अंकाई लेणी व नवनाथाच्या गुहा

पांडुरंग पाटणकर 
शुक्रवार, 16 मार्च 2018

धार्मिक पर्यटन

अखिल जगतामध्ये आपल्या भारत वर्षात संख्येने सर्वांत जास्त कोरीव लेणी आहेत. यातील पितळखोऱ्याशी नाते सांगणारे अंकाईचे शिल्परत्न मनमाडच्या अलीकडे सुमारे १३ किमी अंतरावर आहे.

अखिल जगतामध्ये आपल्या भारत वर्षात संख्येने सर्वांत जास्त कोरीव लेणी आहेत याचा आनंद वाटतो. त्यातही महाराष्ट्रात सर्वांत जास्त कोरीव लेणी आहेत. इसवी सन पूर्व २०० ते १५० या काळात पहिले लेणे भाजे येथे कोरले गेले व त्यापुढच्या शे-दीडशे वर्षात कोंडाणे, पितळखोरे, अजिंठा, बेडसा वगैरे लेणी खोदली गेली. यातील पितळखोऱ्याशी नाते सांगणारे अंकाईचे शिल्परत्न मनमाडच्या अलीकडे सुमारे १३ किमी अंतरावर आहे. याच पहाडावर देखणा असा अंकाई-ढंकाई हा जोडकिल्लाही आहे. दौंडहून मनमाडला रेल्वेने जाताना मनमाडच्या अलीकडे अंकाई किल्ला नावाचे अगदी छोटे रेल्वेस्टेशन लागते. काही पॅसेंजर रेल्वेगाड्याच तिथे थांबतात. किल्ला व लेणी पाहण्यासाठी आम्ही थेट मनमाड गाठले. तेथून येवला, शिर्डीकडे जाणाऱ्या एस.टी. बसेस किंवा रिक्षा, टेम्पोसारखी वाहनेही अंकाई रेल्वे फाट्यावर आपल्याला उतरवतात किंवा रिक्षा, टेम्पो अंकाई गावातही (५ कि.मी.) नेतात. गंमत अशी झाली की आम्ही गेलो होतो किल्ला व लेणी पहायला पण रेल्वे फाट्यावर आम्हाला कळले की उजवीकडचा भला मोठा पहाड नाथसंप्रदायाच्यापैकी गोरक्षनाथांचा आहे. त्यावर अनेक मोठ्या गुहा असून त्यात कानिफनाथ, चौरंगीनाथ व अडबंगनाथांची महत्त्वाची स्थाने आहेत. आमच्या पर्यटनाला धार्मिक पर्यटनाची जोड मिळाली व तेथेही जायचे ठरविले. प्रथम अनकाई गावात जाऊन किल्ल्याच्या पायथ्याची कोरीव लेणी पाहिली. हा एकूण दहा लेण्याचा दुमजली शिल्पसमूह असून लेणी अप्रतिम आहेत. ९ व १० क्रमांकाची तळाकडील लेणी निवासस्थाने किंवा विहार स्वरूपाची असून त्यावरील स्तरातील द्वितीय क्रमांकाचे मुख्य लेणे बेजोड आहे. प्रवेशद्वारातील स्वागतिका शिल्प स्तंभाच्या तळाकडे अकरा नृत्यांगनांच्या विविध पोझेस, कमानी, वेलबुट्टी यांची मुक्त पखरण असा जामानिमा आहे. भगवान शंकराच्या ध्यानावस्थेतील तीन मूर्ती सुरेख आहेत. पुढे गेल्यावर दुर्गा देवी व शिवाच्या तीन मीटर उंचीच्या भव्य मूर्ती पाहताच मंत्रमुग्ध होऊन जातो. सिंहशिल्पे, हत्तीशिल्पेही अप्रतिम आहेत. येथील एका शिलालेखावरून ही लेणी दहाव्या, अकराव्या शतकातील असावीत असे वाटते. हिंदू, जैन व बौद्ध यांचे शिल्प योगदान येथे आढळते.

दुपारी ३ वाजता गोरखनाथांचा पहाड चढायला सुरवात केली. पायथ्याच्या विशाल वटवृक्षापासून पायऱ्या बांधून काढलेल्या आहेत. अर्ध्या तासात गोरक्षनाथांच्या गुहेपाशी आलो आणि स्तिमितच झालो. पंधरा - वीस मीटर उंचीच्या या भव्य गुहेत खोलवर गोरक्षनाथ, गणपती, देवी यांच्या मूर्ती आहेत. पहाड आणखी चढून गेल्यावर वरच्या स्तरांत कानिफनाथांची अशीच गुहा आहे. येथे मात्र खडकाच्याच पृष्ठभागावर त्यांची मूर्ती कोरलेली आहे. नंतर पुढे पाण्याचे टाके व एका छोट्या गुहेत शिवाची पिंड आहे. त्यानंतर आणखी एक पाण्याचे टाके असून त्यामागे चौरंगावर चौरंथीनाथांची छोटी मूर्ती आहे. ग्रंथराज ज्ञानेश्‍वरीच्या अठराव्या अध्यायातील सतराशे त्रेपन्नाव्या ओवीत या चौरंगीनाथांचा उल्लेख आलेला आहे. सप्तश्रृंगी पर्वतावर हातपाय तुटलेल्या चौरंगीनाथाला मत्स्येंद्रनाथ भेटले व तो सर्वांगांनी संपूर्ण झाला असे म्हटले आहे. या पहाडाच्या उजवीकडील टोकावर अडबंगनाथांची गुहा आहे व तेथेही पाण्याचे टाके आहे. कमी पावसाच्या या पहाडावर फिरताना, श्रावणामुळे मात्र हिरवी शाल पांघरल्यासारखी दिसत होती. कुठे कुठे आस्टर, सोनकीची फुले डोके वर काढून वाऱ्यासंगे डोलत होती. त्र्यंबकेश्‍वरच्या ब्रह्मगिरी पहाडावर शंकराने जटा आपटल्या ते स्थान आहे. तसेच इथे खडकावर गोरक्षनाथांनी लहानग्या अडबंगनाथाला आपटले तेव्हा उमटलेल्या खुणा पहायला मिळतात. श्रावण महिन्यात दर शनिवारी येथे यात्रा भरते तेव्हा खूप लोक येतात. गुरे चारायला येणाऱ्या गुराखी मुलांपैकी एकाने आम्हाला या पहाडावरील हे गुहांचे विश्व दाखविले, त्याबद्दल त्याला बक्षिशी म्हणून पैसे देऊ लागताच नको! नको!! म्हणत तो पसारही झाला. अंकाई-टंकाई व मनमाडच्या या भागात फिरताना सपाटीवर एखादा स्तंभ उभारल्यासारखा एक कातळसुळका एकट्याने उभा राहिल्यासारखा दिसत असतो. निसर्गाचा हा चमत्कार 'हडबीची शेंडी' या नावाने ओळखला जातो. थम्सअप पेयाच्या बाटलीवरील अंगठ्यासारखे हे निसर्गनवल दूरवरून खूप वेळ आपली साथ करीत असते.  

फोटो फीचर

संबंधित बातम्या