वनराईने नटलेला मैनागिरी

निवास मोटे
बुधवार, 28 मार्च 2018

कोल्हापूर-कोकण विशेष

कोल्हापूरच्या वायव्येस अठरा किलोमीटरवर श्री जोतिबा डोंगर म्हणजे वाडी रत्नागिरीचे जोतिबा देवस्थान प्रसिद्ध आहे.

सह्याद्रीचा जो फाटा पन्हाळगड, पावनगड असा गेला आहे, त्याला पुढे सोंडेसारखा शंखाकृती भाग जो वर गेला आहे, तोच जोतिबाचा डोंगर होय. प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले जोतिबाचे पुरातन मंदिर या ठिकाणी आहे. समुद्रसपाटीपासून ३१०० फूट उंचावरील जोतिबा डोंगराचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवात, भौतिक व ऐतिहासिक ऐश्‍वर्यात मोलाची भर घालणारा या देवालयाचा परिसर आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांतील लाखो भाविकांचे जोतिबा हे कुलदैवत आहे. डोंगरावरील उंच-सखल भागांमध्ये वाडी रत्नागिरीचे गावठाण आहे. सहा हजाराच्या पुढे या गावची लोकसंख्या असून ९० टक्के लोक गुरव (पुजारी) समाजाचे आहेत. देवाचे धार्मिक कार्य, नारळ, गुलाल, खोबरे, मेवामिठाई, हॉटेल यावर त्यांची उपजीविका चालते. दरवर्षी एप्रिल महिन्यात चैत्र पौर्णिमेला जोतिबा डोंगरावर विराट यात्रा भरते. राज्यातून सुमारे सहा-सात लाख भाविक यात्रेसाठी येतात. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जोतिबा यात्रेचा शुभारंभ होतो. कामदा एकादशीस भाविक यात्रेसाठी येण्यास सुरवात करतात. गुढीपाडव्यास निगवे दुमाला (ता. करवीर) येथील हिम्मतबहादूर चव्हाण-सरकार यांची मानाची सासनकाठी सदरेजवळ उभी करण्यात येते. गुढी पाडव्यानंतर बेळगावचे भाविक पायी येण्यास प्रारंभ करतात. बेळगावमधील चव्हाटा गल्ली व नार्वेकर गल्लीतील भाविक बैलगाड्या घेऊन पायी मोठ्या संख्येने येतात. ते कामदा एकादशीस पोचतात. त्यांना मानाचा विडा देऊन स्वागत करण्यात येते. हे भाविक तंबू मारून डोंगरावर राहातात. पायी येण्याची या भाविकांची पिढ्यान्‌ पिढ्यांची परंपरा आहे. जोतिबावर मानाच्या ९६ सासनकाठ्या असून त्या यात्रेच्या आदल्या दिवशी डोंगरावर येतात. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा जयघोष करीत मंदिर परिसरात येतात. मुख्य मंदिराभोवती प्रदक्षिणा काढून या मंदिराभोवती उभ्या केल्या जातात.

जोतिबा डोंगर हे तीर्थ ज्या पर्वतावर वसले आहे त्या डोंगराचे मूळ नाव मैनागिरी असून या पर्वतावर उत्तरेकडील बाजूस खोलगट भागामध्ये जोतिबाचे मंदिर बांधण्यात आले आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील असून या ठिकाणी तीन मंदिरांचा समूह आहे. यांतील मुख्य मंदिर हे प्राचीन असून उर्वरित दोन मंदिरे अठराव्या शतकात बांधल्याचा उल्लेख सरकारी गॅझेटमध्ये आढळतो. यातील प्रत्येक मंदिराला स्वतःचे असे खास वैशिष्ट्य आहे. जोतिबाचे मंदिर हे अतिप्राचीन असून कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या बरोबरीचे आहे. पन्हाळा राजधानी असलेल्या शिलाहार भोज राजाने हे मंदिर बांधल्याची आख्यायिका आहे. तसेच जोतिबाचा परम भक्त नावजी यांनी मंदिर बांधल्याचाही उल्लेख प्राचीन ग्रंथामध्ये आढळतो. आज असणारे हे देवालय १७३० मध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजीराव शिंदे यांनी मूळच्या ठिकाणी भव्य स्वरूपात पुनर्रचित करून बांधले. हे मंदिर साधे असून त्याचे बांधकाम उत्तम प्रतीच्या काळ्या बेसॉल्ट दगडात करण्यात आले आहे. दुसऱ्या केदारनाथाच्या देवालयाचे विशेष म्हणजे ते खांबांच्या आधाराशिवाय उभे आहे. ते सन १८०८ मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधले आहे. स्थापत्य शैलीतील उत्कृष्ट नमुन्याचे कोरीव काम व अनेक शिल्पे मंदिरावर आढळून येतात. या मंदिरासाठी वापरण्यात आलेला दगड कोरीव कामासाठी अत्यंत उत्कृष्ट असून मंदिरातील तापमान संतुलित राखण्याचे काम करतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये गाभाऱ्याबरोबरच मंदिराच्या बाहेर व मंडपात गारव्याचा अनुभव भाविकांना घेता येतो.

