विजापूर दर्शन

ओंकार वर्तले
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

पर्यटन
आपल्या महाराष्ट्राच्या शेजारी म्हणजे सोलापूरपासून अवघ्या ११० किमी अंतरावर असणारे विजापूर शहरदेखील भटकंतीसाठी अत्यंत सुलभ आणि सुंदर पर्याय होऊ शकतो. ऐतिहासिक वारसा असलेल्या या विजापूरच्या जोडीला तुम्ही सोलापूरदर्शन, अक्कलकोट दर्शनाचीसुद्धा जोड देवून आनंद घेऊ शकता.

आजच्या धकाधकीच्या, गजबजलेल्या जीवनात विरंगुळ्याचे चार क्षण मिळविण्यासाठी प्रत्येक मनुष्य धडपडत असतो. हे क्षण मिळवण्यासाठी, फिरण्यासारखं दुसरं औषध नाही. 

आपल्या महाराष्ट्राच्या शेजारी म्हणजे सोलापूरपासून अवघ्या ११० किमी अंतरावर असणारे विजापूर शहरदेखील भटकंतीसाठी अत्यंत सुलभ आणि सुंदर पर्याय होऊ शकतो. ऐतिहासिक वारसा असलेल्या या विजापूरच्या जोडीला तुम्ही सोलापूरदर्शन, अक्कलकोट दर्शनाचीसुद्धा जोड देवून आनंद घेऊ शकता. विजापूरसाठी रेल्वे आणि सडक मार्गांच्या सुविधा असल्या तरीही स्वतःची अथवा भाड्याची गाडी घेऊन जाणे केव्हाही फायद्याचे.

विजापूर हे कर्नाटक जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि प्राचीन शहर! छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या राजवटींना नेस्तनाबूत केले, त्या शाह्यांपैकी एक म्हणजे विजापूरची आदिलशाही. याच आदिलशाहचे वास्तव्य ज्या बुलंद आणि भक्कम भुईकोटात होते तो म्हणजे विजापूरचा भुईकोट! त्यामुळे जसे आपण गड - किल्ले पाहत असतो, तसेच शत्रुपक्षाचे साम्राज्यही कसे होते याची ऐतिहासिक उत्सुकता आपल्यामध्ये नकळतपणे डोकावत असते. अशाच इच्छेपोटी आणि उत्सुकतेपोटी आपण जर विजापूरला दाखल झालो तर निश्‍चितपणे हे शहर आपल्याला निराश करीत नाही. महाराष्ट्राच्याशेजारी असलेल्या कर्नाटक राज्यातील महत्त्वाचे शहर म्हणून विजापूरची ओळख आहे. इस्लामी वास्तुशैलीसाठी ख्यातनाम असलेले हे शहर देखणे ऐतिहासिक पर्यटनस्थळ आहे. विजापूर या नावाचा शोध इतिहासात घेतला तर अनेक नावे समोर येतील. विजयपूर, बिज्जनहळी, बिज्जपूर, मुहम्मदपूर अशी अनेक नावे आपल्याला सापडतात. या जागी पूर्वी सात आठ खेडी होती. या सात खेड्याचे मिळून एक नगर यादवकाळात वसवले गेले. त्यामुळे या सात खेड्यांपैकीच बिज्जनहळी या मोठ्या खेड्याच्या नावावरून विजापूर हे नाव पडले असे अनेक इतिहास अभ्यासकांचे मत आहे. विजापूरवर चालुक्‍य, राष्ट्रकुट, होयसळ, यादव, आदिलशहा, मुघल, पेशवे अशा विविध राजसत्तांनी राज्य केले. या विजापूरमधीलच सुंदर अशा इमारतींची आपण ओळख करून घेऊयात.

ताज बावडी
दुसऱ्या आदिलशहाने बांधलेली ही विहीर म्हणजेच बावडी म्हणजे तत्कालीन वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. दगडी कमान असलेली ही आयताकृती विहीर अतिशय सुंदररीत्या बांधण्यात आली आहे. फार पूर्वी या विहिरीमधूनच विजापूर किल्ल्याला पाणीपुरवठा केला जायचा. या विहिरीलादेखील छोटी तटबंदी बांधलेली दिसून येते.

