सिंह, हत्तींच्या देशात

जयंत तडवळकर
मंगळवार, 21 जुलै 2020

केनियामधल्या बिग फाइव्ह म्हणजेच, सिंह, हत्ती, ऱ्हायनो (गेंडे), लेपर्ड व आफ्रिकन बफेलो बघितले, पण यातल्या सिंहाचे दर्शन थोडे लांबूनच झाले होते. सुदैवाने त्याचाही योग लवकरच आला. दोन अक्षरशः विशालकाय सिंह झाडाखाली वामकुक्षीच्या तयारीत होते... खूप छान वाटले, केनियाची सफर सफल झाली! 

बँकेच्या नोकरीत असताना मिळणाऱ्या सवलतीच्या आधारे बायकोमुलांसहित भरपूर भटकंती केली. मात्र त्यावेळी वाईल्ड लाइफ तितकेसे लोकप्रिय नव्हते, सोयीपण नव्हत्या. आता त्या क्षेत्राकडे लक्ष नसते गेले तरच नवल होते. जंगलाचा अनुभवसुद्धा घ्यावा असे ठरले. लगेचच ‘फोलिएज’ या वाईल्ड लाइफ टूर ऑपरेटर्सतर्फे ‘बांधवगड’, ‘कान्हा’चा अप्रतिम अनुभव घेतला.

नंतरच्या वर्षी तर एकदम केनियाला जाण्याची टूम निघाली. मी धास्तावलोच. आत्ता कुठे वाईल्ड लाइफ पर्यटनाला सुरुवात केली होती, त्याविषयी पुरेसे ज्ञान नव्हते. पण सगळ्या शंका फोलिएजच्या टीमने दूर केल्या. नेटवरची माहिती तर कायम आपल्या सेवेसाठी हजर असतेच. जाण्याचा दिवस उजाडला, मुंबईहून रात्री साडेअकरा वाजता फ्लाइट होती, ती रात्री उशिरा सुटली. सकाळी साडेआठपर्यंत नैरोबीच्या हॉटेलमध्ये पोचलो. लगेचच तयार होऊन शहर बघण्यासाठी निघालो. म्युझियम, तसेच जिराफ सेंटर बघण्यासारखे आहे. तेथे एका पंजाबी हॉटेलमध्ये घेतलेले जेवण मात्र आजही आठवते. दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही ‘सांबारू, अबरडेर, लेक नाकुरू व मसाई मारा’ या ठिकाणांना भेट द्यायला निघालो. हेन्री हा आमचा सारथी तसेच गाइड होता. उत्तम रस्ते, वाटेत तेथील प्राण्यांच्या अगदी छोट्या-मोठ्या प्रतिकृती विकणारी दुकाने, छोटेखानी रेस्तराँ, स्वच्छ वॉशरुम्स अशा सोयी होत्या. दुपारी एकच्या सुमारास सांबारूला पोचलो. सामान रूमवर टाकून जेवण करून लगेचच बाहेर पडलो. ‘डिकडिक’ नावाचे एक गोंडस छोटेसे हरिण दिसले. याची खांद्यापर्यंत उंची ४० सेंटिमीटरपर्यंत व वजन पाच-सहा किलोपर्यंत असते. आम्हाला आधी वाटले ते पिल्लू आहे. पण हेन्रीकडून कळले, की ही आफ्रिकेत आढळणारी हरणाची एक जात आहे व यांचा आकार एवढाच असतो. 

