पहाडोंकी रानी मसुरी

इरावती बारसोडे
सोमवार, 1 जुलै 2019

पर्यटन
 

वाकड्या-तिकड्या वळणांचे चढत जाणारे रस्ते... नजर जाईल तिथपर्यंत हिरवेगार उंचच उंच सूचीपर्णी वृक्ष... लांबपर्यंत दिसणारे उंचच उंच पर्वत... आणि डोंगरावर वसलेलं एक सुंदर गाव... उत्तराखंडातल्या मसुरीचं अगदी थोडक्‍यात वर्णन करायचं झालं, तर ते असं करता येईल. पण अर्थातच मसुरीचं एवढ्या कमी शब्दांत वर्णन होऊच शकत नाही. 

समुद्रसपाटीपासून साधारण १,८०० मीटर उंचीवर असलेल्या मसुरीला जाण्याची संधी मिळाली ती खरं तर माझ्या बहिणीमुळं. माझी बहीण मीनाक्षी आणि तिचा नवरा प्रणव दोघेही मसुरी इंटरनॅशनल स्कूलमध्ये रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत आणि शाळेच्या कॅम्पसमध्येच राहतात. त्यांना उन्हाळ्याची १५ दिवस सुटी होती आणि तेच औचित्य साधून आमची मसुरी ट्रीप ठरली. आम्ही त्यांच्याकडंच राहणार असल्यामुळं हॉटेल बुकिंग, पर नाइट एवढा खर्च होईल वगैरे भानगडीतून आमची साहजिकच सुटका झाली. पण, ही शाळा मसुरी गावापासून सहा किलोमीटर पुढे आहे. मुळात मसुरीच डोंगरावर वसलेलं गाव असल्यामुळं शाळाही अशीच डोंगरावर आहे. शाळेचा कॅम्पस मात्र सुरेख, झाडांनी वेढलेला! पण, घरी पोचायचं म्हणजे टेकडी उतरून जावं लागतं. रस्ता आहे. पण तिथं वाहन नेता येत नाही. गाडी शाळेच्या डायनिंग हॉलपाशी लावायची आणि पुढं चालत जायचं. टेकडी चढ-उतार करताना महिन्याभरात झाला नसेल तेवढा व्यायाम आठ दिवसांत झाला. अंतर असेल २०० मीटरचंच, पण पहिल्या वेळेस किलोमीटरभर चालत आलोय, नाही चढत आलोय असं वाटलं. इथं ना वर्दळ, ना वाहतूक. शाळेला पंधरा दिवस सुटी असल्यामुळं मुलींचाही आवाज नाही. सगळे शेजारीही सुटीसाठी गावाला गेलेले. त्यामुळं सारं कसं शांत शांत. रातकिड्यांचा किर्रर्र आवाजच काय तो शांतता भेदत होता, अगदी दिवसाही. मला तर ही शांतता फारच भावली. पुण्यासारख्या शहरात राहत असल्यामुळं अशी शांतता क्वचितच अनुभवायला मिळते. 

मसुरीमध्ये माकडं भरपूर. मी दोन प्रजाती पाहिल्या. एक काळ्या तोंडाचं, लांब शेपटीचं लंगुर आणि दुसरं लाल तोंडाचं माकड. यातल्या लाल तोंडाच्या माकडाच्या नादी लागायचं नाही, अशी सूचना मसुरीला पोचण्याआधीच मिळाली होती. ही माकडं म्हणे खूप आगाऊ, भोचक वगैरे असतात. आपण त्यांच्या जवळ जायचं नाहीच, पण ते आपल्याजवळ आलं तर हातात मिळेल त्या वस्तूनं त्याला रट्टा घालायचा. तिथं राहणाऱ्यांना या माकडांनी बराच त्रास दिलेला असल्यामुळं त्यांच्याविषयी लोकांचं फार चांगलं मत नाही. याउलट काळ्या तोंडाचं लंगूर. ही माकडं काहीच त्रास देत नाहीत. त्यांच्या वाटेनं निघून जातात. माझ्या आठ दिवसांच्या वास्तव्यात दोन्ही माकडं मला अनेकदा दिसली. लाल तोंडाचं माकडं दिसलं, तेव्हा प्रत्येक वेळी ते उगाचच आपल्याकडंच बघतंय असा भास व्हायचा. आधी मिळालेल्या माहितीमुळं पूर्वग्रहच दूषित झाला म्हणा ना! लंगूर मात्र आपल्याच नादात असायची. मी त्यांच्याकडं बघत बसायचे (अर्थात जरा लांबूनच), पण त्यांचं खरंच लक्ष नसायचं. मोठ्या टोळ्यांनी यायची. मोठी लंगूर माकडं झाडाची पानं खायची आणि लहान पिलं एकमेकांबरोबर दंगा-मस्ती करण्यात व्यग्र असायची. तर, कधी एखादं लंगूर दोन्ही हात स्वतःच्या गुडघ्यावर ठेवून दगडावर निवांत बसलेलं असायचं. शाळेच्या कॅम्पसमध्ये माकडं, फुलपाखरं, पक्षी, किडे यांच्याकडं बघण्यात टाइमपास खूप झाला. 