जामी - मस्जीद
सन १५६५ मध्ये पाचव्या आदिलशहाने बांधलेली ही मशीद जामी मस्जीद म्हणून ओळखली जाते. यात बऱ्याच कमानी असून यात कुराण व्याख्यांचे चित्र लिखित असून ही मशीद या कलाकुसरीसाठी पाहण्यासारखी आहे. या मशिदीच्या छतालाच दगडी साखळदंड एकमेकांत गुंतलेले अशा रचनेचे दिसतात. एखाद्या दगडातून कोरलेले असे साखळदंड म्हणजे शिल्पकलेचा चमत्कारच म्हटला पाहिजे. या मशिदीजवळच म्हणजे उत्तर दिशेला एक मोठा दरवाजा आहे. या दरवाजाला औरंगजेब गेट असे म्हणतात. जेव्हा औरंगजेबाने विजापूरवर विजय मिळवला तेव्हा या दरवाजाचे बांधकाम केल्याचे सांगितले जाते.

हैदरबुरुज किंवा उपली बुरूज
विजापूर शहराच्या मध्यवर्ती भागात एकटाच उभा असलेला बुरूज म्हणजे दुर्गवास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुनाच म्हणायला हरकत नाही. हा बुरूज उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्यातील अशाच बुरुजाची आठवण करून देतो. या बुरुजावर जाण्यासाठी गोलाकार जिना असून हा अजूनही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. याच्यावर उभे राहून संपूर्ण विजापूरवर लष्करीदृष्ट्या लक्ष ठेवले जात असे. याच्या उंचीमुळे हा टेहेळणी बुरूज म्हणूनदेखील ओळखला जातो. आदिलशहाचा दंडनायक हैदरखान याने हा बुरूज बांधला म्हणून याचे नाव हैदरबुरुज असे पडले. सध्या या बुरुजावर दोन तोफा दिसतात.

गोलघुमट
सोलापूरपासून आपण जसजसे विजापूरच्या जवळ येत गेलो की, एक भव्यदिव्य इमारत आपल्याला या शहराच्या ओळखीची खात्री पटवते आणि आपण या इमारतीसमोर अवाक्‌ होऊन कधी उभे राहतो ते कळतदेखील नाही. ही इमारत म्हणजे जगप्रसिद्ध गोलघुमट होय! या इमारतीचा पसारा आणि आवाका खरोखरच थक्क करणारा आहे. आदिलशहाची समाधी असलेली ही गोलघुमटाची अद्‌भुत इमारत म्हणजे वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुनाच आहे. अतिशय आकर्षक आणि सुरेख बांधणीची ही गोलाकार इमारत म्हणजे विश्‍वातील सर्वांत मोठा गोलघुमट होय. या इमारतीचे एकूण चार स्वतंत्र विभाग आहेत. कबर, नगारखाना, मशीद आणि धर्मशाळा. यापैकी नगारखान्याच्या इमारतीमध्ये भारतीय पुरातत्त्व खात्याने अतिशय अप्रतिम वस्तुसंग्रहालय उभे केले आहे. 

आता मुख्य गोलघुमटाकडे वळूयात. या इमारतीच्या चारही बाजूने वर जाण्यासाठी बंदिस्त गोलाकार जिने असून यांना देखील वर छोटासा गोल घुमट आहे. या जिन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक टप्पा चढून गेल्यानंतर मोकळी खिडकी असलेली जागा अथवा सज्जा आहे. अतिशय सुंदर रचना असलेल्या या जिन्याने आपण गोलघुमटाच्या वरच्या भागात येतो. या घुमटाची उंची जमिनीपासून १९४ फूट व परीघ ११४ फूट आहे. तसेच या दगडी गोलाकार छताला कसलाही मध्यभागी टेकू आणि आधार नाही. यावरून याच्या स्थापत्याचा अंदाज यावा. या गोलघुमटाच्या तळाला पहिला आदिलशहा व त्यांच्या राण्यांच्या समाध्या आहेत. साधारण १६२६ ते १६५६ दरम्यान या इमारतीचे काम पूर्ण झाले. येथील एक अद्‌भुत आश्‍चर्य म्हणजे येथे मोठा आवाज काढल्यानंतर त्या आवाजाने सात वेळा प्रतिध्वनी उमटतात. हा नादचमत्कार म्हणजे या इमारतीचा उत्कर्षबिंदूच म्हणायला हरकत नाही. या इमारतीत भव्यता आहे मात्र कलाकुसर अजिबातच नाही. गोलघुमट पाहण्यासाठी दोन तासदेखील अपुरे पडतात.