थोडे पुढे गेल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजूला थोडीशी मोकळी जागा व पलीकडे तिथल्या हत्तींना आवडणारी बाओबाब (Baobab) झाडी. या झाडांचे वैशिष्ट्य म्हणजे ती पाणी साठवतात, त्यामुळे हत्तींची तहानही भागू शकते. हेन्रीने गाडी थांबवली. त्या ठिकाणी दोन तरणेबांड हत्ती होते व त्यांचे चरणे सुरू होते, आम्ही लगेचच कॅमेरे सरसावले. हेन्रीने गाडी थांबवली असली, तरी त्याचा चेहरा गंभीर वाटत होता. त्याने आम्हाला पटापट फोटो काढून तेथून निघण्याचा सल्ला दिला, का ते काही आम्हाला कळेना. तरीही येथे त्याचे ऐकले पाहिजे म्हणून आम्ही फोटो घेतले. हेन्रीने गाडी सुरू केली आणि अचानक त्या दोन हत्तींपैकी एकाचा मूड बदलला. सोंडेतून थोडी माती, झाडाची पाने उडवून, दोन्ही कान मागे घेऊन त्याने आमच्या दिशेने दोन चार पावलेपण टाकली व थांबला. हेन्रीच्या सल्ल्याचा अर्थ आता आमच्या लक्षात यायला लागला होता. आम्ही घाबरलो होतोच, तेवढ्यात हेन्रीने गाडीचे इंजीन बंद केल्याने अजूनच घाबरलो. परंतु, आवाज बंद होताच हत्ती पुन्हा खाण्यात रमला. आता आम्ही दुहेरी संकटात सापडलो होतो. थोडावेळ विचार करून परत हेन्रीने गाडी सुरू केली, यावेळी मात्र हत्तीने सोंड उंचावून आवाज काढला, कान सुपासारखे समोर आणून आमच्यावर चाल केली. परंतु, हेन्री तयारीत होता, त्याने रिव्हर्स टाकून गाडी मागे घ्यायला सुरुवात केली. हत्ती आमचा पाठलाग करत होता व आम्ही मागे मागे जातो आहोत असे दृश्य होते. सुदैवाने तेथे उजवीकडे वळण होते, तेथे वळल्याने आम्ही हत्तीच्या दृष्टिआड झालो व सुटकेचा निःश्‍वास टाकला. नंतर हेन्रीकडून कळले, की एका विशिष्ट वयानंतर हत्तींना कळपाबाहेर पडावेच लागते. त्यानंतर ते आपल्या ‘मेट’च्या शोधात असतात व या काळात ते अत्यंत चिडचिडे झालेले असतात. आम्ही ‘फुटलेला’ घाम पुसून ‘शौर्याने’ इतर प्राण्यांचे फोटो काढण्यास सिद्ध झालो होतो व पुढच्या मार्गाला लागलो होतो.. हेन्री मात्र जणू काही घडलेच नाही अशा आविर्भावात मधेच वेग कमी करून, थांबून झाडावरचे पक्षी दाखवत होता. पक्षीच कशाला, एके ठिकाणी हळूहळू गाडी थांबवली व एका दिशेला आमचे लक्ष वेधले. मला तर दूरवर गवताशिवाय काही दिसत नव्हते आणि हेन्री तर ‘चित्ता चित्ता’ म्हणत होता. गळ्यात असलेल्या कॅमेऱ्याची लेन्स ‘झूम’ करून शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा गवताच्या वर आलेले एक डोके दिसले व जशी नजर स्थिरावली तसे एकंदर चार चार चित्त्यांचे दर्शन झाले. कौतुकाचा भाग असा, की आमच्या पठ्ठ्याने (हेन्रीने) गाडी चालवत असतानाच इतक्या दूरचे हे दृश्य टिपले होते. 

या पहिल्या मुक्कामात, आफ्रिकन हत्ती, चित्ता, पाणघोडा हे प्राणी व खूपसे सुंदर पक्षी दिसले. पुढचा मुक्काम होता अबरडेर येथे. या प्रवासात आपण ‘विषुववृत्त’ ओलांडून जातो, तसे प्रमाणपत्रसुद्धा मिळते. वाटेत शहामृगाच्या काही जोड्यापण दिसल्या. ‘कोर्टिंग’ सुरू होते. काळ्या पिसांचे नर, मादीभोवती मस्त रिंगण घालत होते. अबरडेर येथील आकर्षण म्हणजे हॉटेलची रचना. हॉटेलचे छत हे जमिनीच्या पातळीवर असून चार मजले एका खाली एक होते. तळमजल्याच्या लेव्हलवर हॉटेलपासून काही अंतरावर एक तळे होते. तळ्याच्या बाजूला असलेली माती क्षारयुक्त असल्याने बरेचसे प्राणी तेथे मातीतल्या क्षारांसाठी व पाणी पिण्यासाठी येत. हे दृश्य पाहण्यासाठी हॉटेलच्या वरच्या मजल्यावर भलामोठा टेरेसपण होता व नीट दिसावे म्हणून प्रकाशझोतही सोडण्यात येत. खूपच छान व आगळावेगळा अनुभव होता.

