झपाटलेले ओसाड गाव...!

डॉ. राधिका टिपरे
सोमवार, 14 डिसेंबर 2020

पर्यटन 

आतापावेतो दिल्लीला बऱ्‍याचवेळा भेट दिली आहे. त्यामुळे दिल्लीतील बहुतेक पर्यटन स्थळे परिचयाची झाली आहेत. ताजमहाल आणि फतेहपूर-सिक्रीसुद्धा तीन चार वेळा बघून झाले होते. पण त्या डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा दिल्ली आणि आग्रा पाहायला जावे लागले, कारण युक्रेनमधून आलेल्या नीना या माझ्या विहिणीबरोबर कुणीतरी जाणे गरजेचे होते. बरोबर लहानगा नातूही होता. या निमित्ताने पुन्हा एकदा फतेहपूर सिक्रीचे मुघल स्थापत्य आणि वास्तुकलेचे वैभव पाहायची संधी मिळाली. 

साधारण चारशे वर्षांपूर्वी मुघल बादशहा अकबराने वसवलेले हे राजधानीचे शहर पाहायला जाताना मन पुन्हा एकदा शंकित झाले होते. कारण या शहरावर आज ‘भुताटकीने झपाटलेले’ किंवा एक ‘डेझर्टेड हाँटेड, घोस्ट सिटी’ म्हणून शिक्का बसला आहे. लाल रंगाच्या कुरूंदामध्ये बांधण्यात आलेल्या भव्य इमारतींनी अक्षरशः नटलेले फतेहपूर सिक्री आज संपूर्णपणे ओसाड पडलेले पाहून मनात शंका कुशंकांची उलट सुलट वावटळ उठली. हे सारे अगम्यच वाटत होते. माझ्याबरोबर असणाऱ्‍या गाइडने मला सांगितले, की खंडहर झालेल्या या शहरात कुणीही राहत नाही. रात्री चुकूनही कुणी या परिसरात थांबत नाहीत. कारण हे गाव झपाटलेले आहे. बऱ्‍याच जणांनी तसा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना रात्र इथे घालवण्यात यश आले नाही. असे लोक भयभीत होऊन फतेहपूर सिक्रीच्या तटबंदीतून बाहेर पळून आले. लोक दिवसभर तिथे थांबतात मात्र सूर्यास्ताच्या आधी प्रत्येक जण या गावाच्या वेशीतून बाहेर पडतो. अगदी जनावरांना चरायला घेऊन जाणारे चरवाहसुद्धा सूर्यास्ताच्या आधी फतेहपूरच्या तटबंदीमधून बाहेर पडण्याची खबरदारी घेतात. केवळ चौदा वर्षांच्या वास्तव्यानंतर अकबर बादशहाने हे शहर खाली केले आणि या शहराचा जणू आत्माच हरवून गेला.

जलालुद्दीन महंमद अकबर या मुघल बादशहाने इ.स.१५७१ साली वसवलेलं हे राजधानीचे नवे कोरे शहर आग्र्यापासून फक्त ३७ कि.मी अंतरावर आहे. आपले गुरू ‘शेख सलीम उद्दीन चिश्ती’ या सुफी संताच्या सन्मानार्थ अकबराने ही नवी राजधानी वसवण्याचा निर्णय घेतला होता. या मागचे कारण सांगताना, इतिहासकार म्हणतात, की अकबर जेव्हा ‘सलीम चिश्ती’या गुरूच्या दर्शनाला गेला होता तेव्हा त्याने अकबराला तुला तीन पुत्र होतील असा आशीर्वाद दिला होता. मूलबाळ नसल्यामुळे मनातून दुःखी असलेल्या अकबराने आपल्या गुरूच्या सान्निध्यात राहण्याच्या इच्छेने आपली राजधानी आग्र्या‍हून सिक्री या लहानशा गावात वसवण्याचे ठरवले. कारण ही जागा आग्रा आणि अजमेर या दोन गावांच्या मध्यावर होती. शिवाय सलीम चिश्ती यांच्या आशीर्वादामुळे ती जागा पावन झालेली आहे असा विश्‍वासही त्याला वाटत असावा. सिक्री हे अतिशय लहानसे गाव होतं. असे म्हटले जाते, की १५२७ साली बाबर जेव्हा राजपूत राणा संगाबरोबरच्या युद्धात विजयी होऊन परतत होता, तेव्हा त्याने मुक्काम केलेल्या या गावाचे नामकरण आनंदाच्या भरात ‘शुक्री’ म्हणजे ‘आभार’ या अर्थाने केले होते.

