सफर काठमांडूची 

अपर्णा सावंत
शुक्रवार, 29 मे 2020

पर्यटन

नेपाळ, आपला सख्खा शेजारी. जवळच असल्यामुळे काय केव्हाही जाता येईल म्हणून न बघताच राहिलेला देश! यंदा ठरवलेच, की नेपाळच्या काठमांडूची तरी सफर करायचीच. पूर्व, पश्‍चिम व दक्षिणेला भारतीय सीमा व उत्तरेला चीनची सीमा असलेला, पृथ्वीवरील १४७.१८ चौ.किमी जागा व्यापलेला. बशीच्या आकाराचा एक छोटा देश! पूर्वी जगातील एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून ओळखला जाणारा देश. आता मात्र तो नेपाळ फेडरल डेमोक्रॅटिक रिपब्लिकन देश आहे. त्यांची राष्ट्रीय भाषा नेपाळी असून हिंदू व बौद्ध धर्मीय लोक जास्त आहेत. भारतीयांना नेपाळला जाण्यासाठी पासपोर्ट किंवा आपले निवडणूक ओळखपत्रसुद्धा चालू शकते. नेपाळची विशेषता म्हणजे - 
१) जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट २) माता कुमारी - लिविंग गॉडेस ३) लुम्बिनी - भगवान गौतम बुद्धांचे जन्मस्थान ४) जनकपूर धाम - देवी सीतेचे जन्मस्थान 
नेपाळची राजधानी काठमांडूचे नाव काष्टमंडप टेंपलवरून पडले आहे. मुंबईहून काठमांडूला जाण्यासाठी डायरेक्‍ट फ्लाइट आहेत. त्या महाग असल्यामुळे आम्ही एअर इंडियाच्या फ्लाइटने व्हाया दिल्ली काठमांडूच्या त्रिभुवन एअरपोर्टवर उतरलो. आम्ही काठमांडूमधील ललितपूर भागातील जामसीरवेल नामक उच्चभ्रू वस्तीतील एका हॉटेलमध्ये उतरलो. आजूबाजूला बरेच परदेशी नागरिक दिसत होते. आमच्या समोरच ताज विवांता हे पंचतारांकित हॉटेल होते. आपल्या मानाने इथे टॅक्‍सी बऱ्याच महाग वाटल्या. मीटर वगैरे नसल्यामुळे किती पैसे लागतील याचा अंदाज येत नाही. काठमांडूला भेट देण्याचा मुख्य उद्देश होता, भगवान श्री पशुपतिनाथाचे दर्शन घेणे. श्री पशुपतिनाथ मंदिर भगवान श्रीशंकराचे एक जगप्रसिद्ध मंदिर आहे. हजारो शिवभक्त महाशिवरात्रीला इथे दर्शनाचा लाभ घेतात. एरवीसुद्धा हे मंदिर भक्तांनी नेहेमीच गजबजलेले असते. पवित्र बागमती नदीच्या निसर्गरम्य काठावर वसलेले हे शिव मंदिर म्हणजे असंख्य छोट्या छोट्या मंदिरांचा समूह आहे. मुख्य मंदिर पॅगोडा शैलीतील असल्यामुळे खूपच आकर्षक दिसते. हे काठमांडूतील सर्वांत जुने हिंदू मंदिर आहे. १९७९ मध्ये युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून मान्यता दिली आहे. नक्की कधी बांधले ते सांगता येत नाही. इ.स.पू. ४०० मध्ये बांधले असावे असे म्हणतात. आपल्या सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे असे हे शिवलिंग आहे. अशी कथा सांगतात, की एकदा भगवान शिवपार्वती कैलासाहून फिरायला निघाले. बागमती नदीचा परिसर निसर्गाच्या विशेष मेहेरबानीमुळे अतिशय नयनरम्य आहे. हा परिसर पाहिल्यावर भगवान त्याच्या इतके प्रेमात पडले, की त्यांनी पार्वतीदेवीसह इथेच राहण्याचे ठरवले. कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी हरणाचे रूप घेतले. ब्रह्मा शिवांना शोधत बागमती किनारी आले व त्यांनी हरणाच्या रूपातील शिवपार्वतीला ओळखले. सुरुवातीला शिवांनी नकार दिला. शेवटी ते तयार झाले. म्हणाले, की आम्ही हरणाच्या रूपामध्ये इथे राहिलो म्हणून शिव इथे पशुपतिनाथ म्हणून ओळखले जातील. असे म्हणतात की जो कुणी श्री पशुपतिनाथांचे दर्शन घेईल, तो पुन्हा पशू योनीत जन्माला येणार नाही. हे शिवलिंग पाच मुखी आहे, चार दिशांना चार व पाचवे वरच्या दिशेला. चारी मुखांवर एका हातात कमंडलू व दुसऱ्या हातात रुद्राक्ष माळा आहे. मुख्य मंदिराच्या चार दिशांना चांदीचे दरवाजे आहेत. पश्‍चिम दरवाजासमोर भव्य नंदी आहे. केदारनाथबरोबर पशुपतिनाथ दर्शन घेतल्यावर १२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण होते. 

