चैतन्याचे कोरीव काव्य

निरुपमा जोशी 
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

हेरिटेज
मध्यप्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यातील खजुराहो इथे इ.स. ९०० ते ११०० या साधारण दोनशे वर्षांच्या कालखंडात चंदेल राजवंशातील राजांनी या मंदिरांची उभारणी केली. चंदेल राजवंशाच्या उत्पत्तीविषयी एक लोककथा प्रचलित आहे.

कुठे एक पाय मुडपून पायातून काटा काढणारी, तर कुठे मान वेळावून आपल्याच शेपट्याशी चाळा करणारी, कुठे स्वतःला दर्पणात न्याहाळणारी, तर कुठे खांद्यावर व्हॅनिटी बॅग (vanity bag) लटकवलेल्या सखीसमवेत आयलायनर लावणारी, कुठे प्रियकराला बिलगून लाजणारी, तर कुठे त्याच्या आलिंगनात बद्ध झालेली समर्पिता!.. अशा असंख्य लोभस मुद्रा बघता बघता शेजारीच हातात मानवी मुंडके घेतलेली मृत्युदेवता, दाढीधारी अग्निदेवता, काहीसा उग्र दिसणारा शार्दूल सामोरे येतात आणि आपल्याही नकळत जीवनातील व्यामिश्र वास्तवाचं भान येतं.

सर्वसमावेशकता हे भारतीय संस्कृतीचं एक व्यवच्छेदक लक्षण आहे. भल्या-बुऱ्या, उच्च-नीच, ऐहिक-पारलौकिक अशा सर्व प्रकारच्या विचारांचे, विकारांचे मानवी जीवनात असलेले स्थान या संस्कृतीने मान्य केले आहे. त्यामुळे अर्थ व काम या पुरुषार्थांचा धर्माच्या आधारे आसरा घेत जीवनाचे अंतिम लक्ष्य म्हणून सांगितलेल्या मोक्षाप्रती पोचता येईल अशा प्रकारे जीवनाच्या चारही ध्येयांचा ताळमेळ आपल्या संस्कृतीने घातला आहे. प्रत्येक टप्प्यावर अधिकाधिक उन्नत होत मानव पूर्णतेच्या सर्वोच्च शिखरावर आरूढ होऊ शकतो, हा विश्‍वास प्रतीकात्मक पद्धतीने काही मंदिरांमधून साकारला गेला आहे. खजुराहो येथील मंदिरे मानवी जीवनाच्या समग्रतेचं मूर्त दर्शन घडविणारी अशीच एक अजोड कलाकृती आहेत. 

खजुराहो मंदिरांचा इतिहास
मध्यप्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यातील खजुराहो इथे इ.स. ९०० ते ११०० या साधारण दोनशे वर्षांच्या कालखंडात चंदेल राजवंशातील राजांनी या मंदिरांची उभारणी केली. चंदेल राजवंशाच्या उत्पत्तीविषयी एक लोककथा प्रचलित आहे. त्या कथेनुसार एक सुस्वरूप ब्राह्मण युवती सरोवरात स्नान करत असताना चंद्र तिच्यावर मोहित झाला. या संबंधातून त्या कन्येने चन्द्रवर्मन नावाच्या पुत्राला जन्म दिला. याच चन्द्रवर्मनाने चंदेल राजघराण्याची स्थापना केली. आपल्या मातेच्या सांगण्यावरून त्याने अशा मंदिर निर्मितीचा संकल्प सोडला. ज्यात सर्व मानवी भावभावना, वासनांचे चित्रण असेल. त्याच वेळी या वासनांचे खरे स्वरूप लक्षात येऊन त्यांना ओलांडून जाण्याची आणि जीवनात अधिक उच्चतर ध्येयाची आकांक्षा माणसाच्या मनात निर्माण होईल. त्याचबरोबर सौंदर्याच्या, कलेच्या आविष्करणाच्या दृष्टीने ती मंदिरे अद्वितीय असतील आणि तत्त्वज्ञान व अध्यात्माच्या क्षेत्रातील विविध संप्रदायांना त्यात स्थान असेल. मंदिर निर्मितीला प्रेरणा देणाऱ्या या कथेची ऐतिहासिकता जरी संदिग्ध असली, तरी या कथेत व्यक्त झालेल्या अपेक्षांच्या कसोटीवर खजुराहोची मंदिरे शंभर टक्के उतरतात हे मात्र नक्की.