आज जेव्हा आपण फतेहपूर सिक्री या राजधानीचे अवशेष पाहतो, तेव्हा राहून राहून मनात प्रश्‍नांकित कुतूहल निर्माण होते. एक अलिशान आणि आखीव रेखीव शहर म्हणून निर्माण केलेल्या या सुनियोजित राजधानीत असे काय घडले, ज्यामुळे बादशहा अकबराने केवळ चौदा वर्षांतच फतेहपूरचा कायमस्वरूपी त्याग करून लाहोरकडे कूच केले...! हे गूढ किंवा हे रहस्य फतेहपूरच्या लाल रंगातील दगडांच्या चिरेबंदीत कायमचे गाडले गेले. कारण या पाठीमागचे खरे कारण अद्यापही इतिहासकारांना कळू शकलेले नाही. हे देखणे शहर खंडहर होऊन गेले आणि आज जेव्हा आपण या चारशे वर्षं जुन्या इमारतींमधून फेरफटका मारतो तेव्हा हे गूढ अधिकच गहिरे होताना दिसते. 

सिक्री गाव तसे उंचावर असल्यामुळे मुख्य इमारतींचा समूह याच भागात बांधल्याचे आपल्या लक्षात येते. ही नवी राजधानी उभारताना अकबराने प्रयत्नपूर्वक एका वेगळ्या पद्धतीचा आधार घेतल्याचे स्पष्टपणे लक्षात येते. तैमुरी, पर्शियन आणि भारतीय वास्तुकलाशैलींचे मिश्रण असणारी ही शैली पुढे अकबरी स्थापत्यशैली म्हणून ओळखली जाऊ लागली. अतिशय आखीव, रेखीव पद्धतीने आरेखन केलेल्या या संपूर्ण राजधानीचे बांधकाम सुनियोजित रचनांकित आराखड्यानुसार केले गेले होते. त्यासाठी लालबुंद रंगाच्या अप्रतिम दर्जाच्या धौलपूर कुरूंदाचा मुक्तहस्ते वापर करण्यात आला होता. आज खंडहर झालेल्या या शहरातील अनेक भव्य दिव्य अशा अनेक वास्तूंचे स्थापत्य पाहताना  

आपल्याला या खास वास्तुशैलीचे वैशिष्ट्ये जाणवत राहते. असे म्हटले जाते, की अतिशय कमी कालावधीत सिक्री येथील या राजधानीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले होते. विशेष म्हणजे, संपूर्ण शहर बादशहा अकबराच्या इच्छेनुसार, त्याच्या आवडीनुसार आणि त्याने निवड केलेल्या शैलीनुसार उभारण्यात आल्यामुळे या शहराला एक तर्कशुद्ध, सुसंगत असे नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले होते. या शहराला एक नैसर्गिक सुबकपणा मिळाला होता. अगदी कमी कालावधीतच एका लहानशा खेडेगावाचे रूपांतर, व्यापार उदिमाने भरभराटीस आलेल्या अतिशय सुंदर, सुबक अशा नगरामध्ये झाले. मुघल साम्राज्याची नवनिर्वाचित राजधानी म्हणून सिक्रीला एक वलय आणि प्रसिद्धीही मिळाली होती असे म्हटले जाते. नव्या राजधानीत राहणाऱ्‍यांची लोकसंख्याही वाढली होती. अकबराने १५७१ साली आपल्या राज्याचा दरबार सिक्रीच्या नव्या शाही महालामध्ये हलविला आणि आपला राज्यकारभार नव्या राजधानीतून सुरू केला. 

