जैवविविधतेनं नटलेलं नागझिरा

पल्लवी कासंडे
सोमवार, 27 मे 2019

पर्यटन
 

मी  पक्षी, प्राणी, जंगलं, निसर्ग संवर्धन या विषयांवर लिहिणारी नाही. हे विषय लहानपणी शाळेतल्या अभ्यासक्रमात थोडेफार शिकले असेन, पण तसं एकूण नवीनच. पाटी कोरीच म्हणा ना! त्यामुळं हा लेख मला किती फुलवून लिहिता येईल माहिती नाही. तरी मनाला जे स्पर्शून गेलं आहे, ते मांडण्याचा हा प्रयत्न.

Adventure foundation आयोजित नागझिरा जंगल सफारीला मी जायचं ठरवलं, तेव्हा सफारी म्हणजे काय माहिती असूनही काही माहिती नाही, असं समजायचं असं मनानं जणू ठरवलं. अनेकांनी सल्ले दिले, अनुभव सांगितले, त्यात आम्हाला वाघ दिसला किंवा दिसला नाही... असेच जास्त होते.

नागझिरा अभयारण्य हे भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांच्या मधे वसलेलं आणि अजून ज्याचं बाजारीकरण झालेलं नाही, म्हणूनच जैवविविधतेनं भरलेलं अभयारण्य किंवा जंगल. तिथं अजूनही वीज नाही. सोलर पॅनल्स हल्ली बसवलेत, ज्यामुळं निवासाच्या जागी आपण रात्री लाइट लावू शकतो. रात्री उगाच दिवे लावायला परवानगी नाही, टॉर्चचा उजेडसुद्धा आपल्या पायाखालचं दिसेल एवढाच पाडायचा. हे सर्व काटेकोरपणे पाळलं जातं. या नागझिऱ्याचा परिसर साधारण १५२ चौरस किलोमीटर्सचा आहे. जंगलाच्या मधोमध नागाचं मंदिर आहे, म्हणून नागझिरा (झरा) असं याचं नाव पडलं. उन्हाळा व पानगळीच्या ऋतूमध्ये प्राणी दिसू शकतात. प्रिकॅम्प मिटिंगला अशी सर्व माहिती मिळालीच. पण त्याबरोबर एक सरप्राईजही मिळाले. नागझिऱ्याचा विकास करण्यात व त्याचं पावित्र्य राखण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे ज्येष्ठ निसर्गतज्ज्ञ मारुती चितमपल्ली या सफारीला येणार आहेत, असं समजलं. म्हणजे सोने पे सुहागाच! कधीतरी जगायला मिळणारे क्षण इतके सोनेरी असतील, असं वाटलंच नव्हतं. ग्रुपचे लीडर्स विवेक देशपांडे आणि मिलिंद देशपांडे यांनी बरीच वर्षं चितमपल्ली सरांबरोबर मैलो-न्‌-मैल पायी प्रवास करून हे जंगल पालथं घातलं आहे, अभ्यास केला आहे, हे समजल्यावर तर न भूतो भविष्यती असे काही अनुभवायला मिळणार आहेत, याची खात्रीच पटली.

