हरिद्वारची मनसादेवी

पांडुरंग पाटणकर 
बुधवार, 21 मार्च 2018

धार्मिक पर्यटन

हिमालयाच्या डोंगररांगांत निसर्गरम्य पर्यटकस्थाने आणि धार्मिक ठिकाणे यांचा समसमा संयोगच झालेला आहे. डेहराडून, मसुरी, सिमला अशा ठिकाणी जाण्यासाठी व चारधाम यात्रेसाठी हरिद्वार हे ‘जंक्‍शन’च ठरते. बद्रिनाथ-केदारनाथाची चैतन्यदायी यात्रा हरिद्वारहून सुरु होते. म्हणून हे ‘हरीचे द्वार’ म्हटले जाते. हरिद्वारच्या आगेमागे दोन उत्तुंग पर्वतरांगा आहेत. उत्तरेच्या शिवालिक पर्वतावर मनसादेवीचे स्थान आहे. तर दक्षिणेच्या नील पर्वतावर श्रीचंडी देवीचे शक्तिपीठ आहे. ही दोन्ही स्थाने नितांत रमणीय आहेत. गावाची वस्ती वाढल्यामुळे पुण्याची पर्वती आता गावातच आली आहे. पण हरिद्वारच्या मनसादेवीचा डोंगर आधीपासूनच गावाशी सलगी राखून आहे. पर्वतीवर जाण्यासाठी साररबागेपासून ‘केबलकार’ (विद्युत पाळणे) उभारायची कल्पना मांडली जाते. पण मनसादेवी शिखरावर जाण्यासाठी हरिद्वरामधून १९९७ सालीच ‘उडन खटोला’ म्हणजेच ‘केबलकार’ सुरु झालेली आहे. या ‘उडन खटोला’ सुरु करणाऱ्या कंपनीने तातडीने प्रयत्नपूर्वक आय.एस.ओ. ९००२ हे अधिकृत प्रमाणपत्रही मिळविलेले आहे. त्यामुळे प्रवासी निर्धोकपणे या रोपवे ट्रॉलीने मनसादेवीच्या दर्शनाला अखंड जात असतात. इकडच्या कुठल्याही प्रवासात हरिद्वारमध्ये एक-दोन तासांचा अवधी मिळाल्यास हे ठिकाण अवश्‍य पाहून येण्यासारखे आहे. हमरस्त्यावरील गऊघाट किंवा सब्जी मंडीतूनही पायी जाण्याचा रस्ता आहे. कश्‍यप ऋषींची मानसकन्या तथा जरत्कारु ऋषींची पत्नी तथा वासुकी नागाची बहीण अशा नात्याने या मनसादेवीच्या अनेक कथा पुराणात आलेल्या आहेत. कश्‍यप ऋषींच्या मानसिक संकल्पाने ती उत्पन्न झाली. म्हणून ‘मनसा’ नाव पडले. कथेप्रमाणे ती देवदेवतांचे, पितरांचे संकल्प पुरे करते म्हणून आजचे भाविकही तिला नवस बोलतात व आपले संकल्प पुरे करून घेतात. 

हरिद्वारमध्ये आल्यापासून गंगेच्या उजव्या तटामागील शिवालीक पहाडावरील मनसादेवीचे मंदिर स्पष्ट दिसत असते. तेथे केव्हा जातो असे होऊन जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजताच तिकडे पायी निघालो. गावातील मुख्य रस्त्यावरील गऊघाटासमोरच्या गल्लीतून डोंगर चढायला सुरवात केली. रेल्वेमार्ग ओलांडल्यावर पहाडावरील पायऱ्या सुरु झाल्या. १८५ पायऱ्या चढून गेल्यावर मोटरचा रस्ता आडवा येतो व लगेचच प्रवेशद्वारही दिसते. डोक्‍यावरून ‘रोप वे’चे पाळणे वर जाताना-येताना दिसतात. हे स्थान खूप जुने व दूरवरच्या भक्तांवर प्रभाव टाकणारे दिसते. कारण काही पायऱ्या व बाकड्यांवर रावळपिंडी, लाहोरकडच्या भाविकांनी आपली नावे कोरलेली आहेत. माथ्यावरील मुख्य मंदिरापाशी जाताच चहूकडचे विहंगम दृश्‍य पाहून डोळे तृप्त होतात. मार्गातील एका वृक्षाला अनेक लाल दोरे, गंडे बांधलेले दिसतात. नवस बोलणाऱ्यांनी ते बांधलेले असतात. व मनोकामना पूर्ण झाल्यावर पुन्हा दर्शनाला येऊन यापैकी एक गंडा सोडून नेतात. श्रीमद्‌देवी भागवत पुराणात देवीच्या १०८ सिद्धपीठांची यादी दिलेली आहे. त्यांत हरिद्वारच्या मनसादेवी, चंडीदेवी आणि मायादेवीचा उल्लेख आहे. सह्याद्रीतील एकवीरादेवी (कार्ला), करवीरची महालक्ष्मी, चिपळूणची विंध्यवासिनी असेही उल्लेख आहेत. मुख्य मंदिरातील मनसादेवी पुण्याच्या चतुःश्रुंगीसारखी शेंदरी स्वयंभू तांदळ्याची असून शेजारी काळ्या महिषासुराची मूर्ती आहे. तिच्या वरील बाजूस गायत्री देवीची तीन तोंडाची संगमरवरी मूर्ती असून त्यावर चांदीचा मुखवटाही आहे. मागील बाजूस चांदीची मखर असून छताकडे भक्तांनी अर्पण केलेल्या चांदीच्या छत्र्या लटकविलेल्या आहेत. प्रदक्षिणा मार्गावर मारुती, दत्तात्रेय, गणपती इत्यादी देवदेवतांचे कोनाडे आहेत. मंदिराच्या खालच्या स्तरात चामुंडा, हनुमान, महादेव, लक्ष्मीनारायण यांची मंदिरे आहेत. येथील मनसेश्‍वर महादेव हे पुरातन मंदिर देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस आहे. मुख्य मंदिराच्या मागील बाजूने एक मार्ग, प्राचीन अशा सूर्यकुंडाकडे जातो. ते सूर्यकुंड सुमारे १ किलोमीटर अंतरावर आहे. तेथे चौकशी केल्यास तिकडूनच खाली गंगेच्या काठी प्रसिद्ध ‘हर की पौडी’ वर जाता येते. 

हरिद्वार हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे मंदिरांची व गंगेवरील पवित्र ठिकाणांची मांदियाळीच आहे. गंगास्नानासाठी प्रसिद्ध असलेले ब्रह्मकुंड म्हणजेच ‘हर की पौडी’ गावाच्या मध्यावर आहे. तेथील सायंकाळची गंगेची आरती पाहण्यासारखी असते. गीता मंदिर, भारतमाता मंदिर, दक्ष प्रजापती मंदिर, भूमा निकेतन इत्यादी ठिकाणेही प्रेक्षणीय आहेत. ऋषिकेश व तेथील लक्ष्मण झुला (२४ किमी) तसेच डेहराडून (५२ किमी), मसुरी (८७ किमी) ही ठिकाणेही पाहता येतील.

फोटो फीचर

संबंधित बातम्या