या नव्याने वसवलेल्या राजधानीतील वास्तव्यानंतर अकबर बादशहाच्या वैयक्तिक जीवनावरही बऱ्‍यापैकी परिणाम झाल्याचे ऐतिहासिक नोंदीवरून आपल्या लक्षात येते. फतेहपूर सिक्री येथेच त्याचा पहिला पुत्र सलीम याचा जन्म १५६९ साली झाला होता. सिक्री येथूनच अकबर गुजरातवर चाल करून गेला होता आणि विजयी होऊन परत आल्यानंतर त्याने सिक्रीचे फतेहपूर असे नामकरण केले...‘विजयाचे शहर’ आणि आपल्या विजयाचे स्मारक म्हणून शहराच्या वेशीवर ‘बुलंद दरवाजा’चे बांधकाम करून घेतले. सुरुवातीच्या काळातील या घटनांचे पडसाद त्याच्या राजनैतिक आयुष्यावर पडल्याचे स्पष्टपणे दिसून येते. १५८५ साली भारतात आलेला ब्रिटिश फिरस्ती ‘राल्फ फिंच’ याने त्याकाळात आग्रा आणि फतेहपूर सिक्री या शहरांना भेट दिली होती. मुघल राज्यकर्त्यांच्या अत्युच्च भरभराटीच्या काळात ही दोन्ही शहरे खूप महत्त्वाची आणि सुंदर होती आणि लंडनपेक्षाही मोठी होती असे त्याने नमूद करून ठेवले आहे. 

अकबर बादशहाने त्याच्या आवडीनुसार वसवलेले सिक्री शहर हे काही काळासाठी का होईना पण मुघलांचे मुख्य प्रशासकीय, सांस्कृतिक आणि व्यापारउदिमाचे केंद्र झाले होते. मध्ययुगीन काळातील इतर अनेक भारतीय शहरांप्रमाणे सिक्रीच्या भोवतीसुद्धा तटबंदी बांधण्यात आली होती. पश्‍चिम बाजूला तलाव असल्यामुळे ती बाजू मोकळी होती. या तटबंदीमध्ये बरेच दरवाजे बांधण्यात आले होते. त्यांची नावेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. दिल्ली दरवाजा, लाल दरवाजा, आग्रा दरवाजा, ग्वालियर दरवाजा, अजमेरी गेट अशी ही नावे त्या दरवाजामधून या विविध गावापर्यंत जाणाऱ्‍या रस्त्यांवरून देण्यात आली होती. या सर्व दरवाजांचे बांधकाम एकाच पद्धतीचे आहे. बहुतेक दरवाजांची आत्तापर्यंत पडझड झाली असली तरी आग्रा दरवाजा आजही बऱ्‍या अवस्थेत उभा आहे. तटबंदीच्या आतमध्ये संपूर्ण गाव वसलेले होते. सर्व प्रकारच्या सोयीसुविधांचा विचार केला होता. प्रवाशांच्या वास्तव्यासाठी सरायची सोय होती. हाथी पोळ, हिरण मिनार, सराय, टंकसाळ, कारखाना, हकिम हमाम, नौबतखाना, अशा अनेक वास्तूंमधून आपल्याला सिक्री शहराचे गतवैभव पाहायला मिळते. या अशाच काही वास्तूंमध्ये लक्ष वेधून घेते ती ‘तानसेन बारादारी’ म्हणून ओळखली इमारत, जी बऱ्या‍पैकी चांगल्या अवस्थेत आहे. नौबतखाना म्हणजे नगारे वाजवण्याची जागा. अकबर बादशहा जेव्हा दरबारात येत असे तेव्हा त्याच्या येण्याची वर्दी देण्यासाठी नगारे वाजवले जात असत असे म्हटले जाते. काहींच्या मते नौबतखाना हा ‘चहर सूक’ म्हणजेच बझारचा एक भाग होता. असो, अशा अनेक महत्त्वाच्या वास्तूंचे खंडहर पाहताना आपल्या लक्षात येते की अकबर बादशहाने अगदी मनापासून, त्याच्या राजधानीचे हे शहर वसवलेले होते.