त्यानंतर आम्ही निघालो ‘लेक नाकुरू’ येथे जाण्यासाठी. गंमत म्हणजे, एकापेक्षा एक सुंदर आणि केवळ जंगलात अथवा प्राणिसंग्रहालयामध्ये दिसणारे प्राणिजगत बघून पुढील प्रवासाला निघावे, तर तितकाच सुंदर निसर्ग आपल्या स्वागतासाठी सज्ज असतो. त्यात रमत असतानाच आपण कधी अपेक्षित ठिकाणी पोचतो कळत नाही. हॉटेलला गेल्यावर पहिली चौकशी म्हणजे ‘कॉटेज’ नंबर किती? एरवी एखाद्या इमारतीच्या कितव्या मजल्यावर आपली खोली आहे हे विचारावे लागते. इथली सर्व हॉटेल्स जंगलात बांधलेली व लपलेली असल्याने यांना उंचीऐवजी लांबी, रुंदी लाभलेली असते. पण याच लांबी, रुंदीचा मला फटका बसणार होता. झाले काय, एक दिवस आम्ही सफारी करून आलो व रूमवर थोडा वेळ आराम करून जेवायला निघालो. पंधरा की अठरांपैकी आमच्या कॉटेजचा नंबर होता बारा. बाहेर साधारण तीन ते चार कॉटेज मागे एक सशस्त्र कर्मचारी होता. रूममधून जेवायला जाणाऱ्यांना हॉटेलच्या डायनिंग हॉलपर्यंत पोचवणे हे त्याचे काम असायचे. क्वचित एखादा लांडगा, तरस वगैरे चुकून आलाच तर त्याला घाबरवण्यासाठी. तर त्या दिवशी झाले काय, की आम्ही जेवायला म्हणून निघालो, मी मोबाइल खोलीत विसरलो म्हणून परत फिरलो, बाकीच्यांना म्हटले जा तुम्ही मी येतो, काही नाही होत. परत येऊन मोबाइल घेऊन एकटा निघालो. सिमेंटच्या फरश्यांची पाच सहा फूट रुंदीची पायवाट तयार केलेली होती. छान थंड हवेत, पोटात भूक घेऊन निघालो होतो आणि अचानक माझ्यापासून अक्षरशः दीड-दोन फुटांवर ‘थाड थाड’ असा आवाज आला. बघे बघेतो दोन गलेलठ्ठ रानडुकरे एकामागे एक पळत गेली होती. मी थोडा पुढे असतो तर जंगल सफारीबरोबर हवाई सफारीपण झाली असती.

दुसऱ्या दिवशी तलावाकाठी जाऊन रोहित पक्ष्यांचे थवे बघायचे होते. प्रत्यक्षात थवे कसले, पक्ष्यांचाच सागर होता तो. हेन्रीच्या अंदाजानुसार अडीच ते तीन लाख पक्षी असावेत. तो लाल गुलाबी रंग, रंगून बघत असतानाच तेथे एक उभा असलेला ट्रक आवाज करत निघाला. माझ्यासाठी ती पर्वणीच ठरली, कारण जवळच असलेला पक्ष्यांचा एक जथ्था दचकून उडाला व आम्ही उभे होतो त्याच दिशेने येऊ लागला. मी कॅमेरा व्हिडिओ मोडवर घेतला व पक्षी येत असलेल्या दिशेला रोखून उभा राहिलो. मग काय, पाच-सातशे पक्षी माझ्या कॅमेऱ्यासमोरून उडत गेले. खूप प्रयत्न करूनही अशी क्लिप मिळाली असती की नाही देव जाणे. तेथून नंतर जवळच असलेल्या एका टेकडीवर गेलो, जिथे बबून्स बघायला मिळाले. सतत येणाऱ्या पर्यटकांमुळे यांची मनुष्याबद्दलची भीती कशी कमी झाली आहे याची झलक दिसून आली. एक शाळेची सहल आली होती. बस उभी राहिल्याबरोबर मुलेमुली व त्यांच्या पाठोपाठ शिक्षक व चालक वगैरे उतरले. या गडबडीत बसची एक खिडकी उघडी दिसल्याबरोबर एक बबून आत शिरून ब्रेडचे दोन पॅक, आणखी एक कसलेतरी पॅकेट घेऊन पळाला/पळाली.

