निसर्गाशी नाते

मयूरेश पाटणकर
बुधवार, 28 मार्च 2018

पर्यटन

रत्नागिरी जिल्ह्यातील कृषी पर्यटनाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या शेतकऱ्यांनी, बागायतदारांनी असा काही व्यवसाय उभा केला आहे की, एकदा जाऊन त्याचा अनुभव घेतलाच पाहिजे.

कृषी पर्यटन म्हटलं की, डोळ्यांसमोर येते हिरवेगार शेत. दोन दिवस सुटी घेऊन शेतात जाऊन काय करायचे, आपल्याला ते जमेल का, मनोरंजनाचे आणखी काय साधन असणार, असे अनेक प्रश्न मनात डोकावतात. मुलांनाही कृषी पर्यटनाची कल्पना मागासलेली वाटू शकते. स्वाभाविकपणे हा पर्याय बाजूला पडतो; पण रत्नागिरी जिल्ह्यातील कृषी पर्यटनाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या शेतकऱ्यांनी, बागायतदारांनी असा काही हा व्यवसाय उभा केला आहे की, एकदा जाऊन त्याचा अनुभव घेतलाच पाहिजे. 

कोकणातील भातशेती छोट्या आकाराच्या जमिनीमध्ये आहे. शिवाय सप्टेंबर महिन्यात कापणी झाली की शेत ओस पडतात. काही शेतकरी भाजीपाला करतात; पण त्याचेही क्षेत्र फार थोडे असते. येथील कृषी पर्यटन फुलते ते नारळ, पोफळी, आंबा, काजूच्या बागेत. आपल्या निवासाची व्यवस्थाही बागेतच असते. निवासस्थानी अनेक ठिकाणी वातानुकूलित, आकर्षक खोल्या असतात. निवासस्थानाबाहेरच जग मात्र अस्सल कोकणातले असतं. नारळी, पोफळीच्या बागेत पाण्याने भरलेला हौद आपण डुंबण्यासाठी कधी येता याचीच वाट पाहात असतो. विविध पक्ष्यांचा किलबिलाट आपण सहजपणे ऐकू शकतो. रात्रीच्या वेळी निरभ्र आकाशातील चांदणे पाहू शकतो. रातकिड्यांची किरकिर, अधूनमधून हुंकारणारी हुमण यामुळे धीरगंभीर बनलेले वातावरण अनुभवता येते.

प्रत्येक कृषी पर्यटन केंद्राची वेगळी खासियत आहे. कोणी आपल्या स्वागतासाठी बैलगाडी पाठवतो. या बैलगाडीतून जाताना ‘मामाच्या गावाला’ तर आपण जात नाही ना, असे आपल्याला वाटते. शेणाने सारवलेल्या अंगणात स्वागतासाठी कुठं कोंबडी आणि तिची पिल्लं तुरूतुरू नाचत असतात, तर कोणाचा तरी वाघ्या कुत्रा, पाळलेली मांजर आपल्या स्वागतासाठी तयार असतात.

काही व्यावसायिकांनी कृषी पर्यटनाला पक्षी निरीक्षणाची जोड दिली आहे. कोकणात सहजपणे ५० ते ६० प्रजातींचे पक्षी आपण पाहू शकतो. त्यांची माहिती हे व्यावसायिक देतात. पक्षी निरीक्षणात दिवस कसा निघून जातो, ते समजतही नाही. काहींच्या बागेत अनेकविध फुलझाडे, औषधी वनस्पती आहेत. काहीजण आपल्याला दिवसा जंगल सफर घडवितात. या सफरीमध्ये मोर, लांडोर, कोल्हा, पक्ष्यांची घरटी, सरपटणारे प्राणी आपण पाहू शकतो. जंगलातील प्राण्यांचा संवाद (कॉलिंग) मार्गदर्शक आपल्या लक्षात आणून देतो. जंगल वाचण्याचा अनुभव आपल्याला मिळतो. 

गुहागर तालुक्‍यातील खाडीपट्ट्यातील एका व्यावसायिकाने कृषी पर्यटनाला आधुनिकतेची जोड दिली आहे. त्याच्या घराच्या परिसरात कमांडो ब्रीज, व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग, आदी साहसी खेळांची सुविधा आहे. वाशिष्ठी नदीत फेरफटका मारताना मगरींचे दर्शन येथे घडते. हनिमुन कपल्ससाठी रात्री बोटीत कॅंडल लाइट डिनरची व्यवस्था होते. दापोली तालुक्‍यात आयुर्वेदिक वनस्पती आणि वृक्षांचे बन कृषी पर्यटन केंद्रात पाहण्याची व्यवस्था आहे.

स्थानिक लोककला पाहण्याची संधी काही व्यावसायिक उपलब्ध करून देतात. कोकणातील खाद्यसंस्कृती मोदक, वडेघाटले, भंडारी पद्धतीचे मटण, ताज्या माशांचे वेगवेगळे पदार्थ आपल्या मागणीनुसार पुरविले जातात. मे महिन्याचा हंगाम असेल तर जंगलात जाऊन रानमेवा लुटण्याचा आनंद मिळतो. कृषी पर्यटन केंद्रात आंब्याची बाग असेल तर त्यांच्याच बागेतील आंबे काढून खाण्याचा आनंदही मिळवता येतो. 

दापोली तालुक्‍यातील एक व्यावसायिक आंब्याच्या हंगामात पर्यटन केंद्रात मॅंगो फूड फेस्टिव्हल भरवतो. तेथे येणाऱ्या पर्यटकांसाठी मर्यादित असलेल्या या फेस्टिव्हलमध्ये आंब्याच्या २० पेक्षा जास्त पदार्थांची चव चाखायला मिळते. ऑक्‍टोबर, नोव्हेंबरच्या हंगामात येते
फिश फूड फेस्टिव्हलही असतो. आपले मनोरंजन करणारे, कोकणी जीवनाचा पुरेपूर अनुभव देणारे कृषी पर्यटन कोकणात आहे. निसर्गाशी नातं जोडणाऱ्या या पर्यटनाची संधी निश्‍चित आपल्याला वेगळी अनुभूती देऊन जाईल.  

संबंधित बातम्या