व्हॅली ऑफ फ्लॉवर

कैलास बाळासाहेब जाधव, औरंगाबाद
गुरुवार, 21 जून 2018

पर्यटन
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये पर्यटन या सदरासाठी लेख पाठविण्याचे आवाहन वाचकांना करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेले लेख प्रसिद्ध करीत आहोत.

‘व्हॅली ऑफ फ्लॉवर’ला जाण्याची इच्छा खूप दिवसांपासून मनात होती. हिमालयाच्या या निसर्ग सुंदर भागाची ख्याती खूप ऐकून होतो; पण कधी भेट देण्याची संधी मिळाली नव्हती. अखेरीस या मोहिमेचे यथासांग नियोजन करून, मी व माझे मित्र आम्ही ऋषिकेशला रेल्वेने पोचलो. ऋषिकेश येथे आमचा बेस कॅंप होता. दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजताच जोशी मठसाठी निघालो. पुरेसे उजाडल्यानंतर एका खळखळणाऱ्या झऱ्याखाली आम्ही मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटला. जेवण आटोपून आम्ही सायंकाळी ५ च्या आसपास जोशीमठला पोहोचलो. जोशीमठ येथे आद्य शंकराचार्य यांचे प्राचीन मंदिर व छोटी साधनेची गुहा आहे. भगवान नृसिंह यांचे प्राचीन मंदिर आहे.आता त्याच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. जोशीमठ परिसराच्या आजूबाजूला  सफरचंदाच्या मोठ्या प्रमाणात बागा आहेत. 