शाळेच्या ए गेटमधून आपण थेट हायवेवरच उतरतो. तिथं एक जायका नावाची टपरी आहे. चहा आणि पराठा इतका उत्कृष्ट मिळतो म्हणून सांगू! आम्ही तिथं पहिल्यांदा गेलो, तेव्हा शनिवार होता. सुटीचा सीझन असल्यामुळं एकूणच मसुरीमध्ये गर्दी खूप होती. या हायवेवर चारचाकी गाड्यांची भली मोठी रांग लागली होती. रांग कित्येक किलोमीटर असावी, कारण रांगेची सुरुवात आणि शेवट दिसत नव्हता. घाटाचा आणि एकपदरी रस्ता असल्यामुळं ओव्हरटेक करून जाण्याचा प्रश्‍नच नव्हता. संथ गतीनं गाड्या सरकत होत्या. इतक्‍या की गाडीतले लोक चक्क उतरून निवांत चहा पिऊन परत गाडीत जाऊन बसत होते. आम्ही मात्र आपण कसे या रांगेत नाही आणि फक्त रस्ता ओलांडला की शाळेत पोचणार आहोत, याच आनंदात होतो. मसुरीमधले केंप्टी फॉल, मसुरी लेक, कंपनी गार्डन ही प्रसिद्ध पर्यटन स्थळं. आम्ही यातल्या एकाही स्थळाला भेट दिली नाही. मुळात एवढ्या गर्दीत जाण्याची कोणालाही इच्छा नव्हती. मसुरीमधला मॉल रोड आणि लाल टिब्ब्याला मात्र आम्ही गेलो. लाल टिब्बा हा मसुरीमधील सर्वांत उंच पॉइंट. टिब्बा याचा अर्थ पर्वत किंवा डोंगर. सूर्यप्रकाशामुळं तिथले सर्व पर्वत लाल दिसतात म्हणून याचं नाव लाल टिब्बा. इथून दिसणारं दृश्‍य केवळ विलोभनीय. सूर्यप्रकाशात उजळून निघालेल्या दूरपर्यंत पसरलेल्या डोंगररांगा आणि हिमाच्छादित शिखरं! 