अगदी तसंच झालं. ३१ मार्च ते ४ एप्रिल २०१९ आम्ही जंगलात राहिलो, इन हार्ट ऑफ द जंगल असं म्हटलं, तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. फक्त राहिलोच नाही, तर सगळं जंगल त्या तीन-चार दिवसांत अनुभवलं. तिथली सकाळ, तिथली रखरखीत दुपार, तिथला मिट्ट काळोख, तिथला धो-धो पाऊस.... सगळं सगळं मिळालं. हे सारं कसं पाहा, हे सांगायला ऋषितुल्य चितमपल्ली सर होतेच. त्यांची ४० वर्षांची कारकीर्द त्यांच्या अनुभव कथनातून आम्ही अक्षरशः जिवाचा कान करून ऐकली. जंगल पाहू नका, जंगल वाचा.... हे त्याचं पहिलंच वाक्‍य हृदयावर आम्ही कोरलंच. त्यांनी ४० वर्षांत जे अनुभवलं ते ४ दिवसांत मिळावं हे मुळीच शक्‍य नव्हतं. पण तरी या सर्व सोनेरी क्षणांची पुंजी घेऊन आम्ही एकूण पाच सफारी केल्या. तीन भर दुपारी २.३० ते ६.०० या वेळात, तर दोन सकाळी ६.०० ते १०.३० या वेळात. ओपन जिप्सीमध्ये सहा सहा जणांचा ग्रुप असायचा. बरोबर ड्रायव्हर आणि गाइड. सकाळचं जंगल वेगळं, दुपारचं-संध्याकाळचं जंगल वेगळं. त्यात आम्ही पोचलो, त्या रात्री धो-धो पाऊस पडला. आमचे गाइड व ड्रायव्हर खूप हुशार. चितमपल्ली सरांसारखेच हे दोघेही माहितीचं भांडार. सरांनी जे जंगल वाचा हे सांगितलं होतं ते या दोघांमुळे शक्‍य झालं. 

हे जंगल विविध प्रकारचं आहे व निरनिराळ्या टापूत ते वैविध्य दिसतं. कुठं ते सपाट आहे, कुठं घनदाट, कुठं विरळ, तर कुठं डोंगरावर, घाटासारख्या रस्त्यांवर. प्रत्येक ठिकाणी विविध प्रकारची झाडं दिसतात व ती तशी नैसर्गिकरीत्याच वाढलेली आहेत. ही झाडं कोणती, काय ही माहिती गुगलवर आहेच, पण प्रत्यक्ष ते दिसणं, ओळखू येणं हे भारी वाटतं....! तसंच जैवविविधता या शब्दाचा अर्थही समजतो.

काही झाडं प्रथमच तिथं पाहिली. जसं घोस्ट ट्री, पांढऱ्या बुंध्याचं हे झाड अंधारात चमकतं. प्रत्येक टापूत एक-दोन अशी झाडं आढळतात. चितमपल्ली सरांच्या बोलण्यात कुसुंब या झाडाचा उल्लेख आला होता. त्या झाडातून पाण्याचे तुषार येतात आणि आजूबाजूचा प्रदेश तुलनात्मक थंड होतो. हा असा हलक्‍या पावसाप्रमाणं पाण्याच्या थेंबांचा शिडकावा आम्हीही सर्वांनी अनुभवला.

घाटाच्या रस्त्यावर अत्यंत दाट जंगल आहे. एकमेकांत पसरलेल्या कांचनवृक्षाच्या वेली आहेत, बांबूची बनं आहेत. इथं अगदी गूढ प्रकारची शांतता अनुभवायला मिळाली. पण तरी ते जंगल पाहणं हे आनंददायीच ठरलं. रात्री हे घाटातलं जंगल not less than haunted असं भासेल असं वाटून गेलं. या जंगलात हिंडताना आम्ही चार-पाच मार्ग हिंडलो. ते फार पद्धतशीर हिंडणं होतं असं नाही, पण एक मनस्वी भटकंती नक्कीच होती. प्राण्यांच्या मनस्वी पण नैसर्गिक हालचालींचा माग घेत त्यांना पाहायचं होतं. आम्हाला ते दिसावे म्हणून कधीच वेगळे प्रयत्न कोणी केले नाहीत. पाणवठ्यांपाशी वाट पाहाणं आणि जे जाताना दिसतायत त्याचं शांत निरीक्षण करणं, हे आम्हीही नेटानं पाळलं. पगमार्क्‍स पाहायचे, मग ते कुठल्या दिशेनं आहेत त्या रस्त्यानं हिंडायचं असंही केलं. प्राणीही आमच्यावर जणू खूश होते व अधूनमधून हे जंगलाचे यजमान आम्हाला त्यांच्या दर्शनाची मेजवानी देत होते. यामुळं वानरं, हरणं, सांबर, वाघ, बिबटे, जंगली कुत्री, गवे असे सर्व पाहाता आले. सर्वांत जास्त दर्शन देतात ती वानरं. नागझिऱ्यात मोहाची झाडंही खूप आहेत. आता त्याला फुलं येतात. ती पिवळसर रंगाची असतात. आदिवासी ती गोळा करून त्याची दारू करतात. वानरं ही फुलं खूप खातात. त्यांना झिंग येते का ते समजलं नाही, पण त्यांच्यामुळं ती फुलं ओळखू आली. त्या फुलांना पहिल्या वाफेच्या भाताला जसा सुगंध असतो, तसा सुगंध असतो. मोहावणाराच. आमच्यापैकी काही जणांनी त्या मोहात पडून चवही पाहिली, झिंग येण्याइतपत खाल्ली नाहीत, ते आमचं नशीब.

