कोकणचा कनकेश्‍वर

पांडुरंग पाटणकर 
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

धार्मिक पर्यटन
कोकणभूमी येथे एकापेक्षा एक सरस आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळे पहुडलेली आहेत. रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळचे कनकेश्‍वर देवस्थान म्हणजे निसर्गाचा ‘सुवर्ण सुंदर’ आविष्कारच आहे.

धार्मिक पर्यटनासाठी कोकणभूमी म्हणजे ‘अलिबाबाची गुहा’च आहे. येथे एकापेक्षा एक सरस आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळे पहुडलेली आहेत. रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळचे कनकेश्‍वर देवस्थान म्हणजे निसर्गाचा ‘सुवर्ण सुंदर’ आविष्कारच आहे. ४०० मीटर उंचीच्या डोंगरावरील हे कोकणवासियांचे श्रद्धास्थान विपुल वृक्षराजी आणि शेकडो औषधी वनस्पतींनी बहरलेले आहे. स्थानिक तज्ज्ञांच्या मताप्रमाणे खूपशा व्याधींवरील परिणामकारक वनस्पती येथे आहेत. परिसरातील अनेक अभ्यासूंनी येथील औषधी वनस्पतींवर संशोधन करून ‘डॉक्‍टरेट’ पदवी मिळविलेली आहे. ‘ड्रॉसेरा’सारख्या कीटकभक्षक वनस्पती तसेच सुवासिक फुले देणारे अनंताचे झाड आम्ही येथे पाहिले. २००१ मध्ये येथील मंदिराला १२५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल श्रीगणेशाचा पुष्टीपदी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा झालेला होता. श्रीगणेशाची येथील मूर्ती सव्वाशे वर्षांपूर्वी बडोद्याहून आणलेली होती व भक्तांसाठी शेजारी निवासस्थाने बांधलेली आहेत. गणेशभक्त श्रीलंबोदरानंद महाराज यांना येथे श्रीगणेशाचे प्रत्यक्ष दर्शन झाले होते, असे म्हणतात. त्यांची समाधी शेजारीच आहे.

पुण्याहून इकडे यायचे झाल्यास शिवाजीनगर एसटी बसस्थानकावरून अलिबागला येणाऱ्या सकाळी ५, ८, १० वाजताच्या बसेस सोयीच्या आहेत. त्या बसने अलिबागच्या अलीकडे सुमारे ५ कि.मी. अंतरावरील कार्लाखिंड गावी उतरल्यास तेथून कनकेश्‍वराच्या पायथ्याच्या मापगावी या गावाला जाण्यास भरपूर रिक्षा मिळतात व अंतर सुमारे ८ किलोमीटर आहे. या सहा आसनी रिक्षांना स्थानिक लोक ‘सितारा’ अशा गोड नावाने पुकारतात. मुंबईहून इकडे यायचे झाल्यास थेट अलिबागला येणाऱ्या एसटी बसशिवाय समुद्रमार्गे भाऊंच्या धक्‍क्‍यावरून रेवासला येणाऱ्या प्रवासीबोटीने यावे व रेल्वेहून अलिबागला जाणाऱ्या एसटी बसने कनकेश्‍वर फाट्यावर उतरल्यास तेथून पायी १५-२० मिनिटांच्या अंतरावर पायथ्याचे मापगाव आहे. खुद्द अलिबागहून अलिबाग-किहीम-कनकेश्‍वर या एसटी गाड्या दर तासाला सुटतात. किहीमच्या रम्य सागरकिनाऱ्यावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (एमटीडीसी) पर्यटक निवासस्थाने आहेत.

पायथ्याच्या मापगावातून कनकेश्‍वराचा डोंगर चढून यायला वळणावळणाच्या रुंद पण कमी उंचीच्या आरामदायी सुमारे ७५० पायऱ्या बांधून काढलेल्या आहेत. अधूनमधून सावली धरायला वृक्षराजीही आहे आणि पायऱ्यांच्या विशिष्ट टप्प्यांवर त्यांना नागोबाची पायरी, गायमांडी, देवाचा पाय अशी नावेही दिलेली आहेत. ५०-६० पायऱ्या चढून जाताच पश्‍चिमेला अथांग सागराचे दर्शन होते व डोळे तृप्त होतात. गंमत म्हणजे समुद्र सुमारे दहा-बारा कि.मी अंतरावर दूर असल्याने लाटांचा आवाज, रौद्रता जाणवत नाही. फक्त पांढऱ्या फेसाच्या लाटा पुढेमागे होताना दिसतात. किनाऱ्यावरील थळ-वायशेतचा प्रचंड खतप्रकल्प (राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर- आरसीएफ) लक्ष वेधून घेतो. माथ्यावर येताच घनदाट अरण्यात आल्यासारखे वाटते. डोंगरमाथा बराच विस्तृत असून, उंच सखल होत गेलेला आहे. सुरवातीला मारुतीरायाचे आटोपशीर मंदिर आहे. हनुमानाची मूर्ती समर्थांनी वर्णील्याप्रमाणे ‘पुच्छ ते मुरदिले माथा...’ पद्धतीची आहे. त्याच्याशेजारी पाण्याचे मोठे बांधीव कुंड असून, त्याला ‘ब्रह्मकुंड’ म्हणतात. पुढे गेल्यावर उंच जागी कनकेश्‍वराचे पश्‍चिमाभिमुख भव्य मंदिर आहे.

लांबरुंद संगमरवरी पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना सुंदर सिंहशिल्पे आहेत. प्रवेशद्वारात सूर्यमुखी स्वागतिकांची शिल्पे आहेत. मंडप व गाभारा चकचकीत शुभ्र टाईल्सने सजविलेला आहे. कनकेश्‍वराच्या मुख्य पिंडीवर पितळी लखलखीत आवरण असून, त्यावर शिवाचा रुपेरी मुखवटा आहे. मंदिराबाहेर प्रांगणात तीन फणी नागाच्या डोईवर पृथ्वीचा गोल दाखविलेला असून, नागाच्या फड्यातून पिण्याचे पाणी तोटीने सोडलेले आहे. कनकेश्‍वराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराशेजारी असलेली भव्य दशमकोनी देखणी ‘पुष्करणी’. मूळच्या भव्य गोलाकार विहिरीला दशादिशांनी छेदणाऱ्या पायऱ्या बांधून दशमकोनी सुंदर पुष्करणी बनविलेली आहे. मंदिर परिसरात इतरही दोन-तीन निर्मळ पाण्याच्या मोठ्या विहिरी आहेत. मुख्य मंदिराशेजारी त्याच्यासारखेच भव्य असे श्रीरामसिद्धीविनायकाचे आरस्पानी मंदिर आहे. वर उल्लेख आलेली बडोद्याहून आणलेली गणेशमूर्ती या मंदिरात आहे. पुष्करणीच्या सभोवताली बल राम श्रीकृष्ण अशी इतर छोटी मंदिरे आहेत.

मंदिराच्या मागील बाजूला दाट झाडीतून गेलेल्या रस्त्याने पायी गेल्यास पंधरा-वीस मिनिटांच्या अंतरावर ‘सनसेट पॉइंट’ आहे. तेथून समुद्राच्या रुपेरी किनाऱ्यांत अस्तमान होणारे सूर्यबिंब पाहताना मन भावुक होते.

संबंधित बातम्या