मनमोहक नंदी हिल्स

दुर्गेश मडवळ, मालवण
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

नंदी हिल्सच्या टेकडीवरून सूर्योदय पाहणे म्हणजे तांबड्या फुटीने दिलेली ललकारीच जणू. पहाटेच्या प्रहरी पांढऱ्याशुभ्र ढगांमधून डोकावणारा सूर्यनारायण आणि मधेच वाऱ्याची शांत, पण थंडगार झुळूक मनाला स्पर्शून जात होती. सारा आसमंत जणू आपल्याला खाली ढगांचे गालिचे करून साद घालीत आहे असे वाटत होते. निसर्गाची अशी किमया पाहून डोळे विस्फारले नाहीत तर नवलच... 

आज मैं उपर आसमान नीचे
आज मैं आगे जमाना है पिछे

खामोशी या चित्रपटातील हे गाण्याचे बोल प्रत्यक्षात मला अनुभवायला मिळाले ते नंदी हिल्स या बंगळूरमधील लोकप्रिय अशा हिल स्टेशनवर. आपल्या देशात निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली उधळण क्षणाक्षणाला आपल्या नजरेचे पारणे फेडतेच, पण त्याबरोबरच आपल्यात एक दर्जेदार ऊर्जा तेवढ्याच क्षमतेने निर्माण करते ते वेगळेच... नंदी हिल्सची स्तुती करायची झाली, तर मी म्हणेन पहाटेच्या ऊर्मीचा मनमोहक देखावाच जणू! खरे तर निसर्गापुढे अजून तरी श्रेष्ठ असा कलाकार कोणी नाहीच. त्याच्या अदाकारीचा एक अंशभाग बघायचा झालाच, तर मात्र तुम्हाला नंदी हिल्सला भेट द्यावीच लागेल हे नक्की.

डिसेंबरमध्ये बऱ्याच दिवसांनी एक प्रवासाची संधी मिळाली, तीपण बंगळूरला जाण्यासाठी. तसेही मागच्या जूनच्या सुरुवातीला माझ्या बकेट लिस्टमध्ये मी बंगळूरचे हे ठिकाण आवर्जून समाविष्ट केलेले होतेच. आत्ता तर लगेच तयारीला सुरुवात झाली आणि गुगलभाऊच्या मदतीने आमचे पुढील नियोजन सुरू झाले. सिंधुदुर्ग ते गोवा आणि गोवा ते बंगळूर असा प्रवास करून सकाळच्या आल्हाददायक वातावरणात बंगळूर शहरामध्ये एकदाचा पोचलो. बंगळूरमधील काही मोक्याची कामे क्षणार्धात करून आमची स्वारी निघाली नंदी हिल्सच्या दिशेने. ऐतिहासिक वारसा असलेल्या गावात लोकसंख्या तशी विरळच. योगायोगाने त्याच गावात राहण्याची संधीपण मिळाली. दोन-तीन दिवस का होईना पण ग्रामीण जीवन, स्थानिक लोक यांना जवळून पाहण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा अनुभव मात्र निराळा आणि मनाला थेट भावणारा होता.

आत्ता थोडीशी रंजक सफर आपण या नंदी हिल्सची करूया. कर्नाटक राज्यातील चिकबल्लापूर जिल्ह्यात नंदी हिल्स (नंदीदुर्ग) हा गंगा राजवंशाने बांधलेला प्राचीन टेकडी किल्ला आहे. टिपू सुलतानने तो वाढविला व मजबूत केला. हे ठिकाण चिकबल्लापूरपासून कमीत कमी १२ किमी आणि बंगळूरपासून ६५ ते ७० किमीच्या अंतरावर आहे. सूर्योदय पाहण्यासाठी हे ठिकाण लोकप्रिय तर आहेच, पण त्याचबरोबर येथे भारताने आयोजित केलेल्या पहिल्यावहिल्या सार्क शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

गावकऱ्यांकडून नंदी हिल्स नावाच्या उत्पत्तीविषयी बरीच रोमांचक माहिती मिळत होती, ती ऐकली व समजूनपण घेतली. पूर्वी नंदी हिल्सला आनंदगिरी म्हणत आणि एक सिद्धांत असा आहे, की या टेकडीवर एक द्रविडकालीन नंदीचे मंदिर आहे, त्यावरूनच नंदी हिल्स हे नाव प्रचलित झाले.