पिल्लं पोटाशी धरून बिनधास्त पळताना, या झाडावरून त्या झाडावरून जाताना अनेक वानरी पाहिल्या. पण एकदा जिप्सीतून जात असताना अचानक झाडाकडं नजर गेली आणि एक पिल्लू झाडावर तोल सांभाळताना दिसलं. लगेच शेजारी त्याची आईपण दिसली. ती पिल्लाला धरत नव्हती, झाडावर बसायला शिकवत होती. एका सकाळी पाणवठ्यावर अचानक वानरांचा कळप दिसला. काही झाडावर होती, काही पाणवठ्यावर पाणी पीत होती. जी झाडावर होती ती बहुधा आजूबाजूला लक्ष ठेवत असावीत. पाणी पितानाही सर्व एकदम पाणी पीत नव्हते. दोघं तिघं प्यायचे, दोघं तिघं आजूबाजूला पाहायचे. असं करत करत पंधरा वीस मिनिटांत जवळ-जवळ सर्व वानरं पुन्हा झाडांवर पळाली. झाडांवर लटकताना त्यांचं वजन ते हलकं करू शकतात, असं आमच्या गाइडनी सांगितलं म्हणून बारीक फांद्यांवरही ते बसू शकतात किंवा लोंबकाळू शकतात. ‘अहो रामाचा आशीर्वाद हाये त्यास्नी’ असंही तो म्हणाला. या पौराणिक आधाराबरोबर कोणत्या फांदीला धरायचं आणि लटकायचं याचं वानरांना ज्ञान असावं, असं आम्हाला वाटलं.