ललितपूर पाटण
हे नेपाळमधील तिसरे मोठे शहर! कला व संस्कृतीचा अनमोल वारसा जपणारे हे शहर. एप्रिल २०१५ च्या मोठ्या भूकंपामुळे या शहराची बरीच हानी झालेली आहे. या शहराची स्थापना इ.स.पू. ३०० मध्ये किरात वंशाच्या राजाने केली. पावसाअभावी या भागामध्ये प्रचंड दुष्काळ पडत असे. त्यावेळी असा समज होता, की मच्छिंद्रनाथ पाऊस घेऊन येतील व दुष्काळाचे निवारण करतील. म्हणून आसामहून राहोमच्छिंद्रनाथ यांची मूर्ती आणण्यात आली. मूर्ती आणणाऱ्या तिघांपैकी एकाचे नाव होते ललित. ललितच्या प्रयत्नामुळे ललितपूर असे नाव पडले. मे महिन्यात इथे श्री मच्छिंद्रनाथ रथ यात्रा निघते. ललितपूर पाटणची रचना बुद्ध धर्मचक्राच्या आकाराची केलेली आहे. शहराच्या चारही कोपऱ्यांवर अशोक स्तूपाची रचना केलेली आहे व मध्यभागी पाचवा स्तूप आहे. सम्राट अशोकाने आपली कन्या चारुमतीसह ललितपूर पाटणला भेट दिली आहे. १२०० हून अधिक बुद्धिस्ट मॉन्युमेंट या शहरात आपल्याला पाहावयास मिळतात. सर्वांत महत्त्वाचे आहे पाटण दरबार स्क्वेअर. युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून जपलेले आहे. ललितपूर राजाचा रॉयल पॅलेस आपले लक्ष वेधून घेतो. दरबार स्क्वेअर नेवारी शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. सर्वत्र आकर्षक लाल विटांची जमीन दिसते. आतील भागात खूप सारी छोटी छोटी मंदिरे आहेत. हिंदू व बुद्ध देवळांचे दरवाजे, खिडक्‍या अतिशय आकर्षकपणे कोरीव काम केलेल्या आहेत. कोरीव कामाचे असंख्य नमुने आपल्याला इथे दगडात, धातूमध्ये, टेराकोटामध्ये पाहायला मिळतात. सगळे कलाकार आपल्या वस्तू इथे विक्रीसाठी ठेवतात. म्हणून संपूर्ण ललितपूर पाटण शहर एक खुल्या म्युझियमसारखे भासते. तिथे एक भीमाचे मंदिरपण पाहायला मिळाले, भीमसेन मंदिर नावाचे. तिथले लोक असे मानतात, की भीमसेन मंदिरात नतमस्तक झाल्यावर भरभराट होते. 
काठमांडूला आल्यावर ललितपूर पाटणला भेट द्यायलाच हवी. आपण एका वेगळ्याच कलेच्या जगात वावरल्याचा अनुभव घेतो. पर्यटकांसाठी इथे जुन्या घरांना आकर्षक अशा रेस्टॉरंट व हॉटेलमध्ये परिवर्तित केलेले आहे. आम्ही अशाच एका याला नावाच्या रेस्टॉरंटमध्ये मोमोज व मसाला चहाचा आस्वाद घेतला. नेपाळी आदरातिथ्याने भारावून गेलो. म्हणून मोमोज व चहा कायम लक्षात राहिला.

