ग्लेशिअर्सच्या प्रदेशात

निर्मला देशपांडे, पुणे
गुरुवार, 24 मे 2018

पर्यटन
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये पर्यटन या सदरासाठी लेख पाठविण्याचे आवाहन वाचकांना करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेले लेख प्रसिद्ध करीत आहोत.

कॅनडा हा सृष्टीसौंदर्याने नटलेला देश आहे. या सुंदर प्रदेशात भटकण्याची संधी आम्हाला मिळाली ती आमच्या चिरंजीवांमुळे. आमचा मुलगा सुहास कॅनडात व्हॅंक्‍युअर या शहरात राहतो. त्याच्याकडे गेल्यावर यावेळी आम्ही व्हॅंक्‍युअर ते बाँफ अशी छोटी ट्रीप केली. या ट्रीपमध्ये इतर छोटी-मोठी स्थळे पहात आम्ही आलो किकिंग हॉर्स रिव्हर व्हॅली-योहोनॅशनल पार्क इथे. 

‘किकिंग हॉर्स’ ही नदी योहो नॅशनल पार्क इथे जमिनीला चिरत इतक्‍या जोरात वहात येते, की पुढे ती खालचे खडक, जमीन फोडत पुढे जाते. त्यामुळे इथे खडकांचा नैसर्गिक पूल तयार झालाय. मोठमोठे खडक एकमेकांना चिकटून तयार झालेल्या या पुलावरून पलीकडे जाताना खूप भीती वाटली. शिवाय खालून वाहणाऱ्या किकिंग हॉर्सचे रौद्रभीषण रूप आणि पाण्याचा प्रचंड आवाज. क्षणभर हृदयाचा ठोका चुकला. किकिंगहॉर्स आल्बर्टाहून वहात येते व बाप्टालेक इथून निघून ती पुढे कोलंबिया रिव्हरला मिळते. तिच्या नावाची ही मोठी गंमत आहे. जेम्स व्हिक्‍टर हा सर्जन नवीन जागा शोधण्याच्या पथकात होता. ते लोक घोड्यावरून प्रवास करीत. इथे आल्यावर एक घोडा १०० फूट खोल दरीत कोसळला. त्याला काढण्याचा सगळे प्रयत्न करत होते, त्या गडबडीत व्हिक्‍टरला त्याच्या घोड्याने लाथ मारली. मात्र तो त्यातून वाचला. या घटनेची आठवण म्हणून या नदीला ‘किकिंग हॉर्स’ हे नाव दिले. ‘किकिंग हॉर्स’ कॅनेडियन रॉकी - दगडधोंड्यातून धावत पुढे ‘बो’ रिव्हरच्या दरीत उडी घेते. तिच्या संपूर्ण प्रवासात तीन प्रचंड धबधबे आहेत.

या प्रवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी भरपेट नाश्‍ता करून आम्ही सल्फर माऊंटन पहायला निघालो. बाँफ नॅशनल पार्कमधला हा मोठा पर्वत आहे. याच्या उतारावर गंधकाचे हॉटस्प्रिंगचे झरे आहेत. खालून वर जाण्याकरिता गाँडोला राईड आहे. ती खालून आठ मिनिटात वर जाते. तिच्या चारी बाजूला मोठमोठ्या काचा असून एकावेळी चार जण तिच्यात बसतात. काचांमुळे वर जाताना आजूबाजूची सुंदर वनराई व खाली पसरलेला लाल हिरव्या पानांच्या वनस्पतीचा गालिचा डोळ्याचे पारणे फेडतो. वर आल्यावर आजूबाजूची उंचच उंच पर्वतशिखरसुद्धा बुटकी वाटतात. जगातले एक अति उंचीवरचे हॉटेल इथे आहे. इथल्या प्रचंड थंडीत तिथली गरमागरम वाफाललेली कॉफी अमृतासमान वाटली. परत गाँडोलाने खाली आलो आणि गाडी निघाली. आइसफील्ड पार्कवे ग्लेशियरकडे.

हे ग्लेशियर बाँफ इथे सुरू होऊन जास्पर नॅशनल पार्क इथे संपते. नंतर कोलंबिया आईस फिल्ड इथे आलो. यात आठ ग्लेशियर्स आहेत. याची एकूण एरिया ३२५ चौरस किलोमीटर आहे. इथे असलेला बर्फ आर्क्‍टिकच्या दक्षिणेला असलेला सर्वांत जास्त बर्फ आहे. इथे मध्यभागी असलेल्या अथाबास्का या ग्लेशियरमध्ये आम्हाला एक विशेष बसने नेण्यात आले. ग्लेशियर म्हणजे हिमनदी.

या बस अगदी खास बनवल्या आहेत. या विशेष बसची किंमत १० लाख डॉलर आहे. हिची चाके बर्फावरून अजिबात घसरणार नाहीत अशी बनवली आहेत. या गाडीच्या एकेका टायरचा डायमीटर साडेपाच फूट आहे. या गाड्या १९६५ पासून कॅल्गिरीतील एक कंपनी बनवते.

