भटकंती अमरकंटकची 

ॲड. मधुगीता सुखात्मे
सोमवार, 16 मार्च 2020

पर्यटन
 

दिवाळीच्या सुटीमध्ये पाच-सहा दिवसांच्या सहलीला जाण्याचा विचार आला आणि डॉ. सविता देशपांडे यांनी छत्तीसगडची राजधानी ‘रायपूर’ एकदा पहाच असा प्रस्ताव मांडला. रायपूरहून नर्मदेचा उगम असलेले ‘अमरकंटक’ आणि भोवतालचे जंगल पाहण्याचे आम्ही निश्‍चित केले. या भटकंतीची सूत्रधार म्हणून सर्व प्रकारची जबाबदारी डॉ. देशपांडे यांनी त्यांचे स्नेही डॉ. आगाशे यांच्या सहकार्याने अतिशय अचूकपणे ‘start to finish’ अशी पार पाडली. 
डॉ. देशपांडे, त्यांचा नातू - आर्य, मी व सुषमा भोगले अशा चौघांनी भाऊबिजेच्या दिवशी बिलासपूर एक्सप्रेसने प्रथम श्रेणीच्या बोगीतून रायपूरला प्रस्थान केले. या पूर्ण प्रवासात रेल्वेची सुधारलेली स्वच्छता प्रवासाला प्रोत्साहन देत होती. पुणे ते रायपूर हा प्रवास नागपूरमार्गे सुरू झाला. जवळजवळ १८ ते १९ तासांचा हा प्रवास करून दुसऱ्या दिवशी अडीच वाजता छत्तीसगडची राजधानी ‘रायपूर’ला उतरून आम्ही आमच्या भटकंतीला सुरुवात केली. स्टेशनवर डॉ. आगाशे यांचे आदरातिथ्य करणारी टोळी आम्हाला घ्यायला आली होती. रायपूर येथे राहण्याची व्यवस्था आणि जाण्या-येण्याकरता इनोव्हा गाडी त्यांनी सज्ज ठेवली होती. आमचा त्या दिवशीचा मुक्काम हॉटेल मयुरा येथे होता. प्रवासाचा शीण घालवून आम्ही पाच वाजता रायपूर दर्शन घेण्यासाठी बाहेर पडलो. रायपूर हे शहर माझ्या ऐकीवातल्या माहितीप्रमाणे मागासलेल्या लोकांचे तसेच नक्षलवादी लोकांचे शहर असल्यामुळे बाहेर पडताना मनात धाकधूक होती. पण स्वच्छ सुरेख रस्ते, दुतर्फा झाडे आणि जाहिरातींचे फ्लेक्‍स विरहीत इमारती पाहून पहिलाच सुखद धक्का आम्हाला बसला. 