नंदी हिल्स बाईकस्वारांसाठी तर पर्वणीच आहे. चांगले पण वळणावळणाचे घाटरस्ते आणि थंडगार हवेच्या झोतात हे अंतर पार पाडणे म्हणजे अविस्मरणीय अनुभव! अर्थातच आम्हाला तो अनुभव घेण्याची उत्कंठा तर होतीच व ती आम्ही पूर्ण केलीच म्हणा. पहाटे चार वाजल्यापासून भल्यामोठ्या वाहनांच्या रांगा आणि माणसांची वर्दळ हे तिथे नेहमीचेच दृश्‍य. नंदी हिल्सच्या टेकडीवरून सूर्योदय पाहणे म्हणजे तांबड्या फुटीने दिलेली ललकारीच जणू. पहाटेच्या प्रहरी पांढऱ्याशुभ्र ढगांमधून डोकावणारा सूर्यनारायण आणि मधेच वाऱ्याची शांत, पण थंडगार झुळूक मनाला स्पर्शून जात होती. सारा आसमंत जणू आपल्याला खाली ढगांचे गालिचे करून साद घालीत आहे असे वाटत होते. निसर्गाची अशी किमया पाहून डोळे विस्फारले नाहीत तर नवलच. रममाण होऊन सुंदर सूर्यदर्शन सुरू असताना त्यात भर घालते ती नंदी हिल्सवरील कॉफी. तीपण तेवढीच सुंदर आणि चविष्ट. या कॉफीचा एक एक घोट घेता-घेता बाकीच्या प्रेक्षणीय स्थळांची खातरजमा करून आपसूकच पावले त्या ठिकाणी वळली. हा संपूर्ण परिसर कर्नाटक पर्यटन विकास महामंडळाच्या अधिपत्याखाली आहे. महामंडळाने स्वच्छता व सुरक्षितता यांची पुरेपूर काळजी घेतलेली जागोजागी दिसत होती. त्यात आणखी एक सोयीचा मार्ग म्हणजे सर्व प्रेक्षणीय स्थाने जवळपास रस्त्यांनी जोडणी केलेली आहे. त्यामुळे चारचाकी वाहनाने तुमची सफर अजूनही आनंददायक होऊ शकते. भोवताली फेरफटका मारण्यासाठी सायकलची सोय उल्लेखनीय आहे. एकंदरीत तुम्ही मित्रांबरोबर या किंवा कुटुंबाबरोबर, ही ट्रिप तुमच्यासाठी आनंददायक ठरेल हे मात्र नक्की...