मसुरीपासून हरिद्वार, ऋषिकेश अवघ्या ७०-८० किलोमीटर अंतरावर. त्यामुळं, एवढ्या लांब आलोच आहोत तर हरिद्वार, ऋषिकेशही करून येऊ, असा एकमतानं निर्णय झाला आणि ट्रीपमध्ये आणखी एका छोट्या ट्रीपचं प्लॅनिंग झालं. चारधाम यात्रेचा सीझन असल्यामुळं हरिद्वारला गर्दी असणार हे निश्‍चित होतं. सकाळी नऊ-दहापर्यंत हरिद्वारमध्ये पोचायचं, मनसा देवीचं दर्शन घ्यायचं आणि मग हॉटेल गाठायचं असा आमचा ओरिजनल प्लॅन होता. पण वाटेतल्या ट्रॅफिकमुळं आमचं गणित दीड-दोन तासांनी चुकलं. हरिद्वारमध्ये पोचायलाच बारा वाजले. त्यात उन्हामुळं फारच चिकचिक झाली होती. रस्त्यावरून मनसा देवीचा कळस दिसत होता. त्याला तिथूनच नमस्कार ठोकला आणि हॉटेलकडं गाडी वळवली. जेवण करून, फ्रेश होऊन देवीला जाऊ असा विचार होता. पण बाहेरची गर्दी आणि ऊन बघता तो विचारही ढेपाळला. उन्हातानाचं, स्वतःला सोसत नसताना देवदर्शन करायचंच या विचारांचे आम्ही नाही. शेवटी सर सलामत तो पगडी पचास! संध्याकाळी गंगा आरतीला मात्र जायचंच होतं, कारण ते दृश्‍य खूप छान असतं, असं ऐकलं होतं. गंगा घाटावर सूर्यास्तानंतर आरती होते. दुर्दैवानं ती कशी होते, कशी दिसते याबाबत मी फार काही सांगू शकत नाही, कारण आम्ही जिथं बसलो होतो तिथून फार काही दिसलंच नाही. लांब, बऱ्यापैकी अंतरावर मोठ्या ज्योती हलताना दिसत होत्या. आजूबाजूच्या मानवनिर्मित प्रकाशामुळं त्या आणखी धूसर वाटत होत्या. मागं लाऊडस्पीकर होते, पण काही ऐकूसुद्धा आलं नाही. गंगामाईच्या प्रवाहाच्या आवाजात इतर सारे आवाज विरून जात होते. गंगेची आरती पाहता आली नाही, याचं मला जरासुद्धा वाईट वाटलं नाही, कारण मला अगदी जवळून गंगा अनुभवायला मिळाली होती. आरतीची वाट बघत आम्ही जवळपास तासभर घाटावर पहिल्या पायरीवर बसलो होतो, इतरांचं गंगा स्नान बघत. मला व्यक्तिशः गंगेमध्ये स्नान करण्याची इच्छा नव्हतीच. गंगेत स्नान केल्यानं पापं धुतली जातात, हा ज्याचा-त्याचा श्रद्धेचा भाग आहे. माझा विचार असा, की नदीत स्नान केल्यानं ती प्रदूषित झाली, तर माझ्या पापांमध्ये आणखी भर नाही का पडणार? मी केलेल्या पापांची फळं धुण्यासाठी आधीच दूषित झालेल्या गंगेला आणखी कशाला त्रास द्या, अस आपलं माझं मत! पण गंमत अशी, की गंगेत स्नान करायचं नाही असं आम्ही ठरवलं होतं खरं, पण बहुधा आम्हाला स्नान घातल्याशिवाय परत पाठवायचं नाही असं गंगामातेनच ठरवलं असाव. गंगाच ती, तिचा साधा-छोटा प्रवाहही आम्हाला बसल्या जागी नखशिखांत भिजवून गेला. खळखळणाऱ्या, पायऱ्यांवर आदळणाऱ्या त्या गंगेच्या पाण्याचा आवाज अजूनही तसाच ऐकू येतो.

गंगा घाटावरचा आणखी एक प्रसंग मला आवर्जून सांगावासा वाटतो. घाटावर पूजा सांगणारे, निधी मागणारे हात धुऊन मागे लागतात. आम्ही त्यांना टाळून पायऱ्यांवर स्थिरस्थावर झालो होतो आणि आता कोणी काही मागणार नाही, अशी आशा होती. तर तिथेही निधी मागणारा एक आलाच. काही केल्या तो जाईच ना. शेवटी शंभर रुपये काढून दिले, तर आणखी द्या म्हणाला आणि वर एक डायलॉग पण मारला, ‘क्‍या साब इतनाही. हम आपही के पास मागेंगे ना, हम गरिबों के पास नहीं मांगते।’ आता या वाक्‍यावर काय बोलणार? जणू काही आमच्या तोंडावरच लिहिलं होतं, आम्ही श्रीमंत आहोत आणि त्याला हजारोंची मदत करू शकतो म्हणून.  