अकबराच्या दरबारातील कारकून अबुल फजल याने नमूद केले होते, की राजधानीचे शहर उभारणीच्या कामात अकबराने स्वतः जातीने लक्ष घातले होते. तो स्वत: मजुरांच्यासह खाणीतून दगड काढायला उपस्थित असायचा. शिवाय बांधकाम सुरू असताना स्वत: जातीने हजर राहून कामाची पाहणी करायला त्याला आवडत असे. त्याने वास्तुकलेच्या दृष्टिकोनातून आपल्या खास शैलीचा आग्रह धरला होता. त्याच्या या खास शैलीचे प्रतिबिंब आपल्याला शाही राजवाड्याच्या आवारातील सर्व लहान मोठ्या  इमारतींमध्ये दिसून येते. या वास्तुकलेला कुठल्याही खास शैलीचे नाव देता येत नाही, परंतु त्यातील वेगळेपणा ठसठशीतपणे नजरेला जाणवतो. त्यामुळेच या सर्व इमारती खास अकबरी स्थापत्यशैलीमध्ये बांधलेल्या आहेत हे पाहणाऱ्‍याला स्पष्टपणे जाणवत राहते. ‘इंम्पेरीयल पॅलेस कॉम्प्लेक्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या विस्तीर्ण आवारात आपण लालबुंद वालुकाश्म दगडामध्ये बांधलेल्या अनेक प्रासादांची, महालांची, कोठ्यांची ओळख करून घेतो तेव्हा नकळत त्यातील साध्या परंतु कलात्मक कलाशैलीने भारावून जातो. या शैलीमध्ये नाजूकपणाचा अभाव आहे, परंतु भव्यतेच्या जोडीला कलात्मक दृष्टिकोन असल्यामुळे त्यातील वेगळेपण मनात ठसते. कसे राहत असतील लोक या शाही महालांमध्ये? हा प्रश्‍न मनामध्ये घर करून राहतो. या शाही राजवाड्यांच्या आवारात अनेक लहानमोठ्या पण अतिशय वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य असणाऱ्‍या वास्तू आहेत. हाथी पोळ हा मुख्य प्रवेशद्वाराचा भाग सोडून या शाही राजवाड्याचे आवार एकूण तीन भागात विभागले होते. एक म्हणजे मदारर्ना अर्थात पुरुषांचा विभाग, दुसरा जनाना म्हणजे स्त्रियांचा विभाग आणि तिसरा विभाग ज्यामध्ये राज्यकारभाराशी संबंधित दरबार आणि कार्यालय यांचा अंतर्भाव होता. खजिना, कार्यालय, दौलतखाना, हराम सार किंवा जनान खाना या वास्तू पूर्वी एकमेकांशी व्यवस्थित जोडलेल्या होत्या. परंतु आता आपल्याला त्याची नीट कल्पना येत नाही. अकबर बादशहाला आपल्या या राजवाड्यात पर्शियन कलाशैलीचा उपयोग करावयाचा होता, परंतु वास्तवात भारतीय हिंदू कलाशैलीचा वापर अधिक प्रमाणात झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. ‘दिवान इ आम’ म्हणून ओळखला जाणारा विभाग म्हणजे बादशहा अकबराचा सर्वसामान्य जनतेसाठी भरणारा दरबार होय. ही इमारत अतिशय विस्तीर्ण जागेत पसरलेली आहे. नक्षीदार स्तंभ, जाळीदार पडदे आणि नक्षीदार कमानी अशा शैलीतील ही लांबच लांब इमारत पाहून अकबराचा दरबार कसा असावा याची कल्पना आपण करू शकतो. या ठिकाणी थोडे पुढे आलेल्या चौकोनी मंडपामध्ये बादशहा अकबर आपल्या जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी जनतेसमोर येत असे. दौलत खाना म्हणून ओळखला जाणारा विस्तीर्ण चौक तेथे असणाऱ्‍या एकापेक्षा एक सुंदर वास्तूंच्या सौंदर्याने आपल्याला अगदी मोहात पाडतो. मुघल साम्राज्याच्या आलिशान वैभवाची कल्पना या संपूर्ण शाही राजवाड्यावरून आपल्याला करता येते. त्याचबरोबर, त्याकाळी राजेरजवाडे किती ऐश्‍वर्यसंपन्न जीवन जगत होते याची एक काल्पनिक का होईना पण झलक अनुभवता येते.