जोड घुमट
नावाप्रमाणेच हे दोन घुमट शेजारीशेजारी बांधले असून वास्तुस्थापत्याने नटलेले आहेत. या दोन्ही घुमटांमध्ये विजापूरचा सरदार खवासखान व त्याच्या वडिलांच्या समाध्या असून या ठिकाणी अमावस्या व पौर्णिमेला गर्दी होत असते.

मुलूख मैदान तोफ
विजापूरमध्ये सर्वांत आकर्षक आणि उत्सुकता ताणून धरलेली कुठली गोष्ट असेल तर ती आहे मुलूख मैदान तोफ. या तोफेलाच ’मलिक-ए-मैदान तोफ’ असेदेखील म्हटले जाते. या फारसी शब्दाचा अर्थ आहे मैदानाचा राजा. साधारण पंचावन्न टन एवढ्या अवाढव्य वजनाची तोफ संपूर्ण जगामध्ये एक महाकाय तोफ म्हणूनच ओळखली जाते. एवढ्या वजनाची तोफ सध्या बुरुजावर ठेवलेली दिसून येते. ही तोफ वर कशी आणली असेल हा प्रश्‍न सतावल्याशिवाय राहात नाही.

अहमदनगरच्या निजामशहाच्या राजवटीतील बुर्हाणशहा याच्याकडे काम करीत असलेल्या तुर्की सरदार रुमीखआन हा या तोफेचा शिल्पकार! तांबे, लोखंड, जस्त अशा धातूंच्या मिश्रणातून ही तोफ अहमदनगर येथे गाळल्याचे सांगितले जाते. याच निजामशहाने ही तोफ स्वतःच्या मुलीच्या लग्नात म्हणजेच चांदबिबीच्या लग्नात भेटविली. या चांदबिबीचा आणि आदिलशहाचा लग्नसोहळा सोलापूरच्या भुईकोटात संपन्न झालाय याच शाही सोहळ्यात ही मुलूख मैदान तोफ देण्यात आली व त्या तोफेची रवानगी नंतर विजापूरला करण्यात आली.

इब्राहिम - रोजा
पहिल्या इब्राहिम आदिलशहाने ही इमारत त्याचीच समाधी आहे. आदिलशहाने त्याची राणी ताजसुलतानाची आठवण म्हणून ही इमारत बांधली. परंतु ज्या पहिल्या इब्राहिम आदिलशहाने ही इमारत बांधली तो मेला म्हणून नंतर त्या इमारतीला त्याचेच नाव देण्यात आले. त्यात त्याची कबर दिसते. याच राजाच्या राजवटीतील वास्तुतज्ज्ञ मलिक संदीलने ही इमारत घडवल्याचे सांगितले जाते. येथे दोन वास्तू समोरासमोर आहेत. कबर आणि मशीद दोन्हीही लांबून सारख्याच दिसतात. या दोन्हीही इमारतीसमोरील कमानी अतिशय देखण्या आहेत. तसेच यांच्या भिंतीवरील नक्षीकामदेखील अप्रतिम आहे. येथले वैशिष्ट्य म्हणजे भिंतींवर कुराणातील आयतांचे लिखित कोरलेले आहे. आवर्जून पहावी अशा या वास्तुसमोर अतिशय सुंदर बगीचा फुलवला असून त्याची निगादेखील राखली जाते.

असो. असे हे देखणे विजापूर शहर विविध वास्तुंनी नटलेले आहे. इतिहास संशोधकांच्या मते यादवकाळात या शहराची निर्मिती झाली. कालांतराने या शहरावर आदिलशहाची सत्ता प्रस्थापित झाली. त्यामुळे येथील सर्वच इमारतींवर इस्लामी स्थापत्याची सुंदर झालर दिसून येते. इंग्रजांचा अंमल सुरू होण्यापूर्वी या प्रदेशावर मराठ्यांची सत्ता होती. परंतु मराठेशाहीत येथील कला मात्र अबाधित आणि अभंग राहिली. मुघल राज्यकर्त्यांसारखी मराठ्यांनी कला कधी उद्‌ध्वस्त केली नाही, उलटपक्षी जपून ठेवली. हाच मोठा गुणात्मक फरक या दोन राजसत्तांमध्ये होता. त्यामुळेच कलेची ओढ, इतिहासाची उत्सुकता आणि फिरण्याची इच्छा जर तुमच्या मनात उत्पन्न झाली तर सुट्ट्यांमध्ये विजापूरला एकदा तरी भेट देवून पहा.

फोटो फीचर

संबंधित बातम्या