ड्रायव्हरने आमचे वाहन प्रचंड जलाशयाच्या काठी नेऊन उभे केले. मावळतीच्या सूर्याचे प्रतिबिंब त्यात पडत असतानाच उगवतीच्या चतुर्थीच्या चंद्राची कोर हळूहळू उमटत होती. थंडीची चाहूल आणि दुसऱ्या तीरावर केलेल्या विद्युत रोषणाईचे प्रतिबिंब मनोरम दिसत असताना ‘मोर रायपूर’ असे लिहिलेला विद्युत प्रकाशित पुतळा छत्तीसगडचे वैभव दाखवत होता. मी कुतूहलाने म्हणाले, ‘इथे मोर दिसत नाही.’ तेव्हा गाइडने सांगितले, ‘मोर रायपूर याचा छत्तीसगडी भाषेत ‘माझे रायपूर’ असा अर्थ आहे. १८ वर्षांपूर्वी छत्तीसगड या प्रांताची निर्मिती झाली, तेव्हापासून आम्ही छत्तीसगडचे वैभव क्रमाक्रमाने प्रस्थापित करून जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत.’ पुढे त्याने जलाशयाच्या दुसऱ्या काठाला मुंबईसारखी मरीन ड्राईव्हवरून दिसणारी Queen's necklace सारखी रोषणाई दाखवून आमची संध्याकाळ अधिकच रम्य केली. दोन तासांच्या या फेरफटक्‍यात छत्तीसगड प्रांताची प्रगत सुव्यवस्था पुण्या-मुंबईपेक्षा अधिक भावली. रात्रीचे जेवण अर्थातच अगत्यशील दांपत्य डॉ. आगाशे यांच्या घरी मनसोक्त गप्पा मारत आणि आख्यायिका ऐकत केले. सर्व बंगल्यांवर विद्युत रोषणाई होती आणि प्रवेशद्वारावर सुकलेल्या तांदळाच्या लोंब्यांचे आकर्षण तोरण लावले होते. हे आकाशकंदील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शकुनाचे म्हणून प्रवेशद्वारावर लावण्याची पद्धत आहे. तसेच छत्तीसगडमध्ये विजेची टंचाई नसल्याने प्रत्येकाच्या घरावरील विद्युत रोषणाई मनाला सुखावीत होती. आदल्याच दिवशी नरेंद्र मोदी निवडणुकीच्या सभेला उपस्थित होऊनदेखील कुठेही जाहिरातींचे फलक दिसले नाहीत, ही एक किमयाच म्हणावी लागेल. 

दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता आम्ही अमरकंटकला जाण्यासाठी प्रस्थान केले. अर्थातच न्याहारीला मिळाले इंदोरी पोहे. त्याची अप्रतिम चव आणि तेलविरहित करण्याची पद्धत आपणही आत्मसात केली पाहिजे असे वाटले. रायपूर ते अमरकंटक हा प्रवास साधारणपणे ३०० कि.मी.चा असून, पर्वतीय प्रदेशातला आहे. भोवताली सूर्याचा प्रकाश पोचू शकणार नाही अशी सागाची घनदाट जंगले आहेत. पण मनात असलेली भीती ही रायपूरच्या अनुभवावरून पार संपून गेली होती आणि आम्ही आल्हाददायक प्रवासाला सुरुवात केली होती. अमरकंटकला पोचण्यासाठी अनेक प्रांतांतून अनेक मार्ग उपलब्ध आहेत. उदा. जबलपूर, बिलासपूर, इहाडोल, रायपूर आणि सर्वांत जवळचे गाव म्हणजे ‘पेंड्रा’, जे नागपूर-कोलकत्ता मार्गावर आहे. रायपूरहून रस्ता धरल्यानंतर ‘रतनपूर’ साधारणपणे १५० कि.मी. अंतरावर आहे. सातपुडा आणि विंध्याचला या दोन्ही पर्वतांच्या साधारण मध्यावर असलेल्या ‘मैकल’ पर्वतावर अमरकंटक वसलेले असून, तिथून नर्मदेचा उगम होतो. त्यामुळे स्थानिक लोक ‘नर्मदामैय्या मैकल पर्वतोसे निकलती है’ असे सांगतात. 

सबंध जंगलातून दुतर्फा झाडीतून जाणारे आमचे एकच वाहन सुंदर घाटमाथा चढत होते. पुण्या-मुंबईच्या प्रदूषित वातावरणात राहिल्यानंतर ही चढण आपल्याला स्वच्छ हवेचा प्रसाद, स्वच्छ धुतलेले जंगल देते. गेल्या १८ वर्षांत सरकारने हे रस्ते बांधले असून, निसर्गाचे रक्षण करत असताना छत्तीसगडच्या खनिज व वनसंपत्तीला कुठल्याही प्रकारे हानी होणार नाही अशी व्यवस्था केली आहे. त्यामुळे त्या घनदाट जंगलातून जात असताना नजरेच्या टप्प्यात दुसरे वाहन नव्हते. अधूनमधून माकडांच्या टोळ्या, रानपक्षी आणि बहरलेली रानफुले दृष्टीसुख देत होती. निसर्गाचे सृष्टीसौंदर्य इतके विलोभनीय होते, की वर्णन करण्याकरता दुसरे शब्द नव्हते. दुपारचे १२ वाजले तरीही सूर्याची तपीष उगवत्या सूर्याच्या कोवळ्या किरणांइतकीही नव्हती. रानवाऱ्याच्या झुळकी फक्त सुगंध पसरवत होत्या. साधारणपणे दीडच्या सुमारास आम्ही रतनपूरला पोचलो. 