खजुराहोतील ही सर्व मंदिरे वालुकाश्‍म दगडातून निर्माण झाली आहेत. फिकट गुलाबी, फिकट पिवळा, तांबूस अशा तीन रंगामध्ये हे दगड मिळतात. टिकाऊ आणि शिल्प कोरण्यासाठी योग्य हे या दगडांचे वैशिष्ट्य आहे. अशा दगडांतून एक हजार वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या एकूण ८५ मंदिरांपैकी आजमितीस सुमारे २२ मंदिरे शतकानुशकतांच्या नैसर्गिक, तसेच राजकीय उलथापालथींना तोंड देत उभी आहेत. 

आपल्या निर्मितीनंतरच्या काळात साधारण तेराव्या शतकानंतर चंदेल राजवंशाच्या अस्तानंतर, ही मंदिरे हळूहळू दुर्लक्षित झाली. मंदिरात लोकांचा वावर कमी झाला. सभोवती रान माजले. काही मंदिरांची पडझड व्हायला लागली. केवळ काही योगी, तांत्रिक लोक आपल्या साधनेसाठी या मंदिरांचा वापर करत होते. परंतु एका अर्थाने हीच बाब या मंदिरासाठी उपकारक ठरली. कारण त्यामुळेच इस्लामी राज्यकर्त्यांच्या मूर्ती व मंदिर भंजनाच्या लाटेतून ही मंदिरे वाचली. इ.स. १८३० मध्ये या भागात आलेल्या ब्रिटिश अधिकारी बर्ट याला काही स्थानिकांनी ही मंदिरे दाखवली. १८५० नंतर कनिंगहम याने या मंदिराचे सर्वेक्षण केले व ही मंदिरे प्रकाशझोतात आली. १९८६ मध्ये त्यांना युनेस्को वल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळाला.

खजुराहोतील मंदिरे
खजुराहोतील मंदिरांचे भौगोलिकदृष्ट्या तीन समूहात वर्गीकरण करण्यात आले आहे. पश्‍चिम समूह, पूर्व समूह आणि दक्षिण समूहातील मंदिरे या नावांनी ती ओळखली जातात. सर्वाधिक कलाकुसर प्राचीन आणि बरीच सुस्थितीत असलेली मंदिरे पश्‍चिम समूहातील आहेत. त्यात चौसष्ट योगिनी मंदिर, मातंगेश्‍वर मंदिर, लक्ष्मण मंदिर, विश्‍वनाथ मंदिर, कंदारिया महादेव मंदिर, चित्रगुप्त मंदिर, देवी जगदंबी मंदिर, नंदी व वराह मंदिर ही मंदिरे येतात. यापैकी मातंगेश्‍वर मंदिर या शिव मंदिरात आजही पूजाअर्चा होते. बाकीच्या मंदिरामध्ये मूर्ती असल्या तरी त्या पुजल्या जात नाहीत. मातंगेश्‍वर मंदिरात आठ फुटांचे भव्य शिवलिंग आहे. खजुराहो गावातील, तसेच पंचक्रोशीतील एक महत्त्वाचे मंदिर म्हणून हे मंदिर ओळखले जाते. महाशिवरात्र दिवाळी या काळात तिथे जत्राही भरते. स्थानिक लोकांच्या राबत्यामुळे मातंगेश्‍वर मंदिर पश्‍चिम मंदिरसमूहाच्या सीमारेषेबाहेर आहे. म्हणजेच पुरातत्त्व खात्याचे तिकीट न काढता ते मंदिर पाहता येते. मातंगेश्‍वर मंदिराच्या जवळच विष्णूच्या वराह रूपातील अवताराचे वराह मंदिर आहे. एकाच अखंड शिलेतून वराहची नऊ फुटांची भव्य मूर्ती साकारलेली आहे. या मंदिराचा निर्मिती काळ इ.स. ९०० ते ९२५ असून या वराहाच्या पाठीवर शेकडो देवीदेवता रेखाटल्या आहेत. वराह मंदिराच्या बरोबर समोर लक्ष्मण मंदिर आहे. यशोवर्मन राजाने इ.स. ९३० ते ९५० दरम्यान बांधलेल्या या विष्णू मंदिरात ब्रह्मा, विष्णू, महेशाची त्रिमूर्ती आहे. अर्धमंडप, मंडप, महामंडप, अंतराळ व गर्भगृह या रचनेनुसार हे मंदिर बांधलेले असून त्यात वामन, नृसिंह इत्यादी विष्णूचे अवतार दाखवले आहेत. मुख्य मंदिराच्या आवारात चार कोपऱ्यात विष्णूचीच चार उपमंदिरेही आहेत. ही सर्व मंदिरे एका विशाल उंच दगडी चौथऱ्यावर उभी असून मुख्य मंदिराची उंची सुमारे ३० मीटर आहे. या मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर शिकार झुंज युद्धाचे प्रसंग, विवाह सोहळा मिरवणूक, कामशिल्पे, दैनंदिन जीवनातील प्रसंग, हत्ती-घोडे-उंट यांचे चित्रण आढळते. 

