यलोस्टोनचे ‘गायझर्स‘

कांचन तळेकर, पुणे
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

पर्यटन

‘सकाळ साप्ताहिक’मध्ये पर्यटन या सदरासाठी लेख पाठविण्याचे आवाहन वाचकांना करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेले लेख प्रसिद्ध करीत आहोत. 

निसर्ग हा सृष्टीचा रंगकर्मी आहे आणि याचा साक्षात्कार अमेरिकेतील ‘यलोस्टोन नॅशनल पार्क’मधील विविध रंगी गरम पाण्याचे झरे व धारोष्ण असंख्य जलतुषारांची उंच उडणारी नेत्रदीपक कारंजी पाहिल्यावर होतो. ताजमहाल (भारत), चीनची भिंत (चीन), ख्रिस्तांचा पुतळा (ब्राझील), चीचेन इट्‌जा (मेक्‍सिको), मॅच्यु-पिच्यु (पेरू), पेट्रा (जॉर्डन), कॉलोजियम ऑफ रोम (रोम) आदी जगप्रसिद्ध सात आश्‍चर्ये ही मानवनिर्मित आहेत. पण अमेरिकेच्या यलोस्टोन पार्कमधील बारोमास अखंडपणे वाहणारे गरम पाण्याचे झरे आणि बाष्पीभूत धारोष्ण फवारे (geysers) म्हणजे निसर्गनिर्मित अद्‌भुत किमया आहे.

यलोस्टोन नॅशनल पार्कमधील उकळत्या पाण्याचे अखंड वाहणारे विविधरंगी झरे व आकाशाकडे थोड्या थोड्या वेळाने झेपावणाऱ्या कारंजाच्या दर्शनाने झालेला आनंद शब्दातीत होता. समृद्ध निसर्गाचे वरदान लाभलेल्या यलोस्टोन पार्कमधील गायझरचे विलक्षण व अप्रतिम जलसौंदर्य पाहून आम्ही सुखावलो. यलोस्टोन पार्क म्हणजे विविध रंग, आकार, प्रकार व उंचीच्या गायझर्सचे विलोभनीय माहेरघर आहे. ही नयनमनोहर कारंजी व झरे म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा अपूर्व असा निसर्गोत्सव म्हटले पाहिजे. १ मार्च १८७२ मध्ये यु.एस. काँग्रेसद्वारा स्थापित यलोस्टोन पार्कमधील हे गायझर्स अमेरिकेतील मोन्टाना, इदाहो व वायमिंग या तीन राज्यांच्या सीमेवर सुमारे ८,९८३ कि.मी. अर्थात २२,१९,७९१ एकर इतक्‍या विस्तृत भूभागावर वसलेले जगातील पहिले नॅशनल पार्क आहे. २०१६ पर्यंत जगातील सुमारे ४२,५७,१७७ इतक्‍या पर्यटकांनी यलोस्टोन पार्कला भेटी दिल्या आहेत. जगातील पर्यटकांची सर्वाधिक गर्दी आकृष्ट करणारा हे अमेरिकेतील प्रथम क्रमांकाचा पार्क मानले जाते. जगातील एकूण गायझर्सपैकी एकट्या अमेरिकेत दोन तृतीयांश गायझर्स आहेत. एकूण १२८३ उद्‌भव झालेल्या गायझर्सपैकी ४६५ गायझर्स जिवंत आहेत. या गायझर्सची काही विलक्षण वैशिष्ट्ये सांगता येतील. उकळत्या पाण्याचे हे झरे व धारोष्ण जल तुषारांचे फवारे बारोमास व अष्टौप्रहर सुरू असतात. यातील काही गायझर्स हे दररोज एका विशिष्ट वेळी अगदी ठराविक वेळेसाठी उंचच उंच उडत असतात. उदा. मोठे गायझर्स दर एक मिनिट ४५ सेकंदाने १० फूट उंच (geyser) उडतात. तर लहान गायझर दर अर्ध्या तासांनी ५ ते १० फूट वर उडतात. ‘लायन’ नावाचा गायझर १०० फुटापर्यंत वर झेपावतो तर ‘जेट’ गायझर २० फुटापर्यंत वर झेपावतो. ‘बिहाइव’ (beehive geyser) हे उंच बेसीनवर उभारलेले गायझर आहे. यलोस्टोन पार्कमधील  हे गायझर दर २० मिनिटांनी ५० फूट उंचीपर्यंत वर झेपावते. ‘शंकू’ (cone) टाईपचा गायझर दर दहा तासांनी साधारणपणे ६० ते ९० फूट उंच झेपावतो. ‘डायशी’ गायझर हे दर ९० ते १०० मिनिटांच्या अंतराने सुमारे ६० ते ७५ फूट उंचावर ३ ते ४ मिनिटापर्यंत वर झेपावते.

