ताडोबाच्या जंगलवाटा

डॉ. राधिका टिपरे
सोमवार, 19 एप्रिल 2021

पर्यटन

सफारीसाठी जंगलात जाताना मन अधीर झाले होते. या अशा नीरव समयी निस्तब्ध जंगलाचा अनाहत नाद ऐकण्यासाठी कान आसुसलेले होते. बांबूच्या दाट जाळीतून जाणारे, झुंजूमुंजू धुक्यात हरवलेले लाल मातीचे रस्ते मनाला जणू साद घालीत होते. खरेच, निसर्गाचे अलवारपण अनुभवण्यासाठी जंगलवाटा धुंडाळीत फिरण्यातला मनस्वी आनंद काय वर्णावा?

नवीन वर्षाची सुरुवात ताडोबाच्या जंगलातील मित्रांना भेटूनच करायची या हेतूने तिकडे पोहोचले. पहिल्या दिवशीच्या दोन्ही सफारी कोळसा रेंजमध्ये घेतल्या होत्या आणि त्यासाठी झरी गेटवरून जंगलात प्रवेश करायचा होता. यावेळी साबीरला बरोबर घेतले होते, त्यामुळे पहाटेच्या अंधारात रस्ता शोधण्यात वेळ गेला नाही. कोळसा रेंजमधील जंगल बऱ्‍यापैकी घनदाट आहे. भरपूर गवताळ पट्टे आहेत. त्यामुळे तृणभक्षींची संख्याही चांगली आहे. मुळात मला कोळसा भागातील हे जंगल खूप आवडते. कारण सागवृक्षांची घनदाट झाडी असलेले हे जंगल थोडे अनवट आहे. पांढरपाणी, शिवनझरी, सुकरी बोडी, रायबा झरी, कोळसा तलाव या नावाचे पाणवठे असलेले कोळसाचे जंगल हिरवाईने नटलेले अाहे. या घनदाट झाडोऱ्‍यात विविध प्रकारच्या पक्ष्यांचे वास्तव्यही बघायला मिळते. शिवाय या रेंजमध्ये जीपची फारशी वर्दळ नसते.

सकाळच्या सफारीसाठी जंगलात जाताना मन अधीर झाले होते, कारण जवळजवळ वर्षभरानंतर जंगलाचा तो हवाहवासा वाटणारा गंध नाकात भरणार होता. अजून उजाडलेले नव्हते. या अशा नीरव समयी निस्तब्ध जंगलाचा अनाहत नाद ऐकण्यासाठी कान आसुसलेले होते. बांबूच्या दाट जाळीतून जाणारे, झुंजूमुंजू धुक्यात हरवलेले लाल मातीचे रस्ते मनाला जणू साद घालीत होते. भल्या पहाटे जीपमधून जंगलाच्या या अनवट वाटा धुंडाळताना मन एका अनोख्या प्रसन्नतेने भरून गेले होते. खरेच, निसर्गाचे अलवारपण अनुभवण्यासाठी जंगलवाटा धुंडाळीत फिरण्यातला मनस्वी आनंद काय वर्णावा? आजकाल मला तरी या रानवाटाच जवळच्या वाटतात... 

अशावेळी एखादा निष्णात ड्रायव्हर आणि अगदी अचूकतेने जंगल वाचणारा वाटाड्या बरोबर असेल तर तुमची जंगल सफारी सुफळ संपूर्ण होते हे नक्की. मला झुंजूमुंजू उजेडात, पेंगुळल्या डोळ्यांनी, उजाडलेल्या जगाकडे पाहणाऱ्‍या रानपिंगळ्यांची एक सुरेख जोडी झाडाच्या खोबणीत बसलेली पाहायला मिळाली. फारच गोड दिसत होते ते चिमुकले घुबडपक्षी.

जंगलात शिरल्यानंतर चौफुल्यावर थांबून, मातीत उमटलेले ठसे पाहून मगच कुठल्या वाटेवरून पुढे जायचे हे बऱ्‍याच वेळा ठरवले जाते. साबीर हा ताडोबामध्ये जीपवर ड्रायव्हर म्हणून काम करणारा तरुण या बाबतीत कमालीचा तरबेज आहे. गेली सहा वर्षे तो माझ्याबरोबर येतोय. सकाळच्या सफारीत आम्हाला वाघाचे पगमार्क दिसले. त्यावरून वाघ जवळपास आहे हे कळत होते. म्हणून बांबूच्या जाळ्या आणि पाणवठे शोधून त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु वाघ काही भेटला नाही. त्यात मधेच एका ठिकाणी तुरेवाल्या गरुडाची जोडी झाडाच्या उंच शेंड्यावर ऊन खात बसलेली होती. फोटो काढण्यासाठी थांबलो, पण तोपर्यंत वाघोबा त्याच रस्त्याच्या दुसऱ्‍या टोकावरून चक्कर मारून झाडीत गायबही झाले. 