रतनपूरला छत्तीसगडची काळीमाता (महामाया) हिचे भव्य मंदिर आहे. आपल्याकडील तुळजापूरची भवानीमाता वा कोल्हापूरची अंबाबाई यासारखी या देवीची ख्याती आहे. भक्तांसाठी येथे सर्व सोयी उपलब्ध आहेत. ठिकठिकाणी माहिती देणारे फलक लावले आहेत. तिथे अंधश्रद्धेचे किंवा जादूटोण्याचे कुठलेही अस्तित्व असल्याचे दिसून आले नाही. मंदिर भव्य असूनही आत दर्शनाकरिता रांगेत उभे राहण्याची सोय होती. गाडीतून उतरल्यानंतर असे वाटले होते, की इतक्‍या आत जंगलप्रदेशात देवीच्या दर्शनाला गर्दी असणार नाही. पण आश्‍चर्याची गोष्ट अशी, की दर्शनासाठी किमान ३०० भक्तगण शांततेत शिस्तीत रांगेत उभे होते. त्यामुळे आम्ही कळसाचेच दर्शन घेऊन पुढील प्रवासाला निघालो. 

रतनपूरपासून अमरकंटकचे अंतर साधारणपणे १५० ते १७५ कि.मी. असून, हा सर्व मार्ग घनदाट सागाच्या जंगलातून जाणारा आहे. वनौषधी, पशुपक्षी आणि वानरांचे निवासस्थान असल्यामुळे नजरेच्या टप्प्यात नागमोडी वळणांनी वळणाऱ्या रस्त्यावर शुद्ध हवा आणि रमणीय मृद्‍गंध - धरणीचा वास सतत सोबत करतो. आम्ही ठिकठिकाणी थांबून प्रदूषणरहित निर्मळ अशा सृष्टिसौंदर्याचा लाभ तर घेतलाच, स्मृतीत कायम राहावे म्हणून अनेक फोटोही काढले. ड्रायव्हर गाइडप्रमाणे तेथील आदिवासी लोकांचे जनजीवन, त्यांचे सणवार उत्सव यांची माहिती देत होता. अनेक आख्यायिका, नर्मदेसंबंधी पुण्याप्रत गोष्टी आणि अमरकंटकची माहिती आम्हाला तेथे पोचण्यापूर्वीच मिळाली होती. नयनरम्य सृष्टीसौंदर्य जे शब्दातीत आहे, ते अमरकंटकच्या मार्गावर आम्ही अनुभवत होतो. तेथे जरी सुधारणा पोचल्या असल्या, तरी दैनंदिन जीवन साधे सरळ सोपे आहे, त्याला शहरी जीवनाचा वास लागलेला नाही. 