‘ग्रॅन्ड गायझर’ हा नावाप्रमाणे मोठा अर्थात अधिक उंचीचा गायझर आहे. हे दर ८ ते १२ तासांनी १५०-१८० फूट उंच बरसणारे कारंजे १०-१२ मिनिटापर्यंत सुरू असते.

या सर्व गायझर्सची वैशिष्ट्ये म्हणजे विविधता, अर्थात त्याचे आकार, प्रकार, रंग, रूप, परस्पर भिन्न आहेत. त्यांची नावे ही त्यांचे रंग, रूप, ध्वनी, आकार उंची तथा गुण आदी वैशिष्टानुसार संबोधले जातात. उदा. ‘लायन’ गायझरचा उद्रेक होत असताना गायझरच्या कंठाशी पाण्याचा आवाज सिंहगर्जनेसारखा येत असल्याने त्यास लायन गायझर म्हणतात. एका गायझरचे नाव तर चक्क ‘ओल्ड फेथफुल’ गायझर म्हणून सुप्रसिद्ध आहे. कारण हा गायझर ज्या परिसरात आहे, तेथील अन्य बहुतांश गायझर कालांतराने नष्ट झाले आहेत. परंतु हा एकमेव गायझर अस्तित्वात आल्यापासून सातत्याने अद्यापही सुरू आहे. अष्टौप्रहर अखंडपणे हे कारंजे रोज दुपारी ३ वाजता नियमितपणे न चुकता ५ मिनिटापर्यंत ५० फुटापर्यंत उडत असते. म्हणून ते गायझर ‘ओल्ड फेथफुल’ (दीर्घजीवी व विश्‍वासू) म्हणून सुप्रसिद्ध झाले आहेत. 

काही कारंजी शंकू किंवा सुळक्‍याच्या आकाराची आहेत, तर काही झरे कुंडांच्या आकाराचे आहेत. 

सलग दोन दिवस या स्वयंभू गायझरचे रंगरूप, सौंदर्य तृषार्त नेत्र व मनाने डोळ्यात साठवून घेत ऊन, सावली व पावसाचा पाठशिवणीचा रंजक खेळही आम्ही अनुभवत होतो. उंच उडणारी बाष्पीभूत कारंजी जरी उष्ण असली तरी अवकाशामध्ये झेपावताना व वाऱ्याच्या झोतामुळे कारंज्यांचा बाष्पलोट क्षणार्धात थंड होऊन आमच्या अंगावर विसावत असे. झऱ्यातून वाहणारे पाणी कढईमधील उकळत्या तेलाप्रमाणे कढत असल्याने त्यामध्ये बोटे बुडविण्याचा प्रयत्न केला असता बोटांना तीव्र चटका बसायचा. अशा प्रकारे झरे व कारंज्यामधील पाण्याची अत्यंत गरम, कोमट व थंड अशी तीनही रूपे ‘पल में मासा, पल में तोला’ या वचनानुसार क्षणभरात आम्ही अनुभवली. अशा तऱ्हेने यलोस्टोनमधील निसर्गाची (पंचतत्वांची) परावर्तित व परिवर्तित अशी असंख्य अतुलनीय, विलोभनीय व अविस्मरणीय रूपे याची देही, याची डोळा आम्ही पाहिली.

या सर्व गायझर्सची आणखी वैशिष्ट्य म्हणजे रंगवैविध्य अर्थात काळे, निळे, हिरवे, पांढरे, नारंगी असे विविध रंगाचे गायझर्स आहेत. त्यामुळे काही गायझर्सना रंगानुरुप नाव दिले आहे. उदा. ‘ब्लू, ब्लॅक, ऑरेंज, व्हाइट इ.’ आदी गायझर्स. वस्तुतः या गायझरमधील पाण्याचे रंग निरनिराळे नसून त्या पाण्याखालील खडक किंवा जमीन, मातीचा पोताचा जो वास्तव रंग असेल तशा रंगाचे पाणी दिसते. या परिसरात सौम्य स्वरूपात अधून मधून ज्वालामुखीचा उद्रेक होतो. त्यामुळे उद्रेकाच्या ठिकाणच्या खडकामधून लावरस बाहेर पडतो. जमिनीच्या/खडकाच्या गर्भात असणाऱ्या तप्त सायकॅट्रिक खडकावर परिणाम होतो. तेव्हा विस्फोटित होणारा लाव्हारस बाहेर येताना त्या खडकाचे अंतरंग घेऊनच बाहेर पडतो. त्यामुळे खडकाच्या बाह्यपृष्ठावर वेगवेगळ्या रंगाचे लाव्हारसमिश्रित स्राव उमटतात. उदा. ‘व्हाइट डोम’ या गायझर नावाप्रमाणेच व्हाइट रंगाचा आहे. या गायझरमधून बाहेर प्रसवणारा व सभोवती पसरणारा लाव्हारस पांढऱ्या रंगाचा असल्याने त्यास ‘व्हाइट डोम’ हे नाव पडले आहे. हा गायझर अत्यंत जुना व प्रसिद्ध आहे. त्याच्या उद्रेकाचा परीघ ४ इंच रुंदीचा असून फवाऱ्याची उंची ३० फूट आहे. विविध रंगाच्या या प्रवाहामध्ये पिवळ्या रंगाचे प्रमाण सर्वाधिक असल्याने ‘यलोस्टोन’ पार्कमधील खडकांवर सर्वत्र प्रामुख्याने पिवळ्या रंगाची अक्षय रांगोळी काढल्याचा आभास होतो. त्यामुळे त्या खडकांना किंबहुना संपूर्ण नॅशनल पार्कला यलोस्टोन हे सार्थ वर्णनात्मक नाव दिले गेले आहे.

