मार्सेलिस - एक देखणे बंदर 

अॅड. गोविंद पटवर्धन
सोमवार, 23 डिसेंबर 2019

पर्यटन
 

रोटरी क्लब पुणे दक्षिण गेली ८-१० वर्षे सभासदांसाठी परदेश सहल आयोजित करीत आहे. या वर्षी क्रुझ आणि स्पेन अशी सहल नक्की झाली. सहलीची आखणी केसरी टूर्स यांच्याकडे सोपविली. माझ्या अनेक सहली झाल्या आहेत. सहलीत तोच तोचपणा येतो, असे जाणवल्याने जावे की न जावे अशा विचारात होतो. माहिती पत्रक मिळाले, तेव्हा वाचायला काय हरकत, म्हणून वाचले. त्यात मार्सेलिस बंदराला भेट आहे हे वाचले आणि सहलीला जाण्याचे नक्की केले. 

क्रुझची सुरुवात इटलीतील पश्‍चिम किनाऱ्यावरील जीनोवा या बंदरावरून सुरू होणार होती. मुंबईहून दुबईमार्गे इटलीमधील फॅशनसाठी प्रसिद्ध मिलान येथे उतरलो. या शहरापासून १५० किलोमीटरवर जीनोवा हे बंदर आहे. डोंगराळ भागातून घाटसदृश निसर्गसुंदर रस्ता आहे. या वर्षी पुण्यात पावसाने पिच्छा पुरविला होता. सप्टेंबर महिन्यात भूमध्य समुद्राजवळील भागातील हवामान आल्हाददायक असते असे वाचले होते. आमचा पाठलाग करीत पाऊस तेथेही पोचला. आम्ही दुपारी तीनच्या सुमारास पोचलो तेव्हा पाऊस पडत होता. वातावरण कुंद होते. कोणाकडे छत्री होती, कोणाकडे नव्हती. पण समोर १४ मजली ‘एमएसी ऑर्केस्ट्रा’ ही महाकाय क्रुझ दिसत होती. क्रुझबद्दल कुतूहल आणि उत्सुकता सगळ्यांना होती. ती आणखी वाढली होती. पावसाकडे कोणाचेच लक्ष नव्हते. कस्टमची तपासणी झाली. क्रुझ म्हणजे तरंगते ७ स्टार हॉटेल. एक हजाराहून जास्त खोल्या आणि इतर अनेक सोईसुविधांची रेलचेल. क्रुझच्या ९ व्या आणि ११ व्या मजल्यावर आमच्या खोल्या होत्या. जवळजवळ २० तासांचा प्रवास झाला असल्याने थोडी विश्रांती घ्यावी असे सर्वांनाच वाटत होते. क्रुझवर आलेल्या प्रत्येकाला सुरक्षा उपायांची प्रात्यक्षिकासह माहिती घेणे बंधनकारक असते असे लिहिले होते. त्यासाठी यावे अशी घोषणा खोलीत माईक सिस्टीमवर ऐकू आली आणि लगेचच बाहेर पडावे लागले. पण तो एक विमानात करतात तसा सोपस्कार आहे, कोणी गंभीरपणे घेत नाही हेही समजले. कोणत्या मजल्यावर काय काय सोईसुविधा आहेत हे पाहण्यासाठी ६ व्या मजल्यापासून १४ व्या मजल्यापर्यंत हिंडून झाले. अनेक उपाहारगृहे, सर्वत्र विपुल मद्य उपलब्ध होते. कसिनो, नृत्यगृह, नाट्यगृह, पोहण्याचे तलाव, जकुझी, जिम, अनेक खेळ इत्यादी... काही नाही, असे नाही. जिन्याजवळ सर्वत्र आरसे लावलेले. नक्की कुठून आलो आणि कुठे जायचे आहे हे समजेना. आपली खोली परत सापडेपर्यंत रात्रीच्या जेवणाची वेळ झाली. साग्रसंगीत जेवण झाल्यावर काही उत्साही अपवाद वगळता सर्व निद्रादेवीच्या अधीन झाले. 