भक्तपूर
नेपाळची सांस्कृतिक राजधानी असलेले हे एक प्राचीन शहर आहे. १८ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत येथील पूर्वजांनी भक्तपूर एक स्वतंत्र देश म्हणून जपणूक केली. चहू बाजूंनी संरक्षक भिंती व येण्याजाण्यासाठी मोठाले दरवाजे. भक्तपूर सात चौ.किमी जागेवर पसरलेले असून, जवळजवळ लाखभर लोक इथे राहतात. बहुतेक जण हस्तकला कारागीर, पॉटरी व्यावसायिक आणि नोकरी करणारे आहेत. हिंदू व बौद्ध इथे गुण्यागोविंदाने नांदताना दिसतात. पॅगोडा व शिखर शैलीतील मंदिरे इथे पाहायला मिळतात. राजवाडा व जुनी कलात्मक घरे हा इथला सांस्कृतिक व ऐतिहासिक ठेवा आहे. भक्तपूर दरबार चौक वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून १९७९ मध्ये नोंद केलेला आहे. इथले नेवारी लोक त्यांचे सण, भजन, पूजन, जत्रा फार धामधुमीत साजरे करतात. पारंपरिक नेवारी वेशात नृत्य, गाणी, भजने सुरू असतात. एक वेगळाच अनुभव येतो. म्हणून परदेशी पर्यटकांचा इथे नेहमीच राबता असतो. भक्तपूर दरबार चौक दगडी कोरीव मूर्त्या, धातूंच्या मूर्त्या व लाकडी कोरीव कामाचा सुंदर नमुना आहे. सोनेरी प्रवेशद्वार, राजा भूपतिन्द्र मालाचा पुतळा, नॅशनल आर्ट गॅलरी, ५५ खिडक्‍या असलेला राजवाडा, अनेक पुरातन देवळे, इथली मुख्य आकर्षणे आहेत. 
दत्तात्रय चौक हा भक्तपूरचा सर्वांत जुना भाग आहे. ओपन म्युझियम म्हणून ओळखला जातो. लाकडी कोरीव काम पाहून अचंबित व्हायला होते. दत्तात्रय व भीमसेन मंदिर इथे आहे. २०१५ च्या भूकंपामुळे बरीच पडझड झालेली आहे. पुन्हा नीट करण्याचे काम सुरू आहे. भक्तपूर नगरपालिका या सगळ्यांची काळजी घेते. इथे प्रवेश शुल्क सार्क देशाच्या नागरिकांना थोडे कमी आहे. इतर परदेशी नागरिकांना जास्त आहे. (नऊ अमेरिकन डॉलर). भक्तपूरचे दही फारच प्रसिद्ध आहे. आम्हीही ते चाखले. अप्रतिम चव! कधीच विसरू शकणार नाही. भक्तपूर नगरपालिकेची इमारत लाल दगडांची इतकी आकर्षक होती, की फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. संपूर्ण दिवस भक्तपूरमध्ये कसा गेला ते कळलेच नाही.

स्वयंभू मंदिर
बुद्ध धर्मीयांचे सर्वात पवित्र स्थान म्हणजे काठमांडूतील स्वयंभूनाथ टेंपल. एका डोंगरावर असल्यामुळे ३६५ पायऱ्या चढाव्या लागतात. साधारण २५०० वर्षे जुना हा स्तूप आहे. भोवताली छोटी स्तूप व छोट्या मंदिरांनी हा सगळा परिसर तयार झालेला आहे. स्तूपाच्या तळाला एक मोठा गोलाकार डोम असतो. त्यावर चौकोनी बैठक असते. त्यावर चारी बाजूंना बुद्धाचे डोळे, भुवया व नाक रंगवलेले असते. डोळे ज्ञान आणि करुणा दर्शवतात. बुद्ध लोकांची इथे गर्दी असतेच, पण हिंदूपण इथे मोठ्या संख्येने भेट द्यायला येतात. हे पवित्र धार्मिक स्थान तर आहेच, पण निसर्गाने कृपांकित असलेले रमणीय ठिकाण आहे. म्हणून हा परिसर गर्दीने फुललेला असतो. वरून काठमांडू व्हॅलीचे नेत्रसुखद दर्शन होणे म्हणजे आनंदच आनंद! 
काठमांडूला जाऊन वरील चार स्थळांना भेट दिल्यामुळे खूप आनंद व समाधान वाटले. तिथल्या नेवारी कुटुंबात जेवणाचा आस्वाद घेण्याचा अनुभवही आम्हाला आला. नेवारी पद्धतीच्या कमी मसाल्यातील चवदार भाज्या, आपल्या खिरीसारखा एक गोड पदार्थ खूपच अप्रतिम! त्यांच्या आदरातिथ्य व आपुलकीने जेवणाची गोडी अधिकच वाढली. अशी ही काठमांडूची सफर कायम लक्षात राहील.

संबंधित बातम्या