‘मामोथ’ येथील छोट्याशा डोंगर माथ्यावर १५-२० एकराच्या परिसरात ठिकठिकाणी उद्‌भवलेल्या गरम पाण्याच्या गायझरमधून बाहेर प्रसवणारा उष्ण पांढरा ज्वालारस डोंगर उतारावरून सतत वाहत असल्याने होणाऱ्या झीजेमुळे उतारावरील खडकांना पांढऱ्या संगमरवरी कापीव पायऱ्यांचा आकार प्राप्त झाला आहे.

उकळत्या पाण्याचे काही झरे नदी किंवा समुद्राच्या पाण्याखाली आच्छादित खडकावर उगम पावलेले आहेत. खडकाखाली असणाऱ्या तीव्र उष्णतेच्या दाबामुळे खडकामध्ये जिथे छिद्र किंवा फट मिळेल तिथे स्प्रिंगप्रमाणे हे गायझर खडकातून वर उफाळून येतात.

एवढ्या विस्तीर्ण यलोस्टोन पार्कमध्ये जंगल, दऱ्या, नद्या, सरोवर, धबधबे, वनश्री, खडकाळ डोंगर, पर्वतरांगा तसेच विविध प्रकारच्या वनस्पती, फुलझाडे आणि असंख्य वन्य पशू, प्राणी मुक्त संचार करीत असतात. वस्तूतः यलोस्टोन पार्क हे पर्यटकांसाठी गिर्यारोहण, कॅम्पिंग, बोटींग, फिशिंग, रायडिंग, आदी न्युमेरियस आणि निसर्ग सौंदर्य दर्शनाची आनंदाभूती व मनोरंजनाच्या पर्वणीचे रमणीय स्थळ आहे. 

खरंतर अमेरिकेतील निसर्ग ऋतुमानच काहीसे वेगळे आहे. येथे तीन तीन महिन्यांचे एकूण चार ऋतू आहेत. उदा. उन्हाळा (जून ते ऑगस्ट), हिवाळा (डिसेंबर ते फेब्रुवारी), पानगळ (सप्टेंबर ते नोव्हेंबर), वसंतऋतू (मार्च ते मे). अर्थात तिथे पावसाळा हा स्वतंत्र ऋतू मानला जात नाही. कारण तो कोणत्याही काळात बरसत असतो. यलोस्टोन पार्कमधील हे अद्‌भुत गायझर्स जगातील निसर्गप्रेमी, भूगर्भशास्त्र व भूगोलाच्या अभ्यासक व संशोधकांसाठी ज्ञानोपलब्धिची अपूर्व पर्वणी ठरू शकते. 

यलोस्टोनमधील नित्य रंगपंचमी खेळणारे निसर्गनिर्मित झरे व कारंजी पाहिल्यावर आपसूक आपल्या प्रसन्न चेहऱ्यावर आनंदाची कारंजी थुईथुई नृत्य करू लागतात. 

 यलोस्टोनच्या गायझर्सखालील विविध रंगांच्या खडकाच्या पृष्ठभागावर खडकातून प्रसवणाऱ्या नाना रंगद्रव्यांचे प्रवाह व प्रवाहाच्या परस्पर मिश्रणाने उमटणारा रंगाचा जलसा अत्यंत विलोभनीय असा वाटतो. निसर्गाने जणू विविध रंगांची अक्षय रांगोळी यलोस्टोनच्या खडकावर रेखाटल्याचा मूर्त भास होतो. खरोखर समृद्ध निसर्गाचे वरदान लाभलेले यलोस्टोन नॅशनल पार्क व रमणीय पृथ्वीवरील जणू स्वर्गच होय.

काश्‍मीर जसे भारताचे नंदनवन आहे, तसेच यलोस्टोन नॅशनल पार्क व त्यामधील नैसर्गिक व विविध रंगांची कारंजी व झऱ्यांचे अप्रतिम जलशिल्प हे अमेरिकेचे नंदनवन म्हणता येईल.

फोटो फीचर

संबंधित बातम्या