दुसऱ्या दिवशी आम्हाला ‘गांगरिया’ या ठिकाणी पोचायचे होते. त्यामुळे प्रवास लवकरच सुरू झाला. प्रथम आम्ही बसने गोविंदघाट येथे पोहोचलो. तेथून आता आमच्या खऱ्या ट्रेकला सुरवात होणार होती. पहिल्या दिवशीचा आमचा ट्रेक हा जवळपास १६ किमीचा होता. ९ च्या आसपास आम्ही गोविंदघाटला पोचलो. येथे अलकनंदा व लक्ष्मण-गंगा या नद्यांचा संगम होतो. या संगमावर गुरुद्वारा असून हे अत्यंत पवित्र ठिकाण आहे. २०१३ मधील पुराचा तडाखा या परिसरातील असंख्य गावांना बसला होता. अख्खी दबलेली गावे आम्हाला पहायला मिळाली. आम्ही ९.३० ला गांगरीयाला जाण्यासाठी चालण्यास सुरवात केली. गोविंदघाट ते गांगरिया हा रस्ता अत्यंत सुंदर आहे. एकीकडे खळखळणारी नदी तर वर आकाशाशी स्पर्धा करणारी पाइन, देवधरची झाडे. त्यातच मध्येच डोकावणारी बर्फाची उंच शिखरे. आम्ही मौजमजा करत संध्याकाळी ७ च्या आसपास गांगरियाला पोहोचलो. शेवटी पावसाने मनसोक्त भिजण्याची इच्छा पूर्ण केली. गांगरीया हे या परिसरातील मोठे गाव असून, येथे गुरुद्वारा आहे. येथे मुक्कामासाठी मोठ्या प्रमाणात हॉटेलसुद्धा आहेत. दुसऱ्या दिवशी आम्हाला ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर’ला जायचे होते. अंतर कमी होते. पण दुपारी पाऊस येतो व वातावरण बिघडते म्हणून आम्ही सकाळी सातलाच निघालो. व्हॅली ऑफ फ्लॉवरचा शोध फ्रॉक स्मित या इंग्रज बॉटनिस्ट यांनी १९३१ मध्ये लावला. त्यांनी व्हॅली ऑफ फ्लॉवरचा अभ्यास करून ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर’ हे पुस्तक लिहून जगाला या व्हॅली ऑफ फ्लॉवरची प्रथमच ओळख करून दिली. ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर’ हा नंदादेवी बॉयोस्पेअर रिझर्व्हचाच भाग असून उत्तराखंडातील गढवाल जिल्ह्यातील चामोलीमध्ये येतो. हे क्षेत्र नॅशनल पार्क असून राखीव आहे. व्हॅली ऑफ फ्लॉवर ८७.५० वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. या व्हॅलीत ३०० पेक्षा जास्त फुलांच्या प्रजाती पहावयास मिळतात. यात प्रामुख्याने जिरॅनियम, बेल फुले, माहीगोल्ड, प्रिमुला, पेडीक्‍युरीयस, थेर्मेपीसीस, टटोलीयस. अस्टर, रेनुकुलस, इनुका इत्यादी प्रकारचे असंख्य फुलांचे प्रकार पहावयास मिळतात. यातील बहुतांशी फुले ही औषधी आहेत. या फुलांचा प्रमुख हंगाम जुलै ते ऑगस्टच्या मध्यापर्यंत असतो. प्रत्येक १०-१२ दिवसात नवीनच प्रकारची फुले उमललेली दिसतात. याच बरोबर येथे विविध प्रकारच्या असंख्य वनस्पती, औषधी वनस्पती, औषधी मशरुम, विविध औषधी फळे, ब्लू बेरी, रेड बेरी पहावयास मिळतात. याच बरोबर येथील वन्यजीवन अतिशय संपन्न आहे. येथे प्रामुख्याने हिमालयीन अस्वल, रेड फॉक्‍स, मस्क डिअर इत्यादी प्राणी आढळून येतात. याच बरोबर असंख्य जातीचे पक्षी, फुलपाखरे व्हॅली ऑफ फ्लॉवरचे सौदर्यं वाढवितात. व्हॅली ऑफ फ्लॉवरच्या सुरवातीस वनविभागाचे चेक पोस्ट आहे. येथे नोंदणी करून व्हॅली ऑफ फ्लॉवरमध्ये जाण्याची परवानगी मिळते. या चेक पोस्टपूर्वी एक रस्ता पवित्र हिमकुंडसाहीबसाठी जातो. हिमकुंडासाहिबसुद्धा गांगरियावरुन ६ किमी आहे. परंतु उंचावर असल्यामुळे चांगलीच दमछाक होते. परंतु शीख बांधव मोठ्या श्रद्धेने ही अवघड यात्रा करतात. आम्ही आता व्हॅलीच्या तोंडाशी होतो. आमच्या सोबत रजनीश गाइड होता. रजनीश हा स्थानिक असल्यामुळे त्याला येथील चांगली माहिती होती. आमचा ग्रुप मोठा होता जवळपास ४० जणांचा होता. तरीही रजनीश सर्वांना वनस्पती, फुले, फळे, निसर्गाची विविध रूपाची माहिती देत होता. व्हॅलीचा रस्ता अरुंद असल्यामुळे रांगेतच चालावे लागते. सुरवातीपासूनच व्हॅलीत असंख्य वनस्पती आपले स्वागत करतात. व्हॅलीत असंख्य औषधी वनस्पती असून, अनेक दुर्धर आजार यामुळे बरे होतात असे रजनीशने सांगितले. येथे मोठमोठे वृक्ष सूर्यप्रकाश जमिनीवर पोहचू देत नाहीत. मशरुमच्या विविध जाती पहावयास मिळतात. ‘अग्नी’सारखे मशरुम आम्हाला पहावयास व खाण्याससुद्धा मिळाले. रजनीश आम्हाला विविध औषधी व विषारी वनस्पतीची माहिती द्यायचा व खाण्यायोग्य वनस्पती चाखण्यास सांगायचा. थोडे अंतर चालल्यावर आम्ही पुष्पावतीच्या तीरावर पोहोचलो. अत्यंत खळखळणारे, वेगाने वाहणारे पाणी पाहून मन थक्क होते. गोल गोल मोठमोठे दगड, त्यांच्यावर आदळणारे पाणी दुधासारखे पांढरे शुभ्र दिसते. नदीच्या शेजारीच अत्यंत खडा पहाड आहे. त्यांच्या व पुष्पावतीच्या मधील पट्ट्यालाच व्हॅली ऑफ फ्लॉवर म्हणूनच ओळखतात. थोडी चढण चढल्यावर मुख्य व्हॅलीची सुरवात झाली. असंख्य रंगीबेरंगी फुललेली फुले, काही पिवळी,काही घंटीसारखे दिसणारी निळी फुले खूपच आकर्षक होती. आम्ही जवळपास ३ किमीपर्यंत व्हॅलीत आतमध्ये शिरलो. व्हॅलीत वातावरण खूप बदलत असते. त्यामुळे आम्हाला रजनीश घाई करण्यास सांगत होता. 
व्हॅलीत एक खबरदारी घ्यावी लागते. पक्की ओळख झाल्याशिवाय कोणत्याही वनस्पतीला हात लावू नये. तसेच गाईडने सांगितलेली फळे अथवा वनस्पती चाखावी. अन्यथा मोह आपल्या जिवावर बेतू शकतो. कोणतेही फूल अथवा वनस्पतीची नासधूस होणार नाही याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. तसेच कोणत्याही प्रकारचा कचरा येथे होणार नाही याचीही प्रत्येकाने काळजी घेतल्यास व्हॅलीचे सौंदर्य अबाधित राहू शकते. कारण येथे पर्यटकांचे मोठ्या प्रमाणात लोंढे येत असतात व प्रत्येकालाच निसर्गाची काळजी वाटत असतेच असे नाही. व्हॅलीचा मनसोक्त आनंद घेऊन व पुन्हा पुन्हा या ठिकाणाला भेट देण्याचा मनात निर्धार करून जड अंतःकरणाने आम्ही व्हॅलीतून परत निघालो. 