साधारणपणे तीनच्या सुमारास केवची नावाच्या गावाला पोचलो. तेथूनच ‘अचानक मार’ या अभयारण्यात जाण्याचा मार्ग सुरू होतो. ‘अचानक मार’ अभयारण्य म्हणजे छत्तीसगडी भाषेत एका अभयारण्याचे मागचे दार होय. अर्थातच आम्ही अचानक मारकडे न वळता अमरकंटकच्यामार्गे ‘कबीर-का चबुतरा’ करत अमरकंटकला निघालो. या चबुतऱ्यावर बसून संत कबीर यांनी दोहे रचल्याची आख्यायिका आहे. कबीराचे अनुयायी याला पवित्र स्थळ म्हणून भेट देतात. आम्ही मात्र वळसा घालून पुढील चढण चढत जंगलातून मार्ग काढत काढत अमरकंटकच्या जवळ पोचलो आणि नर्मदेच्या विशाल सुंदर पात्राने दर्शन दिले. आठ तासाच्या प्रवासाचा शीण नर्मदेच्या दर्शनाने क्षणात नाहीसा झाला. वास्तविक नदीचा उगम बराच पुढे आहे, पण नर्मदेचे पात्र डोळ्यांना सुखावत होते. मध्य प्रदेशातील अनुपपूर जिल्ह्यामध्ये अमरकंटक या गावात नर्मदा नदीचा उगम मानला जातो. येथून नर्मदा निघून १३१२ कि.मी. प्रवास करत भडोचच्या जवळ खंभातच्या खाडीतून सागराला मिळते. या प्रवासात तिला अनेक छोट्या छोट्या नद्या येऊन मिळतात उदा. हिरण, तिन्दोनी, कोलार, अथनी, गोई, तवा आणि गंजाळ या उपनद्या आहेत आणि जलविस्तार ९८,८७२ कि.मी. आहे. नर्मदा मध्यप्रदेशाची पर्वतीय नदी आहे. विस्तारित होऊन मध्यप्रदेश आणि गुजरात या प्रदेशातून मार्गस्थ होते. अमरकंटकमधील वनश्री कलकल करणाऱ्या नद्यांच्या असंख्य धारा आणि त्यामुळे निर्माण होणारे अनेक जलप्रपात वातावरणात एक प्रकारचा आनंद निर्माण करतात. आज मध्यप्रदेश सरकारने नर्मदेचे उगमस्थळ पर्यटकांसाठी पर्यटनस्थळ म्हणून विकसित केल्याचे दिसून येते. अमरकंटक प्राकृतिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक भाव यांनी अभिभूत झालेले आहे. या अमरकंटकच्या हृदयातून निघणारी नर्मदा म्हणजे तिच्या कणाकणात ओंकारदर्शन घडते असे म्हणतात. आज असंख्य लोक नर्मदेची परिक्रमा करतात. त्यामुळे नर्मदेबरोबर अमरकंटकचा महिमा उत्तरोत्तर वाढत जात आहे. ही एकमेव पश्‍चिममुखी नदी असून, हिचे नाव ‘रेवा’ असेही आहे. सत्यनारायणाच्या पूजेच्या कथेमध्ये आपण ‘इति श्री रेवा खंडे’ म्हणतो, तीच ही नर्मदा, जिला ‘मेकलसूता’ही म्हणतात. भक्तांची अशी श्रद्धा आहे, की ‘नमृता’ नर्मदा मोक्षदायिनी आहे. ही शिवपुत्री असल्यामुळे तिच्या तीरावर कन्यापूजनाला फार महत्त्व आहे. पायी परिक्रमा करणाऱ्या लोकांना तीन ते सव्वातीन वर्षे इतका अवधी लागतो. 

अशा नर्मदेचे दर्शन झाल्यानंतर आम्ही अमरकंटकला पोचलो. तिथे राहण्याची उत्तम व्यवस्था होती. आजूबाजूला घनदाट वनराई आहे. नर्मदेचे उगमस्थान व तिची पूजा करण्यासाठी सुंदर मंदिर आहे. त्याभोवती पाण्याची अनेक कुंडे आहेत. आजूबाजूला कमलपुष्पांची शेती होताना दिसते. अमरकंटकच्या पुरातत्त्व विभागाने जुन्या मंदिरांचे व्यवस्थित संगोपन केले असून नर्मदामैय्याचे पावित्र्य जपण्याची वृत्ती इथल्या लोकांमध्ये सहज अनुभवता येते. नर्मदेचे उगमस्थळ आणि जुने कर्णमंदिर, पाताळेश्‍वर मंदिर अशी अनेक देवळे आहेत; तर माई की बगिया, माई का मंडप, सोनमुडा, कबीर चबुतरा, ज्वालेश्‍वर महादेव, कपिलधारा अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. अमरकंटकमध्ये मला भावले ते ‘श्रीयंत्र महामेरू मंदिर’. नर्मदेच्या दक्षिण दिशेला श्रीयंत्र महामेरू मंदिराची स्थापना केली आहे. या मंदिराची उंची, लांबी व रुंदी ५२ फूट आहे. यामधील सर्वच गोष्टी नयनरम्य आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. माझ्या माहितीप्रमाणे अमरकंटकचे हे श्रीयंत्र मंदिर बहुधा पहिले व एकमेव असावे. या मंदिराच्या वरच्या भागातून खाली वाहणाऱ्या नदीमध्ये पोहणाऱ्या बदकांची रांगोळी व लहान-मोठ्या वानरसेनेने चालवलेला प्रपंच याची शोभा एकदम वेगळी अशी आहे. 