कोळसाच्या जंगलात एका वाघिणीची दोन पिल्ले रोज एका ठरावीक ठिकाणी ओढ्याच्या बाजूला येत असल्याचे गाइडने सांगितले होते. त्या जागी दोन चार वेळा चकरा मारल्या. जीप बाजूला लावून वाट पाहिली. पण पिल्ले काही बाहेर आली नाहीत. त्यामुळे पहिल्या सफारीत फाके पडले. पण दुपारची सफारी तिथेच घ्यायची होती, म्हणून गेटच्या बाहेरच वाट पाहत बसून राहिलो. बरोबर नेलेले पराठे खाऊन वेळ निभावली. गेटजवळच्या झाडीमध्ये फुलपाखरांची बरीच वर्दळ दिसून येत होती. त्यातही काळ्या आणि मोरपंखी रंगातील एक कमालीचे देखणे फुलपाखरू नजर वेधून घेत होते. त्याचे नाव ‘कॉमन बँडेड पिकॉक’ असल्याचे नंतर कळाले. दुसऱ्‍या सफारीच्यावेळी सुकरी बोडीकडे गेलो. सारे कसे शांत शांत होते... मधेच एखाद दुसरा अलार्म कॉल... माकडांचे खिऽखिऽ... आणि मोराचा केकारव ऐकू येत होता. हळूहळू सगळ्या पाणवठ्यांचे ठेपे धुंडाळून झाले, पण  वाघाचा मागमूस लागत नव्हता. माझे मन थोडे खट्टू झाले... कारण नव्या वर्षाची सुरुवात राजाच्या भेटीने व्हावी या ओढीने जंगल गाठलं होते... पण काय करणार? 

पुन्हा एकदा पिल्ले बाहेर आलीत का पाहण्यासाठी ओढ्याजवळ पोहोचलो. वाघिणीने पिल्ले दुसऱ्‍या जागी नेली असावीत बहुधा! खडबडीत रस्त्यावर पगमार्क दिसणे अवघड होते खरेतर, पण कसे कोण जाणे, साबीरच्या नजरेला रेताड मातीतही वाघाचे ताजे ठसे दिसले आणि त्याने ड्रायव्हरला गाडी पुढे घ्यायला सांगितली. त्यानंतर मात्र साबीरने वाघाच्या पगमार्कचे ट्रॅकिंग करीत करत जीप त्याला हव्या असलेल्या रस्त्यावर घेतली. तेवढ्यात अगदी जवळून सांबर हरणाचा अलार्म कॉलही ऐकायला मिळाला. कॉल कुठल्या बाजूने येतोय हे पाहणेही गरजेचे असते. खरे सांगू, या अशा वेळी श्‍वास रोखून आपणही जंगलाचा कानाकोपरा धुंडाळीत असतो. सोनेरी तांबूस रंगाचे, काळ्या पिवळ्या पट्ट्यांचे ते शोभिवंत जनावर कुठे दिसते का हे पाहण्यासाठी डोळे मोठे करून आपण झाडांचे बुंधे न्याहाळीत काही दिसतेय का हे शोधत राहतो! खरोखर हा अनुभव प्रचंड थरारक असतो. ज्या बाजूने सांबराचा अलार्म कॉल येत होता त्या बाजूला असलेल्या पाणवठ्याकडे जीप घेऊन जाताना मन साशंक होते, कारण आता सूर्यप्रकाशही कमी झाला होता. मुख्य रस्ता सोडून जीप आत वळवली. ‘रायबा झरी’ नावाचा अगदी लहान आकाराचा पाणवठा होता, रस्त्यापासून शंभर मीटर आतमध्ये. पाण्यात पाठमोरा बसलेला वाघ पाहून साबीर हळू आवाजात म्हणाला... ‘मॅडम वाघ!’

तेवढे निमित्त पुरे होते. शांतपणे विसावलेले ते जनावर क्षणभरातच पाण्यातून उठले आणि झाडीत शिरले. जीप पुन्हा मुख्य रस्त्यावर घ्यायला सांगून साबीर मला म्हणाला, ‘काळजी नका करू मॅडम. हेड ऑन फोटो हवाय ना? मग थोडा धीर धरा.’ त्याचे म्हणणे अगदी खरे होते. मुख्य रस्त्यावर जाऊन डाव्या बाजूने जीप पुढे नेली आणि वाट पाहत थांबलो. काही वेळातच तो अतिशय देखणा, तरणाबांड, आकाराने धिप्पाड नर वाघ मुख्य रस्त्यावर आला... मस्त! समोरून चालत येणाऱ्‍या वाघाला पाहणे ही एक अतिशय रोमांचक बाब आहे...‘कॅट वॉक’ का म्हणतात ते वाघाला हेड ऑन चालत येताना पाहिल्यानंतर उमगते! वाघ अत्यंत देखणे जनावर आहे! त्याला जंगलचा राजा म्हणतात ते उगाच नाही हे आपल्या लक्षात येते. मला मनासारखे सुंदर फोटो मिळाले, कारण वाघ आणि आमची जीप यामध्ये दुसरे कुणीच नव्हते. बराच वेळ महाराज आमच्या जीपच्या पाठीमागून निवांतपणे येत राहिले... मी फोटो घेत राहिले.