अशाच एका वानरांचा गट बिबट्या जवळपास आहे, यासाठी कॉल देताना आम्ही ऐकलं व काही वेळात बिबट्यानं दुरून दर्शन दिलंही. पाणवठ्यावर पाणी पिऊन तो मग झाडीत दिसेनासा झाला. एका सकाळी सांबरांचाही कॉल आम्हाला ऐकायला मिळाला. वीस-पंचवीस सांबरांचा कळप तळ्याकाठी चरत होता, पाण्यात खेळत होता. हरणांचाही कळप दुसऱ्या बाजूला होता. आम्हाला विरुद्ध दिशेनं जंगली कुत्री तळ्याच्या दिशेनं जाताना दिसली. काही क्षणांतच शंभर एक हरणं सुसाट वेगानं पळाली. सांबर काठ सोडून पाण्यात शिरली. एखादं सांबर किंवा हरिण जंगली कुत्र्यांना मिळालं असावं, गळा पकडल्यानंतरचा जसा ऑ-ऑ आवाज येतो, तसा आवाज ऐकू आला. शिकार झाली होती. त्यानंतर कॉल थांबला. पाण्यात उतरलेले सांबर काही क्षण हताश नजरेनं आपण गमावलेल्या भिडूकडं पाहात होते. पण त्यानंतर दुसऱ्या बाजूनी निघून गेले. हरणंही खेळायला, चरायला लागली. या सांबर व हरिण दोन्ही प्राण्यांनी सतत आम्हाला सुखद दर्शन दिलं. सोनेरी नितळ कांती, डोळ्यात कमालीचे प्रेमळ भाव, चालतानाचा डौल, निरागस खेळकरपणा या सगळ्यानं अक्षरशः आम्ही सगळे मोहावून जात होतो. सकाळच्या कोवळ्या उन्हात हरणं सोनेरीच दिसतात. सीतामाईला सुवर्णमृगाचा मोह का पडू नये, जिथे नैसर्गिक अवस्थेतंच ती इतकी सुंदर दिसतात. एका संध्याकाळी दोन नर हरणांची फाइटपण पाहिली. ती मेटिंगसाठी असावी. दोन हरिणी शेजारी हिंडत होत्या. खरं दोन नर व दोन मादी असे होते, मग दोन जोड्या झाल्याच असत्या की, मग कशाला भांडायचं असा मानवी विचार मनात आलाच. पण त्याचं उत्तर शोधायच्या भानगडीत न पडता ती लढाई आम्ही डोळे भरून पाहिली. कळपाच्या लीडरला आणि मेटींगसाठी नराला स्वतःला सिद्ध करावंच लागतं, हा कळपात राहणाऱ्या प्राण्यांचा नियम. वानरांमध्ये तर अगदी रोज लीडरला वेगळं काही करून दाखवावंच लागतं, तर बाकीचे मान देतात, असं चितमपल्ली सरांनीही सांगितलं होतं. हे असं सारं अनुभवत असताना या जंगलाच्या दोन पॉवरफुल्ल यजमानांनीही आम्हाला मनसोक्त दर्शन दिलं. एका दुपारी जिप्सी सपाट रस्त्यावरून चालली असताना आमच्या शेजारून बिबट्या गेला व शेजारच्या टेकाडावरच्या झाडीतच शिरला. जाताना एक क्षण गुरकावून त्यानं पाहिलंच होतं. ड्रायव्हरनं जोरात ब्रेक लावला. आम्ही सगळे एकदम बेसावध होतो, त्यामुळे कुणालाच हे दृष्य कॅमेरात टिपता आलं नाही. मग त्या झाडीत तो बराच वेळ बसला होता. पण तो बाहेर येईल असा अंदाज आमच्या गाइडनं व्यक्त केला. थांबू शांत इथेच, आमच्या गाइडचा अंदाज नेहमी बरोबर यायचा. तसंच झालं. बिबट्या काही काळानं जरा पुढे चालत गेला व नंतर रस्त्यावर आला. कितीतरी वेळ आम्ही त्याला चालताना पाहात होतो. त्याचा कॅट वॉकच तो. मधे त्याने शीपण केली. ते पाहातानाही मजा वाटली. मग तो एकदम दुसऱ्या बाजूच्या झाडीत शिरला. तो पाणवठ्यावर जाईल आता, गाईडनं सांगितलं. मग ड्रायव्हरनं जिप्सी पाणवठ्याकडं वळवली, पण तिथं दुसराच बिबट्या जणू आमची वाट पाहात थांबला होता. वानरांचा कॉल (वर लिहिल्याप्रमाणे) इथेच ऐकायला मिळाला. बराच वेळ वाट पाहून मग तिथून निघालो व एका टेकाडाच्या रस्त्यानं गेलो. तिथल्या दरीतही एक बिबट्या शांतपणे बसलेला आढळला. तासाभरात तीन बिबट्यांनी दर्शन दिल्यानं, त्या भर दुपारच्या रखरखीत वातावरणातही मनाला शीतलता लाभली. 

या जंगलात सहा-सात वाघ आहेत. त्यापैकी आयेशा किंवा टीटू वाघीण आम्हाला सलग दोन दिवस संध्याकाळी साडेपाच-सहाच्या सुमारास एकाच पाणवठ्यावर दिसली. ऊन उतरणीला आलं, की ती झाडीतून बाहेर यायची, पाणी प्यायची, मनसोक्त त्या पाण्यात डुंबायची. जवळच एक विहीरही होती. एकदा पाणवठ्याच्या पाण्यात डुंबून ती पुन्हा विहिरीत शिरली. मग त्यातून उसळी मारून बाहेर येताना याची देही याची डोळा तिचं लावण्यवतीप्रमाणं सौंदर्य पाहिलं. जणू एखादी राणी पाण्यातून ओलेती बाहेर यावी, तसं रूप. बाहेर येऊन तिनं असं काही मागं वळून पाहिलं की... जणू ती म्हणत होती... पाहाताय ना माझ्याकडं! सौंदर्य पाहून घायाळ होणं म्हणजे काय, ते तिथं...  ती नखशिखांत भिजली असताना आम्ही अनुभवलं. 