‘दौलत खाना’चा शब्दशः अर्थ दौलतीचे घर किंवा धनाची कोठी. या चौकामध्ये अनेक लहानमोठ्या वास्तू आहेत ज्यांचे स्थापत्य अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. यामधील ‘दिवान ए खास’, दिवानखाना ए खास, ख्वाबगाह, अनुप तलाव, तुर्की सुलतानाचा मंडप या व अशा इतरही लहान मोठ्या वास्तू आहेत. दिवान ए खास ही वास्तू प्रामुख्याने अकबराच्या खास दरबारासाठी असावी, जिथे बादशहा अकबर त्याच्या दरबारातील महत्त्वाच्या लोकांबरोबर सल्लामसलतीसाठी बसत असावा. दौलतखानाच्या विस्तीर्ण आवारातील, दिवानखाना ए खास ही जागा म्हणजे अकबराची स्वतःची वैयक्तिक राहण्याची जागा आहे. या ठिकाणी त्याची बसण्याची जागा, झोपण्याची जागा पाहायला मिळते. पहिल्या मजल्यावर अकबराची झोपायची खोली होती ज्याला ख्वाबगाह असे म्हटले जाते. या खोलीत बसून बादशहा अकबर त्याचा संपूर्ण वेळ त्याच्या स्वतःसाठी घालवत असे. महाभारताच्या कथा ऐकणे, त्याला आवडत्या पुस्तकामधील उतारे वाचून घेणे अशा गोष्टी तो स्वतःच्या इच्छेनुसार करत असे. अकबराला वाचता येत नसे. त्यामुळे तो पुस्तक दुसऱ्‍यांकडून वाचून घेत असे. याच ठिकाणी बसून तो राजा बिरबल, तसेच अबुल फजल, सुफी संत यांच्यासह चर्चा करत असे किंवा गप्पा मारत असेही म्हटले जाते. दौलतखाना मधील अनुप तलाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या बंदिस्त तलावाचे बांधकाम फारच आकर्षक आणि कोरीव कामाने नटलेले आहे. मध्यभागी चौरस आकाराचा चौथरा आहे. असे वाटते या ठिकाणी बादशहा अकबरासाठी गाण्याची अथवा नृत्याची महफिल सादर केली जात असावी. या अनुप तलावाला कपूर तालाब असेही म्हटले जात होते. याच्या बाजूलाच तुर्कीच्या सुलतानाचा मंडप या नावाने ओळखले जाणारे अप्रतिम सुंदर बांधकाम आहे. या वास्तूमध्ये असलेले अतिशय सुंदर कोरीव काम पाहिल्यानंतर जणू लाकडामध्ये केलेले काम पाहतो आहे असा भास होतो. दफ्तरखाना किंवा शाही गोष्टींची नोंद ठेवली जात असे ते कार्यालयसुद्धा याच परिसरात पाहायला मिळते. ही लहानशी इमारतही अतिशय सुबक आहे. 

दौलतखानाच्या पलीकडे शाही हरीम किंवा शाही जनानखाना हा विभाग आहे. दोन्हीच्या मधे लालबुंद दगडातून कोरलेल्या जाळीदार पडद्याचा आडोसा आहे. शाही हरीम किंवा हराम सारा म्हणजे राजघराण्यातील स्त्रियांसाठी बांधण्यात आलेले बंदिस्त आवारातील आलिशान महाल. मर्दाना विभाग आणि जनाना महाल यांच्यामध्ये पंचमहाल ही पाच मजली अतिशय सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण इमारत आहे. या पाच मंझीला इमारतीत एकूण १७६ स्तंभ असून त्यातील प्रत्येक स्तंभावरील कोरीव कामात वैविध्य पाहायला मिळते. पंचमहालची इमारत पर्शियन पद्धतीच्या ‘बडगीर’ या शैलीचे अनुकरण आहे असे म्हणतात. सर्व बाजूंनी मोकळ्या असणाऱ्‍या पंचमहालातील खोल्या हवा खेळती राहण्यासाठी आणि कडक उन्हाळ्यात थंडावा मिळवण्याच्या दृष्टीने बांधलेल्या आहेत. त्याची वास्तुशैली खास पर्शियन पद्धतीची आहे. पंचमहालाच्या पलीकडे जोधाबाईचा महाल, बिरबल की कोठी, मरीयमची कोठी अशा काही महत्त्वाच्या वास्तू आहेत. मरीयमची कोठी हे बहुधा अकबराच्या आईसाठी बांधलेली लहान आकारातील कोठी असावी असे मानले जाते. या ठिकाणी जोधाबाईचे स्वतंत्र स्वयंपाकघर आहे. बिरबलाची कोठी म्हणून दाखवली जाणारी इमारत लहान असली तरी अतिशय सुंदर आणि सुबक आहे. परंतु ही कोठी बिरबलाची असण्याबद्दलच इतिहासकारांच्या मनात संशय आहे. जनाना महालांच्या आसपास किंवा या भागात बिरबलाची कोठी का असावी या प्रश्‍नाचे उत्तर त्यांच्याकडे नाही. असो, भूतकाळातील घटनांना इतिहासाच्या पानावर वाचताना त्यामध्ये बऱ्‍याच गोष्टींच्या संदर्भात प्रश्‍नचिन्हे उमटतात. त्यातील काही प्रश्‍न अनुत्तरित राहतात. 