आता मसाई मारा करून नैरोबी गाठून मुंबईच्या दिशेने उडायचे होते. अर्थात संपूर्ण दोन दिवस हातात होतेच. मसाई मारा येथे येईपर्यंत आफ्रिकेतले बिग फाइव्ह बघून झाले होते. इथले दोन अनुभव सांगण्यापूर्वी आकर्षण सांगतो, ते म्हणजे बलूनमधली सफर. केनियाच्या मसाई माराला लागूनच टांझानियाचे प्रसिद्ध सेरेंगटी जंगल आहे, त्या सीमेपर्यंत जाऊन तेथे ब्रेकफास्ट करता येतो. इथल्या मुक्कामात आम्ही मसाई लोकांच्या एका ग्रुपमध्ये दोनेक तासांसाठी सामील झालो होतो. त्यांची दिनचर्या, त्यांच्या सवयी, वगैरेची माहिती घेतली. त्यांच्या नृत्यात सहभागी झालो, इतकेच नव्हे तर त्यांची घरे आतून बघून आलो. एक बरे झाले, नृत्यात सहभागी झालो तेव्हा जुन्या हिंदी अथवा इंग्रजी सिनेमात दाखवत तसे भयानक दृश्य नव्हते.

केनियामधला स्वप्नवत प्रवास संपत आला होता. केनियामधील बिग फाइव्ह म्हणजे, सिंह, हत्ती, ऱ्हायनो (गेंडे), लेपर्ड व आफ्रिकन बफेलो. यातल्या सिंहाचे दर्शन थोडे लांबूनच झाले होते. सुदैवाने खबर आली, की दोन मोठे सिंह नुकतेच लोकेट झाले होते. आम्ही लगेच निघालो. दोन अक्षरशः विशालकाय सिंह होते. झाडाखाली वामकुक्षीच्या तयारीत असावेत. खूप छान वाटले, केनियाची सफर सफल झाल्यासारखे वाटले! पण हे काय? गाडी जागेवरून हालत नव्हती, ना मागे ना पुढे. हेन्रीने हळूच दार उघडून वाकून बघितले, तर एका दगडाला अडकली होती. जास्त ‘रेझ’ करणे धोकादायक होते. सुदैवाने रेडिओ कनेक्टिव्हिटी होती. हेन्रीने त्यांच्या भाषेत खबर दिली. आम्ही सगळे जरा घाबरलो होतोच, कारण यातून सुटणार कसे हेच कळत नव्हते. तेवढ्यात एक जीप येऊन सिंह व आमची गाडी यांच्या मधे थांबली. त्यांचे काही तरी बोलणे झाले व हेन्री म्हणाला, आपल्याला गाडीच्या खाली जाऊन तो दगड काढावा लागेल, त्यांनी परवानगी दिली आहे. वीस-पंचवीस फुटांवर दोन आक्राळ विक्राळ सिंह असताना गाडीतून उतरायचे? पण दुसरा उपाय नव्हता. शेवटी हेन्री, मी, राहुल व अमोल खाली उतरलो, कसाबसा तो दगड हालवला आणि परत गाडीत येऊन बसलो. यासाठी फक्त साडेतीन ते चार मिनिटे लागली होती, पण तिथल्या हवेतसुद्धा घामाघूम झालो होतो आणि साडेतीन मिनिटे काय असतात तेपण कळले.

मसाई माराला बाय करून नैरोबीला पोचलो व तेथून फ्लाइटने पहाटे मुंबईत पोचलो. आफ्रिका ज्याला आपण ‘अंडर डेव्हलप्ड कंट्री’ म्हणतो, तेथेसुद्धा दहा दिवसांत एकही हॉर्न ऐकला नव्हता, याची इथल्या हॉर्नच्या कर्कश्श आवाजाने आठवण करून दिली. 

संबंधित बातम्या