अमरकंटकला नर्मदेमुळे धार्मिकदृष्ट्या असाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. तरीही आजूबाजूला नवीन नवीन उपक्रम राबवले जात आहेत. तिथे प्रचंड मोठे जैन मंदिराचे बांधकाम सुरू आहे. पाच-सहा किलोमीटर अंतरावर अमरकंटकच्या जवळ आदिवासींच्या सुप्त कलागुणांचा विकास करणारे भारतीय जनजाती विश्‍वविद्यालय प्रस्थापित केले आहे. म्हणजेच अमरकंटकचा एक पर्यटनस्थळ म्हणून विचार केला, तर निसर्गरम्य घनदाट जंगलाच्या छायेत वसलेले एक नेटके टुमदार गाव आहे, ज्याच्या एका बाजूला श्रीयंत्र मंदिराची उभारणी तर दुसऱ्या बाजूला जैनमंदिर व जनजाती विश्‍व विद्यालय. हे तिथे गेल्याशिवाय अनुभवताच येणार नाही. मराठीत अशी म्हण आहे, की नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ कधी विचारू नये, पण अमरकंटकचा हा अनुभव सगळ्यांपर्यंत पोचावा म्हणून नर्मदामैय्याच्या उगमाची माहिती आणि तिच्यामुळे समृद्ध होणारा हा आनंददायक प्रवास आम्ही अनुभवला. नर्मदामैय्याचा आशीर्वाद घेऊन जड अंतःकरणाने परतीच्या प्रवासाला रायपूरकडे प्रस्थान ठेवले. मुळात अमरकंटक हे मध्यप्रदेशात वसलेले असले, तरी २० वर्षांपूर्वी जन्माला आलेले छत्तीसगड व तेथील संस्कृतीचे सुंदर दर्शन या प्रवासात झाले. रायपूरच्या रस्त्यांच्या दुतर्फा भिंतीवर सुंदर वारली पेंटिंगमधील चित्रे रेखाटली आहेत, तर अमरकंटकचा रस्ता रानवाऱ्याने गंधित होऊन नर्मदेच्या उगमस्थानाची ओढ लावतो. नर्मदामैय्याच्या दर्शनाने अमरकंटक सदैव स्मरणात राहील. 

अमरकंटक - सर्वसाधारण माहिती  
स्थिती : २२.४४ उ. अक्षांस, ८१.५४ पूर्व देशांश 
समुद्रसपाटीपासूनची उंची : १०६०.७० मीटर 
अमरकंटकला जाण्याचा मार्ग : 
बसमार्ग : इलाहबाद, बिलासपूर, रायपूर, जबलपूर, सिवनी, अनुपपूर, पेंड्रा रोड, चित्रकूटपासून बससेवा उपलब्ध आहे. 
रेल्वेमार्ग : पेंड्रा रोडपासून जवळ ३० कि.मी. अंतर. 
विमानसेवा : रायपूर, जबलपूर. 
अमरकंटकजवळील पर्यटनस्थळे : 
     कान्हा राष्ट्रीय उद्यान - २५० कि.मी. 
     बांधवगड - २२५ कि.मी. 
     अचानक मार अभयारण्य - ६५ कि.मी. 
     महामाया मंदिर - रतनपूर - १२० कि.मी.

संबंधित बातम्या