माउंटेनिअरिंगचा थरार

डॉ. संगीता देशपांडे, औरंगाबाद
सोमवार, 14 जून 2021

पर्यटन

मी धावेन, चढेन, पडेन, परत उठेन; पण थांबणार नाही. विविध साहसी गोष्टींची आवड मला होतीच आणि त्यातलेच एक म्हणजे गिर्यारोहण. मला कायमच माझे मूळ हे पर्वतांच्या राशीत असल्याचे जाणवते, त्यामुळे गिर्यारोहण हा पहिल्यापासूनच माझ्यासाठी कुतूहलाचा विषय आहे. 

निसर्गाच्या सान्निध्यात, निसर्गाच्या सतत बदलत्या रूपाचा सातत्याने यशस्वीरीत्या सामना करत पुढे जाणे हे खूपच आव्हानात्मक आहे. म्हणूनच माउंटेनिअरिंग किंवा गिर्यारोहण करत असताना आपल्या शारीरिक क्षमतेचा तर कस लागतोच, परंतु सर्वात महत्त्वाचा मंत्र म्हणजे मानसिक क्षमताही कळते. तरुण असल्यापासूनच माउंटेनिअरिंगचा कोर्स करण्याचे स्वप्न होते, परंतु काही कारणास्तव ते अपूर्णच राहिले होते. तिथे ट्रेनिंग घेताना निसर्ग हा एकच आपला गुरू असतो आणि त्यामध्ये महत्त्वाचे दोन नियम तुम्हाला शिकावे लागतात, त्यामध्ये एक म्हणजे डिटरमिनेशन टू लिव्ह आणि दुसरे, एलिमिनेशन ऑफ फीअर! 

माउंटेनिअरिंग कोर्स गिर्यारोहणाबरोबरच निसर्गाची आवड असणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी करण्यासारखा आहे. त्यामुळे निसर्गाबद्दल आदर व निसर्गाच्या बदलत्या रूपांबरोबर एकरूप होऊन राहण्यासाठीचा प्रयत्न, वेगळी अनुभूती देऊन जातो. इथे प्रतिकूल परिस्थितीत न घाबरता जगण्याचा प्रयत्न करावा लागतो. तसेच तिथे राहताना कमीत कमी गोष्टींचा वापर करायला लागतो. जगण्यासाठी फार गोष्टींची गरज नसते, याची तुम्हाला नकळत व तीव्र जाणीव होते. 

आपल्याकडे पाच संस्था शास्त्रशुद्ध माउंटेनिअरिंगचे ट्रेनिंग देतात. हिमाचल प्रदेशमधील अटल बिहारी वाजपेयी माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ४३ जणांमध्ये माझी निवड झाली. त्यापैकी ३८ जणांनी शिबिर यशस्वीरीत्या पूर्ण केले. माझे वय त्रेपन्न असल्याने माझ्यासाठी हा कोर्स खूपच आव्हानात्मक होता. परंतु तिथे गेल्यानंतर तिथली शिस्त, शास्त्रशुद्ध माउंटेनिअरिंग ट्रेनिंग टेक्निक शिकवण्याची पद्धत टप्प्याटप्प्याने नकळत कळत गेली. अतिशय खडतर टप्प्यांचा सराव, अक्लमटायझेशन ट्रेनिंग इतके सहज होत गेले की आपण हे कधी शिकलो ते कळलेच नाही. पहिली शिकवण होती, ‘नेचर के साथ चलो वो कभी धोका नही देता।’ अक्षरशः महिनाभर या कोविड युगात कुणालाही साधी सर्दीसुद्धा झाली नाही. म्हणजे निसर्गाच्या नियमाप्रमाणे तुम्ही झोकून दिले 

तर निसर्ग तुमची पाठराखण करतो. दुसरी शिकवण खूप भावली, ‘डोंगरांचा आदर करा.’ तिथले ट्रेनर/टीचर अक्षरशः झपाटल्यासारखे डोंगरांबद्दल अतिशय आदराने बोलतात. तिथे स्वच्छता पाळायला सांगतात. काही टेक्निक शिकवताना तिथल्या परिसरात कुठलाही धक्का लागू नये यासाठी जिवाचे रान करतात आणि इको-फ्रेंडलीचा धडा तुम्हाला नकळत मिळतो. 

