दक्षिण डकोटाचे गूढ रहस्य

केतकी पाटील
शुक्रवार, 9 मार्च 2018

पर्यटन
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये पर्यटन या सदरासाठी लेख पाठविण्याचे आवाहन वाचकांना करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेले लेख प्रसिद्ध करीत आहोत.

लाँग विकेंड’ची चाहूल लागली की ऑफिसमध्ये कोण कुठे फिरायला जाणार याची चर्चा सुरू होते. एक मैत्रीण म्हणाली आईला भेटायला ’साउथ डकोटा’ राज्यातल्या ’रॅपिड सिटी’ या शहरात जाणार आहे.  आमच्या शेजारचं हे राज्य तसं जरा बेतास बात आहे असं ऐकून होतो. सगळा प्रेअरी प्रदेश. सरळसोट रस्ते, ना चढ ना उतार. रस्त्याच्या दोनही बाजूला नजर जाईल तिथवर फक्त शेतजमीन. आणि कडाक्‍याच्या थंडीत या हिरव्यागार शेतजमिनीवर फूटभर स्नो असतो. एकूणच दुर्लक्षित, भकास, बकाल आणि गूढ अशी समजूत होती. माझी हीच समजूत या मैत्रिणीने मोडून काढली आणि जणू मला दृष्टांतच दिला. एक एक करत तिने मला इंटरनेटवरून सगळ्या प्रेक्षणीय स्थळांची सफर घडवून आणली. ऑफिस संपवून घरी पोचते ना पोचते तोच मी सगळा प्लॅन आखला आणि पुढच्याच विकेंडला आमची गाडी सुसाट सुटली ते रॅपिड सिटीच्या दिशेने.

साउथ डाकोटाच्या ट्रिपमधलं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे ’बॅडलॅंड्‌स नॅशनल पार्क’. ट्रीपची सुरवात याच पार्कपासून करायची असे ठरवले होते. आदल्या दिवशी जवळ जवळ ६ तास प्रवास आणि दुसऱ्या दिवशी साधारण २ तासात बॅडलॅंड्‌स गाठायचे असे ठरले. हा २ तासाचा प्रवास केवळ अविस्मरणीय होता. सरळसोट रस्ता आणि दुतर्फा केवळ फूटभर उंचीचं गवत उभे होते. सकाळच्या सूर्यप्रकाशात सगळा परिसर सोनसळी दिसत होता. हे होतं ’अमेरिकन नॅशनल ग्रासलॅंड’. हे ग्रासलॅंड लाखो एकर परिसरात पसरलेले आहे आणि सगळीकडे नुसते गवतच गवत. एकही झाड नाही, पान नाही की झाडाची वाळलेली फांदी नाही. एक स्वच्छ आणि स्पष्ट चित्रं. हे सगळं चित्रं डोळ्यांत सामावून घेत होते, फोटो काढत होते आणि अचानक फोटो फ्रेममध्ये उंच, टोकदार, टेकड्यांसारखी रचना दिसली आणि बॅडलॅंड्‌स जवळ आल्याचा सिग्नल मिळाला.

अब्जावधी वर्ष तीव्र वातावरणाचा सामना करणाऱ्या पर्वतरांगांची कहाणी म्हणजे बॅडलॅंड्‌स नॅशनल पार्क.  नदी, समुद्र आणि पर्यावरणातील इतर घटकांमुळे इथे सुरवातीला डोंगररांगांची निर्मिती झाली. पण ही निर्मिती काही एका दिवसात झाली नाही. वेगवेगळ्या घटकांनी जमा केलेले थर एकावर एक चढत गेले आणि या डोंगरांची निर्मिती झाली. साहजिकच घटक वेगळे असल्यामुळे प्रत्येक थराचा रंग निराळा आहे. एकीकडे निर्मिती होत होती आणि दुसरीकडे धूप देखील. जवळ जवळ प्रत्येक वर्षी एक इंच धूप होते. या धुपेमुळे डोंगराला वेगवेगळे आकार आले आहेत. लांबून पाहिलं तर अक्षरशः वळकट्या पडल्या असं वाटतं. जवळ गेल्यावर ती एक एक वळकटी म्हणजे जवळपास एका डोंगराएवढी दिसते. असे एक दोन डोंगर नाहीत तर अडीच लाख एकर पसरलेली ही पर्वतरांग आहे. या पर्वतरांगांमधून वाट काढून जाणे केवळ अशक्‍य मानले जाते. त्यामुळे या परिसराला ’बॅडलॅंड्‌स’ असे नाव पडले. ’Bad Lands to travel through’. या नॅशनल पार्कमध्ये आपले वाहन घेऊन वेगवेगळ्या स्पॉट्‌सवर थांबत, फोटो काढत, दोन अडीच तासात सगळं बघून होतं.

