हिमालयाचे विराण सौंदर्य

डॉ. संजीव भंडारी, सोलापूर
सोमवार, 16 ऑगस्ट 2021

पर्यटन

हिमालय त्याच्या भव्यतेने व निसर्ग सौंदर्याने नेहमीच पर्यटकांना भुरळ पाडत आलेला आहे.  ‘साद घालती हिमशिखरे’ या उक्तीप्रमाणे हिमालय मलाही नेहमीच साद घालत आलेला आहे आणि त्यामुळेच पूर्वेकडील सिक्कीमपासून पश्चिमेला काश्मीरपर्यंत अनेक वेळा डोळे भरून हिमालयाचे निसर्गसौंदर्य पाहण्याची संधी जमेल तेव्हा मी घेतली होती.  मात्र लडाखच्या दुर्गम भागात दहा वर्षे आधीपर्यंत पर्यटकांचा फारसा वावर नसल्याने तेथे जाण्याची संधी आत्तापर्यंत कधी मिळाली नव्हती... 

सोलापूर आय.एम.ए. शाखेचा अध्यक्ष झाल्यावर आमच्या २८ सदस्यांची ट्रिप लेह-लडाखला नेण्याचे मी ठरवले.  आमच्या टूरचे नियोजन करीत असताना एका मित्राने सुचवले, की तुम्ही जाताना विमानाने लेहला न जाता श्रीनगरहून लेहला कारगिल मार्गे NH-1D या रस्त्याने दोन दिवसांचा ४३४ किलोमीटरचा प्रवास करून जा. त्याचे दोन फायदे असे की हळूहळू वर चढत गेल्यामुळे अतिउंचीवरील विरळ ऑक्सिजनची शरीराला सवय होते व त्रास होत नाही आणि शिवाय जगातील एका अत्यंत सुंदर अशा रस्त्याने प्रवास करण्याचा योग येईल!  त्याचा हा बहुमूल्य सल्ला खरोखरच खूप उपयोगी ठरला.  सोलापूरहून आम्ही मुंबईमार्गे विमानाने श्रीनगरला पोहोचलो. श्रीनगरपासून पूर्ण लेह-लडाखच्या टूरची व्यवस्था श्रीनगरच्या यासीन दर या आमच्या एजंटने खूप सुंदर केली होती. श्रीनगर ते लेह रस्त्यावर आणि पुढे पूर्ण लडाखमध्ये सतत अत्यंत कठीण घाटाचे रस्ते असल्यामुळे जीप व्यतिरिक्त  फक्त टेम्पो ट्रॅव्हलर जाऊ शकतात. त्यामुळे आमच्यासाठी अशा दोन गाड्यांची व्यवस्था त्यांनी केली होती. 

दुपारी बारा-साडेबारा वाजता श्रीनगरला पोचल्यावर त्या दिवशी दुपारी आणि संध्याकाळी मुघल गार्डन्सना भेट व दाल लेकमध्ये शिकारा राईड करून रात्री हाऊसबोटवर राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघून देवदार वृक्षांच्या जंगलाने व्यापलेल्या नयनरम्य उंच पर्वतराजी पाहत सिंधू नदीच्या काठाकाठाने आम्ही सोनमर्गमार्गे कारगिलकडे प्रस्थान केले. सोनमर्गनंतर हा रस्ता अत्यंत खडतर असून रस्त्यात सतत अत्यंत कठीण घाट आहेत आणि दोन्ही बाजूला मान वर करून बघावी लागतील एवढी उंचच उंच हिमालयातील खडी शिखरे आहेत. BROचे (Border Road Organisation) खरोखर कौतुक करायला पाहिजे. हा रस्ता सतत चालू राहावा यासाठी ते खूप कष्ट घेतात. लष्कराच्या दृष्टीने हा रस्ता खूप महत्त्वाचा असल्यामुळे त्याकडे विशेष लक्ष दिले जाते आणि हिमवर्षाव थांबल्या थांबल्या मार्च-एप्रिल पासूनच हा रस्ता चालू करण्यावर भर दिला जातो, जेणेकरून मे महिन्याच्या मध्यानंतर या रस्त्यावर लष्कराच्या गाड्या जा-ये करू शकतील. आम्ही गेलो तेव्हा रस्त्यामध्ये दोन-तीन ठिकाणी कडे कोसळल्यामुळे काही वेळ रस्ता मोकळा होईपर्यंत थांबावे लागले, पण आजूबाजूच्या भव्य रांगड्या हिमालयाचे सौंदर्य असे होते की वेळ कसा गेला काही कळले नाही. त्यानंतर अत्यंत दुर्गम आणि या रस्त्यावरील सर्वात थरारक अशा ‘झोजि ला पास’ला आम्ही पोहोचलो. लडाखच्या भाषेत ‘ला’ म्हणजे डोंगरातील खिंड. सर्वदूर गोठलेल्या हिमनदीतील बर्फच बर्फ पसरला होता. थोडावेळ तिथे बर्फात खेळून आणि स्नोबाइक्स मधून दूरवर चक्कर मारून आम्ही पुढे निघालो.