दुसरा दिवस ऋषिकेशवारीचा होता. तिथं काय बघायचं हे आमचं आधीच ठरलं होतं. राम झुला, लक्ष्मण झुला आणि शिवानंद आश्रम. आमच्या टॅक्‍सीवाल्यानं आम्हाला लक्ष्मण झुलापाशी सोडलं. गाडीतून उतरायचा अवकाश गाइड लोकांनी वेढा घातला. आम्हाला गाइड नको, असं दहा वेळा सांगितल्यावर बरेचसे नाहीसे झाले. पण एकजण हट्टालाच पेटला. तीनशे रुपयांवरून थेट पन्नास रुपयांवर आला. इथं पैशांचा प्रश्‍नच नव्हता, आम्हाला खरंच गाइड नको होता. पण त्यानं त्याची किंमत एवढी खाली आणली त्यावरून त्याला किती गरज आहे, ते लक्षात आलं. आम्ही म्हटलं, ठीक आहे बाबा चल. तो तरातरा त्याच्या स्पीडनं लक्ष्मण झुल्याकडं निघाला. आम्ही फार रमतगमत पर्यटन करणारी मंडळी आहोत आणि एखादा स्पॉट बघायला नाही मिळाला तरी चालेल, पण खाण्याच्या वेळा मात्र आम्ही पाळतो. आम्ही लक्ष्मण झुल्याला पोचलो तेव्हा नाश्‍त्याची वेळ होती, त्यामुळं आधी पोटपूजा मग लक्ष्मण झुला! भरपेट नाश्‍ता करून बाहेर पडलो, तेव्हा गाइड म्हणाला की शिवानंद आश्रम १२.३० वाजता बंद होतो. मग आधी आश्रम आणि नंतर लक्ष्मण झुलाला जायचं ठरलं. आश्रमात आम्ही बराच वेळ घालवला. नंतर झुल्यावरून चालत न जाता बोटीनंच नदी ओलांडली. नदीतूनच लक्ष्मण झुला बघितला. गाइडच्या मते, राम झुला आणि आणि लक्ष्मण झुला दिसायला सारखेच आहेत. फक्त उंचीत फरक आहे. मला कधी कधी वाटतं आपण फार निरुत्साही माणसं आहोत की काय. कारण दोन्ही झुले सारखेच दिसतात म्हटल्यावर राम झुलाची भेट रद्दच झाली. आता थेट मसुरीच गाठू यावर संगनमत झालं आणि आम्ही लगेचच ऋषिकेश सोडलं.

ऋषिकेशहून परतल्यावर एक दिवस हातात होता. आम्ही रात्री निघणार होतो, त्यामुळं सकाळी तिथून जवळच असणाऱ्या सन्तुरा माता मंदिरात गेलो. हे मंदिरही टेकडीवरच. इथं सगळंच टेकडीवर आहे. मंदिर जवळ असल्यामुळं मी आणि बहीण दुचाकीवरच गेलो. मसुरीमधले घाटरस्ते दुचाकीवर फिरण्याची मजा काही वेगळीच. या मंदिरातूनही मस्त व्हॅली व्ह्यू दिसतो. आम्ही जवळपास उतरून खाली आलो होतो, तेव्हा अनेक जण वर चढत होते. त्यांच्याकडं बघून शहरी लोकांना चढायची अजिबातच सवय नसते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. प्रत्येक जण आम्हाला विचारत होता, ‘और कितना उपर हैं,’ ‘बस थोडासा हैं,’ अशी थाप मारून मंदिरापर्यंत पोचेपर्यंत त्यांची किती फाटणार आहे, याची कल्पना करून आम्ही दोघी हसू दाबत तिथून सटकलो.

मसुरी पर्यटनाला गेल्यावर लोक नेहमी जी ठिकाणं पाहतात, त्यातली निम्मीसुद्धा आम्ही पाहिली नाही. पण तरीही ही ट्रीप खूपच मस्त झाली, कारण आमची काही अंशी ऑफबिट भटकंती होती. आता एकदा बर्फातली मसुरी पाहायची आहे!

संबंधित बातम्या