विश्‍वनाथ मंदिर
भगवान शंकराला समर्पित असणारे विश्‍वनाथ मंदिर, लक्ष्मण मंदिर, लक्ष्मण मंदिराच्या जवळच असून त्यात त्रिमुखी ब्रह्माच्या प्रतिमेसोबतच शिवलिंगासमोर नंदीची सुरेख मूर्तीही आहे. चंदेलवंशीय राजा धंग याने इ.स. १००२ मध्ये हे मंदिर बांधल्याचा उल्लेख तेथील शिलालेखात सापडतो. 

कंदरिया महादेव मंदिर
इ.स. १०२५ ते १०५० या कालावधीत बांधण्यात आलेले कंदरिया महादेव मंदिर खजुराहो मंदिर समूहातील सर्वांत उंच व देखणे मंदिर म्हणून विख्यात आहे. हिमालय पर्वताच्या उत्तुंग शिखरांप्रमाणे आकाशात झेपावणाऱ्या शिखरांची कल्पना नजरेसमोर ठेवून या मंदिराची शिखरे घडविण्यात आली आहेत. ३१ मीटर उंची असलेल्या या मंदिरांची बांधणी अत्यंत प्रमाणबद्ध, सुबक आणि नजरबंदी करणारी आहे. मंदिरातील तोरणांवर, छतांवर तसेच मंदिराच्या आतील स्तंभावरही अतिशय बारीक व भरगच्च कलाकुसर आहे. या मंदिराची कौशल्यपूर्ण बांधेसूद रचना त्याचे स्थापत्यविशेष, उत्कृष्ट शिल्परेखांकन तसेच भव्यता या साऱ्यांमुळे हे मंदिर भारतीय स्थापत्यकलेचे एक अद्वितीय उदाहरण ठरले आहे. 

देवी जगदंबी मंदिर
कंदारिया महादेव मंदिराच्या जवळच असलेले देवी जगदंबी मंदिर मुळात विष्णू मंदिर होते. तिथे आता काळ्या पाषाणाची देवीची मूर्ती आहे. या मंदिरात गर्भगृहाच्या दारावर अत्यंत बारीक कलाकुसर आहे. 

चित्रगुप्त मंदिर
विश्‍वनाथ मंदिर व कंदरिया महादेव मंदिराच्या दरम्यानच्या काळात या मंदिराची उभारणी झाली आहे. हे सूर्य मंदिर असून सात घोड्यांच्या रथात स्वार सूर्यदेवाची मूर्ती आत आहे. 

चौसष्ट योगिनी मंदिर
काली मातेला समर्पित असणारे चौसष्ट योगिनी मंदिर बरेचसे भग्नावस्थेत असून पश्‍चिम मंदिर समूहातील इ.स. ९०० पूर्वी निर्माण झालेले ते सर्वांत जुने मंदिर आहे. हे येथील एकमेव ग्रॅनाईट मंदिर आहे. 