त्यानंतर जगातील दोन नंबरचे थंड ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या द्रास या गावाच्या आणि कारगिलच्या मधे असलेल्या ‘कारगिल वॉर मेमोरियल’ला भेट देण्याचा योग आला. प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये मे ते जुलै १९९९मध्ये झालेल्या कारगिल युद्धाला एक विशेष स्थान आहे आणि या युद्ध स्मारकाला भेट दिल्यानंतर मन अभिमानाने भरून येते! येथे एका पिंक सँडस्टोनच्या भिंतीवर ब्रास प्लेटवर धारातीर्थी पडलेल्या जवानांची नावे लिहिलेली आहेत. त्यासमोर तैनात असलेले आपले जवान ‘ऑपरेशन विजय’ दरम्यान टायगर हिल, टोलोलिंग पीक, बत्रा टॉप यासारख्या दुर्गम शिखरावर पाकिस्तानबरोबरच्या आमच्या सैन्याच्या विजयी धैर्यपूर्ण युद्धाच्या थरारक कहाण्या सांगतात, तेव्हा अंगावर काटा आल्याशिवाय राहात नाही. तेथे असलेल्या म्युझियममध्ये एका चित्रफितीद्वारे संपूर्ण युद्धाचा पटच जणू आपल्या डोळ्यासमोर उलगडला जातो. तेथे १०० फूट उंच फ्लॅग पोस्टवर फडफडणाऱ्या भारतीय ध्वजाला मानवंदना दिल्याशिवाय राहवत नाही. कारगिलमधील आरामदायक हॉटेलमध्ये रात्र घालवून नाश्त्यानंतर आम्ही ‘नमकी ला’ आणि या रस्त्यावरील सर्वोच्च १३,५०० फूट उंचीवरील ‘फोटु ला’ पासमार्गे लेहकडे निघालो. आता हिमालयाचे रूप एकदमच बदलून गेले होते. हिरव्यागार पर्वतरांगांची जागा आता वैविध्यपूर्ण रंग आणि आकाराच्या उघड्या बोडक्या विराण पर्वतरांगांनी घेतली होती. येथून पुढील सात दिवस लेहच्या वास्तव्यात अशा उघड्या बोडक्या अप्रतिम डोंगरांच्या सौंदर्याने आपण थक्क होऊन जातो! संध्याकाळी लेहला पोहोचण्यापूर्वी आम्ही रस्त्यातील अनेक सुंदर स्थळे - लामारायू मठ, मूनलँड, झांस्कर आणि सिंधू या नद्यांचा संगम, गुरू पाथर साहिब गुरुद्वारा आणि मॅग्नेटिक हिल येथे भेट दिली. मॅग्नेटिक हिलवर गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध आपल्या डोळ्यासमोर आपली बस उलटी उताराकडून चढाकडे आपोआप जाताना बघून खरेच असे होते आहे की हा नजरेचा खेळ आहे हे समजत नाही. 

लेह (उंची ११,५०० फूट) आता बरीच चांगली हॉटेल्स आणि गजबजलेली बाजारपेठ असलेले पर्यटकांचे आकर्षण केंद्र झाले आहे. आमचा मुक्काम लेह येथील सिटी पॅलेस या थ्रीस्टार हॉटेलमध्ये होता. तेथील छान खोल्या, चवदार खाद्य आणि तत्पर सेवेमुळे आमची या ट्रीपमधील निवासव्यवस्था संस्मरणीय झाली. आमचा २८ जणांचा ग्रुप असल्यामुळे रोज संध्याकाळी अंताक्षरी, कॅम्प फायर, कॅरिओके आणि रात्री फेलोशिपबरोबर आमचा आठवड्याभराचा वेळ खूपच छान गेला.