फतेहपूरमधील सर्वात महत्त्वाची वास्तू आहे जामी मस्जीद. सर्वात उंच जागी बांधण्यात आलेली ही विशाल इमारत भारतातील सर्वात मोठ्या आकाराची मस्जीद आहे असे मानले जाते. शेख सलीम चिश्ती या अवलियाच्या प्रती असलेल्या श्रद्धेचे प्रतीक म्हणून या मशिदीची निर्मिती अकबर बादशहाने केली होती. या मशिदीचे बांधकाम साधारण पाच वर्षे सुरू होते आणि १५७१-७२ मध्ये मशीद तयार झाली होती. याच दरम्यान वयाच्या ९५व्या वर्षी सलीम चिश्ती यांचे देहावसान झाले. अतिशय प्रेक्षणीय अशी ही मशीद आणि तिथे असलेला शेख सलीम चिश्ती यांचा दर्गा हे मुसलमानांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान आहे. या दर्ग्याच्या ठिकाणी सलीम चिश्‍ती राहत असे. त्यांच्या मृत्यूनंतर तिथेच त्यांचे दफन केले. मुस्लिमांच्या दृष्टीने हे स्थान अत्यंत पवित्र आहे. जामी मशिदीची भव्यता आणि वास्तुशैली पाहून आपण अकबरी वास्तुशैलीतील वेगळेपण आणि वैभव अनुभवू शकतो. या मशिदीचे उत्तरेकडील शाही प्रवेशद्वार पाहून आपण थक्क होतोच. पण अकबराने मशिदीच्या दक्षिण दिशेस बांधलेला बुलंद दरवाजा पाहून तोंडात बोट घालावे लागते. हा नावाप्रमाणे बुलंद असणारा दरवाजा त्याच्या भव्यतेमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. हा चाळीस मीटर उंच दरवाजा दहा मीटर उंच पायथ्यावर बांधलेला असल्यामुळे त्याची उंची ५२ मीटर आहे. जामी मशिदीच्या भव्यतेमध्ये या बुलंद दरवाजामुळे अधिकच भर पडते. भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि आकाराने सर्वात मोठा दरवाजा म्हणून बुलंद दरवाजाला मान्यता मिळालेली आहे.

खरे सांगायचे तर फतेहपूर सिक्रीच्या या, चारशे वर्षे जुन्या ऐतिहासिक राजधानीचे वर्णन शब्दांत करणे तसे अवघडच आहे... वर्णन तरी कशा कशाचे करणार? अशा अगणित देखण्या वास्तू या शाही महालाच्या आवारात आहेत. त्यांचे सौंदर्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहणेच योग्य ठरेल. चारशे वर्षांपूर्वी आपल्या देशात आलेल्या तिमूर आणि चंगिझखानाच्या भटक्या जमातीच्या वंशजांनी मुघल साम्राज्याचा पाया रोवला. त्यांच्यापैकी सर्वात यशस्वी बादशहा असलेल्या अकबर बादशहाच्या काळात नव्याने वसवलेल्या या राजधानीचे वैभव पाहण्यासाठी कधी ना कधी या खंडहर झालेल्या शहराला भेट देणे अपरिहार्य आहे असे मनापासून वाटत राहते. इतिहास हा इतिहास असतो... ना तो मिटवता येतो, ना तो पुसता येतो. त्याचा स्वीकार करणे हाच एक योग्य पर्याय असतो.

संबंधित बातम्या