विस्मयकारक मंदिरे

पांडुरंग पाटणकर 
गुरुवार, 8 मार्च 2018

धार्मिक पर्यटन
धार्मिक पर्यटनांत काही विस्मयकारक, विचित्र मंदिरेही पाहण्यात येतात. एकूण मंदिरात त्यांचे प्रमाण नगण्य असले, तरी भोजनाच्या ताटात चवीला मीठ जसे असते, तशी ही मंदिरेही पाहायला मजा वाटते.

धार्मिक पर्यटनांत काही विस्मयकारक, विचित्र मंदिरेही पाहण्यात येतात. एकूण मंदिरात त्यांचे प्रमाण नगण्य असले, तरी भोजनाच्या ताटात चवीला मीठ जसे असते, तशी ही मंदिरेही पाहायला मजा वाटते.

व्यासांच्या महाभारतातील ‘दुर्योधन’ हा खलनायकच म्हटला पाहिजे. मूळचे त्याचे नाव ‘सुयोधन’ होते म्हणतात. पण दुर्बुद्धीकारक त्याच्या प्रतापामुळे दुर्योधन नावानेच तो ओळखला जाऊ लागला. उत्तर भारतात त्याचे एक मंदिर आहे. तसेच अष्टविनायकातील सिद्धटेक जवळच्या कर्जत या तालुक्‍याच्या गावाजवळही त्याचे मंदिर आहे. दुर्गाव ह्या छोट्या गावात हे दुर्योधन मंदिर आहे. खरे म्हणजे मुख्य मंदिर महेश्‍वर महादेवाचे हेमांडपंथी थाटात बांधलेले आहे व त्याच्या ‘विमाना’च्या पोकळीत हे दुर्योधनाचे स्थान आहे. येथे गर्भगृहात दोन प्रकारच्या शिवाच्या पिंडी आहेत. एक नेहमीप्रमाणे वर्तुळाकार आहे व दुसरी चौकोनी आहे. गाभाऱ्याच्या वरील खोलगट भागास ‘विमान’ अशी संज्ञा आहे. पूर्वीची तेथील दुर्योधनाची मूर्ती खराब झाल्यामुळे नव्या मूर्तीची स्थापना झालेली आहे. तिचे दर्शन घेण्यासाठी पूर्वी सोय नव्हती. पण अलिकडे आता तिथे सिमेंट क्राँक्रीटचा जीना बांधण्यात आलेला आहे. पावसाळ्याच्या सुरवातीला या दुर्योधन मंदिराचे मुख विटा व मातीने लिंपून बंद करतात. त्याला कोंडले म्हणजे पाऊस चांगला पडतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. कर्जतचे ग्रामदैवत गोदड महाराज मंदिरही प्रसिद्ध आहे.  हेमांडपंथी दगडी मंदिरांनाही ऑईलपेंटच्या भडक रंगांनी रंगविण्याचा दुर्दैवी प्रकार येथेही घडलेला आहे. सदर महेश्‍वर महादेवाचे व दुर्योधनाचे हे मंदिरही बाहेरुन भडक रंगांनी रंगविलेले आहे. देशात उत्तरेकडे डेहराडून काल्सी-लाखमंडळ येथे व दक्षिणेकडे केरळात एक मोठी शिळा दुर्योधन म्हणून पूजण्यात येते. अशी ही तीन दुर्योधन मंदिरे लक्षात राहण्यासारखी आहेत. 

आता वाल्मिकींच्या रामायणाचा खलनायक रावण हा दक्षिण भारतात काही ठिकाणी पुजला जातो व त्याची मंदिरेही आहेत असे सांगतात. पण या रावणाच्या भाच्याचे एक मंदिर कऱ्हाडजवळच्या वसंतगडावर आहे. वसंतगड हा साधा, सरळ, सोपा किल्ला कऱ्हाडच्या अलिकडे १३ किलोमीटर अंतरावर पुणे-बंगलुरू राष्ट्रीय महामार्गाशी जवळीक साधणारा आहे. या मार्गावर साताराकडून येताना उंब्रजनंतर ३ किलोमीटर अंतरावर एक सडक महामार्गाला छेदते व त्या फाट्यावर उजवीकडे तळबीड तर डावीकडे बेलवडे गाव आहे. तेथुन रिक्षाने दहा पंधरा मिनिटात तळबीड गाव येते. गावाच्या पाठीवरच वसंतगड उभा आहे. छत्रपती शिवरायांच्या अखेरच्या पर्वातील सरनोबत हंबीरराव मोहिते यांचा हा गाव इतिहासाचा साक्षीदार आहे. गावात त्यांचे स्मारकही आहे. किल्ल्याचा डोंगर कमी उंचीचा व पसरट असून ग्रामस्थांनी गडावर जाण्यासाठी सुमारे दीडशे पायऱ्याही बांधून काढलेल्या आहेत. त्या संपल्या की दूरवर दोन मोठे वटवृक्ष व गडाची लांबवर गेलेली तटबंदी दिसते. त्या वटवृक्षांमधूनच गडाच्या प्रवेशद्वाराची वाट जाते. अर्ध्या पाऊण तासात आपण गडावर पोहोचतो. भग्न प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डाव्या हाताच्या पडक्‍या मंदिरात श्रीगजाननाची मीटरभर उंचीची शेंदरी मूर्ती आहे. पुढे गेल्यावर गडाच्या मध्यभागी चंद्रसेन महाराजांचे पुरातन भव्य मंदिर आहे. हा चंद्रसेन दैत्य कुळातला होता व तो रावणाचा भाचा होता. रावणाप्रमाणेच त्यानेही शंकराची उग्र तपःश्‍चर्या करुन खड्‌ग प्राप्त करुन घेतले होते. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर उजवीकडच्या भिंतीत ताम्रपट असून त्यावर काही नोंदी कोरलेल्या आहेत. शके १७०० मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला असून तो करणारांची नावे या ताम्रपटावर कोरलेली आहेत. आतील देवाचा ‘चंदोबा’ असाही उल्लेख केला जातो. चैत्रातल्या दुसऱ्या पंधरवड्यात येथे मोठी जत्रा भरते. इतर वेळीही गडावर भाविक येतच असतात. जुन्या काळी मंदिरापुढे भव्य दीपमाळ होती. नंतरच्या काळात ती पडल्यामुळे त्याच चौथऱ्यावर दोन दीपमाळा उभारण्यात आलेल्या आहेत. गडावर पाण्याची दोन मोठी तळी असून एकाचे नाव कोयनातळे व दुसऱ्याचे नाव कृष्णतळे असे आहे. पाणी निर्मळ असून कृष्णतळ्याचे पाणी पिण्यास वापरतात. या गडाचे खास वैशिष्ट्य म्हणजे चारही दिशांना तटाच्या आत उत्तुंग माची बांधलेल्या आहेत. गडात एक छोटेखानी प्राचीन शिवमंदिरही आहे. भोज शिलाहाराने बांधलेल्या किल्ल्यात वसंतगडाची गणना होते. सातवाहन काळातील बरेच अवशेष या परिसरात सापडलेले आहेत.

संबंधित बातम्या