दिल धडकावणारं दर्शन अजून एका यजमान प्राण्यानं आम्हाला दिलं, तो म्हणजे गवा. एक टनाचं धूड, सिक्‍स पॅक का किती आणखी ते मोजताही येणार नाहीत असे मसल्स. रोखून बघणारी नजर, कायमच उगारलेली शिंगं... वाघसुद्धा पुढून शिकार करू शकत नाही आणि फक्त वाघच करू शकतो. त्याला बघून एक हलकीशी ढुशी मारली, तरी किती लांब फेकले जाऊ आपण, असं सर्वांनाच वाटलं. आम्हाला गव्यांचा मोठा कळप दिसला. 

नीलगायीनं अगदी थोडा वेळ दर्शन दिलं. घरातली एखादी सुंदर तरुणी जशी काही क्षणभर दिसावी व गायब व्हावी, तसं झालं. एका टेकडी शेजारून जात असताना आमच्या गाइडला ती दिसली. त्यानं हलकेच नीलगाय असं हातानं खुणावलं, पण दिसे दिसेपर्यंत ती झाडीत दिसेनाशी झाली.

प्राणी हे निशाचर आहेत आणि तुम्ही ते दिवसा दिसावेत, अशा अपेक्षेनं आला आहात... असं चितमपल्ली सरांनी आम्हाला आधीच सुनावलं होतं. जंगल पाहा, जे दिसेल ते कोणत्या स्थितीत, कसं ते पाहा. पक्षी पाहा असंही सांगितलं होतं. त्यामुळं आपण जंगल वाचायला आलोय एखादं प्राणी संग्रहालय नाही, हे मनात पक्कं होतं. पक्षीही खूप पाहिले. पक्षांची नावे मला तितकीशी आठवत नाहीत, पण निळकंठ, सातभाई, खंड्या, टिटवी, वेडा राघू, पोपट, हरियाल, ट्रीपाई, रॉकेट टेल्ड बुलबुल, सरपंट इगल हे बऱ्याच वेळा दिसले. दुर्मिळ असा कस्तूर दिसला. हे सारे पक्षी झाडांत दिसणं, ओळखता येणं, त्यांचे फोटो काढता येणं हेपण खूप आल्हाददायक होतं.

हे सारं जंगल, किंबहुना ही सफारी म्हणजे कुसुंबाचं झाड जसं पाण्याचे तुषार शिंपडतं, तसं या रखरखीत उन्हाळ्यात अनुभवाचं शीतल शिंपण होतं. पुणे ते नागपूर प्रवासापासून ते परतीच्या प्रवासापर्यंत आम्ही मनस्वीपणे या अनुभवात डुंबत होतो. माणूस म्हणून कितीही प्रगती केली, तरी जगण्याचं ट्युनिंग करून घ्यायला जंगलात म्हणजे निसर्गातच यायला हवं, हे खोलवर कुठेतरी ठसलं. माझा हा पहिलावहिला अनुभव माझ्यात आमूलाग्र बदल करणारा ठरतो आहे. जगण्याची दृष्टीच बदलून गेली आहे. कितीतरी अनुभव असे आहेत, की ज्याचं शब्दांकन करणं कठीण वाटतंय. निसर्गसंवर्धनासाठी चितमपल्ली सरांनी जे कळकळीनं काही सांगितलं, ते सतत आठवतंय. दैनंदिनीत ते कसं आणता येईल, त्याचा अखंड विचार सुरू झालाय. या सगळ्यासाठी विवेक देशपांडे, मिलिंद देशपांडे आणि चितमपल्ली सर यांचे आजन्म आभार.

संबंधित बातम्या