पाऊस जोरात येत होता. अशा धुंद वातावरणात आम्ही सातच्या सुमारास मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. 

तिसऱ्या दिवशी आम्हाला हिमकुंड साहिबला जायचे होते. ट्रेक अवघड होता. बऱ्याच जणांनी घोडे करून हिमकुंड करण्याचे ठरविले होते. त्यामुळे मला लवकर जाऊन परत येण्याचे टेन्शन होते. त्यामुळे घोड्यावर येणाऱ्यांची वाट न पाहता चालायला लागलो. वाट कठीण होती. अत्यंत तीव्र चढ होता. पण वाटेत अनेक धबधबे होते. हिमकुंड हे तीर्थक्षेत्र शिखांचे दहावे गुरुगोविंदसिंग यांची तपोस्थळी असून शीख बांधव मोठ्या संख्येने दर्शनासाठी येथे येतात. हिमकुंडाची उंची ४३२९ मीटर असून येथे वातावरण अत्यंत थंड असते. येथे भव्य गुरुद्वारा, लक्ष्मण मंदिर, पाण्याचा मोठा कुंड आहे. त्या कुंडात शिखरावरील बर्फ वितळले, की पाणी जमा होते. तिर्थयात्री मोठ्या श्रद्धेने त्यात अंघोळ करतात. आम्ही कठीण रस्ता पार करीत जवळपास १२ च्या आसपास हिमकुंडला पोहोचलो. रस्त्यात व्हॅलीप्रमाणेच असंख्य फुले, वनस्पती आहे. पण येथे एक अत्यंत सुंदर पवित्र फूल पहावयास मिळते ते म्हणजे हिरवेगार गोबीचे आकाराचे ब्रह्मकमळ अत्यंत सुंदर आणि खूप मोठ्या प्रमाणात येथे आहे. आम्ही पोहचल्याबरोबर कुंडाकडे गेलो. नंतर आम्ही गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतले. गुरुद्वारातील प्रसाद व खिचडी घेतली व पुन्हा अवघड उतार उतरण्यास सुरवात केली. पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. पण आम्हाला कसेही करून खाली लवकर अंधार पडण्याच्या आत पोहोचायचे होते. घोड्यावरील सर्वजण आता पुढे झाले होते. आम्ही चौघेच आता चालत होतो. रस्त्यात इतर शीख बांधव भेटत होते. त्यांना पाहून धीर येत होता. पण रस्ता संपतच नव्हता. आम्ही सायंकाळी ७.३० च्या सुमारास गांगरीयात पोहोचलो. अत्यंत खडतर ट्रेक आम्ही पूर्ण केला होता. गांगरिया हा परिसर बर्फाने आच्छादलेला असतो. येथील अस्वले तर हिवाळ्यात गांगरीयातील घराची लाकडाची मजबूत दारेसुद्धा धडका मारून तोडण्याचा प्रयत्न करतात असे रजनीशने सांगितले. 

चौथ्या दिवशी आम्ही गोविंदघाटसाठी निघालो व तेथून आम्ही बसने जोशीमठ व नंतर एक दिवस आम्ही तेथूनच जवळ असलेले औली येथील रोपवेचा आनंद घेतला. येथील सफरचंदाच्या बागांना भेट दिली. तसेच जवळ असलेल्या तपोवन येथील गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये मनसोक्त अंघोळी सुद्धा केल्या. पाचव्या दिवशी आम्ही सकाळी लवकर निघून ऋषिकेश येथे रात्री पोहोचलो. मनामध्ये पुन्हा एखाद्या नवीन ट्रेकचे स्वप्न पाहूनच...

फोटो फीचर

संबंधित बातम्या