लेह व एकूणच लडाखमध्ये तिबेटी संस्कृतीचा फार मोठा प्रभाव आहे. तिथे अनेक बौद्ध मॉनेस्ट्री आहेत. लेहमधील दुसऱ्‍या दिवशी आम्ही थिकसे आणि हेमिस मॉनेस्ट्रीला भेट दिली. नंतर उंच डोंगरावर असलेल्या शांति स्तूप या बौद्ध धर्मियांच्या स्थळाला भेट दिली. उंचावरून लेह व आजूबाजूच्या पर्वतरांगा हे दृश्य अतिशय रमणीय दिसत होते. याशिवाय तेथील प्रसिद्ध लेह पॅलेस आणि शे पॅलेस यांनाही भेटी दिल्या. संध्याकाळी लेहपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘हॉल ऑफ फेम’ या भारतीय सैन्याने भारत-पाक युद्धातील वीरांना श्रद्धांजली म्हणून बांधलेल्या म्युझियमला भेट दिली. ‘कारगिल वॉर मेमोरियल’प्रमाणे येथेही वीर जवानांच्या शौर्यकथा ऐकून व त्यावरील चित्रपट पाहून मन अभिमानाने भरून येते. या म्युझियममध्ये विविध विभागात अनेक हत्यारे, शत्रूचा पकडलेला दारूगोळा, सियाचिनच्या अतिदुर्गम भागात वापरले जाणारे सैन्याचे साहित्य, कारगिल युद्धातील वीर जवानांचे फोटो अशा अनेक गोष्टी भारतीय सैन्याच्या वीरतेच्या गाथा गातात. लेह भेटीत प्रत्येक भारतीयाने आवर्जून पाहावे असे हे ठिकाण आहे! दुसऱ्‍या दिवशी सकाळी आम्ही पॅनगॉन्ग लेककडे निघालो. एकूण सर्व १४७ किमी. प्रवास उंच उंच डोंगरावरील घाट रस्त्यांवरून नागमोडी वळणे घेत जातो. मधे १७,६०० फूट उंचीवरील एक अतिशय सुंदर ‘चांग ला पास’ या खिंडीतून जावे लागते. हा जगातील तिसरा सर्वोच्च पास पासून सगळीकडे नुकताच पडलेला मऊ बर्फ होता. तिथे सर्वांनी लहान मुलाप्रमाणे ताज्या बर्फात बरीच मस्ती केली आणि हिमवर्षावदेखील अनुभवला!

पॅनगॉन्ग लेक १२५ किमी लांब असून त्याचा दोन तृतीयांश भाग चीनमध्ये आहे. सध्या भारत आणि चीनमधील तो एक वादग्रस्त मुद्दा म्हणूनही चर्चेत आहे. या तलावाचे पाणी निळेशार, मयूरपंखी आहे. चारी बाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या या लेकच्या काठी अनेक तंबू असलेली निवासव्यवस्था उपलब्ध आहे. त्यापैकीच एकामध्ये आम्ही रात्रीचा मुक्काम केला. तलावाचे पाणी अतिशय थंड असल्यामुळे अर्धा मिनीटदेखील त्याच्यामध्ये पाय सोडणे अवघड होते. प्रत्यक्षात टूरच्या तारखांचे नियोजन अशा प्रकारे केले होते, की पॅनगॉन्ग लेक येथे पौर्णिमेची रात्र असेल. रात्री अतिशय थंडी असूनसुद्धा आमच्या सर्व सदस्यांनी सूर्यास्त, पौर्णिमेच्या चंद्राचा उदय व नंतर त्याचे तलावात पडलेले सुंदर प्रतिबिंब आणि शेवटी दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सौंदर्याचा अवर्णनीय आनंद लुटला. या एकाच सूर्योदयाने ट्रीपचे सार्थक झाल्याचा अनुभव आला!

दुसऱ्या दिवशी निघून लेहला पोहोचल्यावर संध्याकाळी आम्ही निवांतपणे लेहच्या मार्केटमध्ये खरेदीसाठी फिरलो आणि काही उत्साही मंडळींनी भाड्याच्या मोटर बाईक घेऊन बऱ्याच लांबपर्यंत जाऊन बाईकिंगचा अनुभव घेतला. 