दुसऱ्‍या दिवशी सकाळी कोअरमधील सफारी अगदीच बोअर झाली. कुणास ठाऊक सगळे वाघ कुठे गायब झाले होते. दुपारची ‘आगरझरी’ रेंजमधील बफर जंगलातील सफारीसुद्धा वाया गेली होती. बांबूच्या जाळीत खोलवर वाघोबा निवांत पहुडले होते... ते काही बाहेर आले नाहीतच! 

  मला ताडोबातील आगरझरीचे बफर जंगल प्रचंड आवडते. एकतर हे जंगल घनदाट आहे आणि मुख्य म्हणजे इरई धरणाच्या काठावरचा बराचसा भाग या रेंजमध्ये सामावलेला आहे. त्यामुळे धरणाच्या काठावरची हिरवीगार कुरणे, पाणथळ जागा आणि आतल्या बाजूला असलेली घनदाट वृक्षराजी हे सगळे पाहायला मिळते. त्यामुळे आगरझरीमध्ये गेल्यानंतर मला पक्षी निरीक्षणाचा आनंदही मनमुराद घेता येतो. या ठिकाणी उंच वाढलेले गवत असल्यामुळे बऱ्‍याच वेळा गव्यांचे कळप चरताना पाहायला मिळतात. त्यामुळे वाघ दिसला नाही तरी इतरही अनेक प्राणी, पक्षी पाहण्याचे भाग्य लाभते हे नक्की. आगरझरीची सकाळची  सफारी प्रचंड आनंद देऊन गेली. एकतर सकाळी सकाळी सूर्योदयापूर्वी इरई धरणाचे सुंदर दृश्य नजरेत साठवून घेता आले. गेटमधून आत शिरताच, आंबेझरीजवळ पगमार्क अगदी ठळकपणे दिसत होते. तरी वाघाचा ठावठिकाणा कळत नव्हता. मग दुसरीकडचे ठेपे तपासायला गेलो, पण तिथेही निराशा पदरी पडली. त्यामुळे पुन्हा आंबेझरीच्या भागात परत यायचे ठरवले. कारण इतर जीप दिसत नव्हत्या. बहुधा सगळ्या जीप त्या ठिकाणी गोळा झाल्या असाव्यात असे आमच्या ड्रायव्हरच्या लक्षात आले आणि त्याने जीप दामटवली. मात्र वाटेत वेगाने रस्ता ओलांडणारा बिबट्या पाहून साबीरने जीप थांबवली. खरेच, त्याच्या तीक्ष्ण नजरेचे कौतुक करावे तेवढे थोडेच. धुक्यात लपेटलेल्या रस्त्यावर दुरून दिसणारा बिबट धूसर का होईना, पण कॅमेऱ्‍यात पकडता आला आणि मला खूप आनंद झाला. पण खरा आनंद तर पुढच्या काही मिनिटांतच अनुभवायला मिळाला. कारण आंबेझरीमध्ये मधू या वाघिणीचे अलीकडेच वेगळे झालेले दोन बच्चे जोडीने गवताच्या आडोशातून बाहेर पडले होते... माय गॉड... व्हॉट अ साईट! डोळ्यांचे पारणे फिटले! रस्त्याच्या दोन्ही टोकाला जीप उभ्या होत्या आणि ते नवखे सब अ‍ॅडल्ट बच्चे अतिशय दमदार पावले टाकीत चालत होते. साबीरने ड्रायव्हरला जीप रिव्हर्स घ्यायला लावली. त्याच्या सूचनेप्रमाणे ड्रायव्हरने जीप रिव्हर्स घेतली आणि वळवून पुन्हा मधल्या गल्लीत घुसवली. साबीरच्या अंदाजानुसार दोन्ही वाघ वळून त्याच रस्त्यावर आले होते आणि त्यांच्या समोर केवळ दहा फुटांवर आमची जीप होती. ताडोबाच्या जंगलात गेले, की हे असे घबाड हाती लागल्याचा आनंद मिळतो!

जंगलात गेल्यावर वाघ कुठे, कसे 

आणि कधी भेटतील हे नक्की सांगणे तसे कठीणच असते. पण वाघांचे ठसे पाहून त्याला कसे ट्रॅक करायचे यात माहीर असणारा वाटाड्या आणि ड्रायव्हर सोबत असेल तर वाघ पाहण्याचे स्वप्न पूर्ण होणे अवघड नसते.

संबंधित बातम्या