प्रत्येक खोलीला बाल्कनी होती. पहाटे जाग आली आणि बाहेर बघितले तर आकाश निरभ्र होते. थंडगार वाऱ्याची झुळूक येत होती. पूर्वेला तांबडे फुटत होते. गर्द निळ्याशार समुद्रावरून आमचे गलबत चालले होते. किनाऱ्यालगत डोंगर होते. लांबवर मार्सेलिस अशी अक्षरे दिसली. ज्या कारणाने ट्रिपला जायचे ठरविले, ते ठिकाण जवळ आले होते. सकाळची न्याहारी झाली, तोपर्यंत बोट बंदरात येऊन थांबली होती. गार वारे असल्याने गरम कपडे घालून मार्सेलिसची सफर करण्यास आम्ही सिद्ध झालो. कस्टमची कागदपत्रे तपासणी करून बसमध्ये बसलो. बस जसजशी शहरातून जात होती, तसतसे तेथील गाइडने शहराचा इतिहास सांगायला सुरुवात केली. या शहराला २,५०० वर्षांचा इतिहास आहे. मार्सेलिस हे रोमन साम्राज्याचा एक भाग होते. अनेक राजकीय स्थित्यंतरे या शहराने पाहिली आहेत, पचविली आहेत. फ्रान्सच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्राकाठचे हे शहर देशातील दोन नंबरचे शहर आहे. फ्रान्सच्या आयात-निर्यात व्यापारात याचा मोठा वाटा आहे. औद्योगिकदृष्ट्या प्रगत आहे. वर्षभर सूर्यप्रकाश असणारा हा भाग आहे. ओळीने लावलेल्या हजारो फिशिंग बोटी येथे दिसल्या. मासेमारीचा मोठा व्यवसाय आहे. ऑइल रिफायनरी, जहाज बांधणी, फूड प्रोसेसिंग, बांधकाम वस्तू इ. उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत. मुंबई ही राजकीय राजधानी असली, तरी पुणे हीच महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे असा अभिमान आपण बाळगतो. पॅरिस सतत धावणारे शहर आहे, तर मार्सेलिस सुखवस्तू राहणी, खानपान, मनोरंजन यासाठी प्रसिद्ध आहे. पॅरिस आणि मार्सेलिस यांचे असेच मुंबई-पुणे नाते आहे.

राजसत्ता उलथून टाकून फ्रेंच राज्यक्रांती झाली, त्यावेळी आंदोलनात भाग घेण्यासाठी या शहरातून मोठ्या संख्येने लोक पॅरिसला गेले होते. त्यावेळी जे गीत म्हटले तेच फ्रान्सचे राष्ट्रगीत आहे. मार्सेलिसमधून मोठ्या प्रमाणावर गेलेले नागरिक ते गीत म्हणत म्हणत सामील झाले असल्याने ते गीत ‘ला मार्सेलिस’ या नावाने प्रसिद्ध झाले. पूर्वापार हे व्यापारी शहर आहे. पण पाऊस अगदी कमी आणि पाण्याची सोय कमी. जवळील नदी म्हणजे नालाच. तोही बहुतेक वेळा आटलेला. त्यामुळे आरोग्याची समस्या गंभीर होती. प्लेगची मोठी साथ आली होती. पाण्याचे दुर्भिक्ष रोगराईस कारणीभूत आहे, हे लक्षात घेऊन १८३९ मध्ये ८० मैल दूर असलेल्या दुरांस नदीतून डोंगराळ भागातून कालवा काढून पाणी आणण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली, अनेक अडचणींना तोंड देत. काही ठिकाणी जमिनीखालून तर काही ठिकाणी पुलांवरून कालवा बांधून १८५४ मध्ये ही योजना पूर्ण झाली. त्यानिमित्त एक महाल बांधण्यात आला, ‘पॅलेस लोगशाम.’ या महालात कोणी राहत नाही. काही म्युझियम्स आहेत. मोठी बाग आहे. कारंजी आहेत. एक देखणी वास्तू आहे. शहरात मेट्रो आहे, ट्रॅम आहे. २४ वेगवेगळी वस्तुसंग्रहालये आहेत. ते सर्व पाहायचे तर दोन चार दिवस राहणे आवश्यक आहे. ‘पॅलेस लोगशाम’ बघून पुढील स्थळी जाता जाता गाइडने येथील खासियत, म्हणजे नारळाच्या दुधात शिजवलेले मासे आणि इतर पदार्थ वापरून केलेले एक सूप (bouillaebaisse- याचा उच्चार कसा करायचा हे समजत नाही) असल्याचे सांगितले. भुकेची वेळ होती. सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटले होते. परंतु, आमच्या प्रोग्रॅममध्ये भारतीय रेस्टॉरंटमध्ये जेवण असल्याने घोर निराशा झाली. भारतात जसे देऊळ, तसे युरोपात कोणत्याही गावातील प्रेक्षणीय स्थळ म्हणजे चर्च अथवा बॅसिलिका. स्वच्छ सूर्यप्रकाश, निरभ्र आकाश. निळेशार पाणी, एका बाजूला समुद्र आणि एका बाजूला डोंगर असे मोठे नयनरम्य शहर आहे. कधी चढण तर कधी उतार असे वळणावळणाचे रस्ते आहेत. गावाला वळसा घालून अरुंद रस्ते पार करीत जरा उंचावर पोचलो. तेथे साधारण पुण्यातील पर्वतीच्याएवढ्या उंचावर १६२ पायऱ्या असलेले ‘नॉत्र दाम कॅथेड्रल’ आहे. पूर्वी येथे किल्ला होता. शहरातील सर्वात उंच ठिकाण आहे. चर्चला लागून मोठे पटांगण (टेरेस) आहे. तेथून संपूर्ण शहराचे सर्व बाजूने विहंगम दृश्य दिसते. दूरवर पोर्ट दिसते. तेथून परत येताना समुद्रात सुमारे एक-दीड किलोमीटर आत एका छोट्या बेटावर किल्ल्यासारखी वास्तू दिसली. तेथे पूर्वी किल्लाच होता, त्याचा नंतर तुरुंग केला. आता पर्यटकांना खुले आहे. तेथे राजकीय शत्रू तसेच सराईत गुंड, डाकू यांना कैदेत ठेवत. तेथून सुटणे अशक्य होते, असे गाइडने सांगितले आणि अंदमानची आठवण झाली. 
बाजारपेठेतील सिटी हॉल (दुसऱ्या महायुद्धात जर्मन बॉम्बिंगमधून वाचलेली वास्तू) येथे काही वेळ शॉपिंगसाठी उतरविणार आणि मग परत बोटीवर जायचे असे गाइडने सांगितले. अजूनही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख गाइडच्या तोंडून झाला नव्हता. गाइडला त्याबाबत विचारल्यावर त्याच्या चेहऱ्यावरून त्याला काही माहीत नाही हे समजले. मार्सेलिसचे भारतीय लोकांना असलेले स्थान माहात्म्य आमच्यापैकी अरुण कुदळे यांनी गाइडला सांगत आमची उजळणी केली आणि येथे काही स्मारक आहे का, अशी विचारणा केली. आमच्यापैकी अनेक इतिहासाचे जाणकार, सावरकर भक्त. त्यांतल्या काहींना काही सांगायचे होते. गाइड चांगला जाणकार आणि अभ्यासू होता. त्याने सर्वांचे ऐकून घेतले. गाइडने इतर गाइड्सना फोन करून विचारले, पण कोणालाही सावरकरांबद्दल काही माहीत नव्हते. गाइड म्हणाला, ‘येथे भारतीय प्रवासी खूप कमी येतात. यानंतर भारतातून कोणी आले, तर मी हा प्रेरणादायी इतिहास नक्की सांगीन.’ 