सुगंधी दवणा वनस्पती
भाविक लोक जसे गजाननाला दूर्वा, महादेवाला बेल वाहतात, तसेच जोतिबाला दवणा वाहण्याची प्रथा पूर्वीपासून आहे. वात, पित्त, कफ या त्रिदोषांवर औषधी असलेला सुगंधी दवणा जोतिबाचे आवडते फूल आहे. गुलालाबरोबर दवणा वाहणे ही भक्तीची परंपरा आहे. संस्कृतमधील ‘दमण’ या नावावरून वीत ते दीड वीत उंच असणाऱ्या भुरकट पांढऱ्या अशा वनस्पतीस दवणा असे नाव पडले. ‘आर्टिमिसीचा सिवार्सिआना’ हे याचे इंग्रजी नाव आहे. मूळची ही वनस्पती काश्‍मिरातील. दवण्याची दुसरी जंगलात उगवते म्हणून तिचे नाव वन्यदमण. दख्खनचा राजा जोतिबा देवास ही वनस्पती प्रिय. एक वेळ फुलांचा हार नसला तरी चालेल; पण दवण्याच्या दोन काड्या आणि चिमूटभर गुलाल वाहिला , की भक्ताला पुरेपूर समाधान. फुलावर आलेल्या दवण्याचा सुगंध तर अवर्णनीय. जोतिबाच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या (केखले, ता. पन्हाळा) येथे शेतकरी हे दवण्याचे पीक घेतात.

जोतिबा डोंगरावर पाहण्यासारखे

  • मूळमाया श्री यमाई मंदिर व मंदिरावरील कलाशिल्पे
  • गायमुख तलाव व श्री शल्य मल्लिकार्जुन मंदिर व परिसर 
  • केखले (ता. पन्हाळा) गावातील दवणा शेती.
  • सकाळच्या प्रहरी दाट धुके. पावसाळ्यात तर काश्‍मीरसारखे वातावरण
  • जोतिबाचे मुख्य मंदिर व परिसर

जोतिबा डोंगरावर कसे याल

  • कोल्हापुरातून एसटी बसची सोय आहे. 
  • महामार्गावरून टोप फाट्यावरून कासारवाडी, सादळे-मादळे गिरोली गावातून जोतिबा डोंगरावर येता येते.
  • महामार्गावरील शिये फाट्यावरून शिये, भुये, निगवे दुमाला, कुशिरे फाट्यावरून डोंगरघाट मार्गे जोतिबावर येता येते.
  • किणा वाठार मार्गे वारणानगर मार्गे जोतिबा डोंगराकडे येता येते.

जोतिबा डोंगराभोवती असणारी बारा जोतिर्लिंगे
जोतिबा डोंगराभोवती बारा जोतिर्लिंगे असून श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी या लिंगांचे दर्शन घेण्यासाठी नगरप्रदक्षिणा (दिंडी) निघते. भाविकांनी या लिंगांचे दर्शन घेतल्यामुळे चारधाम यात्रा केल्याचे पुण्य पदरी पडते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. जोतिर्लिंगे अशी...
१)     बद्रीकेदार : (महादेव मंदिर जोतिबा डोंगर)
        मूळ ठिकाण : केदारनाथ हिमालय
२)     काशी विश्‍वनाथ : (महादेव मंदिर जोतिबा डोंगर)
        मूळ ठिकाण : विश्‍वेश्‍वर वाराणसी
३)     सेतुबंध रामेश्‍वर : (जोतिबा मंदिर परिसरातील रामलिंग मंदिर)
        मूळ ठिकाण तमिळनाडू
४)     ओंकार ममलेश्‍वर : (केखले गणेश बाग)
        मूळ ठिकाण : विद्यांचल - मध्य प्रदेश
५)     महाकालेश्‍वर : नरंकेश्‍वर (श्री यमाई मंदिरासमोर)
        मूळ ठिकाण : उज्जैन - मध्य प्रदेश
६)     कर्पूरेश्‍वर : (जोतिबा कर्पूरतीर्थाच्या काठावर)
        मूळ ठिकाण : श्री घृष्णेश्‍वर - वेरूळ - औरंगाबाद.
७)     त्र्यंबकेश्‍वर : (गिरोली गावाच्या निनाई मंदिरात)
        मूळ ठिकाण : नाशिक
८)     औंढ्या नागनाथ : (पोहाळे तर्फ आळते येथील पांडव लेण्यात)
        मूळ ठिकाण : नागनाथ परभणी - मराठवाडा
९)     सोरटी सोमनाथ : नरंदे (ता. हातकणंगले) नागनाथ दारूकवन
१०)   परळी वैजनाथ : (सादळे-मादळे येथील सिद्धोबा टेकडी)
        मूळ ठिकाण : श्री वैजनाथ - बीड
११)   श्री शैल्य मल्लिकार्जून : (जोतिबा गायमुख तलावाजवळ)
        मूळ ठिकाण : कर्नूल - आंध्र प्रदेश
१२)   भीमा शंकर : (जोतिबा डोंगर डांकीणी तीर्थाजवळ)
        मूळ ठिकाण : भीमाशंकर, पुणे
 

संबंधित बातम्या