पुढील दिवशी आम्ही झांस्कर नदीत ‘व्हाइट वॉटर रिव्हर राफ्टिंग’च्या रोमांचकारी अनुभवासाठी गेलो. श्रीनगर रस्त्यावरील सिंधू आणि झांस्कर नदीच्या संगमापासून अतिशय अरुंद व दोन्ही बाजूला उंचच उंच सुंदर विराण झांस्कर पर्वतरांगांच्या खोलवर दडलेल्या खोऱ्यातून गाडीने आम्ही राफ्टिंगची जेथून सुरुवात होते त्या ठिकाणी पोहोचलो. आमच्यातील बरेचजण पहिल्यांदाच  राफ्टिंग करत होते आणि अज्ञाताची धास्ती व एक कुतूहल या दोन्हींचे मिश्र भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. नंतर थंडगार बर्फाच्या पाण्यातून आजूबाजूचे सौंदर्य न्याहाळत व रॅपिड्समध्ये जीव मुठीत धरून घेतलेला हा एक रोमांचक अविस्मरणीय अनुभव होता. लेहला जाणाऱ्या अनेकांना या राफ्टिंगविषयी कल्पना नसते, पण झांस्कर नदीच्या खोऱ्यातून जवळपास तीन तासांचा २५ किलोमीटर राफ्टिंगचा हा सुंदर थरारक अनुभव खरोखर चुकवू नये असाच आहे.

लेहहून आमचा दुसरा प्रवास १३० किलोमीटरवरील अतिशीत वालुकामय खोरे म्हणून प्रसिद्ध असलेल्या नुब्रा व्हॅली येथे होता. अतिशय कठीण व उभ्या अशा कड्यावरील नागमोडी वळणाच्या घाटातून प्रथम आम्ही १८,३८० फूट उंचीवर असलेल्या, गाड्या जाऊ शकत असलेल्या जगातील सर्वात उंच ‘खारडुंग ला पास’ या खिंडीत पोहोचलो. तेथे कमी ऑक्सिजनमुळे जास्त वेळ थांबण्यात धोका असल्यामुळे पटापट काही फोटो काढून आम्ही पुन्हा भरपूर खाली उतरत नुब्रा व्हॅलीत पोहोचलो. येथेदेखील अनेक कॅम्पिंग साइट आहेत, जेथे आपल्याला तंबूंमध्ये राहावे लागते. या भागात आढळणाऱ्या ‘डबल हम्प’ उंटांवरून हिमालयातील या वाळवंटातून आम्ही फेरफटका मारला आणि नंतर शेजारील उंच वाळूच्या टेकडीवर जाऊन मनसोक्त वाळूमध्ये खेळलो. रात्री निरभ्र आकाशाखाली तेथील निरव शांततेत तंबूसमोरील उघड्या भागात आम्ही गाणी म्हणत आणि गप्पा-विनोद करीत छानपैकी कॅम्प फायरचा अनुभव घेतला. 

दुसऱ्या दिवशी आरामात निघून रस्त्यातील डिक्सित मॉनेस्ट्री व इतर छोट्या-मोठ्या गोष्टी बघत पुन्हा एकदा ‘खारडुंग ला’ पासमार्गे आम्ही संध्याकाळपर्यंत लेहला पोहोचलो. पुढील दिवशी सकाळी लवकरच दिल्लीला जाण्यासाठी फ्लाइट असल्यामुळे सर्वजण सामान आवरून लगेच निद्राधीन झाले. लेह-लडाखच्या या ट्रिपचे दहा दिवस कसे गेले हे खरोखर समजले नाही आणि निघताना सर्वांच्या मनाला एक प्रकारे रुखरुखच लागली होती. पण प्रत्येक सुंदर गोष्ट कधी ना कधीतरी संपणारच! परतीच्या प्रवासात आकाशातून बर्फाच्छादित हिमालयाचे सुंदर रूप डोळ्यात साठवत आम्ही दिल्लीमार्गे मुंबईला परतलो ते मनाशी ठरवूनच की आयुष्यात पुन्हा एकदा तरी लेह-लडाखला भेट द्यायचीच!

संबंधित बातम्या