ट्रेनिंगमध्ये कठीण शारीरिक व मानसिक सराव, जुमारिंग, रॅपलिंग, कृत्रिम व नैसर्गिक पद्धतीने रिव्हर क्रॉसिंग, कृत्रिम व नैसर्गिक रॉक क्लायम्बिंग, आईस क्राफ्ट स्नो क्राफ्ट, आपत्कालीन परिस्थितीमध्ये म्हणजे भूकंप, पूर, भूस्खलन, आग, त्सुनामी यामध्ये स्वतःची काळजी घेत इतरांना वाचवण्याचे कौशल्य शिकवतात. तसेच गिर्यारोहणासाठी लागणाऱ्या साहित्याची माहिती देतात व विविध प्रकारच्या दोरीच्या गाठी शिकवतात. काही विद्यार्थी १८ ते ३५ वयोगटातील असल्याने खूप नवनवीन गोष्टी शिकता आल्या. जीवनाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन, त्यांची जिद्द, तंत्रज्ञानाचा अत्यंत सुंदर वापर, माउंटेनिअरिंगच्या नवनव्या टर्मिनॉलॉजी सहज आत्मसात करता आल्या. 

विद्यार्थ्यांप्रमाणे वर्गात बसून शिकणे व परत विद्यार्थी होणे हे माझ्या मनाला चैतन्य देऊन गेले. तेथील दिवस साडेपाच वाजता सुरू होई. रनिंग केल्यानंतर २० किलोची बॅग पाठीवर घेऊन पाच ते सात किलोमीटर चालून झाल्यावर नाश्‍ता होई. त्यानंतर रॉक एरियात जाऊन नवीन नवीन टेक्निक आत्मसात करत असू व परत खाली येऊन वर्गात बसून शिकत असू. नंतर पाचपासून कसरत करत असू. साडेसात वाजता जेवणाची सुटी होत असे. जेवणानंतर पुन्हा प्रॅक्टिस असे आणि रात्री ८.४० वाजता शेवटचा कॉल असे. हा पहिला टप्पा होता. 

दुसऱ्या टप्प्यात २५ किलोची बॅग घेऊन १४ किलोमीटर ट्रेक सुरू झाले. सोलान आला या ठिकाणी पहिला कॅम्प होता. तिथे पुढचे दोन ते तीन दिवस अधिकाधिक उंच चढत आणि उतरत राहिलो. यामुळे तुमचा स्टॅमिना वाढतो, तसेच लाल रक्तपेशींमधली ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढते. अति उंचीवर त्रास होऊ नये म्हणून ही कसरत करून घेतात.

तिसऱ्या टप्प्यामध्ये सततच्या बर्फवृष्टीमध्ये वर जाऊन बर्फ साफ करणे, पाच-सहा वेगळी टेक्निक्स आत्मसात करणे यात मानसिक आणि शारीरिक कस लागतो. यात बर्फात, हिमनदीवर चालण्यासाठी प्रत्येक पावलागणिक तुम्हाला श्रम करावे लागतात. तेथील बर्फात घालण्याचे बूट व क्रँपॉन तर अडीच अडीच किलोचे असतात. ते घालून चालण्याची सवय सरावाने होते. खडकाळ टप्प्यातून वर जाताना कसोटीच असते. मात्र तेवढ्या उंचीवर गरमागरम चहा व जेवणाचे अमृततुल्य सुख हे मात्र वेगळीच ऊर्जा देऊन जाते.

शेवटचे तीन दिवस वातावरण एकदम खराब झाले, दृश्‍यमानता शून्य होती. रात्री अंधारात दर दोन तासांनी तंबूवरचा बर्फ काढणे म्हणजे दिव्यच होते. आता काय होणार किंवा कशाला आलो हा विचार मनात येत होताच. पण आमचे प्रशिक्षक गाणी म्हणून, आमच्याशी गप्पा मारून आम्हाला सतत प्रोत्साहन देत होते. तेही आमच्याबरोबर दोन दिवस झोपले नाहीत. तिसऱ्या दिवशी वातावरण खूपच खराब झाल्याने गाशा गुंडाळण्याच्या सूचना मिळाल्या. रात्री दोन वाजता निघून त्या बर्फातून कशीतरी वाट काढत आम्ही पहाटे

पाच वाजता खाली म्हणजे धोंडीच्या रस्त्यावर पोहोचलो. वर निसर्गाचे वेगळेच रूप दिसले होते. रात्री डोंगर अतिशय भयाण दिसतात. वर निसर्गाचे वेगळेच रूप दिसले होते. हे सगळेच चित्तथरारक होते!

खाली इन्स्टिट्यूटमध्ये आल्यावर परीक्षा व कम्प्लिशन सेरेमनी होती. खाली आल्यावर काहीतरी मिळवल्याचे समाधान होते. स्वतःच्या क्षमतेवर ठेवलेला विश्‍वास सार्थ ठरला होता. सर्वांनी एकदा तरी माउंटेनिअररिंग कोर्स करावा, असे वाटून गेले. त्यामुळे कमीतकमी वस्तूंचा वापर करून गरजा पूर्ण करणे, निसर्गाप्रती आदर ठेवणे या गोष्टी शिकायला मिळतात. हिमालयाला नमस्कार करून परतीच्या प्रवासाला लागलो, परंतु अजून मन तिथेच होते.

संबंधित बातम्या