नंदी हिल्स गाठायचा आणखी एक मार्ग म्हणजे ट्रेक. ज्यांना ट्रेकिंगचा पूर्वानुभव नसेल किंवा कोण नवशिके असतील, तरीही तुम्ही हा ट्रेक निवांतपणे व सुरक्षितपणे पार पाडू शकता. पायऱ्यांचे विशिष्ट बांधकाम आणि आजूबाजूची जैवविविधता तुमच्या आनंदात शेवटपर्यंत भरच घालत राहते. हा परिसर घनदाट जंगलाचा असला, तरी टेकडीवर राहण्याची सोय व रेस्टॉरंट उत्तम आहे. विद्युत रोषणाई तसेच इतर आवश्यक बाबींची पूर्तता योग्यरीतीने केलेली आढळली. टेकडीवरचे मंदिर, पायवाटा तसेच पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण असलेले टिपू ड्रॉप हे बघितले. या पॉइंटचे वैशिष्ट्य म्हणजे पायथ्याशी असलेली गावे, त्यांची वर्दळ या ठिकाणावरून टिपता येते. आजूबाजूचे पर्वत जणू पर्यटकांना साद घालतायेत की काय, असे चित्रच या पॉइंटवरून तुम्ही अनुभवू शकता. त्याबरोबर भोगा नंदीश्‍वेरा मंदिर, टीपू समर हाऊस, ब्रह्माश्रम, अम्रिता सरोवर हे ऐतिहासिक सुंदर वास्तुकलेचे नमुने उत्तम स्थितीत तेथील व्यवस्थापनाने काळजीपूर्वक सांभाळलेले आहेत. या साऱ्या बाबींचा उलगडा होत असताना पायथ्याशी असलेल्या नंदी गावाच्या मधोमध वसलेल्या भोगा नंदीश्‍वेरा शिव मंदिरात ग्रामस्थांनी केलेल्या वर्णनानुसार तिथे जाण्याचा मोह काही आवरला नाही. साधारणताः टेकडीपासून खाली सात ते आठ किमीवर वसलेल्या गावाची सुंदर अशी छबी नंदी हिल्सवरून स्पष्ट दिसते. गावातील घरांची रचना सुंदर व जुन्या पद्धतीला साजेशी होती. हिंदू आणि मुस्लीम बहुल. या गावात बोंडा म्हणजे भजी ही फेमस डिश व कॉफी मिळत होती. तमिळ-कन्नड मिश्र भाषेत ते बोलत असतानासुद्धा त्या भाषेमध्ये वेगळाच गोडवा जाणवत होता. गावाच्या चहुबाजूंना द्राक्ष आणि फुलांची शेती पुष्कळ पहावयास मिळते. काही युवक पर्यटकांना चांगलीच मदत करत होते. एव्हाना त्या गावची बहुतेक माहिती, भोगा नंदीश्‍वेराबद्दलचा इतिहास याचा एकंदरीतच पाठपरिचय त्यांनी आम्हाला तोडक्यामोडक्या हिंदीमध्ये करून दिला. मनोमन त्यांचे आभार मानून आम्ही पुढच्या दृष्टिक्षेपात असलेल्या मंदिराकडे वाटचाल केली. हजार वर्षांचा इतिहास असलेल्या या मंदिराची स्थापत्यशास्त्रीय शैली ही द्राविड वास्तुशिल्पानुसार आहे. नवव्या शतकाच्या आसपास या मंदिराचे बांधकाम सुरू झाले होते. राणी रत्नावली यांनी मंदिर बांधल्याचा विश्‍वास आहे. हे मंदिर पुढे गंगावंश, चोल साम्राज्य होयसलास यांच्या साम्राज्यांनी वाढवले. याच मंदिराच्या आवारात चोल राजा राजेंद्र यांचा पुतळा पाहावयास मिळतो. प्रत्येक साम्राज्याची वेगवेगळी थोडीफार बांधकाम शैली येथे बाह्य भिंती व इमारती यांमधून नजरेत भरते. भगवान शिव व पार्वती यांना समर्पित हे मंदिर कर्नाटक राज्यातील सर्वांत प्राचीन आहे. याच आवारात अजून तीन मंदिरे आहेत, अरुणाचलेश्वर, उमामहेश्वरा आणि भोगा नंदेश्वरा. मंदिरासमोर ग्रॅनाईटची सुंदर अशी नंदीची मूर्ती आहे. खांब तर कोरीवकामांनी व्यापलेले आहेत.

श्रृंगी तीर्थ हा मंदिरातील तलाव आहे. याची अंतर्गत रचना चारी बाजूंनी वाॅक वे तसेच दगडी मंडपाने वेढलेली अशी आहे. तलावाच्या दिशेने जाण्यासाठी सर्व बाजूंनी उतरण्यासाठी आखीवरेखीव पायऱ्या आहेत. दंतकथा अशी आहे, की हा तलाव दिव्यबैल नंदीने दैवी गंगेमधून पाणी काढण्यासाठी आपले शिंग जमिनीत घुसवून तयार केला आहे. हा तलाव दक्षिण पिनाकिनी नदीचा स्रोतपण आहे.

नंदी हिल्सची आठवण मनात कायम रोवून ठेवत या ऐतिहासिक गावाला निरोप द्यायची वेळ आली होती खरी. मात्र आता गरज होती आणलेला बोजा आवरायची. निसर्ग, इथल्या आठवणी, गमतीजमती त्यांचेही गाठोडे होतेच की आमच्या दिमतीला. साऱ्या प्रवासाचा शीण बाजूला सारून अशी गावे आपल्या हृदयात एक हक्काचे स्थान नक्की निर्माण करतात हेच खरे...!

संबंधित बातम्या