पूर्व मंदिर समुहामध्ये पार्श्‍वनाथ आदिनाथ ब्रह्मा, वामन आदि मंदिरांचा समावेश होतो. ही मंदिरे आता जैन मंदिरे म्हणून ओळखली जात असून पार्श्‍वनाथ मंदिराची निर्मिती इ.स. ९५० च्या सुमारास करण्यात आली आहे. १८६० मध्ये पार्श्‍वनाथ मंदिरात पार्श्‍वनाथांची प्रतिमा स्थापन करण्यात आली. या सर्वच मंदिरावर बारीक नक्षीकाम असून अप्सरा, देवीदेवता तसेच मिथुन शिल्पे आहेत.

दक्षिण मंदिर समूहातील मंदिरामध्ये दुल्हादेव या शिव मंदिराचा तर चतुर्भुज या विष्णू मंदिराचा समावेश होतो. मुख्य पश्‍चिम मंदिर समूहापासून ही मंदिरे काहीशी लांब आहेत. यांचा निर्मिती काळ इ.स. ११०० आहे. 

खजुराहोतील सर्वच मंदिरांवर शिव, विष्णू, ब्रह्मा, गणेश, देवी यांचय विविध रूपातील प्रतिमा इंद्र, वरुण, यम, कुबेर, ईशान, नीऋती, वायू, अग्नी हे अषअट दिकपाल, अष्टवसू, सूर्य, नवग्रह, हत्ती, घोडे, मकर यांच्या प्रतिमा मन-बुद्धीतील द्वंद्व चित्रित करणारा अनेक प्राण्यांच्या मिश्रणातून तयार झालेला काल्पनिक प्राणी शार्दूल, कीर्तिमुख मिथुन शिल्पे, गंगा-यमुना इत्यादी स्त्री रूपातील नद्या, अप्सरा, नागलोक, गंधर्वलोक, देवलोक, भूलोक, पाताळलोक या सर्वांचे प्रतिनिधित्व करणारी; तसेच नागरी जीवन चित्रित करणारी अगणित शिल्पे आहेत. इथे कोरलेल्या अप्सरांचे नाना विभ्रम पाहणाऱ्याला चकित करतात.  स्मितहास्य, लाजणे, शृंगार अशा कोमल भावांबरोबरच असंख्य प्रकारच्या केशभूषा, वेशभूषा, आभूषणे हे सर्व इथे दगडातून अक्षरशः जिवंत झाले आहे. इथल्या शिल्पांमधील वैविध्य, बारकावे तसेच परिपूर्णता पाहून आपण विस्मयचकित तर होतोच; पण त्या अनाम कलाकारांसमोर नतमस्तकही होतो.

खजुराहोची मंदिर, त्यातील कामशिल्पांमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. परंतु मंदिरावरील हजारो शिल्पांच्या जेमतेम आठ ते दहा टक्के असलेल्या या शिल्पांसाठीच आधुनिक काळातील बऱ्याच भारतीयांनाही ती ज्ञात असावीत, ही आपल्यासाठी खरेच खेदाची बाब आहे. मंदिरांवर कोरलेली कामशिल्पे पाहणाऱ्याला कामक्रीडेच्या पलीकडे जाऊन त्यामागे असलेल्या सृजनाच्या सृष्टीचक्राच्या विचारापर्यंत नेण्याबरोबरच काम या विषयाबाबत तत्कालीन समाजमनात असलेल्या खुलेपणाची जाणीव करून देतात. मंदिरांवरची शिल्पे शैव, वैष्णव, तंत्र, हिंदू, बौद्ध, जैन अशा सर्व धर्म-पंथ-संप्रदायांच्या विचारांचा वेगवेगळ्या कालखंडातील त्यांच्या प्रभावांचा परिचय करून देतात. इतिहास हा केवळ सनावळ्या आणि राजवंश यांच्यापुरताच मर्यादित नसतो. 

मंदिरासारख्या वास्तुकलांमधून त्या त्या काळातील लोकजीवन, कला, धार्मिक, आध्यात्मिक कल्पना अशा अनेक गोष्टींचे प्रत्यंतर येत असते. म्हणूनच खजुराहोची मंदिरे ही भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय इतिहास, भारतीय कला व मंदिर स्थापत्य यांचा आरसा असण्याबरोबरच खऱ्या अर्थाने मानवाच्या उन्नतीचा अनमोल असा जागतिक वारसा आहेत.

फोटो फीचर

संबंधित बातम्या