बॅडलॅंड्‌स बघून रॅपिड सिटीमध्ये मुक्कामी सामान ठेवलं आणि पुढे ’माउंट रशमोर’ च्या दिशेने निघालो. रॅपिड सिटीपासून अर्ध्याच तासांवर ’किस्टोन’ नावाचं छोटंसं गाव आहे. माऊंट रशमोरच्या पायथ्याशी वसलेले हे गाव. जेमतेम ५० कुटुंबं. दक्षिण डकोट्यात पर्यटनाला चालना मिळावी आणि लोक व्यवसाय उद्योगाला लागावेत या हेतूने डोआन रॉबिन्सन यांनी माऊंट रशमोरमध्ये भव्य ’नीडल्स्‌’ कोरण्याची कल्पना सुचवली. परंतु रचनाकार गटझन बोरग्लम  ह्यांनी ही कल्पना खोडून काढली. कारण या नीडल्स्‌ कोरण्यासाठी रशमोरचा ग्रॅनाईट अत्यंत ठिसूळ आणि दुय्यम दर्जाचा होता. शेवटी राष्ट्रहिताची आणि जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित करतील अशी रचना साकारण्याचे ठरले. आणि ते म्हणजे स्वतंत्र अमेरिकेचे पहिले चार राष्ट्राध्यक्ष! अनुक्रमे जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफर्सन, थिओडोर रुझवेल्ट आणि अब्राहम लिंकन. ६० फूट उंचीचे हे चेहरे लांबूनही सुबक आणि ठसठशीत दिसतात. राष्ट्रीय निधी उपलब्ध झाल्यापासून १९३७ ते १९४१ या वर्षापर्यंत हे काम अहोरात्र चालू होते. १९४० मध्ये गटझन यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा लिंकन बोरग्लम याने कामाची धुरा स्वीकारली. परंतु पुढे अपुऱ्या निधीमुळे केवळ चेहरे कोरण्यात आले. ही संपूर्ण कलाकृती आग्नेय दिशेला तोंड करून उभी आहे. जेणेकरून जास्तीत जास्त सूर्यप्रकाशने ही कलाकृती उजळून निघेल. या कलाकृतीसमोर उभं राहिल्यावर ते चार चेहरे नुसते चेहरे राहिले नाहीत तर ते बोलके झाले आणि इतिहास पुन्हा जागा झाला.

एकीकडे माऊंट रशमोर तर एकीकडे ’क्रेझी हॉर्स मेमोरिअल’. साउथ डकोटामधील ’लकोटा’ या जमातीच्या पराक्रमी योध्याचा- क्रेझी हॉर्सचा ५५० फूट उंच पुतळा इथे साकारण्यात येत आहे. घोड्यावर स्वार झालेला हा योद्धा दूर दिशेला बोट दाखवताना दिसतो. घोड्याचा तुफान वेग आणि नवीन भूमी पादाक्रांत करण्याचं लक्ष्य या कलाकृतीतून दिसते. १८४८ पासून या शिल्पाचं काम सुरू झालं आहे आणि अजूनही बरेच वर्ष सुरू राहील.

कॉर्कझॅक झिओलकोवस्की या कलाकाराची ही निर्मिती आहे. या पोलिश वंशाच्या शिल्पकाराने आधी बोरग्लम ह्यांच्या हाताखाली माउंट रशमोरचे काम केले होते. त्यांच्या पश्‍च्यात संपूर्ण झिओलकोवस्की कुटुंबाने क्रेझी हॉर्सच्या निर्मितीत स्वतःला झोकून दिले आहे. हे काम पूर्णपणे ना नफा तत्त्वावर चालत आहे. सरकारने आर्थिक मदत करण्यासाठी बरेचदा हात पुढे केला परंतु झिओलकोवस्की कुटुंब केवळ मेमोरिअल फंडच्या माध्यमातून आर्थिक बाजू सांभाळत आहे. एन्ट्री फी, पार्किंग फी, गिफ्ट शॉप, कपडे यांच्या माध्यमातून पैसे जमवले जातात. एव्हढच नाही तर ज्या डोंगरात कोरीवकाम चालले आहे ते दगडही विकायला ठेवलेत.

क्रेझी हॉर्सची पूर्ण मूर्ती कशी दिसेल हे दाखवण्यासाठी प्रस्तावित मूर्तीच्या / मूर्ती इथे साकारण्यात आली आहे. थंडरहेड माउंटनवर कोरण्यात येणाऱ्या या शिल्पावर जाण्यासाठी पायवाट आहे. जवळ जवळ तासा-दीड तासाचा ट्रेकच आहे. अधूनमधून लहान सहान सुरुंग लावण्यात येतात ते बघण्यासाठी देखील खूप गर्दी होते. रात्री लाइट अँड साऊंड शो पण असतो. पूर्वी हे लकोटा लोक कसे राहायचे हे दाखवण्यासाठी एक छोटं म्युझियम देखील उभारण्यात आलं आहे. नवीन पिढीला इतिहास कळावा आणि पूर्वजांचा अभिमान वाटावा या साध्या हेतूतून रचला जाणारा हा नवीन इतिहास बघता आला आणि आम्ही त्याचे साक्षीदार झालो याचा आनंद वाटला. आठवण म्हणून आम्ही देखील एक दगड घेतला आणि परतीच्या वाटेला लागलो.

फोटो फीचर

संबंधित बातम्या