गावात कोठे तरी एक सावरकर स्मृती स्तंभ आहे, असे आमच्यापैकी कोणीतरी ऐकले होते. म्हणून बोटीवर परत जायची वेळ झाली होती, तरी डॉ. किरण पुरोहित आणि काहीजण बसमधून उतरून गावात शोधायला गेले. त्यांना काही नवीन माहिती मिळाली नाही. मात्र परत येता येता स्वातंत्र्यवीर सावरकर रचित ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ हे गीत म्हणून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करून मानवंदना दिली. 

आज आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्यावे की नाही याची चर्चा करीत आहोत. त्या ऐतिहासिक धाडसी समुद्र उडीला १०० वर्षे होऊन गेली. मनात आले, की त्यांचे साहस यशस्वी झाले असते, तर आझाद हिंद फौज १०० वर्षांपूर्वीच उभी राहिली असती का? आणि देश लवकर स्वतंत्र झाला असता का? असा विचार करीत करीत परत क्रुझवर आलो. क्रुझवरील जल्लोषाच्या वातावरणात देशप्रेमाचे विचार मागे राहिले. त्या दिवशी कप्तानाची मेजवानी होती. आमच्यापैकी काही महिलांनी मुद्दाम साडी नेसली होती. त्याचे इतरांना मोठे कुतूहल होते. 

मार्सेलिस बंदरातून क्रुझ निघाली आणि पुढे आठ दिवस अनेक प्रेक्षणीय स्थळे बघितली. तरी एक विचार सतावत राहिला. रुखरुख लागून राहिली. देशात कोट्यावधी सावरकर भक्त असूनही मार्सेलिस येथे स्मारक नसावे? आणि नकळत शब्द ओठांवर आले, ‘नाही चिरा नाही पणती!’ ‘आपले सरकार’ याची नोंद घेऊन काही करेल अशी आशा नको करूया. लाखो सावरकर भक्त आहेत. ते पुढाकार घेतील?

संबंधित बातम्या