांमुळे सिद्ध झाल्यामुळे भारतीय लष्करानं ‘जसवंत सिंग’ हे त्यांच्या मृत्यूनंतरही कामावर असल्याचं गृहीत धरलं... या बहादूर जवानाची कागदोपत्री निवृत्ती अगदी अलीकडंच करण्यात आली. ही बातमी सर्व वृत्तपत्रांमधून आणि चॅनेल्सवरून देण्यात आली होती. तोपर्यंत नियमितपणे त्याचा पगार चालू होता. त्याच्यासाठी रजा दिली जायची. रजेच्या काळात त्याला पंजाबमधील त्याच्या गावी जाण्यासाठी रेल्वेचं तिकीट काढलं जायचं. त्याच्यासाठी बर्थ रिझर्व्ह केली जायची आणि त्याच्या सामानासह त्याचं त्याच्या गावी आगमन व्हायचं. त्याच्यासाठी रोज बेड तयार केला जायचा. त्याला आर्मीच्या नियमांनुसार ठरल्या वेळी बढती दिली जायची. अशा या शहीद जसवंत सिंग यांच्यासाठी सेला पासजवळ बांधलेल्या घरात क्षणभर थांबून परत फिरले... हे सर्व ऐकल्यानंतर मन एका आगळ्या वेगळ्या भावनेनं भरून आलं होतं. 

ढग दाटून आल्यामुळं दिशा अंधारून यायला लागल्या आणि माझं मन उदासलं... कारण मला सेला पास पाहायचा होता. सेला पास आता केवळ २१ किलोमीटर अंतरावर होता. पण अचानक सर्व बाजूंनी धुकं दाटून आलं आणि सगळा आसमंत जणू अदृश्य झाला. फक्त गाडीच्या समोरील दहा फुटाचा रस्ताच काय तो दिसत होता. हे असं आडनाड वेळी प्रवासाला निघाल्याबद्दल स्वतःच्या मूर्खपणाला मी दोष देत राहिले. रस्ता सोडल्यास काहीही दिसत नव्हतं. मात्र सेला पासजवळ पोचल्यानंतर गाडी थांबली तेव्हा अचानक धुकं काही क्षणांसाठी सेला लेकवरून बाजूला सरलं आणि सेला पासजवळ असणारा तो छोटासा ‘सेला तलाव’ पाहण्याची संधी मिळाली... इतकं मनोरम दृश्य होतं ते... सर्व बाजूंनी धुक्यानं वेढलेली शिखरं आणि मधेच आरशासारखा चमकणारा तलाव... सेला पास १३७१४ फूट उंचावर आहे. गाडीच्या बाहेर पडल्यावर थंडीनं गारठून गेले. पण धुकं बाजूला झालं होतं त्या क्षणार्धात तलावाचा फोटो घेता आला... मनोमन माझ्या सुदैवाचं आश्‍चर्य करीत मी तो क्षण कॅमेऱ्यात टिपून ठेवला... थोडं अंतर कापल्यानंतर धुक्याचं आच्छादन असलेले पर्वत मागं पडले आणि मावळत्या सूर्याच्या सोनेरी प्रकाशात उत्तर पूर्व हिमालयाच्या रौद्रभीषण पर्वतरांगांचं दर्शन घडलं... एका बाजूला उंचचउंच पहाड आणि त्यांचे काळ्या पाषाणात बनलेले चित्रविचित्र आकार आणि दुसऱ्या बाजूला ढगांच्या पार्श्वभूमीवर मावळणाऱ्या सूर्याच्या किरणांनी मांडलेला अद्‍भुतरम्य खेळ... हे सर्व काही डोळ्यात कसं साठवू तेच कळत नव्हतं. ज्यांच्याबरोबर मी प्रवास करत होते त्या आर्मी ऑफिसरला गाडी थांबव असं सांगण्याचं धाडस केलं नाही... कारण उशीर झाला असता तर आम्हालाच त्रास होणार होता. पण ते रौद्रभीषण सौंदर्य पाहून डोळे निवले... बस! त्यानंतर काही वेळातच अंधाराच्या सावल्यांनी सर्व आसमंत गिळंकृत केला... आणि मी मुकाट्यानं अंधारात दिसणारा समोरचा रस्ता न्याहाळीत सुखरूप पोचण्यासाठी मनोमन गणपती स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. 

पुढचा प्रवास म्हणजे त्या ऑफिसरचं अत्यंत उच्च दर्जाचं ड्रायव्हिंग कौशल्य आणि निसर्गाचे रौद्र रूप याचा खेळ होता... दुपारी परत निघण्याच्या माझ्या चुकीच्या निर्णयामुळं मी पुढील प्रवासात दिसणाऱ्या निसर्गसौंदर्याला मुकले... पण रात्री बारा वाजता आम्ही भालूकपाँगला सुखरूप पोचलो... तेथून पुढं तेजपूर केवळ ५० किलोमीटर अंतरावर होतं... पण रात्री प्रवास करणं धोक्याचं आहे असं त्या ऑफिसरनं सांगितले. ‘बालीपारा’ हा असममधील प्रदेश त्याकाळात अत्यंत संवेदनशील होता. त्या रात्री भालूकपाँग येथील प्रशांती लॉजमध्ये मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजता लॉज सोडले... वाटेत असममधील घनदाट जंगल लागले. उत्कृष्ट अशा असम सागवान वृक्षांचं ते घनदाट जंगल उल्फा, बोडो या उग्रवाद्यांचा अड्डा आहे असं सांगण्यात आलं. वाटेत अक्षरशः दर दहा फुटांवर स्टेनगनधारी कमांडो तैनात असल्याचं दिसत होतं. रस्त्यात कुठंही न रेंगाळता आम्ही तासाभरात तेजपूरला पोचलो. तवांग पाहून मी सुखरूप तेजपूरला परतले होते. माझ्या पूर्वांचलाच्या भटकंतीमधील तवांगचा प्रवास तसा थोडा बिकट परिस्थितीतच झाला होता. तिथून पुढं मला मिझोरामला जायचं होतं... त्याची एक वेगळीच गोष्ट होती!

संबंधित बातम्या