आमच्या या गाडीचा ड्रायव्हर एक पोरगेला २० वर्षाचा तरुण गमत्या पोरगा होता. तो सतत हसत होता. बडबडत होता आणि मधूनच व्हीलवरचे हात काढत होतात. त्यामुळे गाडी बर्फावर घसरण्याच्या भीतीने आम्ही सारे घाबरत होतो. पण मग १० मिनिटात कळले की, गाडी जिथून सुटली त्या हॉटेल जवळूनच गाडीचे कंट्रोल होतंय. हुश्‍शः सारे निश्‍चिंत होऊन बाहेरची निसर्गदृष्ये पाहण्यात मग्न झालो. गाडी प्रचंड पडलेल्या बर्फावरून जात होती. कडाक्‍याची थंडी होती. ग्लेशियर आलं. त्याच्या थांब्यावर गाडी थांबली. गाडी जरा उंच होती. सांभाळून उतरायला सांगत ड्रायव्हरने सर्वांना आधार देऊन व्यवस्थित उतरवले. खालच्या बर्फात. अशाच काही आणखी बसेस येत होत्या व काही परतणाऱ्यांना परत घेऊन जात होत्या. गाडीतून उतरलो. समोर, पायतळी आणि आजूबाजूला पसरला होता बर्फाचा महासागर. आभाळ, बर्फाचे डोंगर आणि टेकड्या सारं एकरूप झालं होतं. उन्हात पांढरा स्वच्छ, नितळ, किंचित निळसर रंगाचा बर्फ अति सुंदर दिसत होता. जाडजूड, गरम, रंगीबेरंगी उबदार कपडे घातलेली अनेक लहानथोर मंडळी बर्फात खेळत होती. बर्फाचे पाणी थंडगार, किंचित निळसर दिसत होते. कोणी कोणी ते बाटलीत भरून घेत होते. वर दगड माती असलेल्या टेकड्या या बर्फात पाहून आश्‍चर्य वाटले. पण नंतर कळले की त्या टेकड्यासुद्धा बर्फाच्याच आहेत. वाहत आलेल्या मातीचा हलका थर त्यावर बसून त्या अशा दिसताहेत. त्यांच्या खाली पाणी आहे. ही ग्लेशियर्स म्हणजे निसर्गाचा सुंदर आविष्कार आहे. आभाळातून जणू हा बर्फ वहात येऊन इथे पसरला. अति सुंदर असे हे दृश्‍य पाहणे हा आयुष्यातला आनंदाचा ठेवा आहे. निसर्गाच्या, परमेश्‍वराच्या रसिकतेचा दाखला आहे. दरवर्षी इथे प्रचंड बर्फ पडतो. ऑगस्टपासून ही बर्फवृष्टी सुरू होते. हा सगळा बर्फ वितळत नाही. ३० मीटर उंची झाली की तो पसरू लागतो. उरलेल्या बर्फाचे थरावर थर बसतात आणि ते घट्ट दगडासारखे होतात. या प्रक्रियेला १५० ते २०० वर्षे लागतात. या बर्फाच्या प्रचंड वजनाने दगडांचा चुरा होता. दरवर्षी ग्लेशियर पुढे पुढे सरकू लागते. ग्लेशियरचा तोंडाला ‘टो’ म्हणतात. सध्या ग्लोबल वार्मिंगमुळे ते मागे सरकत आहे. जास्त पुढे न येता वितळतंय. (हीच परिस्थिती आपल्या हिमालयातही झाली आहे असे म्हणतात.) त्यामुळे ते नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. हे बर्फ वितळल्यावर हे पाणी पॅसिफिक, अटलांटिक व आर्क्‍टिक महासागरांमध्ये जाते. ग्लेशियर पाहून मन इतकं तृप्त झालं की तहान-भूक हरपली. निसर्गाच्या या आल्हाददायक, मोहक, नयनरम्य रूपानं मन भरून आलं. बसने परत हॉटेलवर आलो. आता दुपारचे तीन वाजले होते. पोटात भुकेने कावळे ओरडत होते. हॉटेल गरमागरम पदार्थांनी गच्च भरलेलं होतं. पण आम्हाला त्यांचा उपयोग नव्हता. कारण ते सर्व पदार्थ नॉनव्हेज होते आणि आम्ही पक्के व्हेजिटेरियन. त्यामुळे एवढ्या कडकडणाऱ्या थंडीत आम्हाला जवळचे थंडगार पदार्थ आणि नंतर मात्र दोन दोन मग गरम वाफाळलेली मस्त कॉफी घेईन पोटपूजा उरकावी लागली.

या प्रवासात छोटी - मोठी गावं, तिथली टुमदार लाकडी घरं, स्वच्छ, गुळगुळीत रस्ते, सर्वत्र असलेली वनराई पाहून खूप कौतुक वाटलं. हा देश कुठेही जंगलतोड न करता डोंगर न फोडता त्यातच वसविला आहे. म्हणून एवढा सौंदयपूर्ण आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये.

फोटो फीचर

संबंधित बातम्या